विभावना अलंकार - लक्षण ४
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
आतां, “कारणावांचून कार्योत्पत्ति, ही पहिली विभावना; कारण संपूर्णपणें नसणें (म्ह० अर्धवट असणें) ही दुसरी विभावना; प्रतिबंधक असतांही कार्याची उत्पत्ति होणें ही तिसरी विभावना; कारणाचा अभाव असतांनाही कार्याची उत्पत्ति होणें ही चौथी विभावना; विरुद्ध कारणापासून कार्याचा जन्म होणें, ही पाचवी विभावना; व कार्यापासून कारणाचा जन्म होणें ही सहावी विभावना या सर्वांचीं क्रमानें उदाहरणें अशीं :---
(१) “लाखेच्या पाण्यानें शिंपडलें नसतांही या सुंदरीचें चरणकमल लाल आहे.”
(२) “तीक्षण व कठिण नसणार्या अस्त्रांनींही मदन जगाला जिंकतो.”
(३) “हे राजा ! तुझ्या प्रतापाचा सूर्य, छत्री असणारांना (राजछत्रानें युक्त असलेल्या राजांनाही) एकदम भाजून काढतो.”
(४) “शंखातून वीणेचा आवाज निघत आहे, हा मोठाच चमत्कार आहे.” (म्ह० शंखाप्रमाणें सुंदर असलेल्या गळ्यांतून वीणेसारखा मधुर आवाज निघत आहे असा आंतील अर्थ)
(५) “अरेरे ! या सुंदरीचे डोळे चंद्राच्या किरणांनींही भाजत आहेत.”
(६) “हे राजा ! तुझ्या हस्तरूपी कल्पवृक्षांतून यशोरूप समुद्र निर्माण झाला.”
अशी सहा प्रकारची विभावना उदाहरणांसह कुवलयानंदकारांनीं सांगितली आहे. यावर आमचें म्हणणें असें :---
‘प्रतिबंधक असतांही कार्याची उत्पत्ति होणें ही तिसरी विभावना व कारण नसतांनाही कार्याची उत्पत्ति होणें ही चौथी विभावना - वगैरे विभावनेचे प्रकार तुम्ही सांगितले असले तरी, कारणावांचून कार्योत्पत्ति ह्या विभावनेला (सामान्य प्रकार न म्हणतां) तुम्हांला (विभावनेचा) पहिला प्रकारच मानला पाहिजे. नाहीं तर हा चौथा प्रकार इत्यादि क्रमवार यादी जुळवार नाहीं. प्रत्येक अलंकाराचें प्रथम सामान्य लक्षण सांगून मग त्याचे पोटप्रकार सांगण्याची रीत आहे; ह्या ठिकाणीं तुम्ही विभावनेच्या सामान्य लक्षणालाच पहिला प्रकार मानून पुढें चालला आहांत. (हें तुमचें करणें योग्य नव्हे.) ज्याप्रमाणें ‘साद्दश्यमुपमा भेदे ।’ (मम्मटाच्या मूळ व्याख्येंत, ‘साधर्म्यमुपमा भेदे’ हे शब्द आहेत.), (दोन पदार्थांत भेद असून साद्दश्य दाखविलें असेल तेथें उपमा अलंकार)’ तद्रूपकमभेदो य उपमानोपमेययो: ।’ (ज्या ठिकाणीं उपमानाचा व उपमेयाचा अभेद असेल तें रूपक) इत्यादिकांनीं उपमा रूपक वगैरेंचें सामान्य लक्षण (म्हणजे अलंकाराचें सामान्य स्वरूप) सांगून झाल्याव्र मग त्या अलंकाराचे पूर्णा लुप्ता (वगैरे उपमेचे;) व सावयव व निरवयव वगैरे (रूपकाचे) पोटभेद मम्मट वगैरेंनीं सांगितले आहेत, त्याप्रमाणें ह्या ठिकाणीं, तुमच्या विभावनेचें सामान्य लक्षण कोणतें, तें सांगून झाल्यावर, मग हे तुमचे पोटभेद सांगणें जुळेल. येथें ‘कारणावांचून कार्योत्पत्ति’ हा प्रकार तर, तुमच्या पोटभेदांतच पडतो; (मग तुमच्या विभावनेचें सामान्य लक्षण कोणतें ?)
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP