कृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग १

श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.


॥ श्री ॥

श्रीपरेशायेनम: ॥ श्रीकृष्णायेनम: ॥ श्रीदत्तात्रेयेनम: ॥ प्रथम नमु विघ्नेहरा ॥ जो प्रीतीचा सोईरा ॥ तो अव्यक्त परा ॥ परा तो व्यक्त जाला ॥१॥
जो म्या जमीला गणपती ॥ तो सकळ गणांचा चक्रवर्ती ॥ मुक्तीफळे घेउन हातीं ॥ वाट पाहे भक्ताची ॥२॥
तो गणराज नमीला ॥ नटारांभी खेळतु देखीला ॥ नानारूपें नटला ॥ मायावेषें ॥३॥
ये सृष्टीचीये आगणी ॥ विनायेकें घेतली अवगनी ॥ राक्षस खडे झाडुनी ॥ भूभीका चोखाळिली ॥४॥
साधुसंतातें स्थापिलें ॥ तयातें आपुलें दाखविलें ॥ तेणें रूपे निवाले ॥ ठाकले पाहतांचि ॥५॥
सुलक्षनीक सुंदर ॥ रूप नटले मनोहर: यैसे अनंत अवतार: पालटु दावी ॥६॥
जें सोगर्ये (?) श्रृष्टी रंगनी ॥ ते करी संपादनी ॥ निज भक्त देती वोवाळणी ॥ जीव जोती रत्नें ॥७॥
श्रीमुखें नांव वानुनी ॥ तयासी मोक्षपद सांगोनी ॥ आचार पेठवनी घेउनी: कोडी गुणा देतु असे ॥८॥
यैसा युगानयौगी संभवतु ॥ येकलाची जाला बहुतु ॥ तो नांदतुसे संततु ॥ निजधामीं ॥९॥
तो गणराज गणपती ॥ म्या नमीला अल्पमती ॥ अभय करू ठेवुनी मस्तकी ॥ कृपादान दिधले ॥१०॥
तो कृपासिंधु मायेबापु ॥ सर्व भूतीं व्यापकु ॥ तेणें मस्तकी ठेउनी हातु ॥ मतीप्रकाश दीधला ॥११॥
आतां नमु सारजा शक्ती ॥ जे चराचरा जीयेचा हातीं ॥ ते अनंत खेळत असे खेळती ॥ मती ईश्वराचीया ॥१२॥
ते जीवजातां हंसवहनी ॥ वीणा पुस्तक करी घेउनी ॥ ते नमीली जीवसंभवनी ॥ चैतन्यमाया ॥१३॥
तीयेसी नमस्कार करुन ॥ मग वंदु श्रीगुरुचे चरण ॥ तेणें अज्ञानअंधकार फेडुन ॥ उजळीला ज्ञानदीपकु ॥१४॥
तयाश्रीगुरुचा उपकारू ॥ कोडी जन्में मीं नव्हे निस्तरू ॥ पाहातां सान मेरू ॥ अगोचरिया महिमेसीं ॥१५॥
तया श्रीगुरुचे वचन ॥ तेंची मीया करुन अंजन ॥ मग देखिले नीर्वाना ॥ श्रीदत्तात्रें माउली ॥१६॥
तो नमु श्रीगुरु ॥ मग साधुसंता नमस्कारू करूं ॥ जेहीं नमीला ईश्वरू ॥ तया नमन कवेश्वरा ॥१७॥
जे जे अनुसरले भगवाना ॥ नमन तयांचेया चरणां ॥ आईक तयापरीस तयां सज्ञाना ॥ नमन माझे ॥१८॥
जे धर्मपरायण ॥ भूतकृपा आंक्रन ॥ आचार्ये सुवीद्य ब्राह्मण ॥ तयासी नमन माझें ॥१९॥
आणि वैश्य क्षेत्री सूद्रादीक ॥ आणि कांहीं याती अनेक ॥ जे जे जाणती ब्रम्हसुख ॥ तयासी नमन माझें ॥२०॥
आतां समस्तां नमस्कार करुनी ॥ मग नमीन चक्रपाणी ॥ जो अनुसयाकररत्नी ॥ अवतारू केला ॥२१॥
तो अत्रीनंदनु । प्रथम यौगीया अवत्रोनु ॥ उद्धरिला भक्तीजनु ॥ श्रीदत्तवेषें ॥२२॥
जो अविनाश अपरांपरु ॥ तो केवि जाला साकारू ॥ क्रुतायौगीचा आचारू ॥ पाहावया भक्ताचा ॥२३॥
तो प्रथम योग पवित्र ॥ म्हणौनि तो अमोघ अवतार ॥ सकळ देवांचा दातार ॥ तो श्रीप्रभुरावो ॥२४॥
कृत त्रेत द्वापार काळी ॥ तो अद्यापी खेळे भूमंडळीं ॥ स्नान करी प्रात:काळीं ॥ मेरूवाळा ॥२५॥
माध्यानी माहोरा भीतरी ॥ अवधूतवेषें मिक्षा करी ॥ खेळु क्रीडा पंचाळेस्वरीं ॥ नित्य खेळें ॥२६॥
आम्टाळें तळें ॥ तेथे प्रतिदिनिं क्रीडा खेळें ॥ गोमती तीये वेळे ॥ तेथें नव्हती ॥२७॥
तीसी यावया हेची कारण ॥ घ्यावया दत्तात्रयांचे दरूषण ॥ सायंकाळीं निद्रास्थान ॥ करिती रुसीमाजी ॥२८॥
अवधूतवेषें खेळती ॥ भ्रमण प्रतदिनी करिती ॥ तो अवतरला आदीमूर्ती ॥ श्रीसर्वेश्वरु ॥२९॥
तो योगीयांचा वेळाईतु ॥ आणि भक्तांसी भुक्ती मुक्ती देतु ॥ यैसा ये सृष्टीमध्ये खेळतु ॥ अद्यापवेर्‍हीं ॥३०॥
तयांचयां स्मरणें ॥ धुरुस आढळ पद दीधले जेनें ॥ तो नमिला सुद्ध अंतक्रनें ॥ श्रीदत्तात्रेयो: ॥३१॥
तो भुक्तीमुक्तीदायकु ॥ त्यांची सरी न पवे अवतारू अन्यकु ॥ तो नमिला भावपूर्वकु ॥ रावो सैंहाद्रीचा ॥३२॥
तो आरळकुतापहरू ॥ मदळसे देउनी अभय करू ॥ तो रेणुकेचा दातारू ॥ यैसे पुराणें बोले ॥३३॥
करुनी साष्टांगी नमस्कारू ॥ माझा मस्तकीं ठेविला अभयंकरू ॥ तेणें कवीतामती जाला विस्तारू ॥ भवसागरू तारावया ॥३४॥
पुढीलें कथेचा प्रकाशु ॥ सांगीजेल सुरसु ॥ आतां उद्धरीजैल वंसु ॥ यादवांचा ॥३५॥
कृत त्रेत जालयां उपरी ॥ पवित्रा द्वापाराभीतरी ॥ कैसे अवत्रले मुरारी ॥ भक्त उद्धरावया ॥३६॥
धन्य धन्य ते उतर दिसा ॥ येणें जाले ऋषीकेषा ॥ ते पूर्व कथा परियेसा ॥ कृष्णदासु सांगतुसे ॥३८॥

॥ प्रसंग पहिला ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP