श्रीदत्त विजय - अध्याय तिसरा
स्वामी दत्तावधूतांनी लिहिलेली ही पोथी म्हणजे श्रीदत्त प्रभूंजवळ जाण्याचा अतिसुलभ मार्ग होय.
श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । लोकोद्धार कारणार्थ । प्रवास करी भगवंत । स्वये पायी चालत । दर्शन देण्या भक्तांना ॥१॥
हिमालयापासोन । सुरु करिती प्रयाण । काशी प्रयाग गया पाहोन । मथुरा वृंदावन पाहिले ॥२॥
गिरनार अबु पर्वत । द्वारका भालकातीर्थ । नारायण सरोवर सोमनाथ । रणछोड पाहिले स्वामींनी ॥३॥
पूर्ण उत्तर हिंदुस्थान । पूर्व पश्चिम हिन्दुस्थान । पाहोन करिती प्रयाण । दक्षिणेकडे श्रीस्वामी ॥४॥
शिवकांची विष्णुकांची । कांचीपुरम् आणि तिरुपती । कुंभकोणम् चिदंबरम् मीनाक्षी । कन्याकुमारी पाहिले ॥५॥
रामेश्वरम् मायावरम् । वडलूर स्वामी रामलिंगम् । श्रीशैलम् अहोबिळम् । पाहिले पाहा स्वामींनी ॥६॥
कुटरालम् सुब्रह्मण्यम् । शुचींद्रम कर्दळीबनम् । वज्रालगुट्टा गुत्तीकोंडाबिळम् । पाहिले पाहा स्वामींनी ॥७॥
ऐसे परी फिरत फिरत । स्वामी येती महाराष्ट्रात । लोककल्याण कारणार्थ । पायी फिरती दत्त स्वये ॥८॥
या त्यांच्या प्रवासात । लीला घडल्या असती अनंत । त्यातील काही निवडक । घेतल्या असती या ग्रंथी ॥९॥
मामा मालुसरे रत्नागिरीत । येवोनी स्वामीसी विनवीत । हॉटेल नाही चालत । कृपा करावी म्हणोनिया ॥१०॥
मामांची बहीण असत । नामे सुलभा सावंत । ती स्वामींसी पुत्रवत । माया पाहा करितसे ॥११॥
म्हणोनी शामराव मालुसर्यांसी । मामा म्हणती श्रीस्वामी । मामाही श्रीस्वामींसी । मुलापरी वागवीतसे ॥१२॥
नाही हॉटेल चालत । ऐसे जव मामा म्हणत । स्वामी म्हणती हासत । लुटोनी हॉटेल टाकावे ॥१३॥
स्वामी जाती हॉटेलात । सारे उचलती पदार्थ । वाटोनी लोका टाकत । विस्मये सारे पाहाती ॥१४॥
दुसर्या दिवसा पासोन । विक्री वाढे शतगुण । वर्षा इतुके उत्पन्न । काही दिनांत मिळतसे ॥१५॥
मामा होवोनी आनंदित । स्वामींसी आपले गृही नेत । काही दिन तेथे राहत । लीला करीत श्रीस्वामी ॥१६॥
मामा मालुसर्यांच्या घरात । श्रीस्वामी राहू लागत । मामी एक दिन पाहात । ऋषी रुप स्वामींचे ॥१७॥
अवाढव्य ऋषी रुप धरोन । स्वामी असती ध्यानमग्न । असंख्य देवता देहातून । बाहेर पडती स्वामींच्या ॥१८॥
चार वर्षांची शीतल । कन्या असे अवखळ । तिचा उनाड खेळ । सदैव असे चाललेला ॥१९॥
मामा स्वामींसी म्हणत । जरा हिला करा स्वस्थ । स्वामी जवळ बोलावित । हात मस्तकी ठेविती ॥२०॥
तात्काळ समाधी लागत । विस्मये सर्व पाहात । अवखळ मुलगी झाली शांत । चिंता करती सर्वही ॥२१॥
मग स्वामींसी विनवीत । करा हिला जागृत । पुन्हा मस्तकी ठेविता हात । कन्या जागृत होतसे ॥२२॥
सहा वर्षांचा द्वितीय सुत । त्यासी सर्व बाळू म्हणत । विचित्र अति वागत । म्हणोनी चिंता मामींना ॥२३॥
मामा स्वामींसी सांगत । बाळूकडे पाहा म्हणत । हा कधी कधी भडकत । न आवरतसे कोणाला ॥२४॥
कोयती कुर्हाड घेवोन । अंगावर येतो धावोन । ऐसेपरी महिन्यातून । दोन वेळा करतो हा ॥२५॥
पत्रिका दाखविली ज्योतिषास । ते म्हणती मृतात्मा यास । प्रति अमावास्या पौर्णिमेस । प्रभावित करितो की ॥२६॥
वय होता बावीस पूर्ण । कोणाचा तरी करेल खून । हे भविष्य ऐकोन । भयभीत पाहा मी असे ॥२७॥
स्वामी मामांसी म्हणत । तुम्ही राहा निश्चिंत । याचे सारे प्रारब्ध । पुसोनिया टाकीन मी ॥२८॥
ऐसे काही दिवस जात । अचानक बाळू भडकत । सुरी कोयती घेवोनी जात । अंगावरी धावोनिया ॥२९॥
स्वामी उठले अकस्मात । बाळूस पकडले हातात । चार रट्टे लगावीत । भूत पळोनी जातसे ॥३०॥
त्या दिवसा पासोन । बाळू झाला पूर्ण शांत । अभ्यासातही हुशार होत । प्रथम क्रमांक येतसे ॥३१॥
पडता दत्ताचा हात । प्रारब्ध सारे बदलत । ऐसा महिमा अदभुत । समर्थ स्वामी दत्ताचा ॥३२॥
भगवतीच्या किल्ल्यात । मामांचे घर असत । सोळा वर्षांचे दत्त । खेळत राहती मुलांसवे ॥३३॥
धोंडीराम नामे गृहस्थ । येवोनी स्वामीसी नमित । म्हणे विनंती एक । करण्यालागी आले मी ॥३४॥
मम पत्नी व्याधिग्रस्त । अठरा वर्षे पूर्ण होत । नाही बिछान्यावरुन उठत । बेशूद्ध होते कधी कधी ॥३५॥
कधी दिवस सात । बेशुद्ध होई अकस्मात । कधी अकरा दिवस । बेशुद्ध होवोनी राहतसे ॥३६॥
वर्षे अठरा अंथरुणावर । पडोन आहे निरंतर । अनेक झाले डॉक्टर । हात टेकले सर्वांनी ॥३७॥
गेले पाच दिवस । पडोन आहे बेशुद्ध । स्वामी जर उपाय नसत । मृत्यू द्यावा पत्नीला ॥३८॥
स्वामी म्हणती तयाप्रत । मी नाही कोणा मारत । तुझी पत्नी व्यवस्थित । ईश्वरकृपे होईल की ॥३९॥
प्रदक्षिणा मारुतिस । रोज करी एकवीस । सांगोनी ऐसे त्यास । घरी पाहा पाठविले ॥४०॥
ते दिनी अस्तमानी । प्रदक्षिणा करण्या लागोनी । मारुति मंदिरा जावोनी । करु लागे प्रदक्षिणा ॥४१॥
किल्ल्याच्या तटावरती । दिसे भयंकर आकृति । धोंडीराम भयचित्ती । प्रदक्षिणा पूर्ण करितसे ॥४२॥
एकविसावी प्रदक्षिणा करीत । आकृति अंगावर येत । धोंडीराम श्रीदत्त । म्हणोनी नमन करितसे ॥४३॥
आकृति अदृश्य होत । स्वामी जवळी येई भक्त । सर्व कथा सांगत । मंदिरा समीप घडलेली ॥४४॥
स्वामी त्यासी म्हणत । तू राहा प्रदक्षिणा करीत । ती आकृति तुजप्रत । दिसणार नाही कधी पुन्हा ॥४५॥
धोंडीराम प्रदक्षिणा करीत । पत्नी घरी होई स्वस्थ । तिसरे दिनी येत । दर्शन घेण्या स्वामींचे ॥४६॥
स्वामींसी पाहोनी पत्नी म्हणत । हे असती भगवान दत्त । प्रकटोनी आमुचे गृहात । आरोग्य दान मला दिले ॥४७॥
दिव्य प्रकाश झोतात । मी यासी पाहिले म्हणत । तो प्रकाश मजवरी पडत । आरोग्य मजसी देतसे ॥४८॥
ऐसा श्रीगुरु समर्थ । भक्त कल्याणा सदा दक्ष । एकेक लीला अदभुत । लीला विग्रही स्वामींच्या ॥४९॥
गिरीधर नामे एक गृहस्थ । येवोनी स्वामीसी नमित । म्हणे आशा नाम असत । माझ्या लहान बहिणीचे ॥५०॥
झाली वर्षे सात । असे व्याधीने पीडित । अनेक डॉक्टर उपाय करीत । परी ठीक न होतसे ॥५१॥
स्वामी म्हणती तयाप्रत । येतो मी तव गृहाप्रत । तव गिरीधर म्हणत । रिक्षा घेवोनी येतो मी ॥५२॥
स्वामी म्हणती तयासी । तू न आणावे रिक्षासी । चालत येवोनी तव गृहासी । साकडे ईश्वरा घालेन मी ॥५३॥
मंत्रोनी घेती तीर्थ । आणि चालू लागत । पाच मैल जावोनी चालत । तीर्थ देती आशाला ॥५४॥
ते तीर्थ प्राशिता क्षणी । आशा बरी होवोनी । लागतसे स्वामी चरणी । आणि विनंती करितसे ॥५५॥
आज घेवोनी विश्राम । उद्या तुमचे घरी येईन । तेथे घेवोनी जेवण । उपवास माझा सोडेन मी ॥५६॥
दुसरे दिनी स्वामी सदनी । येई पाहा ती गृहिणी । सात वर्षांचा उपवास सोडोनी । पोटभर ती जेवीतसे ॥५७॥
परी सर्वही चिंतेत । काय होईल हिचे म्हणत । फळांचा रसही न राहे पोटात । उलटी होवोनी पडतसे ॥५८॥
ऐसी गेली वर्षे सात । आज ही पोटभर जेवीत । काय होईल हिचे म्हणत । चिंता करिती सर्वही ॥५९॥
परी काही न होत । स्वामी आशीर्वाद सांगात । पूर्ण आरोग्य होवोनी प्राप्त । आशा घरी जातसे ॥६०॥
श्रीस्वामींचे दर्शनार्थ । रोज येती अनेक आर्त । सर्वांसी सुख देत । कल्पवृक्ष श्रीस्वामी ॥६१॥
मारुती नामे भक्त । असे स्वामींचा बालमित्र । एकदा येवोनी म्हणत । श्रीस्वामींसी अवधारा ॥६२॥
माझा बंधू रामचंद्र । गंभीर आजारी असत । डॉक्टर आम्हा सांगत । न वाचे हा म्हणोनिया ॥६३॥
स्वामी तयासी म्हणत । चिंता न करी अणुमात्र । हा कागद उशीत । घालोनी ठेवी म्हणती ते ॥६४॥
ऐसे म्हणोनी एक मंत्र । कागदावरी लिहोनी देत । अपमृत्यू टळोनी जात । ऐंशी वर्षे जगतसे ॥६५॥
ऐसा करुणेचा सागर । भक्त रक्षण्या तत्पर । भरोनी राहे चराचर । सर्व व्यापी जगदात्मा ॥६६॥
यदर्थी कथा असंख्य । परी येथे सांगतो संक्षिप्त । श्रीदत्त चरित्र अदभुत । पठणे मोक्ष मिळतसे ॥६७॥
एक भक्त येवोनी विनवीत । माझ्या घरी या म्हणत । स्वामी त्याचे घरी जात । राहती तेथे अवधारा ॥६८॥
त्या रात्री तेथ । स्वामी असती ध्यानस्थ । रुदन ध्वनी येत । लक्ष देवोनी ऐकती ते ॥६९॥
थोडा वेळ ऐकोन । भक्त पत्नी ‘ का ’ रडते म्हणोन । स्वामी पुसती उठोन । ‘ का ’ रडते म्हणोनिया ॥७०॥
भक्त पत्नी सांगत । कान जोराने ठणकत । स्वामी तीर्थ देत । कानात घाली म्हणती ते ॥७१॥
तीर्थ घालिता कानात । कान ठीक होई क्षणात । भक्त पत्नी आनंदात । आभार मानी स्वामींचे ॥७२॥
दोन मासानंतर । कान पुन्हा करी कहर । भक्त पत्नी करी विचार । मनामाजी अवधारा ॥७३॥
आज जर येथे स्वामी असते । माझ्या कानास बरे करते । ऐसे म्हणता मनाते । अदभुत पाहा वर्ततसे ॥७४॥
हवेतून एक हात । तेथे प्रकटे अकस्मात । कानावरी तो फिरत । कान बरा होतसे ॥७५॥
पाहोनी हा चमत्कार । म्हणे स्वामी ईश्वर । भरोनिया चराचर । सदभक्तांते रक्षितसे ॥७६॥
पालकर नामे भक्त । नऊ वर्षांचा असे सुत । एकदा पडे विहिरीत । सत्तर फूट खोल असे ॥७७॥
परी काही न होत । पुत्र राहे आनंदात । विहिरीतूनी सांगत । चिंता कोणी करु नका ॥७८॥
श्रीदत्तकृपे करोन । मी सुखरुप असोन । आता दोर सोडोन । वरती काढा तुम्ही मला ॥७९॥
ऐसे पुत्र सांगत । सर्वा आश्चर्य वाटत । म्हणती स्वामी चराचरात । राहोनी भक्ता रक्षितसे ॥८०॥
राहोनिया चराचरात । सदभक्तांते रक्षित । ऐशा कथा अनंत । किती म्हणोनी सांगाव्या ॥८१॥
मारुती साळवी स्वामीभक्त । त्याच्या घरी स्वामी राहात । तेथील खोल विहिरीत । एक मनुष्य पडतसे ॥८२॥
परी राही सुरक्षित । काहीही त्यासी न होत । दोर टाकोनी काढीत । वरती पाहा तयासी ॥८३॥
एका व्यक्तीचे अंगात । देवी येवोनी सांगत । येथे राही श्रीदत्त । म्हणोनी हा वाचला ॥८४॥
अन्यथा होता घात । आले होते यमदूत । परी दत्तकृपेने वाचत । म्हणोनी देवी सांगतसे ॥८५॥
श्रीदत्त चरित्र अमृत । प्राशिता अमर होती भक्त । जगा सन्मार्ग दाविण्याप्रत । ईश्वर फा प्रकटला ॥८६॥
एक स्त्री व्याधिग्रस्त । डबल टॉयफाईड होत । काविळ होई त्यात । उपचार सारे थकती ते ॥८७॥
स्वामी विभूति देत । तत्क्षणी व्याधी पळोनी जात । सारे काम करो लागत । दुसरे दिनी ती पाहा ॥८८॥
ऐसे परी व्याधिग्रस्त । येवोनी स्वामीते नमित । विभूति देवोनी तयाप्रत । ठीक करिती श्रीस्वामी ॥८९॥
स्वामी स्वगृही न राहात । राहाती भक्तांच्या गृहात । अशोक स्वामी बंधू असत । विनंती करी स्वामींना ॥९०॥
हातखंबा ग्रामात । नूतन गृह बांधले असत । एकांत अरण्य असत । येवोनी राहावे म्हणोनिया ॥९१॥
त्याच्या विनंतीसी देवोनी मान । स्वामी करिती प्रयाण । अशोकासी आनंद होत । दत्त आले म्हणोनिया ॥९२॥
स्वामींसी स्वये घाली स्नान । अति आनंदे करोन । अदभुत वर्ते दुसरे दिन । औदुंबर तेथे येतसे ॥९३॥
कल्पवृक्ष औदुंबर । अकस्मात प्रकटे तेथ । स्वामी दत्त दिगंबर । म्हणती सर्वही तेधवा ॥९४॥
काही काळ मध्ये जात । पुन्हा तेथे जावोनी राहात । चाळीस दिन तप करीत । तया स्थानी श्रीस्वामी ॥९५॥
असंख्य औदुंबर तेथ । आपोआप निर्माण होत । पाहोनी सर्व म्हणत । देहधारी दत्त हा ॥९६॥
स्वामी म्हणती भक्तांप्रत । हे स्थान होईल प्रख्यात । कोटी जीवांचा उद्धार करीत । ऐसे होईल स्थान हे ॥९७॥
स्वामी तेथे तप करीत । असंख्य देवता दर्शना येत । काही भाग्यवान भक्त । पाहाती लीला देवतांच्या ॥९८॥
चतुर्विध पुरुषार्थ । साध्य होतील भक्तांप्रत । प्रत्यक्ष राहू या स्थानात । औदुंबर वृक्षातळी ॥९९॥
हा असे कल्पतरु । प्रत्यक्ष दत्त औदुंबरु । जे जे मनी इच्छिती नरु । प्राप्त होईल परियेसा ॥१००॥
स्वामी म्हणती भक्ताप्रत । जेथे औदुंबर वृक्ष असत । तेथे मी राहे श्रीदत्त । मान ठेवावा वृक्षाचा ॥१०१॥
प्रदक्षिणा औदुंबरासी करीत । सर्व इच्छा पूर्ण होत । श्रीदत्त जय दत्त मनी म्हणत । प्रदक्षिणा कराव्या भक्तांनी ॥१०२॥
भाव असावा आपुले मनी । पूजा करावी दत्तचरणी । जे जे कामना आपुले मनी । पूर्ण होय परियेसा ॥१०३॥
या अध्यायाचे करिता पठण । होई रोग व्याधींचे निरसन । ग्रह दोषादी निवारण । नित्य पठणे होतसे ॥१०४॥
श्रीदत्त विजय दत्त ग्रंथ । दत्त महिमा वर्णिला येथ । तो साक्षात अवधूत । विविधरुपे राहातसे ॥१०५॥
॥ अध्याय तिसरा ॥ ओवी संख्या १०५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP