॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय ८ ॥
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अध्याय आठवा ।
अक्षरब्रह्मयोगः ।
अर्जुन उवाच ।
किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥१॥
मग अर्जुनें म्हणितलें । हां हो जी अवधारिलें । जें म्यां पुसिलें । तें निरूपिजो ॥१॥
सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म । अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ॥२॥
अधिभूत तें कैसें । एथ अधिदैव तें कवण असे । हें उघड मी परियेसें । ऐसें बोला ॥३॥
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥२॥
देवा अधियज्ञ तो काई । कवण पां इये देहीं । हें अनुमानासि कांहीं । दिठी न भरे ॥४॥
आणि नियता अंतःकरणीं । तूं जाणिजसी देहप्रयाणीं । तें कैसेनि हे शारङ्गपाणी । परिसवा मातें ॥५॥
देखा धवळारीं चिंतामणीचा । जरी पहुडला होय दैवाचा । तरी वोसणतांही बोलु तयाचा । सोपु न वचे ॥६॥
तैसें अर्जुनाचिया बोलासवें । आलें तेंचि म्हणितलें देवें । तें परियेसें गा बरवें । जे पुसिलें तुवां ॥७॥
किरीटी कामधेनूचा पाडा । वरी कल्पतरूचा आहे मांदोडा । म्हणौनि मनोरथसिद्धीचिया चाडा । तो नवल नोहे ॥८॥
श्रीकृष्ण कोपोनि ज्यासी मारी । तो पावे परब्रह्मसाक्षात्कारीं । मा कृपेनें उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ॥९॥
जैं कृष्णचि होइजे आपण । तैं कृष्ण होय आपुलें अंतःकरण । मग संकल्पाचें आंगण । वोळगती सिद्धी ॥१०॥
परि ऐसें जें प्रेम । तें अर्जुनींचि आथि निस्सीम । म्हणौनि तयाचें काम । सदां सफळ ॥११॥
या कारणें श्रीअनंतें । तें मनोगत तयाचें पुसतें । होईल जाणोनि आइतें । वोगरूनि ठेविलें ॥१२॥
जें अपत्य थानीहूनि निगे । तयाची भूक ते मायेसीचि लागे । एऱ्हवीं तें शब्दें काय सांगें । मग स्तन्य दे येरी ? ॥१३॥
म्हणौनि कृपाळुवा गुरूचिया ठायीं । हें नवल नोहे कांहीं । परि तें असो आइका काई । जें देव बोलते जाहले ॥१४॥
श्रीभगवानुवाच ।
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः ॥३॥
मग म्हणितलें सर्वेश्वरें । जें आकारीं इयें खोंकरें । कोंदलें असत न खिरे । कवणे काळीं ॥१५॥
एऱ्हवीं सपूरपण तयाचें पहावें । तरी शून्यचि नव्हे स्वभावें । वरी गगनाचेनि पालवें । गाळूनि घेतलें ॥१६॥
जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे । हालवलेंहि न गळे । तें परब्रह्म ॥१७॥
आणि आकाराचेनि जालेपणें । जन्मधर्मातें नेणें । आकारलोपीं निमणें । नाहीं कहीं ॥१८॥
ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती । तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ॥१९॥
मग गगनीं जेविं निर्मळें । नेणों कैचीं एके वेळे । उठती घनपटळें । नानावर्णें ॥२०॥
तैसें अमूर्तीं तिये विशुद्धें । महदादि भूतभेदें । ब्रह्मांडाचे बांधे । होंचि लागती ॥२१॥
पैं निर्विकल्पाचिये बरडीं । फुटे आदिसंकल्पाची विरूढी । आणि तें सवेंचि मोडोनि ये ढोंढी । ब्रह्मगोळकांच्या ॥२२॥
तया एकैकाचे भीतरीं पाहिजे । तंव बीजाचाचि भरिला देखिजे । माजीं होतिया जातिया नेणिजे । लेख जीवा ॥२३॥
मग तया ब्रह्मगोळकांचें अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास । हें असो ऐसी बहुवस । सृष्टी वाढे ॥२४॥
परि दुजेनविण एकला । परब्रह्मींचि संचला । अनेकत्वाचा आला । पूर जैसा ॥२५॥
तैसें समविषमत्व नेणों कैचें । वायांचि चराचर रचे । पाहतां प्रसवतिया योनीचे । लक्ष दिसती ॥२६॥
येरी जीवभावाचिये पालविये । कांहीं मर्यादा करूं नये । पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ॥२७॥
म्हणौनि कर्ता मुदल न दिसे । आणि सेखीं कारणहीं कांहीं नसे । माजीं कार्यचि आपैसें । वाढों लागे ॥२८॥
ऐसा करितेनवीण गोचरु । अव्यक्तीं हा आकारु । निपजे जो व्यापारु । तया नाम कर्म ॥२९॥
अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥४॥
आतां अधिभूत जें म्हणिपे । तेंहि सांगों संक्षेपें । तरी होय आणि हारपे । अभ्र जैसें ॥३०॥
तैसें असतेपण आहाच । नाहीं होईजे हें साच । जयातें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां ॥३१॥
भूतांतें अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगें तरी दिसे । जें वियोगवेळे भ्रंशें । नामरूपादिक ॥३२॥
तयातें अधिभूत म्हणिजे । मग अधिदैव पुरुष जाणिजे । जेणें प्रकृतीचें भोगिजे । उपार्जिलें ॥३३॥
जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु । जो देहास्तमानीं वृक्षु । संकल्प विहंगमाचा ॥३४॥
जो परमात्माचि परी दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा । म्हणौनि स्वप्नीचिया वोरबारा । संतोषें शिणे ॥३५॥
जीव येणें नांवें । जयातें आळविजे स्वभावें । तें अधिदैवत जाणावें । पंचायतनींचें ॥३६॥
आतां इयेचि शरीरग्रामीं । जो शरीरभावातें उपशमी । तो अधियज्ञु एथ गा मी । पंडुकुमरा ॥३७॥
येर अधिदैवाधिभूत । तेहि मीचि कीर समस्त । परि पंधरें किडाळा मिळत । तें काय सांके नोहे ? ॥३८॥
तरि तें पंधरेपण न मैळे । आणि किडाळाचियाही अंशा न मिळे । परि जंव असे तयाचेनि मेळें । तंव सांकेंचि म्हणिजे ॥३९॥
तैसें अधिभूतादि आघवें । हें अविद्येचेनि पालवें । झांकलें तंव मानावें । वेगळें ऐसें ॥४०॥
तेचि अविद्येची जवनिका फिटे । आणि भेदभावाची अवधी तुटे । मग म्हणों एक होऊनि जरी आटे । तरी काय दोनी होती ? ॥४१॥
पैं केशांचा गुंडाळा । वरि ठेविली स्फटिकशिळा । ते वरि पाहिजे डोळां । तंव भेदली गमती ॥४२॥
पाठीं केश परौते नेले । आणि भेदलेपण काय नेणों जाहालें । तरी डांक देऊनि सांदिलें । शिळेतें काई ? ॥४३॥
ना ते अखंडचि आयती । परि संगें भिन्न गमली होती । ते सारिलिया मागौती । जैसी कां तैसी ॥४४॥
तेवींचि अहंभावो जाये । तरी ऐक्य तें आधींचि आहे । हेंचि साचें जेथ होये । तो अधुयज्ञु मी ॥४५॥
पैं गा आम्हीं तुज । सकळ यज्ञ कर्मज । सांगितलें कां जें काज । मनीं धरूनि ॥४६॥
तो हा सकळ जीवांचा विसांवा । नैष्कर्म्य सुखाचा ठेवा । परि उघड करूनि पांडवा । दाविजत असे ॥४७॥
पहिलिया वैराग्यइंधन परिपूर्तीं । इंद्रियानळीं प्रदीप्तीं । विषयद्रव्याचिया आहुती । देऊनियां ॥४८॥
मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी । वेदिका रचे मांडवीं । शरीराच्या ॥४९॥
तेथ संयमाग्नीचीं कुंडें । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें । यजिजती उदंडें । युक्तिघोषें ॥५०॥
मग मनप्राणसंयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु । येणें संतोषविजे निर्धूमु । ज्ञानानळु ॥५१॥
ऐसेनि हें सकळ ज्ञानीं समर्पें । मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे । पाठी ज्ञेयचि स्वरूपें । निखिल उरे ॥५२॥
तया नांव गा अधियज्ञु । ऐसें बोलिला जंव सर्वज्ञु । तंव अर्जुन अतिप्राज्ञु । तया पातलें तें ॥५३॥
हें जाणोनि म्हणितलें देवें । पार्था परिसतु आहासि बरवें । या कृष्णाचिया बोलासवें । येरु सुखाचा जाहला ॥५४॥
देखा बालकाचिया धणि धाइजे । कां शिष्याचेनि जाहलेपणें होइजे । हें सद्गुरूचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवतिया ॥५५॥
म्हणौनि सात्त्विक भावांची मांदी । कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं । न समातसे परी बुद्धी । सांवरूनि देवें ॥५६॥
मग पिकलिया सुखाचा परिमळु । कीं निवालिया अमृताचा कल्लोळु । तैसा कोंवळा आणि सरळु । बोलु बोलिला ॥५७॥
म्हणे परिसणेयांचिया राया । आइकें बापा धनंजया । ऐसी जळों सरलिया माया । तेथ जाळितें तेंही जळे ॥५८॥
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मद्भवं याति नास्त्यत्र संशयः ॥५॥
जें आतांचि सांगितलें होतें । अगा अधियज्ञ म्हणितला जयातें । जे आदींचि तया मातें । जाणोनि अंतीं ॥५९॥
ते देह झोल ऐसें मानुनी । ठेले आपणपें आपण होउनी । जैसा मठ गगना भरुनी । गगनींचि असे ॥६०॥
ये प्रतीतीचिया माजघरीं । तया निश्चयाची वोवरी । आली म्हणौनि बाहेरी । नव्हेचि से ॥६१॥
ऐसें सबाह्य ऐक्य संचलें । मीचि होऊनि असतां रचिलें । बाहेरि भूतांचीं पांचही खवलें । नेणतांचि पडिलीं ॥६२॥
आतां उभेयां उभेपण नाहीं जयाचें । मा पडिलिया गहन कवण तयाचें । म्हणौनि प्रतीतीचिये पोटींचें । पाणी न हाले ॥६३॥
ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली । जैसी समरससमुद्रीं धुतली । रुळेचिना ॥६४॥
पैं अथावीं घट बुडाला । तो आंतबाहेरी उदकें भरला । पाठीं दैवगत्या जरी फुटला । तरी उदक काय फुटे ? ॥६५॥
नातरी सर्पें कवच सांडिलें । कां उबारेनें वस्त्र फेडिलें । तरी सांग पां काय मोडलें । अवेवामाजीं ? ॥६६॥
तैसा आकारु हा आहाच भ्रंशे । वांचूनी वस्तु ते सांचलीचि असे । तेचि बुद्धि जालिया विसकुसे । कैसेनि आतां ॥६७॥
म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते । जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥६८॥
एऱ्हवीं तरी साधारण । उरीं आदळलिया मरण । जो आठवु धरी अंतःकरण । तेंचि होईजे ॥६९॥
जैसा कवणु एकु काकुळती । पळतां पवनगती । दुपाउलीं अवचितीं । कुहामाजीं पडियेला ॥७०॥
आतां तया पडणयाआरौतें । पडण चुकवावया परौतें । नाहीं म्हणौनि तेथें । पडावेंचि पडे ॥७१॥
तेविं मृत्यूचेनि अवसरें एकें । जें येऊनि जीवासमोर ठाके । तें होणें मग न चुके । भलतयापरी ॥७२॥
आणि जागता जंव असिजे । तंव जेणें ध्यानें भावना भाविजे । डोळां लागतखेंवो देखिजे । तेंचि स्वप्नीं ॥७३॥
यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥६॥
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥७४॥
आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे । म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥७५॥
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥७॥
डोळां जें देखावें । कां कानीं हन ऐकावें । मनीं जें भावावें । बोलावें वाचें ॥७६॥
तें आंत बाहेरी आघवें । मीचि करूनि घालावें । मग सर्वीं काळीं स्वभावें । मीचि आहें ॥७७॥
अर्जुना ऐसें जाहालिया । मग न मरिजे देह गेलिया । मा संग्रामु केलिया । भय काय तुज ? ॥७८॥
तूं मन बुद्धि सांचेंसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी । तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ॥७९॥
हेंच कायिसया वरी होये । ऐसा जरी संदेहो वर्ततु आहे । तरी अभ्यासूनि आदीं पाहें । मग नव्हे तरी कोपें ॥८०॥
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन ॥८॥
येणेंचि अभ्यासेंसी योगु । चित्तासि करी पां चांगु । अगा उपायबळें पंगु । पहाड ठाकी ॥८१॥
तेविं सदभ्यासें निरंतर । चित्तासि परमपुरुषाची मोहर । लावीं मग शरीर । राहो अथवा जावो ॥८२॥
जें नानागतीतें पाववितें । तें चित्त वरील आत्मयातें । मग कवण आठवी देहातें । गेलें कीं आहे ? ॥८३॥
पैं सरितेचेनि ओघें । सिंधुजळा मीनलें घोघें । तें काय वर्तत आहे मागें । म्हणौनि पाहों येती ? ॥८४॥
ना तें समुद्रचि होऊन ठेलें । तेविं चित्ताचें चैतन्य जाहालें । जेथ यातायात निमालें । घनानंद जें ॥८५॥
कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्यः ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥९॥
जयाचें आकारावीण असणें । जया जन्म ना निमणें । जें आघवेंचि आघवेंपणें । देखत असे ॥८६॥
जें गगनाहूनि जुनें । जें परमाणुहूनि सानें । जयाचेनि सन्निधानें । विश्व चळे ॥८७॥
जें सर्वांते यया विये । विश्व सर्व जेणें जिये । हेतु जया बिहे । अचिंत्य जें ॥८८॥
देखे वोळंबा इंगळु न चरे । तेजीं तिमिर न शिरे । जे दिहाचे अंधारें । चर्मचक्षूसीं ॥८९॥
सुसडा सूर्यकणांच्या राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी । अस्तमानाचे जयासी । आडनांव नाहीं ॥९०॥
प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥१०॥
तया अव्यंगवाणेया ब्रह्मातें । प्रयाणकाले प्राप्ते । जो स्थिरावलेनि चित्तें । जाणोनि स्मरे ॥९१॥
बाहेरी पद्मासन रचुनी । उत्तराभिमुख बैसोनि । जीवीं सुख सूनि । क्रमयोगाचे ॥९२॥
आंतु मीनलेनि मनोधर्में । स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें । आपेआप संभ्रमें । मिळावया ॥९३॥
आकळलेनि योगें । मध्यमा मध्य मार्गें । अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ॥९४॥
तेथ अचेत चित्ताचा सांगातु । आहाचवाणा दिसे मांडतु । जेथ प्राणु गगनाआंतु । संचरे कां ॥९५॥
परी मनाचेनि स्थैर्यें धरिला । भक्तीचिया भावना भरला । योगबळें आवरला । सज्ज होऊनि ॥९६॥
तो जडाजडातें विरवितु । भ्रूलतामाजीं संचरतु । जैसा घंटानाद लयस्तु । घंटेसीच होय ॥९७॥
कां झांकलिया घटींचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां । या रीतीं जो पांडवा । देह ठेवी ॥९८॥
तो केवळ परब्रह्म । जया परमपुरुष ऐसें नाम । तें माझें निजधाम । होऊनि ठाके ॥९९॥
यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥११॥
सकळां जाणणेयां जे लाणी । तिये जाणिवेची जे खाणी । तयां ज्ञानियांचिये आयणी । जयातें अक्षरु म्हणिपे ॥१००॥
चंडवातेंही न मोडे । तें गगनचि की फुडें । वांचूनि जरी होईल मेहुडें । तरी उरेल कैंचें ? ॥१०१॥
तेविं जाणणेया जें आकळिलें । तें जाणिवलेपणेंचि उमाणलें । मग नेणवेचि तया म्हणितलें । अक्षर सहजें ॥१०२॥
म्हणौनि वेदविद नर । म्हणती जयातें अक्षर । जें प्रकृतीसी पर । परमात्मरूप ॥१०३॥
आणि विषयांचे विष उलंडूनि । जे सर्वेंद्रियां प्रायश्चित्त देऊनि । आहाति देहाचिया बैसोनि । झाडातळीं ॥१०४॥
ते यापरी विरक्त । जयाची निरंतर वाट पाहात । निष्कामासि अभिप्रेत । सर्वदा जें ॥१०५॥
जयाचिया आवडी । न गणिती ब्रह्मचर्याचीं सांकडीं । निष्ठुर होऊनि बापुडीं । इंद्रियें करिती ॥१०६॥
ऐसें जें पद । दुर्लभ आणि अगाध । जयाचिये थडिये वेद । चुबुकळिले ठेले ॥१०७॥
तें ते पुरुष होती । जे यापरी लया जाती । तरी पार्था हेचि स्थिती । एकवेळ सांगों ॥१०८॥
तेथ अर्जुनें म्हणितलें स्वामी । हेंचि म्हणावया होतों पां मी । तंव सहजें कृपा केली तुम्हीं । तरी बोलिजो कां ॥१०९॥
परि बोलावें तें अति सोहोपें । तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें । तुज काय नेणों संक्षेपें । सांगेन ऐक ॥११०॥
तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवे मोडे । हें हृदयाचिया डोहीं बुडे । तैसें कीजे ॥१११॥
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥१२॥
परी हे तरीच घडे । जरी संयमाचीं अखंडें । सर्वद्वारीं कवाडें । कळासती ॥११२॥
तरी सहजें मन कोंडलें । हृदयींचि असेल उगलें । जैसें करचरणीं मोडलें । परिवरु न संडीं ॥११३॥
तैसें चित्त राहिलिया पांडवा । प्राणांचा प्रणवुचि करावा । मग अनुवृत्तिपंथें आणावा । मूर्ध्निवरी ॥११४॥
तेथ आकाशीं मिळे न मिळे । तैसा धरावा धारणाबळें । जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबीं ॥११५॥
तंववरी तो समीरु । निराळीं कीजे स्थिरु । मग लग्नीं जेविं ॐकारु । बिंबींच विलसे ॥११६॥
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥१३॥
तैसें ॐ हें स्मरों सरे । आणि तेथेंचि प्राणु पुरे । मग प्रणवांतीं उरे । पूर्णघन जें ॥११७॥
म्हणौनि प्रणवैकनाम । हें एकाक्षर ब्रह्म । जो माझें स्वरूप परम । स्मरतसांता ॥११८॥
यापरी त्यजी देहातें । तो त्रिशुद्धी पावे मातें । जया पावणया परौतें । आणिक पावणें नाहीं ॥११९॥
तेथ अर्जुना जरी विपायें । तुझ्या जीवीं हन ऐसें जाये । ना हें स्मरण मग होये । कायसयावरी अंतीं ॥१२०॥
इंद्रियां अनुघडु पडलिया । जीविताचें सुख बुडालिया । आंतुबाहेरी उघडलिया । मृत्युचिन्हें ॥१२१॥
ते वेळीं बैसावेंचि कवणें । मग कवण निरोधी करणें । तेथ काह्याचेनि अंतःकरणें । प्रणव स्मरावा ॥१२२॥
तरि गा ऐशिया हो ध्वनी । झणें थारा देशी हो मनीं । पैं नित्य सेविला मी निदानीं । सेवकु होय ॥१२३॥
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥१४॥
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् ।
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धि परमां गताः ॥१५॥
जे विषयांसि तिळांजळी देउनी । प्रवृत्तीवरी निगड वाऊनि । मातें हृदयीं सूनि । भोगिताती ॥१२४॥
परि भोगितया आराणुका । भेटणें नाहीं क्षुधादिकां । तेथ चक्षुरादि रंकां । कवण पाडु ॥१२५॥
ऐसें निरंतर एकवटले । जे अंतःकरणीं मजशीं लिगटले । मीचि होऊनि आटले । उपासिती ॥१२६॥
तयां देहावसान जैं पावे । तैं तिहीं मातें स्मरावें । मग म्यां जरी पावावें । तरी उपास्ति ते कायसी ? ॥१२७॥
पैं रंकु एक आडलेपणें । काकुळती धांव गा धांव म्हणे । तरी तयाचिये ग्लानि धांवणें । काय न घडे मज ? ॥१२८॥
आणि भक्तांही तेचि दशा । तरी भक्तीचा सोसु कायसा । म्हणौनि हा ध्वनी ऐसा । न वाखाणावा ॥१२९॥
तिहीं जे वेळीं मी स्मरावा । ते वेळीं स्मरिला कीं पावावा । तो आभारुही जीवां । साहवेचि ना ॥१३०॥
तें ऋणवैपण देखोनि आंगीं । मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागीं । भक्तांचियां तनुत्यागीं । परिचर्या करीं ॥१३१॥
देहवैकल्याचा वारा । झणें लागेल या सुकुमारा । म्हणौनि आत्मबोधाचिया पांजिरां । सूयें तयातें ॥१३२॥
वरी आपुलिया स्मरणाची उवाइली । हींव ऐसी करीं साउली । ऐसेनि नित्य बुद्धि संचली । मी आणीं तयातें ॥१३३॥
म्हणौनि देहांतींचें सांकडें । माझिया कहींचि न पडे । मी आपुलियातें आपुलीकडे । सुखेंचि आणीं ॥१३४॥
वरचील देहाची गंवसणी फेडुनी । आहाच अहंकाराचे रज झाडुनी । शुद्ध वासना निवडुनी । आपणपां मेळवीं ॥१३५॥
आणि भक्तां तरी देहीं । विशेष एकवंकीचा ठावो नाहीं । म्हणौनि अव्हेरु करितां कांहीं । वियोगु ऐसा न वाटे ॥१३६॥
नातरी देहांतींचि मियां यावें । मग आपणपें यातें न्यावें । हेंही नाहीं स्वभावें । जे आधींचि मज मीनले ॥१३७॥
येरी शरीराचिया सलिलीं । असतेपण हेचि साउली । वांचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रींच आहे ॥१३८॥
ऐसे जे नित्ययुक्त । तयांसि सुलभ मी सतत । म्हणौनि देहांतीं निश्चित । मीचि होती ॥१३९॥
मग क्लेशतरूची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी । जे मृत्युकाकासीं कुरोंडी । सांडिली आहे ॥१४०॥
जें दैन्याचें दुभतें । जें महाभयातें वाढवितें । जें सकळ दुःखाचें पुरतें । भांडवल ॥१४१॥
जें दुर्मतीचें मूळ । जें कुकर्माचें फळ । जें व्यामोहाचें केवळ । स्वरूपचि ॥१४२॥
जें संसाराचें बैसणें । जें विकारांचें उद्यानें । जें सकळ रोगांचें भाणें । वाढिलें आहे ॥१४३॥
जें काळाचा खिचु उशिटा । जें आशेचा आंगवठा । जन्ममरणाचा वोलिंवटा । स्वभावें जें ॥१४४॥
जें भुलीचें भरिव । जें विकल्पाचें वोतिंव । किंबहुना पेंव । विंचुवांचें ॥१४५॥
जें व्याघ्राचें क्षेत्र । जें पण्यांगनेचें मैत्र । जें विषयविज्ञानयंत्र । सुपूजित ॥१४६॥
जें लावेचा कळवळा । निवालिया विषोदकाचा गळाळा । जें विश्वासु आंगवळा । संवचोराचा ॥१४७॥
जें कोढियाचें खेंव । जें काळसर्पाचें मार्दव । गोरियेचें स्वभाव । गायन जें ॥१४८॥
जें वैरियाचा पाहुणेरु । जें दुर्जनाचा आदरु । हें असो जें सागरु । अनर्थांचा ॥१४९॥
जें स्वप्नीं देखिलें स्वप्न । जें मृगजळें सासिन्नलें वन । जें धूम्ररजांचें गगन । ओतलें आहे ॥१५०॥
ऐसें जें हें शरीर । तें ते न पवतीचि पुढती नर । जे होऊनि ठेले अपार । स्वरूप माझें ॥१५१॥
आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥१६॥
एऱ्हवीं ब्रह्मपणाचिये भडसे । न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे । परि निवटलियाचे जैसें । पोट न दुखे ॥१५२॥
नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नींचेनि महापुरें । तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ॥१५३॥
एऱ्हवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थायीयांचे धुरे । ब्रह्मभुवन गा चवरें । लोकाचळाचें ॥१५४॥
जिये गांवींचा पहारु दिवोवरी । एका अमरेंद्राचें आयुष्य न धरी । विळोनि पांतीं उठी एकसरी । चवदाजणांची ॥१५५॥
सहस्त्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदुः ।
रात्रि युगसहस्त्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥१७॥
जैं चौकडिया सहस्र जाये । तैं ठाये ठावो विळुचि होये । आणि तैसेचि सहस्रवरिये पाहे । रात्री जेथ ॥१५६॥
येवढें अहोरात्र जेथिंचें । तेणें न लोटती जे भाग्याचे । देखती ते स्वर्गींचे । चिरंजीव ॥१५७॥
येरां सुरगणांची नवाई । विशेष सांगावी येथ काई । मुद्दल इंद्राचीचि दशा पाहीं । जे दिहाचे चौदा ॥१५८॥
परि ब्रह्मयाचियाहि आठां पाहारांतें । आपुलिया डोळां देखते । जे आहाति गा तयांतें । अहोरात्रविद म्हणिपे ॥१५९॥
अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ॥१८॥
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥१९॥
तये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केहीं न समाये । ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ॥१६०॥
पुढती दिहाची चौपाहारी फिटे । आणि हा आकारसमुद्र आटे । पाठीं तैसाचि मग पाहांटे । भरों लागे ॥१६१॥
शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं । मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ॥१६२॥
तैशी ब्रह्मदिनाचिये आदी । हे भूतसृष्टीची मांदी । मिळे जंव सहस्रावधी । निमित्त पुरे ॥१६३॥
पाठीं रात्रींचा अवसरु होये । आणि विश्व अव्यक्तीं लया जाये । तोही युगसहस्र मोटका पाहे । आणि तैसेंचि रचे ॥१६४॥
हें सांगावया काय उपपत्ती । जे जगाचा प्रळयो आणि संभूती । इये ब्रह्मभुवनींचिया होती । अहोरात्रामाजीं ॥१६५॥
कैसें थोरिवेचें मान पाहें पां । जो सृष्टीबीजाचा साटोपा । परि पुनरावृत्तीचिया मापा । शीग जाहाला ॥१६६॥
एऱ्हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा । तिये गांवींचा गा पसारा । तो हा दिनोदयीं एकसरां । मांडतु असे ॥१६७॥
पाठीं रात्रींचा समो पावे । आणि अपैसाचि सांठवे । म्हणिये जेथिंचें तेथ स्वभावें । साम्यासी ये ॥१६८॥
जैसें वृक्षपण बीजासि आलें । कीं मेघ हें गगन जाहालें । तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ॥१६९॥
परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः ।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥२०॥
तेथ समविषम न दिसे कांहीं । म्हणौनि भूतें हे भाष नाहीं । जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ॥१७०॥
तेविं आकारलोपासरिसें । जगाचें जगपण भ्रंशे । परि जेथें जाहालें तें जैसें । तैसेंचि असे ॥१७१॥
तैं तया नांव सहज अव्यक्त । आणि आकारावेळीं तेंचि व्यक्त । हें एकास्तव एक सूचित । एऱ्हवीं दोनी नाहीं ॥१७२॥
जैसें आटलिया रूपें । आटलेपण ते खोटी म्हणिपे । पुढती तो घनाकारु हारपे । जे वेळीं अलंकार होती ॥१७३॥
हीं दोहीं जैशीं होणीं । एकीं साक्षिभूत सुवर्णीं । तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी । वस्तूच्या ठायीं ॥१७४॥
तें तरी व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशवंत । या दोहीं भावाअतीत । अनादिसिद्ध ॥१७५॥
जें हें विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे । अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ॥१७६॥
पाहें पां तरंग तरी होत जात । परि तेथ उदक तें अखंड असत । तेवीं भूताभावीं न नाशत । अविनाश जें ॥१७७॥
नातरी आटतिये अळंकारीं । नाटतें कनक असे जयापरी । तेवीं मरतिये जीवाकारीं । अमर जें आहे ॥१७८॥
अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥२१॥
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।
यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥२२॥
जयातें अव्यक्त म्हणों ये कोडें । म्हणतां स्तुति हें ऐसें नावडे । जें मनाबुद्धी न सांपडे । म्हणौनियां ॥१७९॥
आणि आकारा आलिया जयाचें । निराकारपण न वचे । आकार लोपें न विसंचे । नित्यता गा ॥१८०॥
म्हणौनि अक्षर जें म्हणिजे । तेवींचि म्हणतां बोधुहि उपजे । जयापरौता पैसु न देखिजे । या नाम परमगती ॥१८१॥
परि आघवा इहीं देहपुरीं । आहे निजेलियाचे परी । जे व्यापारु करवी ना करी । म्हणौनियां ॥१८२॥
एऱ्हवीं जे शारीरचेष्टा । त्यांमाजीं एकही न ठके गा सुभटा । दाहीं इंद्रियांचिया वाटा । वाहतचि आहाती ॥१८३॥
उकलूनि विषयांचा पेटा । होत मनाचा चोहटा । तो सुखदुःखाचा राजवांटा । भीतराहि पावे ॥१८४॥
परि रावो पहुडलिया सुखें । जैसा देशींचा व्यापारु न ठके । प्रजा आपुलालेनि अभिलाखें । करितचि असती ॥१८५॥
तैसें बुद्धीचें हन जाणणें । कां मनाचें घेणें देणें । इंद्रियांचें करणें । स्फुरण वायूचें ॥१८६॥
हे देहक्रिया आघवी । न करवितां होय बरवी । जैसा न चलवितेनि रवी । लोकु चाले ॥१८७॥
अर्जुना तयापरी । सुतला ऐसा आहे शरीरीं । म्हणौनि पुरुषु गा अवधारीं । म्हणिपे जयातें ॥१८८॥
आणि प्रकृति पतिव्रते । पडिला एकपत्नीव्रतें । येणेंहि कारणें जयातें । पुरुषु म्हणों ये ॥१८९॥
पैं वेदाचें बहुवसपण । देखेचिना जयाचें आंगण । हें गगनाचें पांघरूण । होय देखा ॥१९०॥
ऐसें जाणूनि योगीश्वर । जयातें म्हणती परात्पर । जें अनन्यगतीचें घर । गिंवसीत ये ॥१९१॥
जे तनू वाचा चित्तें । नाइकती दुजिये गोष्टीतें । तयां एकनिष्ठेचें पिकतें । सुक्षेत्र जें ॥१९२॥
हें त्रैलोक्यचि पुरुषोत्तमु । ऐसा साच जयाचा मनोधर्मु । तया आस्तिकाचा आश्रमु । पांडवा गा ॥१९३॥
जें निगर्वाचें गौरव । जें निर्गुणाची जाणिव । जें सुखाची राणिव । निराशांसी ॥१९४॥
जें संतोषियां वाढिलें ताट । जें अचिंता अनाथांचें मायपोट । भक्तीसी उजू वाट । जया गांवा ॥१९५॥
हें एकैक सांगोनि वायां । काय फार करूं धनंजया । पैं गेलिया जया ठाया । तो ठावोचि होईजे ॥१९६॥
हिंवाचिया झुळुका । जैसें हिंवचि पडे उष्णोदका । कां समोर जालिया अर्का । तमचि प्रकाशु होय ॥१९७॥
तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा । होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाची ॥१९८॥
तरी अग्नीमाजीं आलें । जैसें इंधनचि अग्नि जहालें । पाठीं न निवडेचि कांहीं केलें । काष्ठपण ॥१९९॥
नातरी साखरेचा माघौता । बुद्धिमंतपणेंही करितां । परि ऊंस नव्हे पंडुसुता । जियापरी ॥२००॥
लोहाचें कनक जाहलें । हें एकें परिसेंचि केलें । आतां आणिक कैचें तें गेलें । लोहत्व आणी ॥२०१॥
म्हणौनि तूप होऊनि माघौतें । जेवीं दूधपणा न येचि निरुतें । तेवीं पावोनियां जयातें । पुनरावृत्ति नाहीं ॥२०२॥
तें माझें परम । साचोकारें निजधाम । हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असे ॥२०३॥
यत्र काले त्वनावृत्तिमावृत्ति चैव योगिनः ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥२३॥
तेवींचि आणिकेंही एके प्रकारें । हें जाणतां आहे सोपारें । तरी देह सांडितेनि अवसरें । जेथ मिळती योगी ॥२०४॥
अथवा अवचटें ऐसें घडे । जे अवसरें देह सांडे । तरि माघौतें येणें घडे । देहासीचि ॥२०५॥
म्हणौनि काळशुद्धी जरी देह ठेविती । तरी ठेवितखेंवी ब्रह्मचि होती । एऱ्हवीं अकाळीं तरी येती । संसारा पुढती ॥२०६॥
तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती । या दोन्ही अवसराआधीन आहाती । तोचि अवसरु तुजप्रती । प्रसंगें सांगों ॥२०७॥
तरि ऐकें गा सुभटा । पातलिया मरणाचा माजिवटा । पांचै आपुलालिया वाटा । निघती अंतीं ॥२०८॥
ऐसा वरिपडिला प्रयाणकाळीं । बुद्धीतें भ्रमु न गिळी । स्मृति नव्हे आंधळी । न मरे मन ॥२०९॥
हा चेतना वर्गु आघवा । मरणीं दिसे टवटवा । परि अनुभविलिया ब्रह्मभावा । गंवसणी होऊनि ॥२१०॥
ऐसा सावध हा समवावो । आणि निर्वाणवेऱ्हीं निर्वाहो । हें तरीच घडे जरी सावावो । अग्नीचा आथी ॥२११॥
पाहां पां वारेनें कां उदकें । जैं दिवियाचें दिवेपण झांके । तैं असतीच काय देखे । दिठी आपुली ? ॥२१२॥
तैसें देहांतींचेनि विषमवातें । देह आंत बाहेरी श्लेष्माआंते । तैं विझोनि जाय उजितें । अग्नीचें तें ॥२१३॥
ते वेळीं प्राणासि प्राणु नाहीं । तेथ बुद्धि असोनि करील काई । म्हणौनि अग्नीविण देहीं । चेतना न थारे ॥२१४॥
अगा देहींचा अग्नि जरी गेला । तरी देह नव्हे चिखलु वोला । वायां आयुष्यवेळु आपला । आंधारें गिंवसी ॥२१५॥
आणि मागील स्मरण आघवें । तें तेणें अवसरें सांभाळावें । मग देह त्यजूनि मिळावें । स्वरूपीं कीं ॥२१६॥
तंव तया श्लेष्माचे चिखलीं । चेतनाचि बुडोनि गेली । तेथ मागिली पुढिली हे ठेली । आठवण सहजें ॥२१७॥
म्हणौनि आधीं अभ्यासु जो केला । तो मरण न येतांचि निमोनि गेला । जैसें ठेवणें न दिसतां मालवला । दीपु हातींचा ॥२१८॥
आतां असो हें सकळ । जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ । तया अग्नीचें प्रयाणीं बळ । संपूर्ण आथी ॥२१९॥
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥२४॥
आंत अग्निज्योतीचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु । आणि सामासांमाजीं मासु । उत्तरायण ॥२२०॥
ऐशिया समयोगाची निरुती । लाहोनि जे देह ठेविती । ते ब्रह्मचि होती । ब्रह्मविद ॥२२१॥
अवधारीं गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा । तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा । यावयां पैं ॥२२२॥
एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें । दिवस जाणें तिसरें । चौथें शुक्लपक्ष ॥२२३॥
आणि सामास उत्तरायण । तें वरचील गा सोपान । येणें सायुज्यसिद्धिसदन । पावती योगी ॥२२४॥
हा उत्तम काळु जाणिजे । यातें अर्चिरा मार्गु म्हणिजे । आतां अकाळु तोही सहजें । सांगेन आईक ॥२२५॥
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ॥२५॥
तरी प्रयाणाचिया अवसरें । वातश्लेष्मां सुभरें । तेणें अंतःकरणीं आंधारें । कोंदलें ठाके ॥२२६॥
सर्वेंद्रियां लांकुड पडे । स्मृति भ्रमामाजीं बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण ॥२२७॥
अग्नीचें अग्निपण जाये । मग तो धूमचि अवघा होये । तेणें चेतना गिंवसिली ठाये । शरीरींची ॥२२८॥
जैसें चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ । मग गडद ना उजाळ । ऐसें झांवळें होय ॥२२९॥
कां मरे ना सावध । ऐसें जीवितासि पडे स्तब्ध । आयुष्य मरणाची मर्याद । वेळु ठाकी ॥२३०॥
ऐसी मनबुद्धिकरणीं । सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी । तेथ जन्में जोडलिये वाहणी । युगचि बुडे ॥२३१॥
हां गा हातींचें जे वेळीं जाये । ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे । म्हणौनि प्रयाणीं तंव होये । येतुली दशा ॥२३२॥
ऐशी देहाआंतु स्थिती । बाहेरि कृष्णपक्षु वरि राती । आणि सामासही वोडवती । दक्षिणायन ॥२३३॥
इये पुनरावृत्तीचीं घराणीं । आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं । तो स्वरूपसिद्धीची काहाणी । कैसेंनि आइके ? ॥२३४॥
ऐसा जयाचा देह पडे । तया योगी म्हणौनि चंद्रवरी जाणें घडे । मग तेथूनि मागुता बहुडे । संसारा ये ॥२३५॥
आम्हीं अकाळु जो पांडवा । म्हणितला तो हा जाणावा । आणि हाचि धूम्रमार्गु गांवा । पुनरावृत्तीचिया ॥२३६॥
येर तो अर्चिरा मार्गु । तो वसता आणि असलगु । साविया स्वस्त चांगु । निवृत्तीवरी ॥२३७॥
शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ॥२६॥
ऐशिया अनादि या दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा । म्हणौनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज ॥२३८॥
कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटिकें वोळखावें । हिताहित जाणावें । हिताचिलागीं ॥२३९॥
पाहें पां नाव देखतां बरवी । कोणी आड घाली काय अथावीं । कां सुपंथ जाणौनियां अडवीं । रिगवत असे ॥२४०॥
जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडूं शके ? । तेविं जो उजू वाट देखे । तो अव्हांटा न वचे ॥२४१॥
म्हणौनि फुडें । पारखावें खरें कुडें । पारखिलें तरी न पडे । अनवसरें कहीं ॥२४२॥
एऱ्हवीं देहांतीं थोर विषम । या मार्गाचें आहे संभ्रम । जन्मे अभ्यासिलियाचें हन काम । जाईल वायां ॥२४३॥
जरी अर्चिरा मार्गु चुकलिया । अवचटें धूम्रपंथें पडलिया । तरी संसारपांथीं जुंतलिया । भंवतचि असावें ॥२४४॥
हे सायास देखोनि मोठे । आतां कैसेनि पां एकवेळ फिटे । म्हणौनि योगमार्गु गोमटे । शोधिले दोन्ही ॥२४५॥
तंव एकें ब्रह्मत्वा जाइजे । आणि एकें पुनरावृत्ती येइजे । परि दैवगत्या जो लाहिजे । देहांतीं जेणें ॥२४६॥
नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥२७॥
ते वेळीं म्हणितलें हें नव्हे । वांया अवचटें काय पावे । देह त्यजूनि वस्तु होआवें । मार्गेंचि कीं ? ॥२४७॥
तरी आतां देह असो अथवा जावो । आम्ही तों केवळ वस्तूचि आहों । कां जे दोरीं सर्पत्व वावो । दोराचिकडुनी ॥२४८॥
मज तरंगपण असे कीं नसे । ऐसें हें उदकासी कहीं प्रतिभासे ? । तें भलतेव्हां जैसें तैसें । उदकचि कीं ॥२४९॥
तरंगाकारें न जन्मेचि । ना तरंगलोपें न निमेचि । तेविं देहीं जे देहेंचि । वस्तु जाहले ॥२५०॥
आतां शरीराचें तयाचिया ठाई । आडनांवही उरलें नाहीं । तरी कोणें काळें काई । निमे तें पाहें पां ॥२५१॥
मग मार्गातें कासया शोधावें ? । कोणें कोठूनि कें जावें ? । जरी देशकालादि आघवें । आपणचि असे ॥२५२॥
आणि हां गा घटु जे वेळीं फुटे । ते वेळीं तेथिंचें आकाश लागे नीट वाटे । वाटा लागे तरी गगना भेटे । एऱ्हवीं चुके ? ॥२५३॥
पाहें पां ऐसें हन आहे । कीं तो आकारुचि जाये । येर गगन तें गगनींचि आहे । घटत्वाहि आधीं ॥२५४॥
ऐसिया बोधाचेनि सुरवाडें । मार्गामार्गाचे सांकडें । तया सोऽहंसिद्धां न पडे । योगियांसी ॥२५५॥
याकारणें पंडुसुता । तुवां होआवें योगयुक्ता । येतुलेनि सर्वकाळीं साम्यता । आपैसया होईल ॥२५६॥
मग भलतेथ भलतेव्हां । देह असो अथवा जावा । परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघडु नाहीं ॥२५७॥
तो कल्पादि जन्मा नागवे । कल्पांतीं मरणें नाप्लवें । माजीं स्वर्गसंसाराचेनि लाघवें । झकवेना ॥२५८॥
येणें बोधें जो योगी होये । तयासीचि या बोधाचें नीटपण आहे । कां जे भोगातें पेलूनि पायें । निजरूपा ये ॥२५९॥
पै गा इंद्रादिकां देवां । जयां सर्वस्वें गाजती राणिवा । तें सांडणें मानूनि पांडवा । डावली जो ॥२६०॥
वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टाम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥२८॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टामोऽध्यायः ॥८॥
जरी वेदाध्ययनाचें जालें । अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें । कीं तपोदानांचे जोडलें । सर्वस्व हन जें ॥२६१॥
तया आघवयाचि पुण्याचा मळा । भारु आंतौनि जया ये फळा । तें परब्रह्मा निर्मळा । सांटि न सरे ॥२६२॥
जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचा कांटाळा न दिसे सानें । पाहा पां वेदयज्ञादि साधनें । जया सुखा ॥२६३॥
जें विटे ना सरे । भोगी तयाचेनि पवाडें पुरे । पुढती महासुखाचें सोयरें । भावंडचि ॥२६४॥
ऐसें दृष्टीचेनि सुखपणें । जयासी अदृष्टाचें बैसणें । जें शतमखाही आंगवणें । नोहेचि एका ॥२६५॥
तयातें योगीश्वर अलौकिकें । दिठीचेनि हाततुकें । अनुमानती कौतुकें । तंव हळुवट आवडे ॥२६६॥
मग तया सुखाची किरीटी । करूनियां गा पाउटी । परब्रह्माचिये पाठीं । आरूढती ॥२६७॥
ऐसे चराचरैक भाग्य । जें ब्रह्मेशां आराधना योग्य । योगियांचें भोग्य । भोगधन जें ॥२६८॥
जो सकळ कळांची कळा । जो परमानंदाचा पुतळा । जो जिवाचा जिव्हाळा । विश्वाचिया ॥२६९॥
जो सर्वज्ञतेचा वोलावा । जो यादवकुळींचा कुळदिवा । तो श्रीकृष्णजी पांडवा । प्रती बोलिला ॥२७०॥
ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतु । संजयो रायासी असे सांगतु । तेचि परियेसा पुढारी मातु । ज्ञानदेव म्हणे ॥२७१॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां अष्टमोध्यायः ॥