भगवंत - डिसेंबर २४

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


सत्पुरुषाजवळ राहून मनुष्य जर आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही. जो आज्ञापालन करील त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय आला म्हणजे तो बुद्धीवर परिणाम करतो. तिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्यावाचून राहणार नाही. प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे.
विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत. ते भगवंतानेच दिले आहेत, म्हणून जीवनात त्यांना योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना, व्यवहारामध्ये विकारांची जरुर आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. विकारांना आपण वापरावे. विकारांनी आपल्याला वापरु नये.
पहिल्याने, प्रपंचातली वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावे. चिकाटीने ते प्रेम वाढवावे, म्हणजे नंतर वस्तूंचे महत्त्व निघून जाते आणि भगवंत तेवढा शिल्लक उरतो. भगवंताला एकदा धरला की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडू नये. त्याचे नाम घेतल्याने हे साधते, म्हणून नाम घेत जा असे मी सतत सांगत असतो. प्रपंचात आपण किती कष्ट करतो ! तितका मोबदलाही मिळत नाही. परमार्थात तसे नाही. परमार्थ जितका करावा तितके समाधान अधिकाधिक असते.
ज्ञानमार्ग असो किंवा भक्तीमार्ग असो, खरा ‘ मी ’ कोण हे ओळखण्यासाठीच सर्व साधने असतात. आज आपल्यापाशी खोट्या ‘ मी ’ चे प्राबल्य आहे. ते नाहीसे करणे जरुर आहे. खोटा ‘ मी ’ गेला की खर्‍या ‘ मी ’ ला कुठून आणायची जरुरी नाही, तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्वतःसिद्ध आहेच. म्हणून खोट्या ‘ मी ’ ला मारण्यासाठी भगवंताचे दास्यत्व पत्करणे फार आवश्यक असते. अनन्यतेशिवाय भगवंताचे प्रेम अनायास उत्पन्न होते. ते नाम तुम्ही निष्ठेने आणि आनंदाने घ्या, हेच माझे सांगणे आहे.

N/A

References : N/A
Last Updated : February 15, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP