॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय १० ॥
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अध्याय दहावा ।
विभूतियोगः ।
नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा । पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥१॥
नमो संसारतमसूर्या । अपरिमितपरमवीर्या । तरुणतरतूर्या । लालनलीला ॥२॥
नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना । सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥३॥
नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा । श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥४॥
नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना । विश्वोद्भवभुवना । श्रीगुरुराया ॥५॥
तुमचा अनुग्रहो गणेशु । जैं दे आपुला सौरसु । तैं सारस्वतीं प्रवेशु । बाळकाही आथी ॥६॥
जी दैविकीं उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ॥७॥
जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयातें अंगिकारी । तो वाचस्पतीशीं करी । प्रबंधुहोडा ॥८॥
हें असो दिठी जयावरी झळके । कीं हा पद्मकरु माथां पारुखे । तो जीवचि परि तुके । महेशेंसीं ॥९॥
एवढें जिये महिमेचें करणें । तें वाचाबळें वानूं मी कवणें । कां सूर्याचिया आंगा उटणें । लागत असे ? ॥१०॥
केउता कल्पतरुवरी फुलौरा ? । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ? । कवणें वासीं कापुरा । सुवासु देवों ? ॥११॥
चंदनातें कायसेनि चर्चावें । अमृतातें केउतें रांधावें । गगनावरी उभवावें । घडे केवीं ? ॥१२॥
तैसें श्रीगुरूचें महिमान । आकळितें कें असे साधन ? । हें जाणोनि मियां नमन । निवांत केलें ॥१३॥
जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें । श्रीगुरूसामर्थ्या रूप करूं म्हणे । तरि तें मोतियां भिंग देणें । तैसें होईल ॥१४॥
कां साडेपंधरया रजतवणी । तैशीं स्तुतींचीं बोलणीं । उगियाचि माथा ठेविजे चरणीं । हेंचि भलें ॥१५॥
मग म्हणितलें जी स्वामी । भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं । म्हणौनि कृष्णार्जुनसंगमीं । प्रयागवटु जाहलों ॥१६॥
मागां दूध दे म्हणतलियासाठीं । आघविया क्षीराब्धीची करूनि वाटी । उपमन्यूपुढें धूर्जटी । ठेविली जैसी ॥१७॥
ना तरी वैकुंठपीठनायकें । रुसला ध्रुव कवतिकें । बुझाविला देऊनि भातुकें । ध्रुवपदाचें ॥१८॥
तैसी जे ब्रह्मविद्यारावो । सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो । ते भगवद्गीता वोंविये गावों । ऐसें केलें ॥१९॥
जे बोलणियाचे रानीं हिंडतां । नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता । परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ॥२०॥
होती देहबुद्धी एकसरी । ते आनंदभांडारा केली वोवरी । मन गीतार्थसागरीं । जळशयन जालें ॥२१॥
ऐसें एकेक देवांचें करणें । तें अपार बोलों केवीं मी जाणें । तऱ्ही अनुवादलों धीटपणें । ते उपसाहिजो जी ॥२२॥
आतां आपुलेनि कृपाप्रसादें । मियां भगवद्गीता वोंवीप्रबंधें । पूर्वखंड विनोदें । वाखाणिलें ॥२३॥
प्रथमीं अर्जुनाचा विषादु । दुजीं बोलिला योगु विशदु । परि सांख्यबुद्धीसि भेदु । दाऊनियां ॥२४॥
तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिलें । तेंचि चतुर्थीं ज्ञानेंशीं प्रगटिलें । पंचमीं गव्हरिलें । योगतत्त्व ॥२५॥
तेचि षष्ठामाजीं प्रगट । आसनालागोनि स्पष्ट । जीवात्मभाव एकवट । होती जेणें ॥२६॥
तैसी जे योगस्थिती । आणि योगभ्रष्टां जे गती । तें आघवीचि उपपत्ती । सांगितली षष्ठीं ॥२७॥
तयावरी सप्तमीं । प्रकृतिपरिहार उपक्रमीं । करूनि भजती जे पुरुषोत्तमीं । ते बोलिले चाऱ्ही ॥२८॥
पाठीं सप्तप्रश्नविधि । बोलोनि प्रयाणसमयसिद्धी । एवं सकळ वाक्यावधि । अष्टमाध्यायीं ॥२९॥
मग शब्दब्रह्मीं असंख्याकें । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें एकें । लक्षें जोडे ॥३०॥
तिये आघवांचि जें महाभारतीं । तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं । आणि जो अभिप्रावो सातेंशतीं । तो एकलाचि नवमीं ॥३१॥
म्हणौनि नवमींचिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया । बिहाला मग मी वायां । गर्व कां करूं ? ॥३२॥
अहो गूळासाखरे मालयाचे । हे बांधे तरी एकाचि रसाचे । परि स्वाद गोडियेचे । आनआन जैसे ॥३३॥
एक जाणोनियां बोलती । एक ठायें ठावो जाणविती । एक जाणों जातां हारपती । जाणते गुणेंशीं ॥३४॥
हें ऐसें अध्याय गीतेचे । परि अनिर्वाच्यपण नवमाचें । तो अनुवादलों हें तुमचें । सामर्थ्य प्रभू ॥३५॥
अहो एकाचि शाटी तपिन्नली । एकीं सृष्टीवरी सृष्टी केली । एकीं पाषाणीं वाऊनि उतरलीं । समुद्रीं कटकें ॥३६॥
एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें । एकीं चुळींचि सागरातें भरिलें । तैसें मज मुकयाकरवीं बोलविलें । अनिर्वाच्य तुम्हीं ॥३७॥
परि हें असो एथ ऐसें । राम रावण झुंजिन्नले कैसे । राम रावण जैसे । मीनले समरीं ॥३८॥
तैसें नवमीं कृष्णाचें बोलणें । तें नवमीचियाचि ऐसें मी म्हणें । या निवाडा तत्त्वज्ञु जाणें । जया गीतार्थु हातीं ॥३९॥
एवं नवही अध्याय पहिले । मियां मतीसारिखे वाखाणिले । आतां उत्तरखंड उवाइलें । ग्रंथाचें ऐका ॥४०॥
जेथ विभूति प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती । ते विदग्धा रसवृत्ती । म्हणिपैल कथा ॥४१॥
देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणें । तरि ओंविया होती लेणें । साहित्यासि ॥४२॥
मूळ ग्रंथींचिया संस्कृता । वरि मऱ्हाठी नीट पढतां । अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमी हें न चोजवे ॥४३॥
जैसें अंगाचेनि सुंदरपणें । लेणिया आंगचि होय लेणें । तेथ अळंकारिलें कवण कवणें । हें निर्वचेना ॥४४॥
तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाच्या सुखासनीं । शोभती आयणी । चोखट आइका ॥४५॥
उठावलिया भावा रूप । करितां रसवृत्तीचें लागे वडप । चातुर्य म्हणे पडप । जोडलें आम्हां ॥४६॥
तैसें देशियेचें लावण्य । हिरोनि आणिलें तारुण्य । मग रचिलें अगण्य । गीतातत्त्व ॥४७॥
जो चराचर परमगुरु । चतुर चित्तचमत्कारु । तो ऐका यादवेश्वरु । बोलता जाहला ॥४८॥
ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे । ऐसें बोलिलें श्रीहरी तेणें । अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणें । धडौता आहासि ॥४९॥
श्रीभगवानुवाच ।
भूय एव महाबाहो श्रृणु मे परमं वचः ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥१॥
आम्हीं मागील जें निरूपण केलें । तें तुझें अवधानचि पाहिलें । तवं टाचें नव्हें भलें । पुरतें आहे ॥५०॥
घटीं थोडेसें उदक घालिजे । तेणें न गळे तरी वरिता भरिजे । ऐसा परिसौनि पाहिलासि तवं परिसविजे । ऐसेंचि होतसे ॥५१॥
अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । मग चोख तरी तोचि भांडारी कीजे । तैसा किरीटी तूं आतां माझें । निजधाम कीं ॥५२॥
ऐसें अर्जुना येउतें सर्वेश्वरें । पाहोनि बोलिलें अत्यादरें । गिरी देखोनि सुभरें । मेघु जैसा ॥५३॥
तैसा कृपाळुवांचा रावो । म्हणे आइकें गा महाबाहो । सांगितलाचि अभिप्रावो । सांगेन पुढती ॥५४॥
पैं प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे । पिकाची जंव जंव वाढी देखिजे । यालागीं नुबगिजे । वाहो करितां ॥५५॥
पुढतपुढती पुटें देतां । जोडे वानियेची अधिकता । म्हणौनि सोनें पंडुसुता । शोधूंचि आवडे ॥५६॥
तैसें एथ पार्था । तुज आभार नाहीं सर्वथा । आम्ही आपुलियाचि स्वार्था । बोलों पुढती ॥५७॥
जैसें बाळका लेवविजे लेणें । तया शृंगारा बाळ काइ जाणे ? । परि ते सुखाचे सोहळे भोगणें । माउलिये दिठी ॥५८॥
तैसें तुझें हित आघवें । जंव जंव कां तुज फावे । तंव तंव आमुचें सुख दुणावे । ऐसें आहे ॥५९॥
आतां अर्जुना असो हे विकडी । मज उघड तुझी आवडी । म्हणौनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे ॥६०॥
आम्हां येतुलियाचि कारणें । तेंचि , तें तुजशीं बोलणें । परि असो हें अंतःकरणें । अवधान देईं ॥६१॥
तरी ऐकें गा सुवर्म । वाक्य माझें , परम । जें अक्षरें लेऊनी परब्रह्म । तुज खेंवासि आलें ॥६२॥
परी किरीटी तूं मातें । नेणसी ना निरुतें । तरि तो गा जो मी एथें । तें विश्वचि हें ॥६३॥
न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥२॥
एथ वेद मुके जाहाले । मन पवन पांगुळले । रातीविण मावळले । रविशशी जेथ ॥६४॥
अगा उदरींचा गर्भु जैसा । न देखें आपुलिये मातेची वयसा । मी आघवेया देवां तैसा । नेणवे कांहीं ॥६५॥
आणि जळचरां उदधीचें मान । मशका नोलांडवेचि गगन । तेवीं महर्षींचें ज्ञान । न देखेचि मातें ॥६६॥
मी कवण पां केतुला । कवणाचा कैं जाहला । या निरुती करितां बोला । कल्प गेले ॥६७॥
कां जे महर्षीं आणि या देवां । येरां भूतजातां सर्वां । मी आदि म्हणौनि पांडवा । अवघड जाणतां ॥६८॥
उतरलें उदक पर्वत वळघे । जरी झाड वाढत मुळीं लागे । तरी मियां जालेनि जगें । जाणिजे मातें ॥६९॥
कां गाभेवनें वटु गिंवसवे । जरी तरंगीं सागरू सांठवे । कां परमाणूमाजीं सामावे । भूगोलु हा ॥७०॥
तरी मियां जालिया जीवां । महर्षीं अथवा देवां । मातें जाणावया होआवा । अवकाशु गा ॥७१॥
ऐसाही जरी विपायें । सांडूनि पुढीले पाये । सर्वेंद्रियांसि होये । पाठिमोरा जो ॥७२॥
प्रवर्तलाही वेगीं बहुडे । देह सांडूनि मागलीकडे । महाभूतांचिया चढे । माथयावरी ॥७३॥
यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।
असंमूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥३॥
तेथ राहोनि ठायठिके । स्वप्रकाशें चोखें । अजत्व माझें देखे । आपुलिया डोळां ॥७४॥
मी आदीसिं परु । सकळलोकमहेश्वरु । ऐसिया मातें जो नरु । यापरी जाणें ॥७५॥
तो पाषाणांमाजीं परिसु । जैसा रसाआंतु सिद्धरसु । तैसा मनुष्याआंतु तो अंशु । माझाचि जाण ॥७६॥
तें चालतें ज्ञानाचें बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ । येर माणुसपण तें भांब । लौकिक भागु ॥७७॥
अगा अवचिता कापुरा । माजीं सांपडला हिरा । वरी पडिलिया नीरा । न निगे केवीं ॥७८॥
तैसा मनुष्यलोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु । तऱ्ही प्रकृतिदोषाची मातु । नेणेंचि कीं ॥७९॥
तो आपसयेंचि सांडिजे पापीं । जैसा जळत चंदनु सर्पीं । तेवीं मातें जाणें तो संकल्पीं । वर्जूनि घापे ॥८०॥
तेंचि आमुतें कैसें जाणिजे । ऐसें कल्पी जरी चित्त तुझें । तरी मी ऐसा हें माझें । भाव ऐकें ॥८१॥
जे वेगळालिया भूतीं । सारिखे होऊनि प्रकृती । विखुरले आहेती त्रिजगतीं । आघविये ॥८२॥
बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥४॥
अहिंसा समता तुइष्टास्तपो दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥५॥
तेथ प्रथम जाण बुद्धी । मग ज्ञान जें निरवधी । असंमोह सहनसिद्धी । क्षमा सत्य ॥८३॥
मग शम दम दोन्ही । सुखदुःख वर्ते जें जनीं । अर्जुना भावाभाव मानीं । भावाचिमाजीं ॥८४॥
पैं भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता । तुइष्टि तप पंडुसुता । दान जें गा ॥८५॥
अगा यश अपकीर्ती । हे जे भाव सर्वत्र दिसती । ते मजचि पासूनि होती । भूतांचिया ठायीं ॥८६॥
जैसीं भूतें आहाति सिनानीं । तैसेचि हेही वेगळाले मानीं । एक उपजती माझ्या ज्ञानीं । एक नेणती मातें ॥८७॥
प्रकाशु आणि कडवसें । हें सूर्याचिस्तव जैसें । प्रकाश उदयीं दिसे । तम अस्तुसीं ॥८८॥
आणि माझें जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवाचें करणें । म्हणौनि भूतीं भावाचें होणें । विषम पडे ॥८९॥
यापरी माझिया भावीं । हे जीवसृष्टि आहे आघवी । गुंतली असे जाणावी । पंडुकुमरा ॥९०॥
आतां इये सृष्टीचे पालक । जयां आधीन वर्तती लोक । ते अकरा भाव आणिक । सांगेन तुज ॥९१॥
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारी मनवस्तथा ।
मद्भवा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥६॥
तरी आघवांचि गुणीं वृद्ध । जे महर्षींमाजीं प्रबुद्ध । कश्यपादि प्रसिद्ध । सप्तऋषी ॥९२॥
आणिकही सांगिजतील । जे कां चौदाआंतुल मुद्दल । स्वायंभू मुख्य वडील । चारी मनु ॥९३॥
ऐसें हे अकरा । माझ्या मनीं जाहाले धनुर्धरा । सृष्टीचिया व्यापारा । लागोनियां ॥९४॥
जैं लोकांची व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचे कांहीं न मांडे । तैं महाभूतांचे दळवाडें । अचुंबित असे ॥९५॥
तैंचि हे जाहाले । मग इहीं लोक केले । तेथ अध्यक्ष रचूनि ठेविले । इहीं जन ॥९६॥
म्हणौनि अकराही हे राजा । मग येर जग यांचिया प्रजा । एवं विश्वविस्तारु हा माझा । ऐसेंचि जाण ॥९७॥
पाहें पां आरंभीं बीज एकलें । मग तेंचि विरूढलिया बूड जाहालें । बुडीं कोंभ निघाले । खांदियांचे ॥९८॥
खांदियांपासूनि अनेका । फुटलिया नाना शाखा । शाखांस्तव देखा । पल्लव पानें ॥९९॥
पल्लवीं फूल फळ । एवं वृक्षत्व जाहालें सकळ । तें निर्धारितां केवळ । बीजचि आघवें ॥१००॥
तैंसे मी एकचि पहिलें । मग मी तेंचि मनातें व्यालें । तेथ सप्तऋषि जाहाले । आणि चारी मनु ॥१०१॥
इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं विविध लोक सृजिले । लोकांपासूनि निपजले । प्रजाजात ॥१०२॥
ऐसेनि हें विश्व येथें । मीचि विस्तारिलोंसें निरुतें । परी भावाचेनि हातें । माने जया ॥१०३॥
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
सोऽविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥७॥
यालागीं सुभद्रापती । हे भाव इया माझिया विभूती । आणि यांचिया व्याप्ती । व्यापिलें जग ॥१०४॥
म्हणौनि गा यापरी । ब्रह्मादिपिपीलिकावरी । मीवांचूनि दुसरी । गोठी नाहीं ॥१०५॥
ऐसें जाणे जो साचें । तया चेइरें जाहालें ज्ञानाचें । म्हणौनि उत्तमाधम भेदाचें । दुःस्वप्न न देखे ॥१०६॥
मी माझिया विभूती । विभूतीं अधिष्ठिलिया व्यक्ती । हें आघवें योगप्रतीती । एकचि मानी ॥१०७॥
म्हणौनि निःशंकें येणें महायोगें । मज मीनला मनाचेनि आंगें । एथ संशय करणें न लगे । तो त्रिशुद्धी जाहला ॥१०८॥
कां जे ऐसें किरीटी । मातें भजे जो अभेदा दिठी । तयाचिये भजनाचे नाटीं । सूती मज ॥१०९॥
म्हणौनि अभेदें जो भक्तियोगु । तेथ शंका नाहीं नये खंगु । करितां ठेला तरी चांगु । तें सांगितलें षष्ठीं ॥११०॥
तोचि अभेदु कैसा । हें जाणावया मानसा । साद जाली तरी परियेसा । बोलिजेल ॥१११॥
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥८॥
तरि मीचि एक सर्वां । या जगा जन्म पांडवा । आणि मजचिपासूनि आघवा । निर्वाहो यांचा ॥११२॥
कल्लोळमाळा अनेगा । जन्म जळींचि पैं गा । आणि तयां जळचि आश्रयो तरंगा । जीवनही जळ ॥११३॥
ऐसें आघवाचि ठायीं । तया जळचि जेवीं पाहीं । तैसा मीवांचूनि नाहीं । विश्वीं इये ॥११४॥
ऐसिया व्यापका मातें । मानूनि जे भजती भलतेथें । परि साचोकारें उदितें । प्रेमभावें ॥११५॥
देश काळ वर्तमान । आघवें मजसीं करूनि अभिन्न । जैसा वायु होऊन गगन । गगनींचि विचरे ॥११६॥
ऐसेनि जे निजज्ञानी । खेळत सुखें त्रिभुवनीं । जगद्रूपा मनीं । सांठऊनि मातें ॥११७॥
जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत । हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥११८॥
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥९॥
चित्तें मीचि जाहाले । मियांचि प्राणें धाले । जीवों मरों विसरले । बोधाचिया भुली ॥११९॥
मग तया बोधाचेनि माजे । नाचती संवादसुखाचीं भोजें । आतां एकमेकां घेपे दीजे । बोधचि वरी ॥१२०॥
जैशीं जवळकेंचीं सरोवरें । उचंबळलिया कालवती परस्परें । मग तरंगासि धवळारें । तरंगचि होती ॥१२१॥
तैसी येरयेरांचिये मिळणी । पडत आनंदकल्लोळांची वेणी । तेथ बोध बोधाचीं लेणीं । बोधेंचि मिरवी ॥१२२॥
जैसें सूर्यें सूर्यातें वोंवाळिलें । कीं चंद्रें चंद्रम्या क्षेम दिधलें । ना तरी सरिसेनि पाडें मीनले । दोनी वोघ ॥१२३॥
तैसें प्रयाग होत सामरस्याचें । वरी वोसाण तरत सात्त्विकाचें । ते संवादचतुष्पथींचे । गणेश जाहले ॥१२४॥
तेव्हां तया महासुखाचेनि भरें । धांवोनि देहाचिये गांवाबाहेरें । मियां धाले तेणें उद्गारें । लागती गाजों ॥१२५॥
पैं गुरुशिष्यांचिया एकांतीं । जे अक्षरा एकाची वदंती । ते मेघाचियापरी त्रिजगतीं । गर्जती सैंघ ॥१२६॥
जैसी कमळकळिका जालेपणें । हृदयींचिया मकरंदातें राखों नेणें । दे राया रंका पारणें । आमोदाचें ॥१२७॥
तैसेंचि मातें विश्वीं कथित । कथितेनि तोषें कथूं विसरत । मग तया विसरामाजीं विरत । आंगें जीवें ॥१२८॥
ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें । नाहीं राती दिवो जाणणें । केलें माझें सुख अव्यंगवाणें । आपणपेयां जिहीं ॥१२९॥
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥१०॥
तयां मग जें आम्ही कांहीं । द्यावें अर्जुना पाहीं । ते ठायींचीच तिहीं । घेतली सेल ॥१३०॥
कां जे ते जिया वाटा । निगाले गा सुभटा । ते सोय पाहोनि अव्हांटा । स्वर्गापवर्ग ॥१३१॥
म्हणौनि तिहीं जें प्रेम धरिलें । तेंचि आमुचें देणें उपाइलें । परि आम्हीं देयावें हेंहि केलें । तिहींची म्हणिपे ॥१३२॥
आतां यावरी येतुलें घडे । जें तेंचि सुख आगळें वाढें । आणि काळाची दृष्टि न पडे । हें आम्हां करणें ॥१३३॥
लळेयाचिया बाळका किरीटी । गवसणी करूनि स्नेहाचिया दिठी । जैसी खेळतां पाठोपाठीं । माउली धांवे ॥१३४॥
तें जो जो खेळ दावी । तो तो पुढें सोनयाचा करूनि ठेवी । तैसी उपास्तीची पदवी । पोषित मी जायें ॥१३५॥
जिये पदवीचेनि पोषकें । ते मातें पावती यथासुखें । हे पाळती मज विशेखें । आवडे करूं ॥१३६॥
पैं गा भक्तासि माझें कोड । मज तयाचे अनन्यगतीची चाड । कां जे प्रेमळांचें सांकड । आमुचिया घरीं ॥१३७॥
पाहें पां स्वर्ग मोक्ष उपाइले । दोन्ही मार्ग तयाचिये वाहणी केले । आम्हीं आंगही शेखीं वेंचिलें । लक्ष्मियेसीं ॥१३८॥
परि आपणपेंवीण जें एक । तें तैसेंचि सुख साजुक । सप्रेमळालागीं देख । ठेविलें जतन ॥१३९॥
हा ठायवरी किरीटी । आम्ही प्रेमळु घेवों आपणयासाठीं । या बोलीं बोलिजत गोष्टी । तैसिया नव्हती गा ॥१४०॥
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥११॥
म्हणौनि मज आत्मयाचा भावो । जिहीं जियावया केला ठावो । एक मीवांचूनि वावो । येर मानिलें जिहीं ॥१४१॥
तयां तत्त्वज्ञां चोखटां । दिवी पोतासाची सुभटा । मग मीचि होऊनि दिवटा । पुढां पुढां चालें ॥१४२॥
अज्ञानाचिये राती । माजीं तमाचि मिळणी दाटती । ते नाशूनि घालीं परौती । तयां करीं नित्योदयो ॥१४३॥
ऐसें प्रेमळाचेनि प्रियोत्तमें । बोलिलें जेथ पुरुषोत्तमें । तेथ अर्जुन मनोधर्में । निवालों म्हणतसे ॥१४४॥
हां हो जी अवधारा । भला केरु फेडिला संसारा । जाहलों जननीजठरजोहरा । वेगळा प्रभू ॥१४५॥
जी जन्मलेपण आपुलें । हें आजि मियां डोळां देखिलें । जीवित हातां चढलें । आवडतसें ॥१४६॥
आजि आयुष्या उजवण जाहली । माझिया दैवा दशा उदयली । जे वाक्यकृपा लाधली । दैविकेनि मुखें ॥१४७॥
आतां येणें वचन तेजाकारें । फिटलें आंतील बाहेरील आंधारें । म्हणौनि देखतसें साचोकारें । स्वरूप तुझें ॥१४८॥
अर्जुन उवाच ।
परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥१२॥
तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूतां विसंवतें धाम । पवित्र तूं परम । जगन्नाथा ॥१४९॥
तूं परम दैवत तिहीं देवां । तूं पुरुष जी पंचविसावा । दिव्य तूं प्रकृतिभावा । पैलीकडील ॥१५०॥
अनादिसिद्ध तूं स्वामी । जो नाकळिजसी जन्मधर्मीं । तो तूं हें आम्ही । जाणितलें आतां ॥१५१॥
तूं या कालत्रयासि सूत्री । तूं जीवकळेची अधिष्ठात्री । तूं ब्रह्मकटाहधात्री । हें कळलें फुडें ॥५२॥
आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिनारदस्तथा ।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥१३॥
पैं आणिकही एक परी । इये प्रतीतीची येतसे थोरी । जे मागें ऐसेंचि ऋषीश्वरीं । सांगितलें तूंतें ॥१५३॥
परि तया सांगितलियाचें साचपण । हें आतां माझें देखतसे अंतःकरण । जे कृपा केली आपण । म्हणौनि देवा ॥१५४॥
एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये । तोही ऐसेंचि वचनीं गाये । परि अर्थ न बुजोनि ठाये । गीतसुखचि ऐकों ॥१५५॥
जी आंधळेयांच्या गांवीं । आपणपें प्रगटलें रवी । तरी तिहीं वोतपलीचि घ्यावी । वांचूनि प्रकाशु कैंचा ? ॥१५६॥
परि देवर्षि अध्यात्म गातां । आहाच रागांगेंसीं जे मधुरता । तेचि फावे येर चित्ता । नलगेचि कांहीं ॥१५७॥
पैं असिता देवलाचेनि मुखें । मी एवंविधा तूंतें आइकें । परी तैं बुद्धि विषयविखें । घारिली होती ॥१५८॥
विषयविषाचा पडिपाडू । गोड परमार्थु लागे कडू । कडू विषय तो गोडू । जीवासी जाहला ॥१५९॥
आणि हें आणिकांचें काय सांगावें । राउळा आपणचि येऊनि व्यासदेवें । तुझें स्वरूप आघवें । सर्वदा सांगिजे ॥१६० ॥
परि तो अंधारीं चिंतामणि देखिला । जेवीं नव्हे या बुद्धी उपेक्षिला । पाठीं दिनोदयीं वोळखिला । होय म्हणौनि ॥१६१॥
तैसीं व्यासादिकांचीं बोलणीं । तिया मजपाशीं चिद्रत्नांचिया खाणी । परि उपेक्षिल्या जात होतीया तरणी । तुजवीण कृष्णा ॥१६२॥
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥१४॥
ते आतां वाक्यसूर्यकर तुझे फांकले । आणि ऋषीं मार्ग होते जे कथिले । तयां आघवियांचेंचि फिटलें । अनोळखपण ॥१६३॥
जी ज्ञानाचें बीज तयांचे बोल । माजीं हृदयभूमिके पडिले सखोल । वरि इये कृपेची जाहाली वोल । म्हणौनि संवाद फळेंशीं उठलें ॥१६४॥
अहो नारदादिकां संतां । त्यांचिया उक्तिरूप सरितां । महोदधीं जाहलों अनंता । संवादसुखाचा ॥१६५॥
प्रभु आघवेनि येणें जन्में । जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें । तयांचीं न ठकतीचि अंगीं कामें । सद्गुरु तुवां ॥१६६॥
एऱ्हवीं वडिलवडिलांचेनि मुखें । मी सदां तूंतें कानीं आइकें । परि कृपा न कीजेचि तुवां एकें । तंव नेणवेचि कांहीं ॥१६७॥
म्हणौनि भाग्य जैं सानुकूळ । जालिया केले उद्यम सदां सफळ । तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साच ॥१६८॥
जी बनकरु झाडें सिंपी जीवेंसाटीं । पाडूनि जन्में काढी आटी । परि फळेंसी तैंचि भेटी । जैं वसंतु पावे ॥१६९॥
अहो विषमा जैं वोहट पडे । तैं मधुर तें मधुर आवडे । पैं रसायनें तैं गोडें । जैं आरोग्य देहीं ॥१७०॥
कां इंद्रियें वाचा प्राण । यां जालियांचे तैंचि सार्थकपण । जैं चैतन्य येऊनि आपण । संचरे माजीं ॥१७१॥
तैसें शब्दजात आलोडिलें । अथवा योगादिक जें अभ्यासिलें । तें तैंचि म्हणों ये आपुलें । जैं सानुकूल श्रीगुरु ॥१७२॥
ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजें । अर्जुन निश्चयाचि नाचतुसें भोजें । तेवींचि म्हणे देवा तुझें । वाक्य मज मानलें ॥१७३॥
तरि साचचि हें कैवल्यपती । मज त्रिशुद्धी आली प्रतीती । जे तूं देवदानवांचिये मती । जोगा नव्हसी ॥१७४॥
तुझें वाक्य व्यक्ती न येतां देवा । जो आपुलिया जाणे जाणिवा । तो कहींचि नोहे हें मद्भावा । भरंवसेनि आलें ॥१७५॥
स्वयमेवाऽऽत्मनाऽऽत्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥१५॥
एथ आपुलें वाढपण जैसें । आपणचि जाणिजे आकाशें । कां मी येतुली घनवट ऐसें । पृथ्वीचि जाणे ॥१७६॥
तैसा आपुलिये सर्वशक्ती । तुज तूंचि जाणसी लक्ष्मीपती । येर वेदादिक मती । मिरवती वायां ॥१७७॥
हां गा मनातें मागां सांडावें । पवनातें वावीं मवावें । आदिशून्य तरोनि जावें । केउतें बाहीं ॥१७८॥
तैसें हें तुझें जाणणें आहे । म्हणौनि कोणाही ठाउकें नोहे । आतां तुझें ज्ञान होये । तुजचिजोगें ॥१७९॥
जी आपणयातें तूंचि जाणसी । आणिकातें सांगावयाही समर्थ होसी । तरी आतां एक वेळ घाम पुसीं । आर्तीचिये निडळींचा ॥१८०॥
हें आइकिलें कीं भूतभावना । त्रिभुवनगजपंचानना । सकळदेवदेवतार्चना । जगन्नायका ॥१८१॥
जरी थोरी तुझी पाहात आहों । तरी पासीं उभे ठाकावयाही योग्य नोहों । या शोच्यता जरी विनवूं बिहों । तरी आन उपायो नाहीं ॥१८२॥
भरले समुद्र सरिता चहूंकडे । परि ते बापियासि कोरडे । कां जैं मेघौनि थेंबुटा पडे । तैं पाणी कीं तया ॥८३॥
तैसे श्रीगुरु सर्वत्र आथी । परि कृष्णा आम्हां तूंचि गती । हें असो मजप्रती । विभूती सांगें ॥१८४॥
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।
याभिर्विभूतिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥१६॥
जी तुझिया विभूती आघविया । परि व्यापिती शक्ति दिव्या जिया । तिया आपुलिया दावाविया । आपण मज ॥१८५॥
जिहीं विभूतीं ययां समस्तां । लोकांतें व्यापूनि आहासी अनंता । तिया प्रधाना नामांकिता । प्रगटा करीं ॥१८६॥
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥१७॥
जी कैसें मियां जाणावें । काय जाणोनि सदा चिंतावें । जरी तूंचि म्हणों आघवें । तरि चिंतनचि न घडे ॥१८७॥
म्हणौनि मागां भाव जैसे । आपुले सांगितले तुवां उद्देशें । आतां विस्तारोनि तैसे । एक वेळ बोलें ॥१८८॥
जया जया भावाचिया ठायीं । तूंतें चिंतितां मज सायासु नाहीं । तो विवळ करूनि देईं । योगु आपुला ॥१८९॥
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूयः कथय तृप्तिर्हि श्रृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥१८॥
आणि पुसलिया जिया विभूती । त्याही बोलाविया भूतपती । येथ म्हणसी जरी पुढती । काय सांगों ? ॥१९०॥
तरी हा भाव मना । झणें जाय हो जनार्दना । पैं प्राकृताही अमृतपाना । ना न म्हणवे जेवीं ॥१९१॥
जे काळकूटाचें सहोदर । जें मृत्यूभेणें प्याले अमर । तरि दिहाचे पुरंदर । चौदा जाती ॥१९२॥
ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु । जया वायांचि अमृतपणाचा आभासु । तयाचाही मीठांशु । जे पुरे म्हणों नेदी ॥१९३॥
तया पाबळेयाही येतुलेवरी । गोडियेचि आथि थोरी । मग हें तंव अवधारीं । परमामृत साचें ॥१९४॥
जें मंदराचळु न ढाळितां । क्षीरसागरु न डहुळितां । अनादि स्वभावता । आइतें आहे ॥१९५॥
जें द्रव ना नव्हे बद्ध । जेथ नेणिजती रस गंध । जें भलतयांही सिद्ध । आठवलेंचि फावे ॥१९६॥
जयाची गोठीचि ऐकतखेंवो । आघवा संसारु होय वावो । बळिया नित्यता लागे येवों । आपणपेंया ॥१९७॥
जन्ममृत्यूची भाख । हारपोनि जाय निःशेख । आंत बाहेरी महासुख । वाढोंचि लागे ॥१९८॥
मग दैवगत्या जरी सेविजे । तरी तें आपणचि होऊनि ठाकिजे । तें तुज देतां चित्त माझें । पुरें म्हणों न शके ॥२९९॥
तुझें नामचि आम्हां आवडे । वरि भेटी होय आणि जवळिक जोडे । पाठीं गोठी सांगसी सुरवाडें । आनंदाचेनी ॥२००॥
आतां हें सुख कायिसयासारिखें । कांहीं निर्वचेना मज परितोखें । तरि येतुलें जाणें जे येणें मुखें । पुनरुक्तही हो ॥२०१॥
हां गा सूर्य काय शिळा ? । अग्नि म्हणों येत आहे वोंविळा ? । कां नित्य वाहातया गंगाजळा । पारसेपण असे ? ॥२०२॥
तुंवा स्वमुखें जें बोलिलें । हें आम्हीं नादासि रूप देखिलें । आजि चंदनतरूचीं फुलें । तुरंबीत आहों मां ॥२०३॥
तया पार्थाचिया बोला । सर्वांगें श्रीकृष्ण डोलला । म्हणे भक्तिज्ञानासि जाहला । आगरु हा ॥२०४॥
ऐसा पतिकराचिया तोषा आंतु । प्रेमाचा वेगु उचंबळतु । सायासें सांवरूनि अनंतु । काय बोले ॥२०५॥
श्रीभगवानुवाच ।
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥१९॥
या चित्राचे निरुपण ऐका
मी पितामहाचा पिता । हें आठवितांही नाठवे चित्ता । कीं म्हणतसे बा पंडुसुता । भलें केलें ॥२०६॥
अर्जुनातें बा म्हणे एथ कांहीं । आम्हां विस्मो करावया कारण नाहीं । आंगें तो लेंकरूं काई । नव्हेचि नंदाचें ? ॥२०७॥
परि प्रस्तुत ऐसें असो । हें करवी आवडीचा अतिसो । मग म्हणे आइकें सांगतसों । धनुर्धरा ॥२०८॥
तरी तुवां पुसलिया विभूती । तयांचें अपारपण सुभद्रापती । ज्या माझियाचि परि माझिये मती । आकळती ना ॥२०९॥
आंगींचिया रोमा किती । जयाचिया तयासि न गणवती । तैसिया माझिया विभूती । असंख्य मज ॥२१०॥
एऱ्हवीं तरी मी कैसा केवढा । म्हणौनि आपणपयांही नव्हेचि फुडा । यालागीं प्रधाना जिया रूढा । तिया आइकें ॥२११॥
जिया जाणतलियासाठीं । आघवीया जाणवतील किरीटी । जैसें बीज आलिया मुठीं । तरूचि आला होय ॥२१२॥
कां उद्यान हाता चढिन्नलें । तरी आपैसीं सांपडलीं फळें फुलें । तेवीं देखिलिया जिया देखवलें । विश्व सकळ ॥२१३॥
एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा । नाहीं शेवटु माझिया विस्तारा । पैं गगना ऐशिया अपारा । मजमाजीं लपणें ॥२१४॥
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥२०॥
आइकें कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका । मी आत्मा असें एकैका । भूतमात्राच्या ठायीं ॥२१५॥
आंतुलीकडे मीचि यांचे अंतःकरणीं । भूतांबाहेरी माझीच गंवसणी । आदि मी निर्वाणीं । मध्यही मीचि ॥२१६॥
जैसें मेघां या तळीं वरी । एक आकाशचि आंत बाहेरी । आणि आकाशींचि जाले अवधारीं । असणेंही आकाशीं ॥२१७॥
पाठीं लया जे वेळीं जाती । ते वेळीं आकाशचि होऊनि ठाती । तेवीं आदि स्थिती गती । भूतांसि मी ॥२१८॥
ऐसें बहुवस आणि व्यापकपण । माझें विभूतियोगें जाण । तरी जीवचि करूनि श्रवण । आइकोनि आइक ॥२१९॥
याहीवरी त्या विभूती । सांगणें ठेलें सुभद्रापती । सांगेन म्हणितलें तुजप्रती । त्या प्रधाना आइकें ॥२२०॥
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान ।
मरीचिर्मरूतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥२१॥
हें बोलोनि तो कृपावंतु । म्हणे विष्णु मी आदित्यांआंतु । रवी मी रश्मिवंतु । सुप्रभांमाजीं ॥२२१॥
मरूद्गणांच्या वर्गीं । मरीचि म्हणे मी शारङ्गी । चंद्रु मी गगनरंगीं । तारांमाजीं ॥२२२॥
वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥२२॥
वेदांआंतु सामवेदु । तो मी म्हणे गोविंदु । देवांमाजी मरुद्बंधु । महेंद्रु तो मी ॥२२३॥
इंद्रियांमाजीं अकरावें । मन तें मी हें जाणावें । भूतांमाजी स्वभावें । चेतना ते मी ॥२२४॥
रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥२३॥
अशेषांही रुद्रांमाझारीं । शंकर जो मदनारी । तो मी येथ न धरीं । भ्रांति कांहीं ॥२२५॥
यक्षरक्षोगणांआंतु । शंभूचा सखा जो धनवंतु । तो कुबेरु मी हें अनंतु । म्हणता जाहला ॥२२६॥
मग आठांही वसूंमाझारीं । पावकु तो मी अवधारीं । शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी ॥२२७॥
पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥२४॥
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥२५॥
जो स्वर्गसिंहासना सावावो । सर्वज्ञते आदीचा ठावो । तो पुरोहितांमाजीं रावो । बृहस्पती मी ॥२२८॥
त्रिभुवनींचिया सेनापतीं । आंत स्कंदु तो मी महामती । जो हरवीर्यें अग्निसंगती । कृत्तिकाआंतु जाहला ॥२२९॥
सकळिकां सरोवरांसी । माजीं समुद्र तो मी जळराशी । महर्षींआंतु तपोराशी । भृगु तो मी ॥२३०॥
अशेषांही वाचा । माजीं नटनाच सत्याचा । तें अक्षर एक मी वैकुंठींचा । वेल्हाळु म्हणे ॥२३१॥
समस्तांही यज्ञांच्या पैकीं । जपयज्ञु तो मी ये लोकीं । जो कर्मत्यागें प्रणवादिकीं । निफजविजे ॥२३२॥
नामजपयज्ञु तो परम । बाधूं न शके स्नानादि कर्म । नामें पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थें ॥२३३॥
स्थावरां गिरीआंतु । पुण्यपुंज जो हिमवंतु । तो मी म्हणे कांतु । लक्ष्मियेचा ॥२३४॥
अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥२६॥
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥२७॥
कल्पद्रुम हन पारिजातु । गुणें चंदनुही वाड विख्यातु । तरि ययां वृक्षजातांआंतु । अश्वत्थु तो मी ॥२३५॥
देवऋषींआंतु पांडवा । नारदु तो मी जाणावा । चित्ररथु मी गंधर्वां । सकळिकांमाजीं ॥२३६॥
ययां अशेषांही सिद्धां । माजीं कपिलाचार्यु मी प्रबुद्धा । तुरंगजातां प्रसिद्धां । आंत उचैःश्रवा मी ॥२३७॥
राजभूषण गजांआंतु । अर्जुना मी गा ऐरावतु । पयोराशी सुरमथितु । अमृतांशु तो मी ॥२३८॥
ययां नरांमाजीं राजा । तो विभूतिविशेष माझा । जयातें सकळ लोक प्रजा । होऊनि सेविती ॥२३९॥
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥२८॥
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥२९॥
पैं आघवेयां हातियेरां । आंत वज्र तें मी धनुर्धरा । जें शतमखोत्तीर्णकरा । आरूढोनि असे ॥२४०॥
धेनूंमध्यें कामधेनु । तें मी म्हणे विष्वक्सेनु । जन्मवितयाआंत मदनु । तो मी जाणें ॥२४१॥
सर्पकुळाआंत अधिष्ठाता । वासुकी गा मी कुंतीसुता । नागांमाजीं समस्तां । अनंतु तो मी ॥२४२॥
अगा यादसांआंतु । जो पश्चिम प्रमदेचा कांतु । तो वरुण मी हें अनंतु । सांगत असे ॥२४३॥
आणि पितृगणां समस्तां । माजीं अर्यमा जो पितृदेवता । तो मी हें तत्त्वता । बोलत आहें ॥२४४॥
जगाचीं शुभाशुभें लिहिती । प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती । मग केलियानुरूप होती । भोगनियम जे ॥२४५॥
तयां नियमितयांमाजीं यमु । जो कर्मसाक्षी धर्मु । तो मी म्हणे आत्मारामु । रमापती ॥२४६॥
प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥३०॥
अगा दैत्यांचिया कुळीं । प्रऱ्हादु तो मी न्याहाळीं । म्हणौनि दैत्यभावादि मेळीं । लिंपेचि ना ॥२४७॥
पैं कळितयांमाजीं महाकाळु । तो मी म्हणे गोपाळु । श्वापदांमाजीं शार्दूळु । तो मी जाण ॥२४८॥
पक्षिजातिमाझारीं । गरुड तो मी अवधारीं । यालागीं जो पाठीवरी । वाहों शके मातें ॥२४९॥
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जान्हवी ॥३१॥
पृथ्वीचिया पैसारा । माजीं घडीं न लगतां धनुर्धरा । एकेचि उड्डाणें सातांहि सागरां । प्रदक्षिणा कीजे ॥२५०॥
तयां वहिलियां गतिमंतां । आंत पवनु तो मी पंडुसुता । शस्त्रधरां समस्तां । माजीं श्रीराम तो मी ॥२५१॥
जेणें सांकडलिया धर्माचें कैवारें । आपणपयां धनुष्य करूनि दुसरें । विजयलक्ष्मिये एक मोहरें । केलें त्रेतीं ॥२५२॥
पाठीं उभे ठाकूनि सुवेळीं । प्रतापलंकेश्वराचीं सिसाळीं । गगनीं उदो म्हणतया हस्तबळीं । दिधली भूतां ॥२५३॥
जेणें देवांचा मानु गिंवसिला । धर्मासि जीर्णोद्धारु केला । सूर्यवंशीं उदेला । सूर्य जो कां ॥२५४॥
तो हातियेरुपरजितया आंतु । रामचंद्र मी जानकीकांतु । मकर मी पुच्छवंतु । जळचरांमाजीं ॥२५५॥
पैं समस्तांही वोघां । मध्यें जे भगीरथें आणितां गंगा । जन्हूनें गिळिली मग जंघा । फाडूनि दिधली ॥२५६॥
ते त्रिभूवनैकसरिता । जान्हवी मी पंडुसुता । जळप्रवाहां समस्तां । माझारीं जाणें ॥२५७॥
ऐसेनि वेगळालां सृष्टीपैकीं । विभूती नाम सूतां एकेकीं । सगळेन जन्मसहस्रें अवलोकीं । अर्ध्या नव्हती ॥२५८॥
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥३२॥
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥३३॥
जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं । ऐसी चाड उपजेल जैं जीवीं । तैं गगनाची बांधावी । लोथ जेवीं ॥२५९॥
कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरि भूगोलुचि काखे सुवावा । तैसा विस्तारु माझा पहावा । तरि जाणावें मातें ॥२६०॥
जैसें शाखांसी फूल फळ । एकिहेळां वेटाळूं म्हणिजे सकळ । तरी उपडूनियां मूळ । जेवीं हातीं घेपे ॥२६१॥
तेवीं माझें विभूतिविशेष । जरी जाणों पाहिजेती अशेष । तरी स्वरूप एक निर्दोष । जाणिजे माझें ॥२६२॥
एऱ्हवीं वेगळालिया विभूती । कायिएक परिससी किती । म्हणौनि एकिहेळां महामती । सर्व मी जाण ॥२६३॥
मी आघवियेचि सृष्टी । आदिमध्यांतीं किरीटी । ओतप्रोत पटीं । तंतु जेवीं ॥२६४॥
ऐसिया व्यापका मातें जैं जाणावें । तैं विभूतिभेदें काय करावें । परि हे तुझी योग्यता नव्हे । म्हणौनि असो ॥२६५॥
कां जे तुवां पुसिलिया विभूती । म्हणौनि तिया आईक सुभद्रापती । तरी विद्यांमाजीं प्रस्तुतीं । अध्यात्मविद्या ते मी ॥२६६॥
अगा बोलतयांचिया ठायीं । वादु तो मी पाहीं । जो सकलशास्त्रसंमतें कहीं । सरेचिना ॥२६७॥
जो निर्वचूं जातां वाढे । आइकतयां उत्प्रेक्षे सळु चढे । जयावरी बोलतयांचीं गोडें । बोलणीं होतीं ॥२६८॥
ऐसा प्रतिपादनामाजीं वादु । तो मी म्हणे गोविंदु । अक्षरांमाजीं विशदु । अकारु तो मी ॥२६९॥
पैं गा समासांमाझारीं । द्वंद्व तो मी अवधारीं । मशकालागोनि ब्रह्मावेरीं । ग्रासिता तो मी ॥२७०॥
मेरुमंदरादिकीं सर्वीं । सहित पृथ्वीतें विरवी । जो एकार्णवातेंही जिरवी । जेथिंचा तेथ ॥२७१॥
जो प्रळयतेजा देत मिठी । सगळिया पवनातें गिळी किरीटी । आकाश जयाचिया पोटीं । सामावलें ॥२७२॥
ऐसा अपार जो काळु । तो मी म्हणे लक्ष्मीलीळु । मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी ॥२७३॥
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥३४॥
आणि सृजिलिया भूतांतें मीचि धरीं । सकळां जीवनही मीचि अवधारीं । शेखीं सर्वांतें या संहारीं । तेव्हां मृत्युही मीचि ॥२७४॥
आतां स्त्रीगणांच्या पैकीं । माझिया विभूती सात आणिकी । तिया ऐक कवतिकीं । सांगिजतील ॥२७५॥
तरी नित्य नवी जे कीर्ति । अर्जुना ते माझी मूर्ती । आणि औदार्येंसी जे संपत्ती । तेही मीचि जाणें ॥२७६॥
आणि ते गा मी वाचा । जे सुखासनीं न्यायाचा । आरूढोनि विवेकाचा । मार्गीं चाले ॥२७७॥
देखिलेनि पदार्थें । जे आठवूनि दे मातें । ते स्मृतिही एथें । त्रिशुद्धी मी ॥२७८॥
पैं स्वहिता अनुयायिनी । मेधा ते गा मी इये जनीं । धृती मी त्रिभुवनीं । क्षमा ते मी ॥२७९॥
एवं नारींमाझारीं । या सातही शक्ति मी अवधारीं । ऐसें संसारगजकेसरी । म्हणता जाहला ॥२८०॥
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥३५॥
वेदराशीचिया सामा । आंत बृहत्साम जें प्रियोत्तमा । तें मी म्हणे रमा । प्राणेश्वरु ॥२८१॥
गायत्रीछंद जें म्हणिजे । तें सकळां छंदांमाजीं माझें । स्वरूप हें जाणिजे । निभ्रांत तुवां ॥२८२॥
मासांआंत मार्गशीरु । तो मी म्हणे शारङ्गधरु । ऋतूंमाजीं कुसुमाकरु । वसंतु तो मी ॥२८३॥
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥३६॥
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजयः ।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥३७॥
छळितयां विंदाणा । माजीं जूं तें मी विचक्षणा । म्हणौनि चोहटां चोरी परी कवणा । निवारूं न ये ॥२८४॥
अगा अशेषांही तेजसां । आंत तेज तें मी भरंवसा । विजयो मी कार्योद्देशां । सकळांमाजीं ॥२८५॥
जेणें चोखाळत दिसे न्याय । तो व्यवसायांत व्यवसाय । माझें स्वरूप हें राय । सुरांचा म्हणे ॥२८६॥
सत्त्वाथिलियांआंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु । यादवांमाजीं श्रीमंतु । तोचि तो मी ॥२८७॥
जो देवकी वसुदेवास्तव जाहला । कुमारीसाठीं गोकुळीं गेला । तो मी प्राणासकट पियाला । पूतनेतें ॥२८८॥
नुघडतां बाळपणाची फुली । जेणें मियां अदानवीं सृष्टि केली । करीं गिरि धरूनि उमाणिली । महेंद्रमहिमा ॥२८९॥
कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें । जेणें मियां जळत गोकुळ राखिलें । वासरुवांसाठीं लाविलें । विरंचीस पिसें ॥२९०॥
प्रथमदशेचिये पहांटे । माजीं कंसा ऐशीं अचाटें । महाधेंडीं अवचटें । लीळाचि नासिलीं ॥२९१॥
हें काय कितीएक सांगावें । तुवांही देखिलें ऐकिलें असे आघवें । तरि यादवांमाजीं जाणावें । हेंचि स्वरूप माझें ॥२९२॥
आणि सोमवंशीं तुम्हां पांडवां । माजीं अर्जुन तो मी जाणावा । म्हणौनि एकमेकांचिया प्रेमभावा । विघडु न पडे ॥२९३॥
संन्यासी तुवां होऊनि जनीं । चोरूनि नेली माझी भगिनी । तऱ्ही विकल्पु नुपजे मनीं । मी तूं दोन्ही स्वरूप एक ॥२९४॥
मुनीआंत व्यासदेवो । तो मी म्हणे यादवरावो । कवीश्वरांमाजीं धैर्या ठावो । उशनाचार्य तो मी ॥२९५॥
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥३८॥
अगा दमितयांमाझारीं । अनिवार दंडु तो मी अवधारीं । जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरीं । नियमित पावे ॥२९६॥
पैं सारासार निर्धारितयां । धर्मज्ञानाचा पक्षु धरितयां । सकळ शास्त्रांमाजीं ययां । नीतिशास्त्र तें मी ॥२९७॥
आघवियाचि गूढां । माजीं मौन तें मी सुहाडा । म्हणौनि न बोलतयां पुढां । स्त्रष्टाही नेण होय ॥२९८॥
अगा ज्ञानियांचिया ठायीं । ज्ञान तें मी पाहीं । आतां असो हें ययां कांहीं । पार न देखों ॥२९९॥
यच्चाऽपि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदसेति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥३९॥
नान्तोऽस्ति मम दिव्यांना विभूतीनां परंतप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥४०॥
पैं पर्जन्याचिया धारां । वरी लेख करवेल धनुर्धरा । कां पृथ्वीचिया तृणांकुरां । होईल ठी ॥३००॥
पैं महोदधीचिया तरंगां । व्यवस्था धरूं नये जेवीं गा । तेवीं माझिया विशेषलिंगां । नाहीं मिती ॥३०१॥
ऐशियाही सातपांच प्रधाना । विभूती सांगितलिया तुज अर्जुना । तो हा उद्देशु जो गा मना । आहाच गमला ॥३०२॥
येरां विभूतिविस्तारांसि कांहीं । एथ सर्वथा लेख नाहीं । म्हणौनि परिससीं तूं काई । आम्हीं सांगों किती ॥३०३॥
यालागीं एकिहेळां तुज । दॐ आतां वर्म निज । तरी सर्व भूतांकुरें बीज । विरूढत असे तें मी ॥३०४॥
म्हणौनि सानें थोर न म्हणावें । उंच नीच भाव सांडावे । एक मीचि ऐसें मानावें । वस्तुजातातें ॥३०५॥
तरी यावरी साधारण । आईक पां आणिकही खूण । तरी अर्जुना तें तूं जाण । विभूति माझी ॥३०६॥
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥४१॥
जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया ठाया । ते ते जाण धनंजया । विभूति माझी ॥३०७॥
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥४२॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भ्गवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥१०॥
अथवा एकलें एक बिंब गगनीं । प्रभा फांके त्रिभुवनीं । तेवीं एकाकियाची सकळ जनीं । आज्ञा पाळिजे ॥३०८॥
तयांतें एकलें झणीं म्हण । तो निर्धन या भाषा नेण । काय कामधेनूसवें सर्वस्व हन । चालत असे ? ॥३०९॥
तियेतें जें जेधवां जो मागे । तें ते एकसरेंचि प्रसवों लागे । तेवीं विश्वविभव तया आंगें । होऊनि असती ॥३१०॥
तयातें वोळखावया हेचि संज्ञा । जे जगें नमस्कारिजे आज्ञा । ऐसें आथि तें जाण प्राज्ञा । अवतार माझे ॥३११॥
आणि सामान्य विशेष । हें जाणणें एथ महादोष । कां जे मीचि एक अशेष । विश्व हें म्हणौनि ॥३१२॥
तरी आतां साधारण आणि चांगु । ऐसा कैसेनि पां कल्पावा विभागु । वायां आपुलिये मती वंगु । भेदाचा लावावा ॥३१३॥
एऱ्हवीं तूप कासया घुसळावें । अमृत कां रांधूनि अर्धें करावें । हां गा वायूसि काय पां डावें । उजवें आंग आहे ? ॥३१४॥
पैं सूर्यबिंबासि पोट पाठीं । पाहतां नासेल आपुली दिठी । तेवीं माझ्या स्वरूपीं गोठी । सामान्यविशेषाची नाहीं ॥३१५॥
आणि सिनाना इहीं विभूतीं । मज अपारातें मविसील किती । म्हणौनि किंबहुना सुभद्रापती । असो हें जाणणें ॥३१६॥
आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे । यालागीं भेदू सांडूनि सरिसें । साम्यें भज ॥३१७॥
ऐसें विबुधवनवसंतें । तेणें विरक्तांचेनि एकांतें । बोलिलें जेथ श्रीमंतें । श्रीकृष्णदेवें ॥३१८॥
तेथ अर्जुन म्हणे स्वामी । येतुलें हें राभस्य बोलिलें तुम्हीं । जे भेदु एक आणि आम्ही । सांडावा एकीं ॥३१९॥
हां हो सूर्य म्हणे काय जगातें । अंधारें दवडा कां परौतें । तेवीं धसाळ म्हणों देवा तूंतें । तरी अधिक हा बोलु ॥३२०॥
तुझें नामचि एक कोण्ही वेळे । जयांचिये मुखासि कां कानां मिळे । तयांचिया हृदयातें सांडूनि पळे । भेदु जी साच ॥३२१॥
तो तूं परब्रह्मचि असकें । मज दैवें दिधलासि हस्तोदकें । तरी आतां भेदु कायसा कें । देखावा कवणें ? ॥३२२॥
जी चंद्रबिंबाचा गाभारां । रिगालियावरीही उबारा । परी राणेपणें शारङ्गधरा । बोला हें तुम्हीं ॥३२३॥
तेथ सावियाचि परितोषोनि देवें । अर्जुनातें आलिंगिलें जीवें । मग म्हणे तुवां न कोपावें । आमुचिया बोला ॥३२४॥
आम्हीं तुज भेदाचिया वाहाणीं । सांगितली जे विभूतींची कहाणी । ते अभेदें काय अंतःकरणीं । मानिली कीं न मनें ॥३२५॥
हेंचि पाहावयालागीं । नावेक बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं । तंव विभूती तुज चांगी । आलिया बोधा ॥३२६॥
तेथ अर्जुन म्हणे देवें । हें आपुलें आपण जाणावें । परी देखतसें विश्व आघवें । तुवां भरलें ॥३२७॥
पैं राया तो पंडुसुतु । ऐसिये प्रतीतीसि जाहला वरितु । या संजयाचिया बोला निवांतु । धृतराष्ट्र राहे ॥३२८॥
कीं संजयो दुखवलेनि अंतःकरणें । म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणें । हा जीवें धाडसा आहे मी म्हणें । तंव आंतुही आंधळा ॥३२९॥
परी असो हें तो अर्जुनु । स्वहिताचा वाढवितसे मानु । कीं याहीवरी तया आनु । धिंवसा उपनला ॥३३०॥
म्हणे हेचि हृदया आंतुली प्रतीती । बाहेरी अवतरो कां डोळ्यांप्रती । इये आर्तीचिया पाउलीं मती । उठती जाहली ॥३३१॥
मियां इहींच दोहीं डोळां । झोंबावें विश्वरूपा सकळा । एवढी हांव तो देवा आगळा । म्हणौनि करी ॥३३२॥
आजि तो कल्पतरूची शाखा । म्हणौनि वांझोळें न लगती देखा । जें जें येईल तयाचि मुखा । तें तें साचचि करितसे येरु ॥३३३॥
जो प्रऱ्हादाचिया बोला । विषाहीसकट आपणचि जाहला । तो सद्गुरु असे जोडला । किरीटीसी ॥३३४॥
म्हणौनि विश्वरूप पुसावयालागीं । पार्थ रिगता होईल कवणें भंगीं । तें सांगेन पुढिलिये प्रसंगीं । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥३३५॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां दशमोऽध्यायः ॥