उत्तरार्ध - अध्याय २६ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.



श्रीकृष्ण रुक्मिणीसह रैवतकीं पर्वतोत्तमीं आला, ।
द्याया बहुमान, तिचें शुभ उपवासावसान जें, त्याला. ॥१॥
षोडश सहस्त्र भार्या, सुतबंधुज्ञातिवर्ग झाडून, ।
प्रथम पुढें हयरथगजशिबिकांहीं द्विज सदार धाडून, ॥२॥
दयिताब्रतावसानीं विप्रांतें विपुल दक्षिणा अर्पी, ।
वस्त्रालंकारांहीं, विविधान्नें, कृष्ण आदरें तर्पी. ॥३॥
पुरवुनि वांछित अर्थी कृष्णें, यादवहि, सर्व जेवविले. ।
रामासि रुक्मिणीनें रत्नालंकार, सुपट, लेवविले. ॥४॥
तों श्रीनारद आला जेथें श्रीकृष्ण, रुक्मिणी देवी; ।
ठेवी शिर पायांवरि, पूजी प्रभु दाससा तया, सेवी. ॥५॥
देवर्षि पारिजातद्रुमकुसुम प्रभुसि दे, प्रभुहि फुल तें ।
दे रुक्मिणीस, जीचें मन पत्युपभक्तसेवनें भुलतें. ॥६॥
परम प्रसाद, यास्तव ती त्या पुष्पीं पतिव्रता लोभे; ।
इंगित जाणुनि पतिचें, धरुनि शिरीं, द्विगुण रुक्मिणी शोभे. ॥७॥
तीतें देवर्षि म्हणे, “रुक्मिणि ! कृष्णस्त्रियांत तूं धन्या, ।
तरिच तुला पुष्प दिलें; प्रभुसि तुजअसि प्रिया नसे अन्या. ॥८॥
योग्य तुजचि, समलंकृत तव संसर्गेंकरूनि हें झालें; ।
तूं सत्सभाचि, पुष्प प्रभुचरितचि, यासि शोभणें आलें. ॥९॥
हें पारिजातकुसुम श्रीमति ! अम्लान सर्वदा असतें, ।
वांछित सुगंध देतें, दूध सुरभिचें श्रिता जसें रस तें. ॥१०॥
शीतहि, उष्णहि, देतें; नाना पुष्पेंहि वांच्छिलीं देतें; ।
सति ! दीपकर्म करितें; हें विलयातें क्षुधातृषा नेतें. ॥११॥
रुक्मिणि ! लघु गुरु होतें; ग्लानि, जरा, व्याधि, आधि, हें हरितें; ।
देहीं वर्ण, कृशत्व, स्थूलत्वहि, इच्छिलें तसें करितें. ॥१२॥
हें धरितां, मति धर्मीं होती, सौभाग्य वाढतें, आर्ये ! ।
बहु वाद्यगीतनाद प्रकटितसे, लोकबंधुचे भार्ये ! ॥१३॥
बहु गुण या पुषाचे, देतें धरित्यासि नित्य हर्षभर; ।
जाइल तरुराजाप्रति, रुक्मिणि ! तुजजवळि वसुनि वर्षभर. ॥१४॥
येयिल पुन्हांहि करितां स्मरण, सुकुसुमें असीं उमा देवी, ।
श्रीविश्वेश्वरदयिता, विश्वनुता, भगवती, सदा सेवी. ॥१५॥
अदिति, शची, सावित्री, लक्ष्मी विष्णुप्रिया, अमरभार्या,।
भोगिति या पुष्पातें, ज्या ज्या सुपतिव्रता, सुमति, आर्या. ॥१६॥
‘पतिस बहू आवडत्यें,’ म्हणवुनि जी आपल्यास मानवती  |
निवविल मनास या अपमानें कसि तापल्यास मानवती ? ॥१७॥
‘आपण सौभाग्याढया, न,’ असें तीच्या मनांत बाणेल, ।
सत्राजिती तुझा बहु सौभाग्योत्कर्ष आजि जाणेल. ॥१८॥
पतिला अतिलावण्यें, शीलें, वश व्हावयासि साजेल, ।
परि परिसुनि तव सुयशा, रामा भामादि फार लाजेल.” ॥१९॥
इत्यादि सुरर्षि वदे. तें दासीकथित आयिके भामा; ।
अपमानदु:ख विरवी तद्देहा, जळ जसें घटा आमा. ॥२०॥
ऐकुनि अपमान, करी जाणों परिहारयत्न हा रमणी, ।
फाडी वस्त्र क्रोधें, विखरी तोडूनि रत्नहारमणी. ॥२१॥
इतरा म्हणती, ‘ज्येष्ठा वैदर्भी होय सर्वथा अर्हा.’ ।
भगवद्दयिता भामा मानी स्वविपक्षसत्क्रिया गर्हा. ॥२२॥
आवडती म्हणुनि करी, मानुनि निजमानघात, रुसवा हे, ।
हृदयांत, ताप ज्याचें फळ, जो कोपाख्य, या तरुस वाहे. ॥२३॥
बांधुनि शिर, शून्यगृहीं निजली, नेसूनि शुभ्र पातळ ती. ।
संवाहनकामा परि धाकें दासी पदा न आतळती. ॥२४॥
प्रभु हें कळतांचि, मिषें भैमीपासुनि निघोनि रैवतकीं, ।
ये सांत्वनार्थ धांवुनि, समयज्ञ, दयार्द्र, मुख्य दैवत कीं, ॥२५॥
ज्यासि म्हणे वैदर्भी, “मत्कर्णीं, “मत्कर्णीं धर्मसत्कथा यो, जी !” ।
त्या मुन्युपचारार्थ प्रधुम्ना साधु सादरा योजी. ॥२६॥
प्रभु विश्वकर्मनिर्मितसदनद्वारांत दारुका ठेवी, ।
जाय हळून न कळतां, जेथें ती खीन्नमानसा देवी. ॥२७॥
दूरूनि भीतभीत श्रीपति कुपिता मन:प्रिया पाहे, ।
मृदुचरणांगुष्ठनखें उकरीत क्षोणितें सती आहे. ॥२८॥
लीलाकमळदळांतें सुनखांहीं लेश लेश तोडून, ।
जोडून स्वमुखीं तें, ती हांसे, श्वास उष्ण सोड्न. ॥२९॥
प्रेष्यार्पित चंदनरस घेउनि, वर्ण न यथेष्ट मांडून, ।
क्रोधावेशभ्रांता होती टाकीत सर्व सांडून. ॥३०॥
ठेउनि वामकरतळीं मुख, धरुनि ध्यान, ते पुन्हां सोडी; ।
शयनीं पळ निजुनि, उठे, लागे कोठेंहि नच जिला गोडी. ॥३१॥
अंतर्बाहय क्रोधें, पहिली प्रेमें जसी, तसी भिजली; ।
शिर ठेउनि उपधानीं, झांकुनि पदरें मुखाब्ज, ती निजलीं. ॥३२॥
त्या समयीं प्रेष्यांतें संज्ञा करि हरि, मुनिव्रता धरवी, ।
शंकित समीप जाय, प्रभुची हे रीति आयका बरवी. ॥३३॥
प्रेष्येच्या हस्तीं जें चामर, सज्जनमयूरघन घे तें, ।
ढाळीत उभा राहे; सेवी त्या देवदेव अनघेतें. ॥३४॥
प्रभुकरसंसर्गी त्या कुसुमाचा तीस चेव दे वास, ।
प्रेष्यांसि सुगंध पुसे, उठुनि, न जाणूनि देवदेवास. ॥३५॥
प्रेष्या नमिति, न वदती, जाणों त्या जाणती न बोलाया. ।
पाहे चहूंकडे, तों देखे तीचीच द्दष्टि लोला या. ॥३६॥
प्रभुतें पाहुनि, भामा देवी भगवत्प्रिया म्हणे, “युक्त”. ।
पाहे अन्यत्र, निघे एकमुहूर्त न तिच्या मुखें उक्त. ॥३७॥
नेतें भवाब्धिच्या जें ध्यात्यासि पलीकडील कांठीं, तें ।
श्रीमुख रागें पाहे ती, घालुनि भोवयांत गांठींतें. ॥३८॥
‘मग बहु शोभसि,’ ऐसें म्हणुनि, वदन वामकरतळीं ठेवी, ।
हौनि अधोमुखी, स्फुरदधरा, लागे रडावया देवी. ॥३९॥
अंभोजदळांपासुनि शुद्ध हिमसलिल नृपा !  जसें गळतें, ।
स्रवलें त्या भामेच्या नेत्रांपासूनि जें तसें, जळ तें, ॥४०॥
वरिचेवरि हस्तांहीं धरुनि, प्रभुवर उर स्थलीं जिरवी; ।
मिरवी स्नेहातिशय, प्रीति श्रीजानिची नव्हे हिरवी. ॥४१॥
श्रीकृष्ण म्हणे, “दयिते ! तव नयनांतूनि तोय कां आलें ? ।
वदन प्रभातहिमकरमध्यान्हांबुजसमान कां झालें ? ॥४२॥
केसररंजित रुचतें, किंवा कौसुंभ वस्त्रयुग, वामे ! ।
पूजेंतचि समुचित हें कां रुचलें शुभ्र आजि तुज ? रामे ! ॥४३॥
रत्नालंकारांचें सति ! सुभगे ! देवि ! सर्वदा पात्र, ।
केवळ अनाभरण कां आजि तुझें मन्मनोज्ञ हें गात्र ? ॥४४॥
वदन, रदनमणिरुचिनें हरुनि द्यति, पाडणार कुंद रितें, ।
गतपत्रलेख जेणें, कारण वद, जें असेल, सुंदरि ! तें. ॥४५॥
मुक्तामणिहार सदा जो प्रिय तुज याचि हरिसम, स्तनग, ।
सुगुण, सुवृत्त, असावा तो, सति ! नसतील जरि समस्त नग. ॥४६॥
पूर्णेदुसपत्नें या, उत्पळगंधें, स्मितप्रभासदनें, ।
सुमुखि ! किमपि न वदसि कां अमृतमधुरसूक्तिसुनिपुणें वदनें ? ॥४७॥
न पहासी एकेंही नयनें कुवलयदलाद्दतस्पर्धें; ।
अर्धेहि तरि मला तूं देवि ! विलोकूनि, म्हण,     ‘सुखें ! वर्धे.’ ॥४८॥
देवि ! तुझा किंकर मी, हें या लोकीं प्रसिद्ध; मग मातें ।
कां आज्ञा न करिसि तूं ? खगमा तें भव्य, जेंचि अगमातें. ॥४९॥
म्यां केलें काय तुझें विप्रिय ? जेणेंकरूनि आयास ।
देसी अतिसुकुमारा देहा, सुंदरि ! असत्व हा, यास. ॥५०॥
कर्में, वचनें, चित्तें, त्वल्लंघन देवि ! करित मी नाहीं; ।
तव मानिलें मदसुंहीं, गंगेचें जेविं चरित मीनांहीं. ॥५१॥
बहुमानपात्र मात्र श्रीमति ! अन्या स्त्रिया खरें, जाण; ।
स्नेहहि, बहु मानहि, सति ! तुझिया ठायीं असे, तुझी आण. ॥५२॥
यौवन तुझें स्थिर असो; नच, न घडायासि सुरत, रुसवा हो; ।
मन्निश्चय या अर्थी गंधाक्षत कां न सुरतरुस वाहो ? ॥५३॥
गंधक्षमादि सुगुण प्राणेश्वरि ! जेविं भूमिच्या राहे, ।
तैसा तव स्वरूपीं स्थिर माझा स्नेह सर्वदा आहे. ॥५४॥
अर्कीं प्रभा, हिमकरीं कांति, जसी सुरसुतोपमे ! असती, ।
गुणगेहीं तव देहीं तैसी मत्प्रीति, सर्वदा वसती.” ॥५५॥
ती प्रभुसि म्हणे, “पूर्वीं होती, ‘माझाचि तूं,’ असी समज, ।
सामान्य आजि कळतां, जाडयें श्रम कां नसो असीस मज ? ॥५६॥
नेणें काळगतिस मी, विपरीत अनित्य सर्व जी करिती; ।
आजि समजली, ख्याता आहे लोकांत सर्वदा परि ती. ॥५७॥
मेल्यावांचुनि घडलें मज दुसरें जन्म आजि, कींम भेद ।
झाला, तूं पति, मी स्त्री; हा देतो फार या मना खेद. ॥५८॥
झाल्यें तुज द्वितीया, झालासि मज द्वितीय तूं आजी; ।
किंबहुना, हृदय तुझें जाणतसे भेद, हा मना भाजी. ॥५९॥
कृष्णा ! माधुर्य तुझ्या न मनीं, वदनींच नांदतें या हें. ।
माझ्या ठायीं कपटस्नेह, असें स्पष्ट आजि मी पाहें. ॥६०॥
याचि जनीं कृत्रिम हा स्नेह, न अन्यत्र, हें कळों आलें; ।
‘आ’ लेंकरूं करी जें, घालावें मधु तयाम्त कीं आलें ? ॥६१॥
पुष्पांजलिसा देह स्त्री जी देवा ! घनप्रभा ! वाहे, ।
कपटें तूं अवमानिसि, वंचिसि, भक्ता ऋजुस्वभावा हे. ॥६२॥
द्रष्टव्य देखिलें म्यां, श्रोतव्यहि ऐकिलें;  नसे तृष्णा; ।
स्नेहला फल आलें, झालें पर्याप्त सर्वही, कृष्णा ! ॥६३॥
कृष्णा ! अनुग्रहाला भाजन हा जन असेल जरि काय, ।
देसिल आज्ञा, वेंचिन तप करुनि तपोवनांत, तरि काय. ॥६४॥
पतिच्या छंदें केलें व्रत तप जें काय, सर्व तें फळतें; ।
मळतें यश अच्छंदें; स्त्रीधर्मरहस्य हें मला कळतें.” ॥६५॥
ऐसें बोलुनि, झांकुनि पतिच्या पीतांबरांचळें वदन, ।
राणी पाणी आणी नयनीं, करि घाबरें जगत्सदन. ॥६६॥
कृष्ण म्हणे, “देवि ! असा आयास मनास सेव्य कां गमला ? ।
माझा शपथ तुज असे, जें सत्ये ! सत्य, तेंचि सांग मला. ॥६७॥
म्यां भक्तें ऐकावें, वदतां नाशहि नसेल, तरि बोल. ।
लोल श्रवणीं आहें, प्रेमाचें त्वन्मनीं असो ओल.” ॥६८॥
पतिचा पाहुनि सत्या सत्यादर, गहिंवरे, म्हणे, “देवा ! ।
माझें सौभाग्य जगीं वाढविलें त्वांचि, घेतली सेवा. ॥६९॥
स्वविपक्षजनीं ऐकत होत्यें स्वस्तवनगर्भिता गाथा, ।
नाथा ! माझा लवला लव लाडानें तुझ्या न हा माथा. ॥७०॥
बहुमानगर्विता मी होतें बहुमानदा विलासवती, ।
हांसुनि आजि म्हणतिल, ‘व्यर्थचि बहुमान दाविला,’ सवती. ॥७१॥
माझ्या अपमानातें ऐकुनि, मातें विपक्षजन सर्व ।
हांसेल, अन्य जनही हौनि मजहूनि उच्च बहु खर्व. ॥७२॥
कथिती दासी दिधलें तुज सुरतरुपुष्प नारदें, देवा ! ।
त्वां इष्टजनासि दिलें,वर्जुनि मज, न स्मरोनि मत्सेवा. ॥७३॥
त्या कुसुमरत्नदानें त्या इष्टजनीं सुगुप्त जो ठेला, ।
बहुमान, स्नेहहि, तो त्वां आजि प्रकट वल्लभें केला. ॥७४॥
जेविं शिवेचें केलें ब्रम्हासुतें स्तवन साधुवादरतें, ।
त्वां ऐकिलें प्रियेचें, मोक्षपरें ब्रम्हासेंचि, सादर तें. ॥७५॥
जरि तुजपुढें प्रियेचा ब्रम्हासुतें स्तवनसुरस वाढावा, ।
तरि जो दुर्भग जन हा, तेणें तेथें कशास  काढावा ? ॥७६॥
देवूनि प्रेमरस, प्रभु तूं देतोसि जरि असा ताप, ।
मज तप करावया दे आज्ञा, क्षालीन आपलें पाप. ॥७७॥
अन्यत्र प्रेम तुझें नव्हतें स्वप्नींहि देखिलें, स्पष्ट ।
प्रत्यक्ष पाहत्यें तें, मज याहुनि अधिक कोणते कष्ट ? ॥७८॥
मुनिवर वर्णू, तीही न म्हणो, ‘वर्णन असें नको, पावें; ।
ऐकत होतासि रसें, परिसुनि हें, म्यां, कसें न कोपावें ? ॥७९॥
मानार्थचि वांचावें मानधनांहीं, तुझेंचि हें उक्त. ।
यास्तव, ‘मरेन’ ऐसें म्हणत्यें मी मानवर्जिता युक्त. ॥८०॥
हा दैवा ! जो रक्षक दक्ष करुण, तोचि सर्वथा वक्र ।
झाला मज भयदायक; काय करूं ? दीन तुजपुढें शक्र. ॥८१॥
देवा ! न कळे, त्यजिली त्वां हे अबळा पुढें करिल काय ? ।
बहुधा कुमुद्वतीची जी गति, तीतें इचा वरिल काय. ॥८२॥
बहु हौनि प्रिया, मी आलें तव अप्रिया विना कलहें; ।
म्यां केलें देवाचें प्रिय, अप्रिय तरिच जाहलें फल हें. ॥८३॥
तुजसह तव प्रियत्वीं रैवतका जी यदूत्तमा पाहे, ।
पाहेल कसी यावरि, हौनि तुज अप्रिया, नगा या हे ? ॥८४॥
अप्रियपणांत मुक्ताहार कसी हे गळ्यांत वाहेल ? ।
ज्यांत क्रीडा केली तुजसह, त्या सागरासि पाहेल ? ॥८५॥
यावरि जाईल कसी हे सासूच्या गृहासि पदनतिला ? ।
बहुमानवती, बुडवुनि मान, कसी दाखवील वदन तिला. ॥८६॥
‘सत्ये ! तुजवांचुनि मज अन्या नाहीं प्रिया,’ असें केलें ।
जें भाषण या स्वमुखें, कोठें तें आजि कृष्णजी ! गेलें ? ॥८७॥
कळलासि आजि कृष्णा ! तूं केवळ कितव, धूर्त, शठ, चोर, ।
वत्पक्ष चंचळ खरा, जनवंचक मधुर गुण मुखीं थोर.” ॥८८॥
अभिमानवती देवीजी कोपें, मत्सरें, असें वदली; ।
सांत्वन करि कृष्ण तिचें, रत ज्याच्या चरणसारसीं सदली. ॥८९॥
“ऐसें न वद, मदीश्वरि ! दयिते ! सत्ये ! त्वदीय मी जाण, ।
प्राणप्रिये ! ‘मदुक्तिश्रुति सत्या,’ तूं असें मनीं आण, ॥९०॥
श्रीमन्नारद मुनिला प्रद्युम्नाची करि प्रसू नतितें; ।
तो मत्समक्ष दे तें, करुनि दया मजवरि, प्रसून तितें. ॥९१॥
देवि ! प्रसन्न हो तूं, माझा अपराध एक हा साहें, ।
‘दिधलें,’ म्हणो तव मुख, प्रकटुनि पीयूषसेकहासा, हें. ॥९२॥
पुष्पेच्छा जरि, तरि तूं ‘हूं’ मात्र म्हण, त्वदिष्ट जाणून, ।
खाणून पारिजातचि लाविन तव मंदिरांत आणून, ॥९३॥
तूं वांछिसील जोंवरि, तोंवरि तो तव गृहांत राहेल, ।
वाहेल तुला पुष्पें, त्वद्भाग्योत्कर्ष विश्व पाहेल.” ॥९४॥
भामा म्हणे, “मुकुंदा !  जरि तूं देसील पारिजातातें; ।
तेणें हर्ष मम मना, यमुनेच्या जेविं वारिजातातें. ॥९५॥
म्यां हा कोप त्यजिला या सुरतरुदाननिश्चयें, देवा ! ।
सर्व स्त्रियांत अधिका हौनि, हर्षें करीन मी सेवा.” ॥९६॥
श्रीकृष्ण म्हणे, “जाण स्वकरीं आलाचि देवनग, जाये ! ।
कासारांत न कमळें, करिणीचें काय सेवन गजा ये ?” ॥९७॥
प्रभु यापरि समजावी, जो होती जाहली प्रिया साधी. ।
सदनीं सत्येच्याचि स्नानाद्यावश्यकक्रिया साधी. ॥९८॥
प्रभुनें ध्यातांचि, गृहीं भामेच्या हेतु रो कलागतिचा, ।
जो सर्वमुमुक्षूंला देणार ख्यात येकला गतिचा. ॥९९॥
मुनिचरण प्रक्षाली सत्या अत्यादरें, कमळपाणी ।
श्रीतीर्थपाद घाली कांचनपात्रें स्वयें अमळ पाणी. ॥१००॥
पूजुनि परम प्रेमें, बसवुनि मणिकांचनाचिया पाटीं, ।
दोघांहीं जेवविला शुचिकनकाच्या मनोरमीं ताटीं. ॥१०१॥
नारद आशीर्वाद प्रभुला देवुनि, म्हणे, “अजितभार्ये ! ।
माझ्या तपोबळें तव सौभाग्य सदा असो अधिक, आर्ये ! ॥१०२॥
मग देवर्षिनिदेशें भगवान् विघसान्न आदरें सेवी, ।
जेवी त्यावरि पतिच्या आज्ञेनें तत्प्रसाद ती देवी. ॥१०३॥
प्रभुसि मुनि म्हणे, “आज्ञा दे जाइन मी महेंद्रसदनातें, ।
तेथें तन्मह आहे, जो करि पाहोनि भस्म मदनातें. ॥१०४॥
प्रतिमासीं परमोत्सव शंभुप्रीत्यर्थ होतसे, देवा ! ।
गावुनि गंधर्व, करिति विभुची नाचोनि अप्सरा सेवा. ॥१०५॥
पूर्वदिनीं जें देवुनि शक्रें आमंत्रिलों स्वयें बा ! मी, ।
तरुराजपुष्प तें या रैवतकीं, तुज दिलें तुज्या धामीं. ॥१०६॥
हा इष्ट शचीस जसें देतों सौभाग्य पूजनें, कृष्णा ! ।
तूंतेविं पारिजात स्वपरांची सर्व, पुरवितो तृष्णा. ॥१०७॥
सेवासत्तप करितां, अदितिस कश्यप म्हणे, ‘महाभागे ! ।
माग, प्रसन्न झालों; वांछित वर ओपितों,न हा भागे.’ ॥१०८॥
अदिति म्हणे, ‘अतिसुभगाहे वर्णावी समस्तसुभगांनीं, ।
तोटा न भूषणीं हो, तैसाचि न नर्तनीं, न शुभ गानीं. ॥१०९॥
नित्य कुमारीच असो, न शिवावा शोक सर्वथा चित्ता, ।
विरजा, स्वधर्मशीला, पतिभक्तिमती, प्रभो ! तपोवित्ता.’ ॥११०॥
पत्नीप्रियार्थ निर्मी कश्यप मुनि पारिजातवृक्षातें, ।
याचें यश न परा ये, जें चंद्रा, तेज काय ऋक्षा तें ! ॥१११॥
ज्या तरुराजीं पुष्पें सर्वेही सर्वकामदें असती, ।
ज्याच्या ठायीं केली, सुगुणांहीं सज्जनीं तसी, वसती, ॥११२॥
या वक्षासीं बांधुनि कश्यप मज अदितिनें दिला दान, ।
सौभाग्यपुण्यकामें कथिल्या विधिनें, करूनियां मान. ॥११३॥
निष्क्रय घेउनि, केला म्यां कश्यप मुक्त केशवा ! साचा, ।
या दानीं बहु महिमा, इतरीं याच्या न लेश वासाचा. ॥११४॥
सौभाग्यार्थ शचीनें मग शक्र दिला मलाचि बा ! नमुनी, ।
पतिदान रोहिणी दे देवा ! घे तेंहि हाचि दान मुनी. ॥११५॥
ऋद्धि प्रभुसखभार्या, बहु भीड तिचीहि केशवा ! पडली, ।
तत्पतिदानहि घे हा, न सुटे आंगासि पात्रता जडली. ॥११६॥
ऐसा सौभाग्यप्रद नि:संशय पारिजात अगम हित, ।
संश्रितवांछितपूरक, हा त्रिजगीं कां नसेल मग महित ?” ॥११७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP