ज्याप्रमाणें यज्ञांत व्रीहि व यव हीं दोन परस्परनिरपेक्षा म्हणजे स्वतंत्ररीतीनें यज्ञाचीं साधनें मानलीं जातात त्याप्रमाणें, मदाला यौवन व मद्य हीं दोन स्वतंत्र निरनिराळीं कारणें आहेत; त्यामुळें मद्य नसलेलें असें यौवन मदाचें कारण आहे, असें म्हणण्यांत विरोध लेशमात्र नाहीं. (मग विरोधमूलक विभावना येथें असू शकेलच कशी ?) तुम्ही म्हणाल, “आसव ऊर्फ मद्य हें मदाचें प्रसिद्ध कारण असल्यामुळें तें नसतांना मदाची उत्पत्ति झाली, असें वर्णन करणें, यांत विरोधाचें भान तर खरेंच;” पण असें म्हणतां येत नाहीं. येथें विरोधाचें भान झालें असतें, पण तें केव्हां ? जर यौवनाला मदाचें कारण म्हणून कवीनें प्रत्यक्ष शब्दानें सांगितलें नसतें तर. पण यौवनाला मदाचें कारण म्हणून कवीनें एकदां सांगितल्यावर, तें यौवन, मदाचें कारण म्हणून प्रसिद्ध असलेल्या मद्याहून निराळें म्हणून कवीनं सांगितलें असलें तरी, मद्य ह्या कारणाप्रमाणें हें दुसरें (म्ह० यौवनही) मदाचें कारण असू शकेल, असें वैकल्पिक कारणाचें भान झाल्यामुळें, ह्या ठिकाणीं विरोधाचें भान होऊच शकत नाहीं. म्हणूनच ह्या श्लोकांतील पहिल्या व तिसर्या चरणांत, न्यूनाभेदरूपक मानावें; पण दुसर्या चरणांत मात्र प्रतीयमान (गम्य) उत्प्रेक्षा आहे, अशी व्यवस्था करावी. आम्ही रचलेल्या उदहारणांत मात्र अग्नि हें दाहाचें प्रसिद्ध (एकमेव) कारण असल्यामुळें, व यौवन हें दाहाचें कारण असल्याचें प्रस्तुत पद्यांत सांगितलें नसल्यामुळें, अग्नीवांचून दाह उत्पन्न झाला, या वर्णनांत बाह्यत: विरोध प्रतीत होतो हें सह्रदयांच्या ध्यानांत येईलच.
आतां, ‘लुब्धकधीवरपिशुना निष्कारणवैरिणो जगति ।’ या वाक्यांत विभावना आहे असें म्हणण्याचा प्रसंग येईल याची वाट काय ? तुम्ही म्हणाल, ‘येऊं दे, त्यात आमचें बिघडलें काय ?’ पण असें नाहीं म्हणतां येणार; कारण आलंकारिकांनीं या श्लोकांत विभावना मानलेली नाहीं. पण (येथें विभावना नको असेल तर) विभावनेच्या लक्षणांत एक आणखी विशेषण घालावें. तें हें कीं, कारणताबच्छेदकरूप धर्मानें विशिष्ट अशी प्रतियोगिता ज्यांची आहे, असा कारणाभाव. (असें विशेषण विभावनेच्या लक्षणांत घातलें म्हणजे, वरील श्लोकांत विभावना होणार नाहीं) असें तुम्ही (जगन्नाथपक्षीयांनीं,) म्हटलें, तरीसुद्धां, ‘खला विनैवापराधं भवन्ति खलु वैरिण: (अपराधावांचून खल वैरी होतात) या नव्या वाक्यांत विभावनेच्या लक्षणाची अतिव्याप्ति होणारच. (म्हणजे या वाक्याला तरी विभावना मानणे भाग आहे.) [कारण तुम्ही विभावनेच्या लक्षणांत जें नवीन विशेषण घातलें आहे त्या द्दष्टीनें या नव्या वाक्यात अपराधाचा अभाव, हा योग्य कारणाभाव होऊं शकतो.] यावर कुणी (म्ह० जगन्नाथपक्षीय) म्हणतील कीं, ज्या ठिकाणीं कार्य हा अंश अतिशयोक्तीनें, अथवा अभेदाध्य्वसायानें युक्त असेल ती असें पुन्हां एक विशेषण आम्ही आमच्या वरील लक्षणांत घालतों, (म्ह० खला विनैव०’ या वाक्यांत, वैरिण: भवन्ति हें कार्य अतिशयोक्तीनें युक्त नसल्यामुळें, येथें विभावना अलंकार होणार नाहीं). यावर (पूर्वपक्षीयांचे) उत्तर असें कीं, ‘ठीक आहे; तुमचें हें दुसरें विशेषण ध्यानांत घेऊन, आम्ही वरील ओळ, ‘खल्ला विनैवापराधं दहन्ति खलु सज्जनान’ । (दुष्ट लोक अपराधावांचूनच सज्जनांना भाजून काढतात) अशी बदलतो, म्हणजे ह्या ठिकाणीं विभावना आहे असें म्हणण्य़ाच्या जो प्रसंग आला हातो. तो तसाच कायम राहील. यावर (वरील वाक्यांत, विभावना आहे असें म्हणणार्या लोकांना, आमचें (जगन्नाथाचें) उत्तर असें :--- विभावना अलंकारांत कार्यरूपी अंशाचें अतिशयोक्तीनें युक्त होणें हे एक स्वरूप व त्यावर अभेदनिश्चयानें आरोपित होणें हें दुसरें स्वरूप. यांपैकीं कार्याच्या पहिल्या स्वरूपाला विषय म्हणावे व दुसर्या म्हणजे आरोपित कार्याला विषयी म्हणावें. अशा या विषयी म्हणून येणार्या कार्याचें जें विषयितावच्छेदक (म्ह० विषयीवर राहणारा जो विशेषधर्म) त्यानें युक्त अशी कार्यतेशीं संबद्ध असणारी कारणता, त्या कारणतेचा विशेषणरूप धर्म विभावनेंतील विरोध दाखविण्याकरतां घ्यावा. उदाहरणार्था, “खला विनैवापराधं दहन्ति खलूउ सज्जनान” या श्लोकांतील दाह हें विषयी, कार्य, त्याचा विषयितावच्छेदक धर्म दाहत्व हा. दाहत्वानें युक्त अशा दाहाशीं (म्ह० विषयिरूप कार्याशीं) अभिन्न अशी पीडा आहे, असा ह्या ठिकाणीं निश्चय केलेला आहे. (म्ह० दाह व ही पीडा दोन्हीं एकच असा अभेदाध्यवसाय कार्याच्या अंशांत ह्या ठिकाणीं केलेला आहे.) अर्थात विषयितावच्छेदक जो दाहत्व धर्म, तो पीडेवरही (म्ह० विषयरूप कार्यावर) अवच्छेदक धर्म म्हणून आला. आतां अशा रीतीनें दाहत्व या धर्मानें युक्त जी पीडा तिचें विशिष्ट कारण अपराध होऊच शकत नाहीं. दाहत्वाववछिन्न जी कार्यता दाहाचे ठिकाणीं आहे, त्या कार्यतेचें खास कारण होण्याचा धर्म म्हणजे दाहाचे ठिकानीं आहे, त्या कार्यतेचें खास कारण होण्याचा धर्म म्हणजे कारणतावच्छेदक धर्म, अपराधत्व हा असूच शकत नाहीं; तर दाहत्वावछिन्न, जो दाह त्याच्याशिं अभिन्न असणारी जी पीडाअ त्या पीडेंतील कार्यतेणें निरूपित जी कारणता, ती मात्र अपराधाच्या ठिकाणीं असते हें कबूल. तेव्हां, त्या अपराधरूपी कारणतावच्छेदक धर्मानें युक्त जी प्रतियोगिता तद्रूप जें (अपराधरूपी) कारण त्याच्या अभावाशीं सामानाधिकरण्यसंबंधानें राहणार्या कार्याच्या (म्ह० दाहरूपी कार्याच्या सामानाधिकरण्यासंबंधानें राहणार्या कार्याच्या (म्ह० दाहरूपी कार्याच्या) उत्पत्तीचें वर्णन केलें असलें तरी, ह्या ठिकाणीं विभावना होण्याचा प्रसंग येत नाहीं.
आतां जर, ‘खला विनैव दहनं दहान्ति जगतीतलम’ असा वरील श्लोकार्ध केला, तर मात्र (दाहाचें खरें कारण दहन असल्यानें) विभावना अवश्य होईल.
त्याचप्रमाणें, ‘पाण्यावांचूनच्या ठिकाणीं कमळ, त्या कमळावर दोन निळीं कमळें; तीं तिन्हींही एका सोन्याच्या वेलीवर; आणि ती वेल सुकुमार व सुंदर; अशी ही अजब वस्तूंची केव्हढी परंपरा !’
ह्या एका कवीच्या, अतिशयोक्तीचें उदाहरण म्हणून दिलेल्या श्लोकांतही, विभावना अलंकार आहेच; पण ती, ‘कमलमनम्भसि’ एवढया भागांत शाब्दी आहे; व ‘कमले च कुवलये’ ह्यांत आर्थीं आहे असें थोडक्यांत सांगतां येईल.
येथें रसगंगाधरांतील विभावना प्रकरण संपले.