श्रीगुरुबोध ग्रंथ - तृतीय प्रकरण
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
॥ श्रीगणेशायनम: ॥ मज समोर बैसविलें । गुरुरायें बोलों आरंभिलें । म्हाणती तुज कोणीं गांजिलें । सांग मज ॥१॥
संसारें त्रासलों म्हणसी । तरी तूं त्याच्या द्रष्ट आहेसि । असंगत्वें पाहसी । तरी तूं निराळा ॥२॥
तूं तुझें स्वरूप विसरलासी । म्हाणोनि संसारीं भुललासी । आतां तरी द्दश्य भासासी टाकूनि देईं ॥३॥
तुझ्यापुढें जें जें दिसे । तें तें सर्वहि नासे । तुझा तूं असतचि असे । सर्वकाळ ॥४॥
जन्ममरण तुला नाहीं । अवस्थात्रयाचा साक्षी पाहीं । सच्चिदानंद लक्षणीं तिहीं । ओळखी घे तूं ॥५॥
तूं नामरूपातीत अससी । द्दश्य पदार्था नातळसी । तुझा तूंचि अससी । वेगळेंपणें ॥६॥
कैंचा पुत्र कैंची जाया । सुखसाठीं म्हाणती या या । माझी माझी म्हणसी काया । ती तूं नव्हेसी सर्वथा ॥७॥
मुखें माझें जें म्हणसी । तें तूं कैसेनि होसी । त्याहूनि निराळा अससी । म्हणूनि म्हणसी माझें ॥८॥
तिन्ही अवस्थांचा साक्षी । बरवें आपणातेम लक्षी । खोटें अहंपण भक्षीं । सुखिया होसी ॥९॥
नाम रूप तुला नाहीं । ऐसें सांगितलें पाहीं । तें स्पष्ट सांगतों ह्रदयीं । द्दढ धरूं ॥१०॥
ज्यावेळीं तुझें जन्म झालें ॥ आईबापें नाम ठेविलें । तेंचि सत्य मनीं कल्पिलें । माझें ऐसें ॥११॥
दुसर्यासि हाक मारितां । तूं ओ न देसी तत्वतां । तुझें नाम उच्चारितां । पुढें होसी ॥१२॥
सत्य नाम एकचि धरिलें । तरी तेंही मिथ्या ठरलें । कैसें तेंही वहिलें । सांगतों तुज ॥१३॥
बाप मुला म्हणोनि पाचारी । मुलें दादा म्हणती निर्धारीं ॥ चाकर साहेब म्हणोनि पुढारीं । सांगाया येती ॥१४॥
इतुक्यां ओ देसी स्वभावें । मग कैचें नाम खरें मानावें । हेंचि मजसी सांगावें । निश्चय करूनि ॥१५॥
मूल हेंचि नाम सत्य मानिसी । तरी बाबा म्हणतां ओ कां देसी । बाबा हेंचि सत्य धरिसी । तरी दादा म्हणतां सरसी पुढें ॥१६॥
विचारें तुला नामचि नाहीं । म्हणूनि कोणत्याही नामें पाहीं । पाचारितां विषाद कांहीं । वाटेचिना ॥१७॥
इति श्रीगुरुबोध ग्रंथ । श्रवणें लाभे मोक्षपंथ । मननाभ्यासें श्रीभगवंत । ह्रदयीं भेटे ॥१८॥
इति श्रीगुरुबोधे तृतीय प्रकरणं संपूर्णम् ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP