ज्ञानेश्वरी अध्याय ४

संत ज्ञानेश्वर (जन्म : १२७५) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत.


॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय ४ ॥

॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अध्याय चवथा ।

ज्ञानकर्मसंन्यासयोगः ।

आजि श्रवणेंद्रियां पाहलें । जें येणें गीतानिधान देखिलें । आतां स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें ॥१॥

आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी । आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥२॥

जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु । तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥३॥

कैसी आगळिक दैवाची । जे गंगा जोडली अमृताची । हो कां जपतपें श्रोतयांचीं । फळा आलीं ॥४॥

आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें । मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥५॥

हा अतिसो अतिप्रसंगें । सांडूनि कथाचि ते सांगें । जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ॥६॥

ते वेळीं संजयो रायातें म्हणे । अर्जुनु अधिष्ठिला दैवगुणें । जे अतिप्रीति श्रीनारायणें । बोलतु असे ॥७॥

जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगेचि माते देवकीसी । जें न संगेचि बंधु बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशीं बोलत ॥८॥

देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । परी तेही न देखे या प्रेमाचें सुख । आजि कृष्णस्नेहाचें बिक । यातेंचि आथी ॥९॥

सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होतिया कीर बहुवसा । परी त्याही येणें मानें यशा । येतीचिना ॥१०॥

या जगदीश्वराचें प्रेम । एथ दिसतसें निरुपम । कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ॥११॥

हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती । मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥१२॥

एऱ्हवीं हा योगियां नाडळे । वेदार्थासी नाकळे । जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥१३॥

तो हा निजस्वरूप । अनादि निष्कंप । परी कवणें मानें सकृप । जाहला आहे ॥१४॥

हा त्रैलोक्यपटाची घडी । आकारची पैलथडी । कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥१५॥

श्रीभगवानुवाच ।

इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।

विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥१॥

मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता । कथिला परी ते वार्ता । बहुतां दिवसांची ॥१६॥

मग तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी । निरूपिली बरवी । मनूप्रती ॥१७॥

मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली । ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥१८॥

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।

स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ॥२॥

मग आणिकही या योगातें । राजर्षि जाहले जाणते । परी तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोण्ही ॥१९॥

जे प्राणियां कामीं भरु । देहाचिवरी आदरु । म्हणौनि पडिला विसरु । आत्मबोधाचा ॥२०॥

अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखची परमावधि । जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ॥२१॥

एरव्हीं तरी खवणेयांच्या गांवीं । पाटाउवें काय करावीं । सांगें जात्यंधा रवी । काय आथी ? ॥२२॥

कां बहिरयांच्या आस्थानीं । कवण गीतातें मानीं । कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपजें ? ॥२३॥

पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते । ते काउळे केवीं चंद्रातें । वोळखती ? ॥२४॥

तैसी वैराग्याची शिंव न देखती । जे विवेकाची भाष नेणती ? । ते मूर्ख केंवीं पावती । मज ईश्वरातें ? ॥२५॥

कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला । म्हणौनि योगु हा लोपला । लोकीं इये ॥२६॥

स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।

भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥३॥

तोचि हा आजि आतां । तुजप्रती कुंतीसुता । सांगितला आम्हीं तत्त्वतां । भ्रांति न करीं ॥२७॥

हें जीवींचें निज गुज । परी केवीं राखों तुज । जे पढियेसी तूं मज । म्हणौनियां ॥२८॥

तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा । मैत्रियेचि चित्कळा । धनुर्धरा ॥२९॥

तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों ? । जऱ्ही संग्रामारूढ आहों । जाहलों आम्ही ॥३०॥

तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें । परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं ॥३१॥

अर्जुन उवाच ।

अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः ।

कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥४॥

तंव अर्जुन म्हणे श्रीहरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी । एथ विस्मयो काय अवधारीं । कृपानिधी ॥३२॥

तूं संसारश्रांतांची साउली । अनाथ जीवांची माउली । आमुतें कीर प्रसवली । तुझीच कृपा ॥३३॥

देवा पांगुळ एकादें विजे । तरी जन्मौनि जोजारु साहिजे । हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां ॥३४॥

आतां पुसेन जें मी कांहीं । तेथ निकें चित्त देईं । तेवींचि देवें कोपावें ना कांहीं । बोला एका ॥३५॥

तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता । ते नावेक मज चित्ता । मानेचिना ॥३६॥

जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाउवें नाहीं । तरी तुवांचि केवीं पाहीं । उपदेशिला ? ॥३७॥

तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव श्रीकृष्ण सांपेचा । म्हणौनि गा इये मातुचा । विसंवादु ॥३८॥

तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांहींचि नेणिजे । हें लटिकें केवीं म्हणिजे । एकिहेळां ? ॥३९॥

परि हेचि मातु आघवी । मी परियेसें ऐशी सांगावी । जे तुवांचि रवी केवीं । पाही उपदेशु केला ॥४०॥

श्रीभगवानुवाच ।

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।

तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥५॥

तंव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता । तैं आम्हीं नसों ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ॥४१॥

तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हासी । बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी । आपुलीं तूं ॥४२॥

मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें । तें समस्तही स्मरें । धनुर्धरा ॥४३॥

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीष्वरोऽपि सन ।

प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥६॥

म्हणौनि हें आघवें । मागील मज आठवें । मी अजुही परि संभवें । प्रकृतियोगें ॥४४॥

माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे । तें प्रतिबिंबें मायावशें । माझ्याचि ठायीं ॥४५॥

माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे । तेही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एऱ्हवीं नाहीं ॥४६॥

कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें । एऱ्हवीं काय वस्तुविचारें । दुजें आहे ? ॥४७॥

तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं । तैं साकारपणें नट नटीं । कार्यालागीं ॥४८॥

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥७॥

जें धर्मजात आघवें । युगायुगीं म्यां रक्षावें । ऐसा ओघु हा स्वभावें । आद्यु असे ॥४९॥

म्हणौनि अजत्व परतें ठेवीं । मी अव्यक्तपणही नाठवीं । जे वेळीं धर्मातें अभिभवी । अधर्मु हा ॥५०॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥८॥

ते वेळीं आपुल्याचेनि कैवारें । मी साकारु होऊनि अवतरें । मग अज्ञानाचें आंधारें । गिळूनि घालीं ॥५१॥

अधर्माची अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवीं गुढी । सुखाची उभवीं ॥५२॥

दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूंचा मानु गिंवशीं । धर्मासीं नीतीशीं । शेंस भरीं ॥५३॥

मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळीं । तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥५४॥

सत्सुखें विश्व कोंदे । धर्मुचि जगीं नांदें । भक्तां निघती दोंदे । सात्त्विकाचीं ॥५५॥

तै पापांचा अचळु फिटे । पुण्याची पहांट फुटे । जैं मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ॥५६॥

ऐसेया काजालागीं । अवतरें मी युगीं युगीं । परि हेंचि वोळखें जो जगीं । तो विवेकिया ॥५७॥

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।

त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥९॥

माझें अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें । हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥५८॥

तो चालिला संगें न चळे । देहींचा देहा नाकळे । मग पंचत्वीं तंव मिळे । माझ्याचि रूपीं ॥५९॥

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।

बहवो ज्ञानतपसा पूता मद्भवमागताः ॥१०॥

एऱ्हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती । वाटा कें वेळीं न वचती । क्रोधाचिया ॥६०॥

सदा मियांचि आथिले । माझिया सेवा जियाले । कीं आत्मबोधें तोषले । वीतराग जे ॥६१॥

जे तपोतेजाचिया राशी । कीं एकायतन ज्ञानासी । जे पवित्रता तीर्थांसी । तीर्थरूप ॥६२॥

ते मद्भावा सहजें आले । मी तेचि ते होऊनि ठेले । जे मज तयां उरले । पदर नाहीं ॥६३॥

सांगैं पितळेची गंधिकाळिक । जैं फिटली होय निःशेख । तैं सुवर्ण काई आणिक । जोडूं जाइजे ? ॥६४॥

तैसे यमनियमीं कडसले । जे तपोज्ञानें चोखाळले । मी तेचि ते जाहले । एथ संशयो कायसा ? ॥६५॥

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।

मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥११॥

एऱ्हवीं तरी पाहीं । जे जैसे माझ्या ठायीं । भजती तयां मीही । तैसाचि भजें ॥६६॥

देखैं मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ । जाहलें असे केवळ । माझ्याचि ठायीं ॥६७॥

परी ज्ञानेंवीण नाशिले । जे बुद्धिभेदासी आले । तेणेंचि त्या कल्पिलें । अनेकत्व ॥६८॥

म्हणौनि अभेदीं भेदु देखती । यया अनाम्या नामें ठेविती । देवी देवो म्हणती । अचर्चातें ॥६९॥

जे सर्वत्र सदा सम । तेथ विभाग अधमोत्तम । मतिवशें संभ्रम । विवंचिती ॥७०॥

काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धि यजन्त हि देवताः ।

क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥१२॥

मग नानाहेतुप्रकारें । यथोचितें उपचारें । मानिलीं देवतांतरें । उपासिती ॥७१॥

तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावती समस्त । परी तें कर्मफळ निश्चित । वोळख तूं ॥७२॥

वांचून देतें घेतें आणिक । निभ्रांत नाहीं सम्यक । एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ॥७३॥

जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तें वांचूनि आन न निपजे । कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ॥७४॥

नातरी कडेयातळवटीं । जैसा आपुलाचि बोलू किरीटी । पडिसादु होऊनि उठी । निमित्तयोगें ॥७५॥

तैसा समस्तां यां भजना । मी साक्षिभूतु पैं अर्जुना । एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ॥७६॥

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ॥१३॥

आतां याचिपरी जाण । चाऱ्ही हे वर्ण । सृजिलें म्यां गुण - । कर्मविभागें ॥७७॥

जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें । कर्में तदनुसारें । विवंचिली ॥७८॥

एथ एकचि हे धनुष्यपाणी । परी जाहले गा चहूं वर्णीं । ऐसी गुणकर्मकडसणी । केली सहजें ॥७९॥

म्हणौनि आइकें पार्था । हे वर्णभेदसंस्था । मीं कर्ता नव्हें सर्वथा । याचिलागीं ॥८०॥

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।

इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥१४॥

हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें । ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ॥८१॥

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः ।

कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥१५॥

मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐशिया जाणोनि मातें । कर्में केलीं समस्तें । धनुर्धरा ॥८२॥

परि तें बीजें जैसीं दग्धलीं । नुगवतींचि पेरिलीं । तैशीं कर्मेंचि परि तयां जाहलीं । मोक्षहेतु ॥८३॥

एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना । आपुलिये चाडें सज्ञाना । योग्यु नोहे ॥८४॥

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।

तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥१६॥

कर्म म्हणिपे तें कवण । अथवा अकर्मा काय लक्षण । ऐसें विचारितां विचक्षण । गुंफोनि ठेले ॥८५॥

जैसें कां कुडें नाणें । खऱ्याचेनि सारखेपणें । डोळ्यांचेंहि देखणें । संशयीं घाली ॥८६॥

तैसें नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें । गिंवसिजत आहाती कर्में । जे दुजी सृष्टी मनोधर्में । करूं सकती ॥८७॥

वांचूनि मूर्खाची गोठी कायसी । एथ मोहले गा क्रांतदर्शी । म्हणौनि आतां तेंचि परियेसीं । सांगेन तुज ॥८८॥

कर्मण्यो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।

अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥१७॥

तरी कर्म म्हणजे स्वभावें । जेणें विश्वाकारु संभवे । तें सम्यक आधीं जाणावें । लागे एथ ॥८९॥

मग वर्णाश्रमासि उचित । जें विशेष कर्म विहित । तेंही वोळखावें निश्चित । उपयोगेंसी ॥९०॥

पाठीं जें निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरूपें । येतुलेनि कांहीं न गुंफे । आपैसेंचि ॥९१॥

एऱ्हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन । परी तें असो आइकें चिन्ह । प्राप्तांचें गा ॥९२॥

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।

स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥१८॥

जो सकळकर्मीं वर्ततां । देखैं आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगें निराशता । फळाचिया ॥९३॥

आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगीं । बोधला असे ॥९४॥

तरी क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तोचि तो ये चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ॥९५॥

जैसा कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामाजिं देखे । तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहें ॥९६॥

अथवा नावें हन जो रिगे । तो थडियेचें रुख जातां देखे वेगें । तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हण अचळ ॥९७॥

तैसें सर्व कर्मीं असणें । ते फुडें मानूनि वायाणें । मग आपणया जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ॥९८॥

आणि उदोअस्तुचेनि प्रमाणें । जैसें न चालतां सूर्याचें चालणें । तैसें नैष्कर्म्यत्व जाणें । कर्मींचि असतां ॥९९॥

तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे । जैसें जळामाजीं न बुडे । भानुबिंब ॥१००॥

तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केलें । न भोगितां भोगिलें । भोग्यजात ॥१०१॥

एकेचि ठायीं बैसला । परि सर्वत्र तोचि गेला । हें असो विश्व जाहला । आंगेंचि तो ॥१०२॥

यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः ।

ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥१९॥

जया पुरुषाच्या ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं । परी फलापेक्षा कहीं । संचरेना ॥१०३॥

आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिलें सिद्धी नेईन । येणें संकल्पेंहीं जयाचें मन । विटाळेना ॥१०४॥

ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्में अशेखें । तो परब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ॥१०५॥

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।

कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित्करोति सः ॥२०॥

जो शरीरीं उदासु । फळभोगीं निरासु । नित्यता उल्हासु । होऊनि असे ॥१०६॥

जो संतोषाचा गाभारा । आत्मबोधाचिये वोगरां । पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगितां ॥१०७॥

निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।

शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥२१॥

यदृच्छालाभसंतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः ।

समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥२२॥

कैसी अधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी । सांडोनियां आशा कुरोंडी । अहंभावेंसीं ॥१०८॥

म्हणौनि अवसरें जें जें पावे । कीं तेणेंचि तो सुखावे । जया आपुलें आणि परावें । दोन्ही नाहीं ॥१०९॥

तो दिठीं जें पाहे । तें आपणचि होऊनि जाये । आईके तें आहे । तोचि जाहला ॥११०॥

चरणीं हन चाले । मुखें जें जें बोले । ऐसें चेष्टाजात तेतुलें । आपणचि जो ॥१११॥

हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेंवांचूनि नाहीं । आतां कवण तें कर्म कायी । बाधी तयातें ॥११२॥

हा मत्सरु जेथ उपजे । तेतुलें नुरेचि जया दुजें । तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी ? ॥११३॥

म्हणौनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि कर्मरहितु । सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ॥११४॥

गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ।

यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥२३॥

तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे । पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ॥११५॥

ऐसाहि परी कौतुकें । जरी कर्में करी यज्ञादिकें । तरी तियें लया जाती निःशेखें । तयाच्याचि ठायीं ॥११६॥

अकाळींचीं अभ्रें जैशीं । उर्मीवीण आकाशीं । हारपती आपैशीं । उदयलीं सांती ॥११७॥

तैशीं विधिविधानें विहितें । जरी आचरे तो समस्तें । तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें । पावतीचि गा ॥११८॥

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतम् ।

ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥२४॥

हें हवन मी होता । कां इयें यज्ञीं हा भोक्ता । ऐसिया बुद्धीसि नाहीं भिन्नता । म्हणौनियां ॥११९॥

जे इष्टयज्ञ यजावे । तें हविर्मंत्रादि आघवें । तो देखतसे अविनाशभावें । आत्मबुद्धि ॥१२०॥

म्हणौनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम । तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥१२१॥

आतां अविवेकु कुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचें पाणिग्रहण जाहलें । मग उपासन जिहीं आणिलें । योगाग्नीचें ॥१२२॥

दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।

ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥२५॥

जे यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसीं । गुरुवाक्य हुताशीं । हवन केलें ॥१२३॥

तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे । जेणें आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ॥१२४॥

आतां अवधारी सांगैन आणिक । जे ब्रह्माग्नी साग्निक । तयांतें यज्ञचि यज्ञु देख । उपासिजे ॥१२५॥

श्रोत्रादिनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।

शब्दादीन्विषयानन्ये इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥२६॥

एक संयमाग्निहोत्री । ते युक्तित्रयाच्या मंत्रीं । यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्यीं ॥१२६॥

एकां वैराग्य रवि विवळे । तंव संयती विहार केले । तेथ अपावृत जाहले । इंद्रियानळ ॥१२७॥

तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली । तंव विकारांचीं इंधनें पळिपली । तेथ आशाधूमें सांडिलीं । पांचही कुंडें ॥१२८॥

मग वाक्यविधीचिया निरवडी । विषय आहुती उदंडीं । हवन केलें कुंडीं । इन्द्रियाग्नीच्या ॥१२९॥

सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।

आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥२७॥

एकीं ययापरी पार्था । दोषु क्षाळिले सर्वथा । आणिकीं हृदयारणीं मंथा । विवेकु केला ॥१३०॥

तो उपशमें निहटिला । धैर्येंवरी दाटिला । गुरुवाक्यें काढिला । बळकटपणें ॥१३१॥

ऐसें समरसें मंथन केलें । तेथ झडकरी काजा आलें । जें उज्जीवन जाहलें । ज्ञानाग्नीचें ॥१३२॥

पहिला ऋद्धिसिद्धींचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धूमु । मग प्रगटला सूक्ष्मु । विस्फुलिंगु ॥१३३॥

तया मनाचें मोकळें । तेंचि पेटवण घातले । जें यमनियमीं हळुवारलें । आइतें होतें ॥१३४॥

तेणें सादुकुपणे ज्वाळा समृद्धा । मग वासनांतराचिया समिधा । स्नेहेंसीं नानाविधा । जाळिलिया ॥१३५॥

तेथ सोहंमंत्रें दीक्षितीं । इंद्रियकर्मांच्या आहुती । तियें ज्ञानानळीं प्रदीप्तीं । दिधलिया ॥१३६॥

पाठीं प्राणक्रियेचिये स्रुवेनिशीं । पूर्णाहुती पडली हुताशीं । तेथ अवभृत समरसीं । सहजें जहालें ॥१३७॥

मग आत्मबोधींचें सुख । जें संयमाग्नीचें हुतशेष । तोचि पुरोडाशु देख । घेतला तिहीं ॥१३८॥

एक ऐशिया इहीं यजनीं । मुक्त ते जाहले त्रिभुवनीं । या यज्ञक्रिया तरी आनानीं । परि प्राप्य तें एक ॥१३९॥

द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।

स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥२८॥

एक द्रव्युयज्ञु म्हणिपती । एक तपसामग्रीया निपजविती । एक योगयागुही आहाती । जे सांगितलें ॥१४०॥

एकीं शब्दीं शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे । ज्ञानें ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ॥१४१॥

हें अर्जुना सकळ कुवाडें । जे अनुष्ठितां अतिसांकडें । परी जितेंद्रियासीचि घडे । योग्यतावशें ॥१४२॥

ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धि आथिले । म्हणौनि आपणपां तिहीं केलें । आत्महवन ॥१४३॥

अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।

प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥२९॥

मग अपानाग्नीचेनि मुखीं । प्राणद्रव्यें देखीं । हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ॥१४४॥

एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहींतेंही निरुंधिती । ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ॥१४५॥

अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति ।

सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥३०॥

एक वज्रयोगक्रमें । सर्वाहारसंयमें । प्राणीं प्राणु संभ्रमें । हवन करिती ॥१४६॥

ऐसें मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ । जिहीं यज्ञद्वारां मनोमळ । क्षाळण केले ॥१४७॥

जया अविद्याजात जाळितां । जें उरलें निजस्वभावता । जेथ अग्नि आणि होता । उरेचिना ॥१४८॥

जेथ यजितयाचा कामु पुरे । यज्ञींचें विधान सरे । मागुतें जेथूनि वोसरें । क्रियाजात ॥१४९॥

विचार जेथ न रिगे । हेतु जेथ न निगे । जें द्वैतदोषसंगें । सिंपेचिना ॥१५०॥

यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।

नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥३१॥

ऐसें अनादिसिद्ध चोखट । जें ज्ञान यज्ञावशिष्ट । तें सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहंमंत्रें ॥१५१॥

ऐसें शेषामृतें धाले । कीं अमर्त्यभावा आले । म्हणौनि ब्रह्म ते जहाले । अनायासें ॥१५२॥

येरां विरक्ति माळ न घालीचि । जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि । जे योगयागु न करितीचि । जन्मले सांते ॥१५३॥

जयांचें ऐहिक धड नाहीं । तयांचे परत्र पुससी काई । म्हणौनि असो हे गोठी पाहीं । पंडुकुमरा ॥१५४॥

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।

कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥३२॥

ऐसें बहुतीं परी अनेग । जे सांगितलें तुज कां याग । ते विस्तारूनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ॥१५५॥

परी तेणें विस्तारें काय करावें । हेंचि कर्मसिद्ध जाणावें । येतुलेनि कर्मबंधु स्वभावें । पावेल ना ॥१५६॥

श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ञानयज्ञः परंतप ।

सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥३३॥

अर्जुना वेदु जयांचें मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ । जया नव्हाळियेचें फळ । स्वर्गसुख ॥१५७॥

ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती । जैशी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशीं ॥१५८॥

देखैं परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन । जे न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्री ॥१५९॥

जें धांवतया कर्माची लाणी । नैष्कर्म्यबोधाची खाणी । जें भुकेलिया धणी । साधनाची ॥१६०॥

जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली । जेणें इंद्रियें विसरलीं । विषयसंगु ॥१६१॥

मनाचें मनपण गेलें । जेथ बोलाचें बोलकेंपण ठेलें । जयामाजी सांपडलें । ज्ञेय दिसे ॥१६२॥

जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे । जेथ न पाहतां सहज भेटे । आपणपें ॥१६३॥

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥३४॥

तें ज्ञान पैं गा बरवे । जरी मनीं आथि आणावें । तरी संतां यां भजावें । सर्वस्वेसीं ॥१६४॥

जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंठा । तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥१६५॥

तरी तनुमनुजीवें । चरणांसीं लागावें । आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥१६६॥

मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें । जेणें अंतःकरण बोधलें । संकल्पा नये ॥१६७॥

यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।

येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥३५॥

जयाचेनि वाक्य उजिवडें । जाहलें चित्त निधडें । ब्रह्माचेनि पाडें । निःशंकु होय ॥१६८॥

तें वेळीं आपणपेयां सहितें । इयें अशेषेंही भूतें । माझ्या स्वरूपीं अखंडितें । देखसी तूं ॥१६९॥

ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारु जाईल । जैं गुरुकृपा होईल । पार्था गा ॥१७०॥

अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।

सर्व ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ॥३६॥

जरी कल्मषाचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु । व्यामोहाचा डोंगरु । होउनी अससी ॥१७१॥

तऱ्ही ज्ञानशक्तिचेनि पाडें । हें आघवेंचि गा थोकडें । ऐसें सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानीं इये ॥१७२॥

देखैं विश्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कडवसा । तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ॥१७३॥

तया कायसे हे मनोमळु । हें बोलतांचि अति किडाळु । नाहीं येणें पाडें ढिसाळु । दुजें जगीं ॥१७४॥

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मासात्कुरुतेऽर्जुन ।

ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥३७॥

सांगै भुवनत्रयाची काजळी । जे गगनामाजि उधवली । तिये प्रळयींचे वाहटुळी । काय अभ्र पुरे ? ॥१७५॥

कीं पवनाचेनि कोपें । पाणियेंचि जो पळिपे । तो प्रळयानळु दडपे । तृणें काष्ठें काई ? ॥१७६॥

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।

तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥३८॥

म्हणौनि असो हें न घडे । तें विचारितांचि असंगडें । पुढती ज्ञानाचेनि पाडें । पवित्र न दिसे ॥१७७॥

एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक तैसें कें आहे । जैसें चैतन्य कां नोहे । दुसरें गा ॥१७८॥

या महातेजाचेनि कसें । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे । कां गिंवसिलें गिंवसे । आकाश हें ॥१७९॥

नातरी पृथ्वीचेनि पाडें । कांटाळें जरी जोडे । तरी उपमा ज्ञानीं घडे । पंडुकुमरा ॥१८०॥

म्हणौनि बहुतीं परी पाहतां । पुढतपुढती निर्धारितां । हें ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींची आथि ॥१८१॥

जैसी अमृताची चवी निवडिजे । तरी अमृताचिसारिखी म्हणिजे । तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेंसींचि ॥१८२॥

आतां यावरी जें बोलणें । तें वायांची वेळु फेडणें । तंव साचचि हें पार्थ म्हणे । जें बोलत असां ॥१८३॥

परी तेंचि ज्ञान केवीं जाणावें । ऐसें अर्जुनें जंव पुसावें । तंव तें मनोगत देवें । जाणितलें ॥१८४॥

मग म्हणतसे किरीटी । आतां चित्त देईं इये गोठी । सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपावो तुज ॥१८५॥

श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।

ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥३९॥

तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकळ विषयां । जयाच्या ठायीं इंद्रियां । मानु नाहीं ॥१८६॥

जो मनासीं चाड न सांगे । जो प्रकृतीचें केलें नेघे । जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया जाहला ॥१८७॥

तयातेंचि गिंवसित । तें ज्ञान पावे निश्चित । जयामाजि अचुंबित । शांति असे ॥१८८॥

तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे । मग विस्तार बहु प्रगटे । आत्मबोधाचा ॥१८९॥

मग जेउती वास पाहिजे । तेउती शांतीची देखिजे । तेथ आपपरु नेणिजे । निर्धारितां ॥१९०॥

ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानबीजाचा विस्तारु । सांगतां असे अपारु । परि असो आतां ॥१९१॥

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।

नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥४०॥

ऐकें जया प्राणियाच्या ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं । तयाचें जियालें म्हणों काई । वरी मरण चांग ॥१९२॥

शून्य जैसें कां गृह । कां चैतन्येंवीण देह । तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीन ॥१९३॥

अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परि ते चाड एकी जरी वाहे । तरी तेथ जिव्हाळा कांहीं आहे । प्राप्तीचा पैं ॥१९४॥

वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परि ते आस्थाही न धरीं मानसीं । तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण ॥१९५॥

जे अमृतही परि नावडे । ऐसें सावियाचीं आरोचकु जैं पडे । तैं मरण आलें असें फुडें । जाणों येकीं ॥१९६॥

तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेसींचि माजे । तो संशयें अंगिकारिजे । एथ भ्रांति नाहीं ॥१९७॥

मग संशयीं जरी पडिला । तरी निभ्रांत जाणें नासला । तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासि गा ॥१९८॥

जया काळज्वरु आंगीं बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे । आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानीं ॥१९९॥

तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें । संशयीं तो नोळखे । हिताहित ॥२००॥

हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयीं असतां कांहीं । मना नये ॥२०१॥

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसंछिन्नसंशयम् ।

आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय ॥४१॥

म्हणौनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियांसि ॥२०२॥

येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा । जो ज्ञानाचिया अभावा । माजि असे ॥२०३॥

जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे । म्हणौनि सर्वथा मार्गु मोडे । विश्वासाचा ॥२०४॥

हृदयीं हाचि न समाये । बुद्धीतें गिंवसूनि ठाये । तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥२०५॥

तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।

छित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥४२॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥

ऐसा जरी थोरावें । तरी उपायें एकें आंगवे । जरी हातीं होय बरवें । ज्ञानखड्ग ॥२०६॥

तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे । मग निःशेष खता फिटे । मानसींचा ॥२०७॥

याकारणें पार्था । उठीं वेगीं वरौता । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥२०८॥

ऐसें सर्वज्ञाचा बापु । जो श्रीकृष्णु ज्ञानदीपु । तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया ॥२०९॥

तंव या पूर्वापर बोलाचा । विचारूनि कुमरु पंडूचा । कैसा प्रश्नु अवसरींचा । करिता होईल ॥२१०॥

ते कथेची संगति । भावाची संपत्ति । रसाची उन्नति । म्हणिपेल पुढा ॥२११॥

जयाचिया बरवेपणीं । कीजे आठां रसांची वोवाळणी । जो सज्जनाचिये आयणी । विसांवा जगीं ॥२१२॥

तो शांतुचि अभिनवेल । ते परियसा मऱ्हाटे बोल । जे समुद्राहूनि सखोल । अर्थभरित ॥२१३॥

जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें । शब्दाची व्याप्ति तेणें पाडें । अनुभवावी ॥२१४॥

नातरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा । बोलु व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावें ॥२१५॥

हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणती स्वभावें । तरी निकें चित्त द्यावें । हे विनंती माझी ॥२१६॥

जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती । जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ॥२१७॥

आधींच साखर आवडे । तेचि जरी ओखदां जोडे । तरी सेवावी ना कां कोडें । नावानावा ? ॥२१८॥

सहजें मलयानिळु मंदु सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु । आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या ॥२१९॥

तरी स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी । तेवींचि कानांकरवीं । म्हणवीं बापु माझा ॥२२०॥

तैसें कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासी होय पारणें । आणि संसारदुःख मूळवणें । विकृतीविणें ॥२२१॥

जरी मंत्रेंचि वैरी मरे । तरी वायां कां बांधावीं कटारें ? । रोग जाय दूधसाखरें । तरी निंब कां पियावा ? ॥२२२॥

तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दुःख न देतां । एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजि ॥२२३॥

म्हणौनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका । ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तिदासु ॥२२४॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां चतुर्थोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 30, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP