गवळण - १ ते ५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
परब्रम्ह निष्काम तो हा गौळियां घरीं । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥
म्हणती गौळणी हरीचीं पाउलें धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥
लपत छपत येतो हरी हा राजभुवनीं । नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनीं ॥३॥
सांपडला देव्हारीं यासी बांधी दाव्यांनीं । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥४॥
बहुता कष्टें बहुता पुण्यें जोडलें देवा । अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ॥५॥
नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा । जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ॥६॥
२.
गेलिया वृंदावना तेथें देखिला कान्हा । संवगडिया माजी उभा ध्यान लागलें मना ॥१॥
हरिनाम गोड झालें काय सांगों गे माय । गोपाळ वाहती पावे मन कोठें न राहे ॥२॥
त्याचें मुख साजिरें वो कुंडलें चित्त चोरें । सांडुनी अमृत धनी लुब्धलीं चकोरें ॥३॥
सांडुनी ध्रुवमंडळ आली नक्षत्रमाळा । कौस्तुभा तळवटीं वैजयंती शोभे गळां ॥४॥
सांडुनी मेघराजु कटिसूत्नीं तळपे विजू । भुलला चतुराननू तया नव्हे उमजू ॥५॥
सांडुनी लक्ष्मी निज गोपाळासी बोले गुज । अचोज हा चोजवेना ब्रम्हांदिकां सहज ॥६॥
वांजट धीट मोठी ऐसी कवण असे खिळू । भेदली हरिचरणीं पायीं मुरडीव वांकी सोज्वळू ॥७॥
त्याचें पायींची नेपुरें वाजती वो गंभीरें । लुब्धलीया पक्षयाती धेनु पाचारी स्वरें ॥८॥
आणिक एक नवल कैसें स्वर्गीं देव झाले पिसे । ब्रम्हादिक उच्छिष्ठालागीं देखा जळीं झाले मासें ॥९॥
आणिक एक नवल परी करीं घेऊनि शिदोरी । सवंगडया वांटितसे नामया स्वामी मुरारी ॥१०॥
३.
यशोदे घराकडे चाल मला जेवूं घाल ॥धु०॥
साध्या गव्हांची पोळी लाटीं । मला पुरण पोळी करून दे मोठी । नाहीं अडवीत गुळासाठीं । मला जेवूं घाल ॥१॥
तूप लावून भाकर करीं । वांगें भाजून भरीत करीं । वर कांद्याची कोशिंबिरी । मला जेवूं घाल ॥२॥
आईग खडे साखरेचे खडे । लवकर मला करून दे वडे । बाळ स्फुंदस्फुंदोनी रडे । मला जेवूं घाल ॥३॥
आई लहानच घे गे उंडा । लवकर भाजुन दे मांडा । लांब गेल्या गाईच्या झुंडा । मला जेवूं घाल ॥४॥
आई मी खाईन शिळा घांटा । दह्याचा करून दे मठ्ठा । नाहीं माझ्या अंगीं ताठा । मला जेवूं घाल ॥५॥
भाकर बरीच गोड झाली । भक्षुनी भूक हारपली । यशोदेनें कृपा केली । मला जेवूं घाल ॥६॥
आई मी तुझा एकुलता एक । गाई राखितों नउ लाख । गाई राखून झिजलीं नख । मला जेवूं घाल ॥७॥
नामा विनवी केशवासी । गाई राखितो वनासी । जाऊन सांगा यशोदेशी । मला जेवूं घाल ॥८॥
४.
तळवे तळहात टेंकीत । डाव्या गुडघ्यानें रांगत । रंगणी रंगनाथ । तो म्यां देखिला सये ॥१॥
गवळण जसवंती पैसांगे । आलेवर कृष्णाचेनि मागें ।
येणें येणें वो श्रीरंगें । नवनीत माझें भक्षिलें ॥२॥
एक्या हातीं लोण्याचा कवळु । मुख माखिलें अळुमाळु ।
चुंबन देतां येतो परिमळु । नवनीताचा ये सये ॥३॥
येणें माझें कवाड उघडिलें । येणें शिंकें हो तोडिलें ।
दह्यादुधातें भक्षिलें । उलंडिलें ताकातें ॥४॥
ऐसें जरी मी जाणतें । यमुनापाणिया नव जातें ।
धरूनि खांबासी बांधितें । शिक्षा लावितें गोविंदा ॥५॥
ऐसा पुराण प्रसिद्ध चोर । केशव नाम्याचा दातार ।
पंढरपुरीं उभा विटेवर । भक्त पुंडलिकासाठीं ॥६॥
५.
जाऊं पाण्या निसुरवाण्या । आळवीती गोड राण्या ॥ध्रु०॥
गोविंद गीतीं गाऊं गोविंद गीतीं गाऊं । आनंदें जाऊं पाण्या ॥१॥
खाऊं कंदमुळें आम्ही असों वनीं । न देखों श्रीकृष्ण न ऐकों कानीं ॥२॥
आम्ही गोड भिल्लिणी काय ऐसी बोली । तुझिया नामाची लागली आवडी ॥३॥
आजीचा दिवस आम्हां झालासे आनंदु । विष्णुदास नामा यानें लावियेला छंदु ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP