उत्तरार्ध - अध्याय ४३ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


बाणरथीं गुह बैसुनि, कुंभांडातें करूनि सूत, रणीं ।
गांठी एक तिघांतें; वाटे तो पाहत्यांसि भूतरणी. ॥१॥
रामातें, कृष्णातें, प्रद्युम्नातें,  महेषु तो हाणी, ।
न्हाणी रक्तें त्यांतें, आणी नेत्रांसि जिष्णुच्या पाणी. ॥२॥
वातदहनमेघास्त्रें सोडिति, कोपोनि, हे तिघे तीन, ।
हेतीपुढें जयांच्या, ‘साधु !’ म्हणुनि, शत्रु हेति घेती न. ॥३॥
वारी पार्वतवारुणसावित्रांहीं तयांसि तो स्वामी, ।
यदुवीर अस्त्रमाया उडविति, देती म्हणों न ते ‘यामि’. ॥४॥
स्वामी बम्हाशिरोस्त्र प्रकटी; तें प्रलयतपनसम तावी ।
त्रासें रोमांचित त्या समयीं कोणी न तप, न समता, वी. ॥५॥
इतरांची काय कथा ? ‘हा ! हा !’ उच्चारिलें तदा शक्रें; ।
रविमंडळ जेंवि घनें, निष्प्रभ केलेंचि अस्त्र तें चक्रें. ॥६॥
करितां ब्रम्हास्त्रप्रतिघात प्रभुनें, कुमार कोपानें ।
सोडी शक्ति, करी जी परतेजांचीं रणांत सोपानें. ॥७॥
येतां, शक्ति समीप, प्रभु हुंकारेंचि लोळवी तीतें, ।
सुबाम्हाण कृत्येतें, अग्नीचे जेंवि लोळ वीतीतें. ॥८॥
सुर “साधु ! साधु !” वदले, “मद लेश नुरेचि तुजपुढें अरिचा.” ।
हरिचा स्तव बहु करिती देवर्षिप्रमुख मुनि परोपरिचा. ॥९॥
चक्र धरी हरि, अरिवरि सोडाया, धगधगीत, जों फिरवी, ।
मिरवी तें रविशतरुचि, धैर्य परांचें विलोकितां विरवी. ॥१०॥
रुद्र म्हणे देवीतें, “रक्षावा संकटीं कुमारमणी,” ।
प्रेषी स्वाष्टमभागज देवीतें शंभुची उमा रमणी. ॥११॥
मध्येंचि उभी राहे नग्ना तत्काळ कोटवी, राया ! ।
ती कनकशक्ति चित्रा, भासे, बा ! होय कोट वीरा या. ॥१२॥
द्दष्टि प्रभु वरि फिरवी, पाठ करुनि तीकडे, रणीं राहे, ।
त्या लंबा देवीतें क्रोधीहि न धर्मपाळ तो पाहे. ॥१३॥
तीस म्हणे, “गे ! लंबे ! अंबे ! वेडे ! निघोनि जा गेहा, ।
धर्मत्राणाविषयीं, क्रोधभरींही रिघोनि, जागे हा.” ॥१४॥
गेलीं निघोनि, घेउनि शंभुनिकट पुत्र, कोटवी, तीचें ।
यशचि, न दुर्यश जाणे, हे वर वांत्सल्य पोट वीतीचें. ॥१५॥
प्रभु धर्मज्ञप्तस्वप्रेमामृत हे कवींस वाढूनी, ।
लंबा अंबांशभवा ती गेल्यावरि, गुहासि काढूनी, ॥१६॥
तो बाण मयूरध्वज गरुडारूढासह स्वयें समर ।
करिता झाला निरुपम, ज्या पाहुनि चकित जाहले अमर. ॥१७॥
बाण म्हणे, “मरसी तूं, ज्यांला अरिदलन हें भलें पाठ, ।
ते हे मद्भुज कोठें ? कोठें त्वद्वाहु यादवा ! आठ ? ॥१८॥
सुहृदवलोकन कैंचें ? यापरि न द्वारका  पहासील, ।
गोपा ! मला न तरसिल, सरसिल, मरसिल, न तूं रहासील.” ॥१९॥
बाणोक्तें मुनि गगनीं हांसे,  सर्वांहि हास्य आयकवी; ।
ऐकुनि अबद्ध, उगला राहेल प्रभुसमक्ष काय कवी ? ॥२०॥
भगवान् म्हणे, “प्रलाप व्यर्थ करिसि, यात काय गा ! जीव ? ।
बाणा ! नाम, रणमखीं व्यापारुनि आजि काय, गाजीव.” ॥२१॥
ऐसें गर्जुनि, भगवान् सोडूनि शतें अनेक बाणांचीं, ।
भेदी मर्में, शर्में द्याया, खंडूनि गर्व, बाणाचीं. ॥२२॥
हांसे बाण, प्रभुतें झांकी, नानाविधायुधें सोडी, ।
वृष्टि सहस्रभुजांहीं केली, घनवृष्टि तीपुढें थोडी. ॥२३॥
खर परशु, परिघ, पट्टिश, शक्ति, गदा, मुसल, शूल, बाण, असी, ।
सोडी, जोडी, थोडी घनवृष्टि, ख्याति वीर बाण असी. ॥२४॥
त्याहि सहस्त्रभुजाला तो द्विभुजहि राम विप्र आटेना, ।
हा तों अष्टभुज प्रभु, विफळ स्वायास यास वाटेना. ॥२५॥
जें दानवास्त्र होतें प्राप्त कुळीं कनककशिपुपासून, ।
तें योजी, अरि ज्याच्या तेजें मेलेचि तोंड वांसून. ॥२६॥
तों दाटलें निबिड तम, त्यांत विविधशस्त्रवृष्टि बा ! राया ! ।
वारा यातायात न करि, परि हरि होय सिद्ध वाराया. ॥२७॥
पर्जन्यास्त्रें शमवी प्रभुवर तो दानवास्त्र, आंगातें ।
प्रभुच्याहि पेटवी जें, करितें त्रिभुवन न भस्म कां गा तें ? ॥२८॥
क्रोधें बळिसुत हांसे, शरनिकरें पिहित करि पुन्हा याला, ।
रक्तें न्हाणायाला, चुकला तो मत्त न रिपु न्हायाला. ॥२९॥
तो करि बाणरथाचे, हाणुनि खर विशिख, तिळतसे तुकडे; ।
जातात सुकवि ज्या भवसिंधूच्या, गुरुसि मिळत, सेतुकडे. ॥३०॥
प्रभु शस्त्रीं चापकवच तोडुनि, मणिकनकमुकुटही पाडी, ।
ताडी उरांत विशिखें, गर्व दिंगतासि तत्क्षणीं धाडी. ॥३१॥
मूर्च्छित बाण पडे, त्या प्रासादाग्रावरूनि मुनि पाहे, ।
वाहे प्रहर्ष, वाजवि नख, शतमखसख बसे, उभा राहे, ॥३२॥
कक्षास्फोटनतत्पर नारद हांसे, म्हणे, “बरें झालें, ।
धालें नेत्रयुग, विभो ! माझ्या जन्मासि सुफळ हें आलें. ॥३३॥
गाइन मी तुज हरिला, अरिलाही लावितोसि वाटेतें; ।
हर ! हर ! मदगदहर हर, कीं तूं, मज अन्य गु्रा न वाटे तें. ॥३४॥
मार कसा, तार कसा, दारकसा पाल्य तुज गमे, खळ हा; ।
न म्हणो बळ ‘हा !’ बळहा वर्षो, यासीं पुन्हा न यो कळहा.” ॥३५॥
तों करिति कृष्णबाणध्वज गरुडमयूर ते महायुद्ध, ।
क्रुद्ध द्विजवर जोडी यश, पाडुनि बर्हिसत्तमा, शुद्ध. ॥३६॥
रणभूवरि बर्हिणसह सहसा तो बाण पावला पतन, ।
गतनय तनया न करि व्यसनांत पिता महेशही जतन, ॥३७॥
पावुनि पराभवातें, पश्चात्तापेंकरूनि तो भाजे, ।
“सुहृदुपदेश,” म्हणे, “अवगणिले देती सुकीर्ति शोभा जे.” ॥३८॥
करणारा शरवृष्टि प्राज्या वर्षाघनांसम क्षम हा, ।
झाला भंग बळिसुता या देवासुरजनासमक्ष महा. ॥३९॥
समजोनि भक्तवत्सल भव भक्ताची व्यथा, म्हणे, “तूर्ण ।
जा, नंदिकेश्वरा ! ने रथ, बाणीं मत्प्रसाद बा ! पूर्ण. ॥४०॥
हो सारथि बाणरणीं, विरथ नसो, बसिव मद्रथावरि तो; ।
मज भक्त स्वामीसा; आप्त विपत्तींत भद्र थावरितो.” ॥४१॥
‘संकटसमयीं स्वाश्रित रक्षावा सर्वथा,’ असें पढवी. ।
तो नंदिकेश्वर द्रुत, आज्ञा सांगुनि, तया रथीं चढवी. ॥४२॥
ब्रम्हारचित दिव्य रथीं चढला, भरला पुन्हाहि उत्साहें, ।
ब्रम्हाशिरोस्त्र प्रकटी, नुमजे, होइल तसीच कुत्सा, हें. ॥४३॥
सर्वास्त्रपातनें त्या अस्त्रें सुरलोक सर्व तापविला, ।
ब्रम्हाशिरोस्त्रा चक्रा गांठि पडे, जेंवि पर्वता पविला, ॥४४॥
वारुनि अस्त्र, हरि म्हणे, “कोठें तीं कत्थितें तुझीं ? बाणा ! ।
कां न विकत्थन करिसी ? सुहृदाच्या तों न मानसी आणा. ॥४५॥
जेंवि तुझी करितों मी, दंडें खळ वळतसें, न तो सामें. ॥४६॥
जो ज्ञाता, हितकर्ता, म्हणतो, ‘कुलजीं न दर्प राहो,’ तो, ।
कीं या सर्वस्वहरा भजता जन पात्र खर्परा होतो. ॥४७॥
आलों, बाहु च्छेदुनि, सर्व तुझा आजि दर्प साराया; ।
न भला हा देहांत क्षणही, गेहांत सर्पसा, राया !” ॥४८॥
भुजकर्तनप्रतिज्ञाश्रवणें लागे सुरर्षि नाचाया, ।
बा ! नावरेचि कांहीं केल्या अतिहर्षवेग याचा या. ॥४९॥
जें वज्राचें तेज, व्याळांचें तेज, तेज यक्षांचें, ।
जें ब्रम्हाचारितेज, ब्रम्हार्षींचें स्वकर्मदक्षांचें, ॥५०॥
रविचें, पतिव्रतांचें, त्रेताग्नीचें, तसेंचि शक्राचें, ।
तेज स्थापुनि, केलें आप्यायन केशवें स्वचक्राचें. ॥५१॥
वरद हर दयासागर, मानुनि विज्वर तदा सकळ, वळला; ।
गौरीस म्हणे, “रक्षीं, स्पष्ट पहावे न दास कळवळला.” ॥५२॥
लंबा अंबाप्रहिता तत्काळ प्रभुपुढें गभीरा हे ।
प्रकटे, अन्याद्दश्या नग्ना, स्मरणें जिच्या न भी राहे. ॥५३॥
तीस म्हणे कृष्ण, “अगे ! देवि ! विवस्त्र पुन्हाहि आलीस, ।
कोटवि ! तुज हे स्फुरली, किंवा तुझिया सुयुक्ति आलीस ? ॥५४॥
सोडूनि द्दष्टिपथातें, हो असितापांगि ! दूर, न वधीन ।
बाणातें, द्विभुज करिन, हरिन मदचि, वृष्णिवीर नवधी न. ॥५५॥
होसील जीवपुत्री, मी याचे बाहुमात्र खंडीन, ।
आर्ये ! हो एकिकडे, या, व्हाया साबधान, दंडीन.” ॥५६॥
लंबा म्हणे, “दयार्णव तूं, तारक सत्य देवदेवांचा, ।
शरणागतांसि तव पदपंकजरज अभय दे, वदे ‘वांचा.”’ ॥५७॥
दे अनुमोदन, व्हाया, होता सुत सिंह, तोचि अवि, लंबा; ।
जाय, करूनि अवश्य प्राप्ताप्तप्रार्थनार्थ, अविलंबा, ॥५८॥
कृष्ण म्हणे, “रे बाणा ! धिक् तव या पौरुषा असो लोकीं, ।
आपण बुडोनि, पितरां बुडवितसे दुष्ट पुत्र तो शोकीं. ॥५९॥
आली, जेंवि अशक्ता, तुज रक्षायासि कोटवी, राजा ! ।
हूं, भीड, काय भय त्या, प्राप्त असा दिव्य कोट वीरा ज्या.” ॥६०॥
ऐसें गर्जुनि हरिसा, हरि, साराया मदासि, अरि सोडी, ।
त्या बाणाचे नवशत साष्टनवति संगरांत भुज तोडी. ॥६१॥
छेदूनि पाडिले ते, उग्रत्वें हांसते भुज गरा जे, ।
चक्रेम लीलालेशें, श्रीखगशक्रें जसे भुजगराजे. ॥६२॥
दंडुनि, वर भुज खंडुनि, जैसा विच्छिन्नशाख तरु, अरितें, ।
करितें झालें, आलें प्रभुच्या हस्तांबुजीं पुन्हा अरि तें. ॥६३॥
रक्तार्द्र गमे, गैरिकगुरुगिरि अतिवृष्टिनें जसा उलला, ।
गर्जों लागे घनसा, शोणितगंधेंकरूनि तो भुलला. ॥६४॥
गर्जित ऐकुनि, अरिकरिहरि हरि अरि धरि पुन्हा करीं रागें, ।
तों सगुह शिव पुढें ये, कीं त्यासि ‘अभय’ दया म्हणे ‘मागें.’ ॥६५॥
शंभु म्हणे, “जगदीशा ! कृष्णा ! मधुसूदना ! महाबाहो ! ।
आतां क्षमा करावी, भस्म तव सुदर्शनें न हा बा ! हो. ॥६६॥
म्यां अभय दिलें आहे या बाणाकारणें, न कोपावें; ।
भुज खंडुनि मद हरिला, बा ! योजूं मारणें नको, पावें.” ॥६७॥
कृष्ण म्हणे, “विश्वेशा ! बांचो त्वद्भक्त दैत्यचक्रप हा, ।
तूं मान्य सुरां असुरां, म्यां हें आटोपिलें स्वचक्र, पहा. ॥६८॥
माझें नमन तुज असो, न करिन तें, जें महेश्वराकार्य, ।
जातों, जाया आज्ञा द्याया मजलागिं योग्य तूं आर्य.” ॥६९॥
यापरि या परिपूर्णें प्रार्थुनि परमेश्वरा, तदाज्ञा त्या ।
मागुनि, निघता झाला, अत्युत्सव नारदा तदा ज्ञात्या. ॥७०॥
अनिरुद्ध रुद्ध जेथें, भगवान् गरुडें तया स्थळीं गेला, ।
अंतर्बाहय मळ हरुनि, लाजविती यत्सुकीर्ति गंगेला. ॥७१॥
श्रीकीर्तिमदें बुडवुनि, ज्याच्या बहु दुर्दशा दिली देहा, ।
त्या बाणाला नंदी तारी व्यसनांत, गुरुकिली दे हा. ॥७२॥
“बाणा ! प्रसन्न होइल शंकर, पंकरहित क्षणें होसी; ।
शंभुपुढें नृत्य करीं, कथितों तुज हें घबाड मी जोसी.” ॥७३॥
नंदी ने, त्या विकळा बाणा पाहुनि रथीं, हराजवळ; ।
धवळ क्षीरधिहुनि यश घे, दे उपदेश जो सुधाकवळ; ॥७४॥
“रे ! बाणा ! रे ! बाणा ! नि:शंक प्रभुपुढें करी नृत्य,” ।
ऐसें पुनरपि नंदी सांगे, मग तोहि नाचला भृत्य. ॥७५॥
होय प्रसन्न नृत्यें,  “वर माग” म्हणे तयासि वरदेश; ।
ज्याच्या भक्तासि नसे कोणी पर, देश तोहि परदेश. ॥७६॥
बाण म्हणे, “अजर अमर भजनार्थ तुझ्या असो, दयालो ! हा; ।
स्पर्शमणि जया स्पर्शे, देतोचि सुवर्णता तया लोहा.” ॥७७॥
शंकर म्हणे, “दिला हा वर तुज, दुसराहि माग, ओपीन; ।
द्रवली माय बहु म्हणे, ‘सेवनियां स्तन्य वत्स हो पीन.”’ ॥७८॥
बाण म्हणे, “नृत्य असें करितां, हो पुत्रलाभ सर्वास,” ।
हा देउनि वर, ‘तिसरा माग,’ म्हणे; भक्त इष्ट शर्वास. ॥७९॥
बळिसुत म्हणे, “न बाधो पीडा चक्रप्रहारजन्या या, ।
अन्या यादान, दयासिंधो ! व्हावी, करूनि अन्याया.” ॥८०॥
जगदीशा म्हणे, “जाइल आतांचि त्यजुनि हे तुला पीडा, ।
चवथाही मजपासीं घे वर मागोनि दितिकुलापीडा !” ॥८१॥
बाण म्हणे, “प्रमथोत्तम व्हावें निकटस्थ आठ यानहि म्यां, ।
नाम ‘महाकाळ’ असो.” घोका जन  करुन पाठ या महिम्या. ॥८२॥
हें देउनि, देव वदे, “वत्सा ! वर माग पांचवा यास, ।
हा वरदोत्तम जैसा, न क्षम अमृताब्धि वांचवायास.” ॥८३॥
बाण म्हणे “या माझ्या क्षणहि करू विरूपता न वर देहा ।
आश्रितकल्पतरो ! हा अल्प तरो, ‘हा !’ म्हणो न, वर दे हा,” ॥८४॥
त्र्यक्ष म्हणे, “बाणा ! हे ठाकेल विरुपता न या देहीं, ।
बा ! जैसी दुर्गतता स्वद्रुच्छायाश्रिताचिया गेहीं.” ॥८६॥
अजित म्हणे, “देवर्षे ! कोठें अनिरुद्ध रुद्ध दाखीव, ।
मूर्त सुधारस माझ्या सुतृषितद्दष्टीस शीघ्र चाखीव.” ॥८७॥
देवर्षि म्हणे, “देवा ! आहे कन्यापुरांत अनिरुद्ध, ।
मणिमंत्रौषधितेजें प्रज्वलित, ज्वलन जेंवि वनिं रुद्ध.” ॥८८॥
तों प्रभुसि चित्रलेखा सामोरी ये, नमूनि नेत्यातें, ।
रामप्रद्युम्नगरुड यांसह अंत:पुरांत ने त्यातें. ॥८९॥
नाग गळाले, झाले, गरुडातें देखतांचि, ते बाण, ।
कुटिलपण त्यजुनि, सरळ जन होती प्रभुपुढें तसे जाण. ॥९०॥
अनिरुद्ध मुक्त हौनि आधी, पावोनि हर्ष, रामातें, ॥९१॥
ऊषा, गुरुजग पाहुनि, होऊं दे व्याकुळ श्रमें न मन, ।
करि रामकृष्णगरुडप्रद्युम्नातें अनुक्रमें नमन. ॥९२॥
तों आला देवर्षि त्रिदशेंद्राचा निरोप आणून. ।
वर्धापन करि हरिचें, त्या जयसमयांत युक्त जाणून. ॥९३॥
अनिरुद्ध वरश्रीवर वर्धवि त्या नारदा, करी नमन, ।
मुनि दे आशीर्वाद प्रभुला, जो हर्षवी करीनमन. ॥९४॥
नारद म्हणे, “करावा अनिरुद्धाचा विवाह, मी श्रवण ।
जंबूलमालिकेचें करिन, कवण या रसीं नसे प्रवण ?” ॥९५॥
या नारदमुनिवचनें आलें सर्वांसि हास्य बहुतर तें, ।
कविवृंद यद्विनोदें करितें, हर्षोनि, लास्य बहुत रतें, ॥९६॥
केशव म्हणे, “करावा अनिरुद्धाचा विवाह, तरि तूर्ण.” ।
कुंभांड करी सर्वहि, मुनिचा ज्यामाजि काम परिपूर्ण. ॥९७॥
कुंभांडातें देउनि शोणितपुरराज्यराष्ट्र वरदानें, ।
आयुष्य, अभय, सद्यश, ऐसीं दिधलीं तयासि वरदानें. ॥९८॥
निघतां, महेश्वरातें वंदुनियां, द्वारकेस जायाला, ।
कुंभांड कथी  प्रभुतें, वरुणावरिहि स्वयें सजायाला. ॥९९॥
बाणाच्या बहु गायी होत्या वरुणाकडे सुरुचिरा ज्या, ।
ज्यांचें जराज्वरापह वीर्यप्रद पय सुधासुरुचि, राजा ! ॥१००॥
ज्यांच्या अमृतसम गुण क्षीराचा व्यक्त देखिला, राया ! ।
प्रभुकारणें उचित तें यास्तव तो भक्त दे खिलारा या. ॥१०१॥
गेले सुर शतमख, विधि, वर्धवुनि प्रभुसि, पुसुनि हर्षानें, ।
सत्यार्थ स्तवनानें, पूजुनियां दिव्यपुष्प्वर्षानें. ॥१०२॥
वाहन मजूर देउनि, हर्षवुनि द्वारकेसि पाठविली ।
ऊषा जगदंबेनें, तन्मातेहूनि फार आठविली ॥१०३॥
अग्रजसुतपौत्रसह प्रभुही गेला दिशेसि वरुणाच्या, ।
धेनु विलोकुनि, धाडी अनुजातें करूनि दूत अरुणाच्या. ॥१०४॥
भामाहि बाणधेनुक्षीराशनकाम जाणवी पतितें, ।
“आवश्यक कार्य” म्हणे यास्तवही देव तो, “महासति ! तें.” ॥१०५॥
आपण वरुण रण करी, सामें प्रभुलाहि दे न हा गायी, ।
बहुधा सुविवेकाची सर्वत्र सुरांतही महागायी. ॥१०६॥
राम, घनश्याम महाधाम, गरुड काम, तत्तनुज याहीं ।
नाहीं त्या वरुणाचें समरीं राहों दिलें कटक कांहीं. ॥१०७॥
केशव वैष्णव योजी, तों प्रकटे अग्नि, दारुणतरा या ।
न शके वरुणप्रेरित, बहुवृष्टि करूनि, वारण तराया. ॥१०८॥
वैष्णवतेजें शमतां  स्वास्त्र, म्हणे वरुण, “केशवा ! परिस, ।
जें समयाचें भेदक, अपवित्र जगांत तें शवापरिस. ॥१०९॥
‘बाणाचें गोधन दे,’ म्हणसी, तरि समयभेद नव घडतो, ।
तव अग्रजासि मज, बा ! मेघश्यामा ! जगांत अवघड तो. ॥११०॥
तुज बाणाच्या गायी, जीवंत असोनि, मी न ओपीन, ।
मज मारुनि ने, न्यासत्राणें मद्यश जगांत हो पीन, ॥१११॥
रक्षीं, वरुणीं करुणा करणें चित्तीं असेल, तरि समया; ।
नाहीं तरि मारुनि, ने गायीं, जरि लेखिसील अरिसम या.” ॥११२॥
जैसी सुदती तरुणा, करुणाकीर्ति प्रिया जया धीरा, ।
तो सांत्वुनि त्या वरुणा अरुणानुजजरथ असें म्हणे वीरा; ॥११३॥
“धेनु असोत तुजकडे, वरुणा ! तव सत्यसंधता राहो, ।
म्हणतो सत्यरतांतें जन, ‘विखरुनि पुण्यगंध, तारा हो !’ ॥११४॥
जेंवि धरि बहुकुटुंबी, वित्तींच न, विप्र भोजनांत रुची, ।
धरितों यशीं, न विषयीं मी, तरिच नवि प्रभो ! जनांत रुची. ॥११५॥
तुज मारुनि, कां न्याव्या ? देऊत तुलाचि या महा गायी; ।
नंदगृहांत न यांची पोष्यार्थ मुलांचिया महागायी.” ॥११६॥
दे अभय, घे वरुणकृत पूजन, ये प्रभु महर्षिसुरसहित, ।
पुर या म्हणे, तसें त्या स्वरगा होवुनि न हर्षि ‘सुरस हित.’ ॥११७॥
श्रीनारदप्रमुख मुनि, जे शक्रप्रमुख देव, ते सर्व ।
प्रभुनें सुतासि सांगुनि पूजविले, होय तें महापर्व. ॥११८॥
शक्र यदुसभेंत कथी बाणपराभूतिची कथा, राया ! ।
भगवत्तत्वज्ञानें भवभय जनमानसीं न थाराया. ॥११९॥
सांगे, बहु मर्यादा रक्षुनि, केली जयांत करुणा, तें, ।
जें, परिभव करुनि, रणीं दे अभय श्रीमृकुंद वरुणातें, ॥१२०॥
अवतरला ज्यास्तव, तें उरलें नाहींच कार्य होयाचें, ।
तारक, सार, कविस्तुत चरित हरि तमासि आर्यहो ! याचें. ॥१२१॥
या गावें, स्वस्थांनीं स्वस्थानीं स्थिर बसोनि, कृष्णातें; ।
याचें यशचि शमवितें, अमृत शमविनाचि तापतृष्णा तें.” ॥१२२॥
कृष्णातें आलिंगुनि, पुसुनि, चरित गात, जाय हरि नाकीं, ।
न म्हणे प्रभुप्रतापें ज्याचें मन ‘शत्रु ठाय हरिता कीं ?’ ॥१२३॥
देउनि आशीराशी, हौनि परम प्रसन्नवद, मुनी ।
गेले स्वस्थानातें, प्रभु दे आज्ञा जयांसि, पद नमुनी. ॥१२४॥
आहुक म्हणे, “मुकुंदा ! कुंभांडाची सुता सती रामा, ।
मज वाटतसे योग्य जांबवतीच्या सुतास ती रामा. ॥१२५॥
बहु असुरांच्या कन्या ऊषेच्या आलि आलिया धन्या ।
यांला सत्कृति अन्या न हिता, जसि नागरा जना वन्या. ॥१२६॥
त्या द्यावी, ज्या पाहुनि, जीचें मन कामसायकाकुळ, ती; ।
‘सेव’ म्हणुनि काय करिल, वरुनि रसिकधाम, साय काकुळती ?” ॥१२७॥
ऊषा, रामा, इतराहि तराव्या, म्हणुनियां विवाहन या, ।
धर्मा रक्षूनि, करी, सुखवि सुता गणुनियां, विवाहनया. ॥१२८॥
परिपक्व विवाहोत्सव, उत्सव जे इतर, सर्व ते हिरवे; ।
फिरवे न गृहीं, जी बहु सुकुमारी, द्वारकेंत ती मिरवे ! ॥१२९॥
उत्सव नित्य यदुपुरीं, परि म्हणति तयांत परम हाच कवी, ।
प्रभु वैकुंठचि गमवी, दावुनि विधिजाहि परमहा चकवी. ॥१३०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP