पंचसमासी - समास २
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥ श्रीराम समर्थ ॥
सर्वांगाचे करोनि कान । तुम्हीं व्हावें सावधान । पहिले अध्यायीं प्रश्र । शिष्यें केला ॥१॥
तया प्रश्राचें उत्तर । आतां ऐका तत्पर । सांगिजेल सविस्तर । येच क्षणीं ॥२॥
जेणें निरसे हें अज्ञान । तया नांव ब्रह्मज्ञान । तया ज्ञानाचें लक्षण । ऐसें असे ॥३॥
स्वरूपीं सावधपण । हेंचि ज्ञानाचें लक्षन । ब्रह्मीं पडे विस्मरण । हे अज्ञानदशा ॥४॥
स्वरूपीं भुली पडतां । बहु लागे मोहममता । तेणें गुणें देहअहंता । दृढ होय ॥५॥
माझी माता माझा पिता । माझा पुत्र माझी कांता । माझा बंधू माझी सुता । जामात माझे ॥६॥
माझें घर माझा संसार । माझी जन्मभूमि सार । माझे सोयरे अपार । शेत वाडे पशू ॥७॥
माझें सपंत्ति । माझें वैभव माझी संतति । सर्वांचा अभिमान चित्तीं । दृढ झाला ॥८॥
ऐसें माझें माझें म्हणतां । अभिमानानें ओझें वाहतां । आयुष्य वेंचलें अवचितां । मरोन गेला ॥९॥
गोवून संसारीं वासना । अभिमानें भोगी यातना । विषयीं गुंतला चुकेना । जन्ममृत्यु ओझें ॥१०॥
नश्वर जाणोनि म्हणे माझें । व्यथचि अभिमानें फुंजे । माथां प्रपंचाचें ओझें । कुटुंबकाबाडी ॥११॥
जें जयाचें मनोगत । तया होय तेंचि प्राप्त । म्हणोनि विषयीं सक्त । तया स्वहित नाहीं ॥१२॥
चुकोनि आत्मज्ञान । धरिलें विषयीं ज्ञान । याला म्हणिजे अज्ञान । नेमस्त शिष्या ॥१३॥
आतां हें अज्ञान । तया निरसी तें ज्ञान । तया ज्ञानाचें लक्षण । ऐक सांगतों ॥१४॥
मी आत्मा ऐसें जाणिजे । तया नांव ज्ञान बोलिजे । हें ज्ञान सहज बोलिजे । अज्ञान कैंचें ॥१५॥
आत्मा पवावयाची खूण । आधीं पाहावें मी कोण । आपणासी पहांता पूर्ण । समाधान बाणे ॥१६॥
देह माझें जो जाणतो । तरी देहावेगळाचि तो । धनी गुरु माझे म्हणतो । तो गुरु नव्हे ॥१७॥
सर्व पदार्थ धनी जाणे । तरी तो पदार्थ होऊं नेणें । तैसा आत्मा सकळ जाणे । तो तया वेगळा ॥१८॥
मी कोण ऐसें पाहतां । देहाची मायिक वार्ता । आपण आपला शोध घेतां । आपण मिथ्या ॥१९॥
देहीं शोधितां मीपण उडे । मार्ग लागला आणिकीकडे । मूळासी जातां बापुडें । तो कोठें नाहीं ॥२०॥
देहसंगें वृत्ति मळे । शुद्ध ज्ञान तें झांकोळे । आपणा नेणतां आरंबळे । जीव दु:खें ॥२१॥
आपली शुद्धि घेवों जातां । आपण आत्माचि तत्त्वतां । बंधनचि नाहीं मुक्तता । होईल कैंची ॥२२॥
जन्म मृत्यु मायिक भ्रांति । हें आलें आत्मप्रचीती । अजन्मा तो आदिअंतीं । आपणचि आहे ॥२३॥
अनुभ-वितां आत्मस्थिती । मुळीं नाहीं पुनरावृत्ति । या नांव सायुज्यमुक्ति । जाण शिष्या ॥२४॥
जेथें शिणली वेदवाणी । तो तूं आत्मा पूर्णपणीं । सायुज्यमुक्तीचा धनी । तूंचि एक ॥२५॥
ऐकोनि शिष्य आनंदला । म्हणे जन्म सार्थक जाहला । माझा संशय फेडिला । सद्रुरुरायें ॥२६॥
नमस्कारोनि पुढती । बोलतां झाला स्वामीप्रती । हेंचि दृढ माझे चित्तीं । बैसवा स्वामी ॥२७॥
पुढिलिये समासीं । दृढ होईल शिष्यासी । श्रोतीं सावध कथेसी । अवधान द्यावें ॥२८॥ इति श्री०॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2014
TOP