श्रीदत्त विजय - अध्याय दुसरा

स्वामी दत्तावधूतांनी लिहिलेली ही पोथी म्हणजे श्रीदत्त प्रभूंजवळ जाण्याचा अतिसुलभ मार्ग होय.


अध्याय दुसरा
श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । साधूंसी म्हणती दत्त । आसन करावे सिद्ध । आसनसिद्धी होता प्राप्त । ईश्वर प्रसन्न होतसे ॥१॥

नयन झाकोनी स्वस्थ । चार तासापर्यंत । ईश्वर चिंतन जो करीत । आसन सिद्ध त्या होई ॥२॥

मग सहजासनी बैसोन । जप करावा प्रति दिन । एक वर्ष करिता जाण । मंत्र सिद्ध होतसे ॥३॥

प्रथम येई सुगंध । परिसर जाई भरोन । हे प्रथम लक्षण । मंत्रसिद्धीचे समजावे ॥४॥

देवता दिसती ध्यानात । कधी मोत्यांची झुंबरे दिसत । कधी पैंजण वाजत । चरण दर्शन कधी होई ॥५॥

सिद्धांची दर्शने होत । कधी हिमालय दिसत । ऐसे ध्यानी येत । अनुभव पाहा साधकासी ॥६॥

द्वितीय लक्षण मंत्रसिद्धीचे । तृतीय नेत्र खुलतसे । बासरी पैंजण मृदुंगाचे । ध्वनी येती ऐकावया ॥७॥

होई कुंडलिनी जागृत । चक्रे होती जागृत । अनाहत ध्वनी येत । ऐकू पाहा श्रवणासी ॥८॥

मंत्रसिद्धीचे तृतीय लक्षण । देवता होई प्रसन्न । दर्शन आणि मार्गदर्शन । सदैव देई भक्ताते ॥९॥

ऐसे हे मंत्र साधन । सांगती दत्तकृपा करोन । आता स्तोत्र साधन । सांगतो म्हणती श्रीगुरु ॥१०॥

दत्त गणेश विष्णुस्तोत्र । सरस्वती लक्ष्मी दुर्गास्तोत्र । ऐसी स्तोत्रे असंख्यात । विख्यात असती भूवरी ॥११॥

एक स्तोत्र निवडोन । एक लक्ष पाठ करोन । स्तोत्र सिद्ध करिता जाण । देवता प्रसन्न होतसे ॥१२॥

ऐसे ऐकोनी गुरुवचन । साधू पावती समाधान । एक साधू उठोन । नमन करोनी पुसतसे ॥१३॥

मंत्रसिद्धीचे साधन । स्वामी सांगितले आपण । आता मंत्रही सांगोन । उपकृत करावे आम्हासी ॥१४॥

ऐसे ऐकोनी वचन । दुसरा साधू बोले वचन । स्वामी तव मुखींचे मंत्र जाण । महासिद्ध असती ते ॥१५॥

ते द्यावे आम्हा लागोन । ऐसे प्रार्थिती सर्वजण । स्वामीही प्रसन्न वदन । मंत्र सांगती तयांना ॥१६॥

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय । ॐ र्‍हीम्‍ ॐ दत्तात्रेयाय । ॐ परब्रह्मणे दत्तात्रेयाय । जपा तुम्ही साधकहो ॥१७॥

ॐ दत्त दुर्गा ॐ विष्णवे स्वाहा । ॐ नमो महासिद्धाय स्वाहा । ऐम्‍ सरस्वत्यै स्वाहा । जपा तुम्ही साधक हो ॥१८॥

सोऽहम्‍ हंसा ब्रह्म । ऐसे करावे गायन । कूटस्थी ठेवावे मन । ब्रह्मपद पावे तो ॥१९॥

कूटस्थी ठेविता मन । प्राण करी उर्ध्व गमन । तेथोनी पुढे महाशून्य । मार्ग आपैसा मिळतसे ॥२०॥

समूळ नासता देहभान । निर्विकल्प होई मन । हेचि समाधी साधन । सोऽहम्‍ ध्यानी साधावे ॥२१॥

होता चिदाकाश दर्शन । स्थिर करावे तेथे मन । हे परब्रह्माचे साधन । करा तुम्ही साधक हो ॥२२॥

धारणा करावयाची पद्धती । सांगेन आता तुम्हाप्रती । एकाग्र चित्ते स्थल निश्चिती । करोनी करावी साधना ॥२३॥

नाभिचक्री करिता ध्यान । होई कायाव्यूह ज्ञान । चंद्रावरती करिता ध्यान । आत्मज्ञान होतसे ॥२४॥

सूर्यावरती करिता ध्यान । ब्रह्माण्डाचे होई ज्ञान । यक्ष देवतांचे दर्शन । अग्नीध्याने होतसे ॥२५॥

करिता भ्रूमध्यध्यान । ऋषींचे होई दर्शन । स्वस्थ बैसता डोळे मिटोन । अंतरज्ञान होतसे ॥२६॥

ईश्वरप्राप्ती साधन । श्रीदत्त सांगती साधूं लागोन । यज्ञ विधिचे विधान । सांगेन म्हणती अवधारा ॥२७॥

स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण । चार देह आत्म्याचे आवरण । करिता परोपकार दान । लक्ष्मी प्रसन्न होतसे ॥२८॥

दान आणि परोपकार । करिती मानव जीवन सुकर । तैसेचि मृत्यूनंतर । मोक्ष आपैसा मिळतसे ॥२९॥

स्थूलदेह शुद्धिकारण । तैसेचि गृहाचे शुद्धिकारण । नित्य घृताचे हवन । गृही करावे साधकहो ॥३०॥

ॐ दत्त स्वाहा म्हणोन । घृताने करावे हवन । ऐसे करिता प्रतिदिन । गृह शुद्ध होतसे ॥३१॥

वास्तुशुद्धी देहशुद्धी । तैसिचि वातावरण शुद्धी । विविध मंत्रांची सिद्धी । हवनाद्वारे होतसे ॥३२॥

मंत्र म्हणोनी घृताचे हवन । लक्ष वेळ करिता जाण । मंत्र सिद्ध होवोन । देवता प्रसन्न होतसे ॥३३॥

भक्तिमार्गाचे साधन । ऐका म्हणती श्रीगुरु आपण । परमेश्वराचे नामस्मरण । सदैव करावे भक्तांनी ॥३४॥

येता जाता उठता बैसता । देता घेता काम करिता । अथवा शयनी असता । नाम स्मरावे देवाचे ॥३५॥

ऐसे करिता नामस्मरण । प्रसन्न होई नारायण । मुक्ती मार्गाचे साधन । सहज हाता येतसे ॥३६॥

ऐशापरी साधना करीत । होई कुंडलिनी जागृत । षड्चक्रेही जागृत । होती पाहा साधनेने ॥३७॥

मूलाधार होता जागृत । ध्यानी येई ऐरावत । अथवा गणपती दर्शन देत । चक्र होता जागृत हे ॥३८॥

स्वाधिष्ठान होता जागृत दिसे देवमत्स्य जली विहार करीत । ब्रह्मा दर्शन देत । चक्र होता जागृत हे ॥३९॥

होता मणिपूर जागृत । विष्णू दिसे ध्यानात । उगवता सूर्य दिसत । चक्र होता जागृत हे ॥४०॥

विशुद्धचक्र होता जागृत । नवदुर्गा दर्शन देत । निळा गोल दिसत । चिदाकाशही दिसतसे ॥४१॥

होता आज्ञाचक्र जागृत । अर्धनारीश्वर दर्शन होत । अनेक देव - देवता दिसत । होता चक्र जागृत हे ॥४२॥

होता सहस्रार जागृत । सिद्धावस्था होई प्राप्त । साधक होई जीवन्मुक्त । साधना पूर्ण होतसे ॥४३॥

स्थूलदेह अन्नाधिन । सूक्ष्मदेह विचाराधिन । कारणदेह कल्पनाधिन । महाकारण निर्गुण तो ॥४४॥

मन करिता विचारशून्य । सूक्ष्मदेह शुद्ध होवोन । प्राप्त होती सदगुण । मोक्ष मार्गाचे साधन जे ॥४५॥

निर्विचार करिता मन । मन होऊ लागे उन्मन । सूक्ष्मदेहाचे बंधन । गळोनी पाहा जातसे ॥४६॥

कल्पनेसी त्यागिता । नुरे कारण देहाची वार्ता । जीवन्मुक्त सिद्धावस्था । प्राप्त जाणा होतसे ॥४७॥

महाकारण स्वये विश्वात्मा । तोचि जाणा परमात्मा । त्यासी जाणावया तप साधना । करणे अनेक लागतसे ॥४८॥

एकदा जाणता महाकारण । नुरे साध्य आणि साधन । आत्मा परमात्मा होवोन । स्वये पाहा जातसे ॥४९॥

श्रीदत्त प्रभू दयाघन । साधूंसी ऐसे उपदेशून । पुढे करिती प्रयाण । समस्त लोका उद्धारावया ॥५०॥

श्रीदत्त चरित्र अमृत । प्राशिता अमर होती भक्त । श्रीदत्त चरित्र सुधारस । म्हणोनी नित्य सेवावा ॥५१॥

हिमालय पर्वती येत । तेथील सिद्धाश्रम गुप्त । तेथे स्वामी राहात । तपसाधना करावया ॥५२॥

सिद्धांचे आश्रम गुप्त । योग्यांसी दृक्‍ गोचर होत । सामान्य जनांसी न दिसत । ऐसे दिव्य आश्रम ते ॥५३॥

महाअवतार बाबाजी । भृगुराज परमहंसजी । भद्रबाहु महातपाजी । असती सहस्रावधी वर्षांचे ॥५४॥

ऐशा योग्यां समवेत । स्वामीही तेथे तप करीत । कल्पवर्षांचेही असत । ऋषी पाहा तेथवरी ॥५५॥

सिद्ध योग्यांच्या समवेत । बैसले असती श्रीदत्त । काही देवता येत । भेटावया श्रीस्वामींना ॥५६॥

त्या देवता कोण कोण । सांगेन तुम्हा विस्तारोन । महालक्ष्मी नारायण । महासरस्वती ललिता ती ॥५७॥

महाकाली राजराजेश्वरी । षोडषी त्रिपुरसुंदरी । नवदुर्गा परमेश्वरी । येवोनी भेटती स्वामींना ॥५८॥

म्हणती दत्ताचा पूर्णावतार । प्रकटला असे भूवर । त्यासी सहाय्य करण्या तत्पर । सदैव राहू सांगाती ॥५९॥

ऐसे सांगोनी देवता । श्रीदत्त देहात प्रवेशत । मूलाधारात प्रवेशत । श्रीगणेश आणि सरस्वती ॥६०॥

ब्रह्मा आणि गायत्री । ज्ञानशक्ती कमला सावित्री । इच्छाशक्ती क्रियाशक्ती । स्वाधिष्ठानी राहाती त्या ॥६१॥

नारायण विष्णू आदित्य । महालक्ष्मी गरुड हनुमंत । रामसीता देवी ललिता । मणिपूरांत राहाती त्या ॥६२॥

सिद्धगणेश महेश पार्वती । अनाहत चक्री राहाती । नवदुर्गा अष्टादश हाती । विशुद्ध चक्री राहातसे ॥६३॥

अर्धनारी ईश्वर । आज्ञा चक्रात होई स्थिर । देवी देवता इतर । सहस्रार चक्री स्थिरावल्या ॥६४॥

ऐसेपरी सर्व देवता । श्रीदत्त देही प्रवेशत । लोककल्याण कारणार्थ । सहाय्य करावे म्हणोनिया ॥६५॥

वैष्णौदेवी यमुनोत्री अमरनाथ । केदार गंगोत्री बद्रीनाथ । कर्णप्रयाग देवप्रयाग तुंगनाथ । हरिद्वारादी पाहिले ॥६६॥

ऐसे सर्व पाहोन । करिती प्रयाग वाराणसी गमन । मध्ये विंध्यवासिनी दर्शन । घेवोनी पुढे निघाले ॥६७॥

श्रीस्वामींच्या प्रवासात । हजारो लोक त्यांसी भेटत । त्यांचे दुःख निवारण करीत । सन्मार्ग दाविती तयांना ॥६८॥

ऐशा कथा अनंत । परी येथे सांगतो संक्षिप्त । श्रीदत्त चरित्र अदभुत । अशक्य असे वर्णाया ॥६९॥

औदुंबर वृक्षातळी । बैसले श्रीदत्त चंद्रमौळी । सभोवार शेकडो मंडळी । बैसली असती वेष्टोनिया ॥७०॥

एकेक समस्या सांगत । स्वामी त्याचे निवारण करीत । ऐसे चालले असे तेथ । सत्संग पाहा तेथवरी ॥७१॥

एक म्हणत स्वामींसी । षोडशवर्षे झाली लग्नासी । परी नाही संतानासी । उपाय यासी सांगावा ॥७२॥

स्वामी तीर्थ देती । म्हणती होईल पुत्र प्राप्ती । आपुल्या घरी दत्तजयंती । उत्सव करीत जाई तू ॥७३॥

एक वर्षात पुत्र निधान । लाधले पाहा तया लागोन । भक्त मनोकामना पूर्ण । ऐशापरी करिती ते ॥७४॥

एक स्त्री स्वामीप्रत । माझे काम अडले असत । ऐसे म्हणोनी सांगत । कृपा करावी म्हणतसे ॥७५॥

स्वामी म्हणती तिसी । करी प्रदक्षिणा मारुतिसी । ऐकोनी या उदगारासी । भाळी हात लावीतसे ॥७६॥

ती म्हणे स्वामींसी । मारुति काय देईल मजसी । तीन वर्षे नित्य नेमेसी । करीत आहे प्रदक्षिणा ॥७७॥

स्वामी तिसी म्हणती । पाच दिवसानी ये म्हणती । येवोनी पाचवे दिनी म्हणे ती । काम झाले म्हणोनिया ॥७८॥

स्वामी आपण काम केले । श्रेय मारुतिसी दिले । ऐसे म्हणोनी चरण कमळे । श्रीस्वामींची धरीतसे ॥७९॥

स्वामी भक्तांसी म्हणत । जप तुम्ही करा नित्य । श्रीदत्त जय दत्त । सदा मुखाने म्हणत राहा ॥८०॥

तैसेचि थोडे दान । करावे गरजू लागोन । नित्य करावे अन्नदान । भुकेलेल्या प्राण्यासी ॥८१॥

दान आणि परोपकार । स्मरावा सतत ईश्वर । ऐसे करिता साचार । जीवन सुखी होतसे ॥८२॥

ऐसे लोका उपदेशून । करिती तेथोनी प्रयाण । मिर्झापूर ग्रामा लागोन । आले पाहा श्रीस्वामी ॥८३॥

तेथे एक तांत्रिक । येवोनी स्वामीसी नमित । म्हणे रवळनाथ भैरव मजप्रत । प्रसन्न पाहा झालासे ॥८४॥

परी नाही मनःशांती । अदृश्य शक्ती सताविती । मज द्यावी सदगती । म्हणोनी चरणी लागला ॥८५॥

स्वामी तयासी म्हणती । सोडोनी दे माया सिद्धी । ऐशा साधनेने अधोगती । होते साधकाची जाण पा ॥८६॥

साधका देवोनी ईश्वरध्यान । स्वामींनी केले प्रयाण । लक्षावधी जना सन्मार्ग दावोन । प्रज्ञापुरी पोचले ते ॥८७॥

समर्थांचे करिता दर्शन । स्वामी समर्थ होवोनी प्रसन्न । एक देती पेन । म्हणती दत्ता हे घे तुला ॥८८॥

पेन देवोनी समर्थ । ग्रंथ लेखन सुचवीत । भावी काळात अनेक ग्रंथ । लिहिले पाहा स्वामींनी ॥८९॥

तेथोनी गाणगापुरा जाती । स्वामी नृसिंह सरस्वती । तयांच्या सत्संगी राहाती । काही समय श्रीस्वामी ते ॥९०॥

पुढे मुरगोडी जात । तेथे चिदंबर दीक्षित । ते विचित्र लीला करीत । पाहोनी स्वामींसी येताना ॥९१॥

स्वामी असती श्रीदत्त । त्यांसी औदुंबरी प्रिती बहुत । म्हणोनी चिदंबर दीक्षित । लीला अदभुत करितसे ॥९२॥

चिदंबर दीक्षित स्थानात । सहा अश्वत्थवृक्ष असत । सहाही पिंपळवृक्षास । औदुंबर करिती श्रीस्वामी ॥९३॥

पाहोनी चिदंबर स्वामींची लीला । श्रीस्वामींसी आनंद झाला । बैसले तेथे ध्यानाला । मंदिरात चिदंबर स्वामींच्या ॥९४॥

चिदंबर स्वामी म्हणती श्रीदत्तास । औदुंबरवृक्ष तुम्हा  आवडत । म्हणोनी सहाही पिंपळास । पाहा औदुंबर केले मी ॥९५॥

चिदंबर स्वामींसी करोनी नमन । स्वामी करिती प्रयाण । यल्लम्मा सौंदत्ती महानंदी पाहोन । अहोबिळम्‍ पाहिले ते ॥९६॥

ज्या ज्या स्थानी स्वामी जात । तेथील देवता भेटत । जना सन्मार्ग दावीत । कष्ट दूर करोनिया ॥९७॥

अरण्यातून असती जात । एक विशाल गुहा दिसत । गुहे बाहेर असत । दोन ऋषी बैसलेले ॥९८॥

स्वामीसी घेवोनी सांगात । ऋषी गुहेत प्रवेशत । गुहा बंद अकस्मात । होवोनी पाहा जातसे ॥९९॥

ऋषी स्वामींसी म्हणत । आम्ही जाणिले तुम्ही येत । म्हणोनी करण्या स्वागत । बाहेर आम्ही थांबलो ॥१००॥

आठ दिवस पर्यंत । तेथे राहोनी समाधिस्थ । पुनश्च आपुल्या कार्याप्रत । स्वामी निघाले तेथोनिया ॥१०१॥

कर्दळीबनम्‍ कमरीमठम्‍ । बाणालोद्दी सलेश्वरम्‍ । अंकळम्माकोटा मल्लेश्वरम्‍ । गुप्त ऋषींची स्थाने ती ॥१०२॥

सर्व स्थानी जावोन । करिती ऋषींचे दर्शन । तेथे करोनी तपाचरण । जन कल्याण करिती ते ॥१०३॥

अरण्यातील ग्रामस्थ । त्यांचे कष्ट निवारीत । त्यांसी उपदेश करीत । सन्मार्गाने चालण्याचा ॥१०४॥

या अध्यायाचे करिता पठण । मनेच्छा होईल पूर्ण । निपुत्रिकासी संतान । होवोनी आनंद होतसे ॥१०५॥

श्रीदत्त विजय दिव्य ग्रंथ । ऋषी ग्रंथामाजी राहात । श्रीदत्त जय दत्त मंत्र सिद्ध । दिला दत्ताने सर्वांना ॥१०६॥

॥ अध्याय दुसरा ॥ ॥ ओवी संख्या ॥१०६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:47.4530000