पंचसमासी - समास ५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥  
आतां शिष्या सावधान । मागील कथानुसंधान । झालिया आत्मनिवेदन । आली वृत्ति मिथ्यत्वें ॥१॥
धन पाहोनि लोभी आलें । परी मन तेथेंचि बैसलें । शरीरप्रकृतिं । भ्रांतापरी ॥२॥
कार्य करी प्रपंचाचें । ध्यान लागलें धनाचें । अंतर गुंतलें तयाचें । द्रव्याकडे ॥३॥
ऐसें परम झालें मन । ध्यानीं आठवे धन । पिसें लागलें स्वप्र । तैसेंचि देखे ॥४॥
तो ज्ञाता समाधानीं । प्रारब्धयोगें वर्ते जनीं । परी अनु-संधान मनीं । वेगळेंची ॥५॥
वृत्ति गुंतली स्वानुभवें । जनीं तेंचि भासे आघवें । सबाह्य व्यापिलें देवें । ब्रह्मांड अवघें ॥६॥
वृत्ति मुळाकडे पाहे । त्यास राम दिसताहे । स्तब्ध होवोनियां राहे । रामचि दिसे ॥७॥
मन मुरडे आटे । तंव मार्गीं राम भेटे । मागें पुढें प्रगटे । रामचि अवघा ॥८॥
दाही दिशा अवलेकितां । रामचि भासे तत्त्वतां । वदन चुकवूं जातां । सन्मुख राम ॥९॥
राम झालिया सन्मुख । कल्पांतीं नव्हे विन्मुख । नेत्र झांकितां अधिक । रामचि दिसे ॥१०॥
मग विसरोनि पाहिलें । तंव तें रामचि झालें । जीव सर्वस्वें वेधिले । संपूर्ण रामें ॥११॥
मग आपणा पाहे । तंव रामचि झाला आहे । उभय-साक्षी जो राहे । तोचि राम ॥१२॥
रामेंविन सर्वथा कांहीं । अणुमात्र रितें नाहीं । दृश्य द्रष्टा दर्शन तेंही । रामचि भासे ॥१३॥
प्रपंच सारिला मानसें । दृढ लागलें रामपिसें । देह वर्ते भ्रमिष्ट जैसें । पिशाचवत्‍ ॥१४॥
रामरूपीं वेधलें मन । तेणें राहे कुलभिमान । पूर्व दशेचें लक्षण । पालटोनि गेलें ॥१५॥
धरूनि रामरूपीं आवडी । प्रपंच गेला ताडातोडीं । माया राहे बापुडी । न चले कांहीं ॥१६॥
प्रत्यक्ष जन प्रगटला । दृश्य पदार्थ बोधिला । असतच नाहींसा झाला । सद्रुरुप्रतापें ॥१७॥
ऐसें नाहीं हेंगे तेंगे । ऐसें तैसें पुढें मागें । पूर्वस्थिति बोलणें लागे । ऐसिया परी ॥१८॥
स्वरूप बोलिलें नव जाये । बोलिल्यावीण हातां नये । म्हणोनि शब्द उपाये । रचिला देवें ॥१९॥
शब्दाचे उदरीं अगाध । सांठवला नीतिबोध । अर्थ पहातां स्वानंद । तुंबळे बळें ॥२०॥
शब्दमथन शब्दें केलें । अर्थ नवनीत प्रगटलें । मथनकर्त्यासी भक्षिलें । त्या नवनीतें ॥२१॥
प्रपंचतक्राअंतरीं । नवनीत वास्तव्य करी । तक्र आटोनि पात्रभरी । नवनीत झालें ॥२२॥
अवघें नवनीत दाटलें । तेणें बळें पात्र फुटलें । नवनीतें संपूर्ण झालें । ब्रह्मांड अवघें ॥२३॥
तेथेंहि दाटलें उदंड । तेणें उतटलें ब्रह्मांड । सकळ लोपोनि उदंड । तेंचि तें झालें ॥२४॥
नवनीत प्राप्त व्हावयासी । जातां तयासि तेंचि ग्रासी । सकळ पदार्थमात्रासी । नवनीतें सेविलें ॥२५॥
सेविलें आपणा आपण । हे अनुभवाची खूण । ग्रंथ झाला संपूर्ण । पंचसमासी ॥२६॥
सद्रुरूसी जातां शरण । शीघ्र तुटे जन्ममरण । सर्व मनोरथ पूर्ण । होती वचनमात्रें ॥२७॥
देह नासे क्षणांतरीं जाणोनि सार्थक करी । तो एक धन्य संसारीं । सत्संगेंचि ॥२८॥
उपजला प्राणी तो नासे । आपणा तो मार्ग असे । म्हणोनि दृढ विश्वासें । सद्रुरुपाय धरावे ॥२९॥
चालवीत असतां आश्रम । जे होइजे आत्माराम । ऐसा हा सत्यमागम । महिमा कोटिगुणें ॥३०॥
श्रोतीं सावध होणें । अंतकाळीं लागे जाणें । येथील राहाती सजणें । आणि संपत्ति ॥३१॥
बहु जन्मांचे शेवटीं । नरदेह पुण्यकोटी । म्हणोनि भगवंता भेटी । होती सत्संगें ॥३२॥
ऐशी खूण सकळांस । सांगोनि गेला रामदास । सत्संगे जगदीश । नेमें भेटे ॥३३॥
अरुख बोबडी वाणी । भावें पूजिला कोंदडपाणि । न्यून पूर्ण संतजनीं । क्षमा केली पाहिजे ॥३४॥
॥ पंचसमासी ग्रंथ संपूर्ण ॥ ओवीसंख्या ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP