श्रीगुरुबोध ग्रंथ - पंचम प्रकरण
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
॥ श्रीगणेशायनम: ॥ साक्षी अवस्थात्रयाचा । कैसा तो सांगतों साचा । जाणोनियां अभ्यासाचा । योग साधीं ॥१॥
जाग्रति खरी वाटे जाग्रतींत । परी स्वप्नीं नाशे निश्चित । स्वप्नही नाशे सुषुप्तींत । पाहसी तूं ॥२॥
सुषुप्ति खरी मानावी । तरी जाग्रतींतही दिसावी । जागेपणीं न दिसतां गणावी । नाहीं म्हाणोनि ॥३॥
अवस्था नाशती पाहीं । परी साक्षी नासत नाहीं । अनुभव सांगे तिहींचाही । तुर्यावस्था ॥४॥
रात्रीं स्वस्थ निद्रा पडली । स्वप्नीं मोठी मौज पाहिली । जागा होतां कोठें गेली । आश्चर्य वाटे ॥५॥
ऐसा तिन्ही स्थितींचा अनुभव । सांगतसे जो स्वयमेव । जेथें अज्ञानासी ठाव । मुळींच नाहीं ॥६॥
तिन्ही अवस्थांचा लय होतां । द्रष्टा न नाशे तत्वतां । जें दिसे त्या पाठीं आयता । अनुभवरूप ॥७॥
द्दश्याचा नाश होत आहे । त्याचा नाश कधींच नोहे । तो सर्वदा आहेच आहे । जाणीवरूपें ॥८॥
जाणीव म्हाणजे ज्ञान । तें नोहे देहासमान । व्यापकपणें संपूर्ण । सर्वांठायीं ॥९॥
तें पाहों जातां दिसेना । बोलूं जातां बोलवेना । गुरुकृपेवीण येईना । अनुभवासी ॥१०॥
जें जें कांहीं डोळां दिसे । तें त्याहूनि अनारिसें । भास होतां स्फुरतसे द्रष्टेपणें ॥११॥
हें सर्व अनुभवाया जाण । गुरुक्रुपा पाहिजे पूर्ण । येथें कांहीं वाचाळपण । कामा नये ॥१२॥
बहुत पुस्तकें वाचिती । अर्थ उत्तम सांगती । श्रोतयांसी भुलविती । ज्ञातेपणें ॥१३॥
मीच एक ज्ञानी । ऐसा अभिमान धरूनि मनीं । सर्व लोकां पाचारुनी । ज्ञान सांगती ॥१४॥
लोकांसि मात्र सांगती । नाहीं अनुभवाची स्थिति । ऐसिया कैसी मिळेल गती । मोक्षमार्गींची ॥१५॥
प्रथम आपण अनुभवावें । मग जनांसि उपदेशावें । नातरी उगीच शिणावें । काय काज ॥१६॥
नाहीं वैराग्याचा लेश । न वाटे संसाराचा त्रास । त्यासि पुढें होय क्लेश कैसा पहा ॥१७॥
लोकांसि उपदेश केला । सुखें कांहीं काळ घालविला । सवेंचि संकटांचा घाला । आला जेव्हां ॥१८॥
त्या वेळीं सर्व ज्ञान गेलें । आतां पाहिजे काय केलें । हेंचि सुचेना ज्यासि भलें । भिऊनि गेला ॥१९॥
कांहीं लोक त्या सांगती । गुरूसि शरण जावें म्हाणती । तेणें तुम्हां उत्तमगती । प्राप्त होय ॥२०॥
यासि जानतेपणाचा अभिमान । पूर्वींच ठाऊक असे संपूर्ण । सद्गुरूसि शरण जाऊन । नवें काय मिळेल ॥२१॥
परंतु आग्रहें शरण गेला । जें जें गुरु सांगती याला । तें सर्व याच्या मनाला । जुनें वाटे ॥२२॥
नाहीं वचनांवरी निश्वय । कैसेनि होईल उदय । सर्व वासनांचा क्षय । कैसा होय ॥२३॥
कल्पना नि:शेष निमती । तोचि सुखाचा झरा निश्चिती । याची तरी मनोवृत्ति । संशयें उठे ॥२४॥
उगीच उपदेशा घेतलें । गुरूसि मात्र शिणविलें । गळा कान मोकळे झालें । उभयतांचे ॥२५॥
यास्तव तुंवा सावध असावें । प्रथम साधन अभ्यासावें । द्दढ होतां मग वाचावे । विचारें ग्रंथ ॥२६॥
जो आपुल्या साधना मिळे । तो वाचितां ज्ञन प्रबळें । अभ्यासें आपण कळे । ज्ञानस्वरूप ॥२७॥
इति श्रीगुरुबोध ग्रंथ । श्रवणें लाभे मोक्षपंथ । मननाभ्यासें श्रीभगवंत । ह्रदयीं भेटे ॥२८॥
इति श्रीगुरुबोधे पंचम प्रकरणं संपूर्णम् ॥५॥ श्रीराम ॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP