आतां, “ज्याप्रमाणें अतिशयोक्तीचे सर्व प्रकार सांगून झाल्यानंतर या प्रकारांपैकीं कोणताही एक प्रकार असणें हें अतिशयोक्तीचें सामान्य लक्षण, (असें म्हटलें आहे,) त्याप्रमाणें येथेंही (विभावनेचे सर्व प्रकार सांगून झाल्यावर यांपैकीं कोणताही एक प्रकार असणें म्हणजे विभावना, (सें विभावनेचें सामान्य लक्षण) समजावें.” असें तुम्ही म्हणाल, तरीपण (तें मानूनही) विभावनेच्या (तुमच्या) पहिल्या प्रकाराहून दुसर्या प्रकाराचा फरख्क दाखविणें कठिण आहे; कारण येथें ‘कारणाभावेऽपि कार्योत्पत्ति:’ यांतील ‘कारणाभाव’ याचा :--- “कारणाभावाचा प्रतियोगी जें कारण तें, कारणतावच्छेदक या संबंधानें युक्त असलें पाहिजे; म्हणजे त्याच्यांत कारणत्व हा खास धर्म असला पाहिजे, (ही पहिली अट) व तें कारण, कारणत्व या विशिष्ट धर्मानें युक्त असलें पाहिजे (ही दुसरी अट) :--- असें विशिष्ट स्व्रूपाचें कारण ज्या अभावाचा प्रतियोगी आहे असा अभाव म्ह० कारणाभाव”. असा (कारणाभाव याचा) अर्थ, आम्हांला येथें सांगावयाचा आहे. कारणाभाव अशा विशिष्ट स्वरूपाचाच आम्हांला येथें सांगावयाचा आहे, असें म्हणण्यांत, विभावनेचे दुसरे प्रकार मानण्यापेक्षां, जास्त सुटसुटीतपणा (लाघव) आहे. याचप्रमाणें प्रतिबंधक हा सुद्धां (एक प्रकारचा) कारणाभावच आहे (असें आम्ही मानतों.) अर्थात प्रतिबंधक नसणें म्हणजेच कारण असणें, हें मान्य केलें कीं, विभावनेच्या (तुमच्या) तिसर्या प्रकारांतही, निराळेपणा राहत नाहीं. (तुमच्या) विभावनेच्या चवथ्या प्रकारांतही कारणाभाव आर्थ आहे (एवढाच फरक); (कारण) ‘शंखांतून, हा वीन्याचा आवाज’ इ० असें म्हटल्यानें, ‘वीणेवांचून (च) आवाज’ अशी प्रतीति होत असल्यानें, (पहिल्या प्रकाराहून) यांत निराळेपणा (मुळींच) मानतां येत नाहीं. एवंच, पहिल्या प्रकारानें बाकीच्या प्रकारांना पोटांत घेऊन टाकल्यानें, विभावनेचे सहा प्रकार होतात हें म्हणणें जुळत नाहीं.
आतां कुवलयानंदांतील या म्हणण्याचें कसेंतरी समर्थन केलें पाहिजे, असा आग्रहच असेल तर, असें समर्थन करा :---
कारणावांचून कार्याचा जन्म हें (प्रथम) विभावनेचें सामान्य लक्षण (समजा.) नंतर ही विभावना दोन प्रकारची माना - शाब्दी व आर्थी. पैकीं शाब्दी तीन प्रकारची. ह्या तिघांपैकीं (१) पहिला प्रकार, प्रतिबंधकाहून निराळा असा, विशिष्टपदार्थरूप कारणाचा अभाव असूनही होणारी कार्याची उत्पत्ति हा. (२) दुसर्य प्रकारांत विशिष्ट पदार्थ कारण म्हणून हजर असतांही, त्या कारणाच्या विशेष प्रकाराच्या (म्ह० धर्माच्या) अभावामुळें, कार्याचा अभाव होतो, त्या विशेष प्रकाराचा (धर्माचा) अभाव प्रथम सांगून, मग कार्याची उत्पत्ति सांगितलेली असते. (ज्या विशेष कारणतावच्छेदक धर्माचा अभाव सांगितलेला असतो तसा कुठें कुठें कारणतावच्छेदक धर्माच्या संबंधाचाही अभाव सांगितलेला असतो) तिसर्या प्रकारांत, प्रतिबंधक प्रथम सांगून नंतर कार्याची उत्पत्ति सांगितली जाते. आर्थी विभावना पण अतिन प्रकारची. (१) प्रस्तुत कार्याशीं समानजातीय अशा दुसर्या कारणापासून प्रस्तुत कार्याची उत्पत्ति होणें, हा पहिला प्रकार. (२) प्रस्तुत कार्याच्या विरुद्ध असणार्या कार्याच्या कारणावरून कार्याची उत्पत्ति हा दुसरा प्रकार. व (३) स्वत:च्या (म्ह० कारणाच्या) कार्यापासून, प्रस्तुत कार्याची उत्पत्ति होणें, हा तिसरा प्रकार. या तिन्ही विभावनांना लागू पडेल असा अर्थ करणें हाच तुमच आशय असला पाहिजे.