ही विभावना (आमच्या द्दष्टीनें) दोन प्रकारची, पहिली उक्तनिमित्ता म्हणजे ज्यांत खरें कारण सांगितलें असतें ती; व दुसरी अनुक्तनिमित्ता म्हणजे जिच्यांत कार्योत्पत्तीचें (खरें) कारण सांगितलें नसतें ती. वरील दोहोपैकी अनुक्तनिमित्ता विभावनेचें उदाहरण वर ‘विनैव शस्त्रं०’ याश्लोकांत दिलेंच आहे. त्या ठिकाणीं कामपीडा उत्पन्न करणार्य (खर्या) विलासादि कारणांचा उल्लेख केलेला नाहीं.
उक्तनिमित्ता विभावनेचें उदाहरण हें :---
‘ज्या दिवसापासून या चंद्रमुखीच्या, विलासाचें घर अशा यौवनाचा उदय झाला, त्या दिवसापासून, अग्नीवांचून तरुणांचीं ह्रदयें होरपळत आहेत.’
ह्या श्लोकांत यौवन हें दाहाचें कारण सांगितलें असून तें (यौवन) होरपळून टाकण्याला कारण आहे, असा त्याचा शेवटीं अर्थ होतो.
आतां, “सडपातळ देहाचें; सामग्रीवांचूनचें मंडन; मदाचें, मद्यावांचूनचें कारण, मदनाचें, पुष्पावांचूनचें अस्त्र, अशा बालपणाच्या पुढील वयांत (म्ह० यौवनांत), तिनें प्रवेश केला (कुमारसंभव, सर्ग १।३१)
या श्लोकांतील दुसर्या चरणांतु, मद्य सेवन केलें नसतांही मद उत्पन्न करणारें तिचें यौवन आहे असें सांगितल्यामुळें, व यौवनाचही चौथ्या चरणांत उल्लेख केला असल्यामुळें, या ठिकाणीं उक्तनिमित्ता विभावना अलंकार झाला आहे, पहिल्या व तिसर्या चरणांत मात्र विभावना नाहीं; कारण त्यांतील अनुक्रमें सामग्री व पुष्प हे दोन पदार्थ, मंडन व अस्त्र याला हेतु म्हणजे कारण होत नाहींत. (ते स्वत:च अनुक्रमें मंडनरूप व अस्त्ररूप आहेत)” असें जें अलंकारसर्वस्वकार वगैरेंनी म्हटलें आहे, त्यावर विचार करूं या :---
विभावना वगैरे अलंकार विरोधमूलक आहेत; त्यांच्यामध्यें विजेच्या चमकेप्रकाणें विरोध वरवर थोडक्यांत भासमान होणें यांतच या अलंकारांच्या चमत्काराचें बीज आहे. प्रस्तुत श्लोकांत मद्याहून भिन्न असणें ह्या रूपानें, यौवनाला मदाचें कारण म्हणून म्हटलें आहे. अर्थातच यौवनाला मदाचें कारण म्हणून शब्दानेंच सांगितलें असल्यामुळें ह्या ठिकाणीं विरोधाचें लेशमात्र भान होत नाहीं. त्यामुळें, विरोधमूलक विभावना ह्या ठिकाणीं मुळांतच नाहीं; मग उक्तनिमित्ता विभावना हा विभावनेचा प्रकार असणार कुठून ?