उत्तरार्ध - अध्याय ४७ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


वैशंपायन सांगे, “प्रभुची भव्या कथा परिस. राया ! ।
उग्रा बहुकल्पांची होय जनिभृतिव्यथा परि सराया. ॥१॥
श्रीनारसिंहनामा प्रादुर्भाव प्रभूत्तमाचा या, ।
श्रवण करुनि,क भगवज्जन लागति, होऊनि मुदित, नाचाया. ॥२॥
दैत्यांचा आदिपुरुष, विख्यात हिरण्यकशिपु या नांवें, ।
तप करि, जें, रोमांचित होऊनि, देवादिकींहि वानावें. ॥३॥
तप अपविघ्न करी तो सार्धैकादशा सहस्र हायन, हो ! ।
ब्रम्हा प्रसन्न झाला; धीरा कृतनिश्चयासि काय न हो ? ॥४॥
बैसुनि दिव्यविमानीं सुरजनमुनिजनसमेत ये धाता, ।
“ताता ! वर माग,” म्हणे, “आलों द्याया अभीष्ट मी दाता.” ॥५॥
कनककशिपु नमुनि म्हणे,  “देवासुर, उरग, यक्ष, गंधर्व, ।
राक्षस, पिशाच, मानव, न वधुत, शापुन ऋषिप्रवर सर्व. ॥६॥
शस्त्रास, वृक्ष, पर्वत, शुष्कार्द्र, इहीं नसोचि वध माजा, ।
येतां काळ, म्हणावें त्या, अयश नसो फिरोनि; अधमा ! जा.’ ॥७॥
स्वर्गीं, कीं पाताळीं, भूवरि, गगनीं, नसो निशा, दिवसा; ।
लोकपतींस म्हणावें, ‘होऊनि मम दास, शतमखादि, वसा.” ॥८॥
व्हावें म्यां तपन, शशी, वायु, दहन, उदक, गगन, नक्षत्रें; ।
दशदिग्रूप धरावें, ठाकावें मजसमोर न क्षत्रें. ॥९॥
धात्या ! व्हावें त्रिजगीं म्यांचि अहंकार, कोप, यम, शक्र, ।
वरुण, धनद, विदिगीशहि; असुरांचें वश मला असो चक्र. ॥१०॥
मज मूर्तिधरें अस्त्रें व्हावीं युद्धीं  उपस्थितें सर्वें; ।
गर्वें आला अरि म्यां भंगावा, पंचशर जसा शर्वे. ॥११॥
एकें करप्रहारें सबळा मज जो शकेल माराया, ।
त्यपासुनि मृत्यु असो.” वर मागे विधिस दैत्य हा, राया ! ॥१२॥
द्रुहिण म्हणे, “वर दिधले, तूं या सर्वांहि पाव कामांतें;” ।
वातें जेंवि म्हणावें, होऊनि अनकूल, पावका, ‘मातें.’ ॥१३॥
वर देउनि निजलोकीं जातां, मुनिदेव म्हणति “बा ! धात्या ! ।
दिधले असे कसे वर, विश्वासि करावयासि बाधा, त्या ? ॥१४॥
अद्भुत वर जरि दिधले लोकक्षयकर पितामहा ! यास, ।
चिंतीं वधहि, घडों दे स्वापत्यासि न पिता महायास.” ॥१५॥
ब्रम्हा म्हणे, “तपाचें फळ पावावें अवश्य दितितनयें, ।
भगवान् वधिल, तपस्या सरतां, त्यातें तयाचिया अनयें. ॥१६॥
विधिवाक्य श्रवण करुनि, गेले ते स्वस्थळासि देव मुनी, ।
सर्व प्रजांसि भय तो, सिंधुकुशांस न विषाग्नि दे वमुनी. ॥१७॥
जे सत्यधर्मनिरत ब्राम्हाण होते धरूनि आश्रम, ते, ।
कनककशिपुकृत धर्षण सहुनी, झाले म्हणोनि ‘हा !’ श्रमते. ॥१८॥
सर्वहि सुर जिंकुनि, तो त्रैलोक्य करूनि वश, वसे नाकीं; ।
असुरांसि पुसे, “कोणी अजित पर त्रिभुवनीं असेना कीं ?” ॥१९॥
सुर केले यज्ञाच्या भागासि अपात्र, असुर ते पात्र; ।
बा ! त्रस्त साधु झाले, भ्याला अनयें न एक हामात्र. ॥२०॥
गेले शक्रादि सकळ देव शरण विष्णुतें शरण्यातें, ।
ज्याचा प्रतापदावानळ नुरवी नतविपत्त्यरण्यातें. ॥२१॥
श्रीविष्णु म्हणे, “सुर ! हो ! व्हा स्वस्थ, रहा, धरूनि न भयातें; ।
वरमत्त अवध्य जरिहि, करितों लीलेंकरूनि नभ यातें.” ॥२२॥
देउनि अभय स्वमुखें, आला जगदीश हरि हिमनगातें, ।
सत्कवि म्हणति, “जयातें, ज्ञात्याचें मुक्त तरिहि मन, गातें.” ॥२३॥
चिंती प्रभु तुहिननगीं ऐसें कीं “शीघ्रसिद्धिकर रूप, ।
म्यां कोणतें धरावें ? माराया उग्र हा असुरभूप.” ॥२४॥
मग ये कनककशिपुच्या अतुळ सभेतें वधावयासि अरी, ।
दिव्य, अनुत्पन्न, असें अत्यद्भुत नारसिंहरूप धरी. ॥२५॥
शत गांवें, जींत गुरुहि दु:ख लेश न तगावें. ॥२६॥
जी उंच पांच गांवें, जींत गुरुहि दु:ख लेश न तगावें. ॥२६॥
जींत मणिस्तंभ रुचिर, मणिबद्धें हंसमंडितें सुसरें, ।
नंदनवनाधिक वनें, एक सभारत्न तें, नसे दुसरें. ॥२७॥
हस्तचतु:शतमात्र स्वर्णकशिपुचें अनर्घ आसन तें, ।
ज्या भजति अमरवृंदें, निकटस्थितिचीच धरुनि आस, नतें. ॥२८॥
विरजस्क मंद वाहे जेथें सुख पवन नव नव सुवास, ।
धरि, तेंवि महेंद्राचें धनदाचें भवन न वन वसु, वास. ॥२९॥
रचुनि प्रबंध सुललित, याचें गंधर्व सर्व यश गाती, ।
नाचति वराप्सरा, जी लोकपसंपत्. तयासि वशगा ती. ॥३०॥
तेजें गमे विचित्राभरणांबरधर हिरण्यकशिपु रवी, ।
उग्र परि स्वजनाची, पद्माची प्रीति भानु कशि पुरवी ? ॥३१॥
लब्धवर विरोचन, बळि, नरक, प्रर्‍हाद, विप्रचित्ति, असे ।
दैत्य शतसहस्र, तयांमध्यें दैत्येंद्र तो प्रहृष्ट असे. ॥३२॥
होता स्त्रीशतवेष्टित दिव्यसभेमाजि रत्नपर्वतसा, ।
वरतेजा, पर ते ज्या तृणसे, दैत्येंद्र मूर्त गर्वतसा. ॥३३॥
तों नरहरि दैत्यांहीं त्या दिव्यसभेम्त देखिला, राया ।
आश्चर्य क्षण, मग भय, वृषभांच्या फार दे खिलारा या. ॥३४॥
ते दैत्य कनककशिपुप्रमुख म्हणति, “देखिलें न हें मागें, ।
शशिसित नरहरिरूप स्रजिलें न असें हिमागहेमागें.” ॥३५॥
प्रर्‍हाद पित्यासि म्हणे, “या नरहरिच्या विचित्ररूपातें ।
नीट पहा, यांत दिसे, जें आहे विश्व, दैत्यभूपा ! तें.” ॥३६॥
दितिसुत म्हणे, “सुभट ! हो जीवंत धरा नृसिंह पाळाया. ।
जरि सांपडेल न सुखें, हो कंठीं प्राप्त शस्त्रपाळा या.” ॥३७॥
सुररिपुनिकरें, त्रिपुरें ज्यापरि भवदेव, वेढिला हो ! तो; ।
अहिगण झटो, न गरुडा त्या परिभव देववे, ढिला होतो. ॥३८॥
गर्जे नरहरि, भंगी क्रोधें दिव्या तसी अरिसभा जी; ।
असुरपतिस, दावानळ जेंवि गजा, बहु तयापरिस भाजी. ॥३९॥
श्रीनरहरिवरि योजी आधीं दंडास्त्र देवरिपुशक्र, ।
मग काळचक्र सोडी अतिदारुण, विष्णुचक्र, ऋषिचक्र. ॥४०॥
तो धर्मचक्र सोडी, पैतामहचक्र दैत्यपति टाकी, ।
शुष्काशनि, आर्द्राशनि, सोडी बहु; ‘हाय !’ म्हणति तों नाकी. ॥४१॥
कंकाळ, मुसळ, शूळ, ब्रम्हास्त्र, तसेंचि ऐंद्र तो सोडी; ।
ऐशीक आणि शैशिर, आग्नेय, महानगांसि जें फोडी, ॥४२॥
वायव्य कपाळाभिध, किंकरनामास्त्र, हयशिरोस्त्र, तथा ।
क्रौंचास्त्र, महाशक्तिहि, जी दावी अरिस मृत्युलोकपथा, ॥४३॥
पैशाच, सार्प, मोहन, शोषण, संतापनास्त्रही योजी, ।
टाकी विलापनास्त्र विजृंभण पातन; न देव तें मोजी; ॥४४॥
त्वाष्ट्र प्रकटी, मोहन, संवर्तन, काळमुद्नरहि भारी; ।
मायाधर गांधर्वहि, असिरत्नहि, जें अरातितें मारी. ॥४५॥
क्षोभण, वारुण योजी, प्रस्वापनही वधावया स्वारी, ।
प्रमथनहि, पाशुपतही, बा ! कोणीही न अस्त्र ज्या वारी. ॥४६॥
ऐसीं अस्त्रें, शस्त्रें, कनककशिपु, तद्भटौघही वर्षे, ।
स्पर्शे पदासि, तें तें, पावुनि दु:संगमोचना, हर्षे. ॥४७॥
अस्त्रें वेंची, मानी ढन योजुनि जेंवि काज वेंचितसे; ।
ते ते प्रताप झाले, भास्करभगेच्छु काजवेचि तसे. ॥४८॥
अक्षत नरहरिवरि ते अरि. तेजें बहुत सोडिती चक्रें, ।
प्रभुनें गिळितां, केला बहु जयजयकार सामरें शक्रें. ॥४९॥
मग पावकप्रभा त्या अहितानें प्रेरिली महाशक्तीं, ।
प्रभुहुंकारें भंगे, प्रत्यूहें जेविं तामसी भक्ती. ॥५०॥
मग नरहरिवरि अरि ते उपळांची करिति दारुणा वृष्टी, ।
प्रभुतनु भंगी तीतें, मायेतें सुकविची जसी द्दष्टी. ॥५१॥
जळवर्ष सोडिलें. मग, रज्जुसमा प्रकटल्या तदा धारा, ।
वरि जळति, गळति बाहिर, त्या नाहीं स्पर्शत्या सदाधारा. ॥५२॥
केले प्रकट दितिसुतें दहन, पवन; पेटला महादहन, ।
मह न त्रिदशांत उरे, कीं वाटे गिळिल तो जगद्नहन. ॥५३॥
नरहरिपुढें शिखीच्या त्या तेजाचें न मांडलें कांहीं, ।
‘झाला भस्म अरि,’ असा  केला बोभाट रांडलेकांहीं. ॥५४॥
शक्र, घनांतें आज्ञा करुनि, महावृष्टि पावकीं करवी; ।
होय प्रसन्न भगवान, सेवा स्वल्पाहि अवसरीं बरवी. ॥५५॥
पावकमाया शमतां, प्रकट असुरराज घोर करि तम तो, ।
देवर्षि म्हणति, “कां हो ! अद्यापि प्रभुपुढेंहि अरि तमतो ?” ॥५६॥
प्रकटी नरकंठीरव निजमूर्तिद्युति, तमासि ती निवटी, ।
ज्याची स्मृति होय महामायातिमिरीं जड जना दिवटी. ॥५७॥
सर्वा माया शमतां, भ्याले ते असुर सोडिती धीर, ।
जाती कनककशिपुला शरण, न रणमरण वांच्छिती वीर. ॥५८॥
तेव्हां कांचनकशिपु क्षोभे, बहु कांपवी धरा समुदी; ।
गडबडली देवीच न, देवाच्या विरह दे करास मुदी. ॥५९॥
सागरहि उचंबळले, तटिनीचा जो प्रवाह तो उलटा; ।
खचलीं गुरुगिरिशिखरें; धृति ह्रदयीं न, सुपथीं जसी कुलटा ॥६०॥
उत्पात विविध झाले, शास्त्रश्रुत अनुभवासि ते आले, ।
असुर बहु मनीं भ्याले, प्रेक्षक रोमांचकचुका ल्याले. ॥६१॥
दितिसुत शुक्रासि पुसे, ‘कथिती उत्पात काय ? हो ! तात ! ।
अत्युग्र हे पहातां, रोमाचित वीरकाय होतात.” ॥६२॥
शुक्र म्हणे, “राष्ट्रीं ज्या राजाच्या प्रकटतात हे घोर, ।
होतें राष्ट्रहरण कीं राजमरण, सांगतात हें थोर.” ॥६३॥
ऐसें उत्पातांचें फळ बळवत्, सत्य, भावि, आयकवी, ।
परमगुरु तें निवेदुनि निजशिष्या, स्वालयासि जाय कवी. ॥६४॥
गुरु जातां, असुरेश्वर ह्रदयीं पावे मुहूर्त मोहातें, ।
धांवे नरहरिवरि अरि अत्युग्र गदा धरूनि तो हातें. ॥६५॥
तेव्हां कांपे अचळा अचळांसह चळचळां, जसी तरणी; ।
शीत रणीं देवांला ये, विप्रभ जाहला शशी, तरणी. ॥६६॥
तक्षक वासुकि, शेषहि, कांपे, मग का न आन कांपावे ? ।
कनककशिपु सिंहध्वनि दे, परमोत्साह आनकां पावे. ॥६७॥
कृष्णा, गोदा, शरयू, यमुना, इत्यादि आपगा, त्यांतें ।
तो कांपवी, न बाधों देती ज्या पापताप गात्यांतें. ॥६८॥
तों रुद्रादित्यादि प्रभुसि म्हणति, “कांपतात लोक पहा, ।
देवा ! मारावा हा अरि शीघ्र, म्हणोत हे न लोकप ‘हा !’ ॥६९॥
नरसिंहा ! कालाहुनि देताहे न्य़ून कांप हा काय ? ।
डळमळती भू  पादन्यासें, बुडविल न कां, पहा, काय ? ॥७०॥
विश्वस्वस्तिकर नसे तुजवांचुनि अन्य, पाव, नाश तशा ।
कनकाक्षाचा केला, वधिसि सदरि तूंचि पावना ! शतशा.” ॥७१॥
सर्वामरसंप्रार्थित, भगवान् नरकेसरी करी लगट, ।
गर्जे बहु, मुख पसरुनि, वाटे विश्वासही करील गट. ॥७२॥
असुरांच्या हृदयांतें झाला नरसिंह गर्जनें चिरिता, ।
तज्जीवन किति ? करिता जलनिधिही नादसर्जनेंचि रिता. ॥७३॥
जेविं करावी गरलावरि म्हणवायास ‘हा !’ निकड कडुंनीं; ।
अरिंनीं केली प्रभुवरि तसि, जरि करि गर्वहानि कडकडुनी. ॥७४॥
मोठयामोठया असुरांसह धांवे दैत्यराज माराया, ।
नरहरि, उडोनि, गांठी त्या प्रबळांतें पळांत, बा ! राया ! ॥७५॥
सत्सुख खळक्षय करी, ठाव्या जगदेककोविदा रीती, ।
जी अशनिगुरु अरितनु, प्रभु नखरांहींच तो विदारी ती. ॥७६॥
त्या शशका, व्याघ्रचि तो दे, वरि घालूनियां कव, चपेटा; ।
न उरे व्याघ्रापासुनि, न धरुनि बहुलीनताकवच, पेटा. ॥७७॥
प्रभुनें पळांत पर परमोग्रहि सहसा, हरूनि मद, वधिला; ।
जो मत्त म्हणे, “ईश्वर मीच, प्रभु कोण करिल मदवधिला ? ॥७८॥
इतरांतेंहि, न लावी पळ तो निजभक्तसुरतरु, चिराया, ।
प्रभुचें उग्रहि सुचरित गाती, विसरूनि सुरतरुचि, राया ! ॥७९॥
वंदिति, पुष्पें वर्षति सुर, ‘जय ! जय !’ म्हणति, करिति सुस्तवन, ।
“कीं हेंचि सुसुख, राज्य त्यजुनि, वरिति कवि चरित्रपुस्तवन. ॥८०॥
गातिल सत्कवि सादर या सुयशा विजितदेवतर्वतुला, ।
घ्यातिल मोह शमाया, श्रीनृहरे ! पूजितील सर्व तुला.” ॥८१॥
अर्चुनि, आज्ञा घेउनि, सामर विधि जाय आत्मलोकाला, ।
प्रभुहि श्वेतद्वीपाप्रति गेला, हरुनि. विश्वशोकाला. ॥८२॥
पूजाया भक्तांहीं, पुरुषार्थ सुखेंकरूनि साधाया, ।
प्रभु निजनरहरिमूर्ति स्थापी, पीडा जना न बाधाया. ॥८३॥
अत्यद्भुत नरसिंहप्राहुर्भाव प्रभुप्रसादानें ।
हा लेश गायिला म्यां, पर अभयांचीं न दे असा दानें. ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP