भगवंत - डिसेंबर २
ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.
देवाच्या आड काय बरे येत असते? आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही याला वास्तविक आपणच कारण असतो. आपण लोकांना त्याबद्दल दोष देत असतो, पण इतर लोक त्याच्या आड येत नसून आपण स्वतःच आड येत असतो, हे थोडा विचार केला असताना समजून येईल. ज्याला आपले म्हणायला पाहिजे होते त्याला आपले न म्हणता, आपण दुसर्या कुणाला तरी आपले म्हणत असतो. आपला मुलगा, बायको, भाऊ, या सर्वांना आपले म्हणत असतो. हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले असतात. परंतु देवाला जर आपण आपले म्हटले, तर तो सदासर्वकाळ आपलाच असतो, आणि आपल्याला तो मदत करायला तयार असतो. तुम्हा सर्वांना द्रौपदीची गोष्ट माहीत आहे ना? आपले भ्रतार आपले रक्षण करतील असे तिला वाटत होते. परंतु त्या कोणाकडून काही होणे शक्य नाही असे तिला दिसले, तेव्हा तिने अनन्यतेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तेव्हाच श्रीकृष्ण तिच्याकरिता धावून आले. म्हणजे काय, की आपण ज्याला आपले म्हणत असतो ते खरे आपले नसतात. आपण परमात्म्याला आपले म्हणावे, ‘ मी त्याचा आहे ’ अशी सदासर्वकाळ आठवण ठेवावी, आणि जे जे घडते ते ते सर्व त्याच्याच इच्छेने होत असते ही भावना ठेवावी. अशी भावना होण्याकरिता आपण त्याची उपासना करायला पाहिजे. उपासना करणे म्हणजे तरी काय? आपण देवाचे आहोत, आपण नेहमी त्याच्या सान्निध्यात आहोत, असे वाटणे. असे वाटण्याकरिता त्याच्या नामस्मरणात राहणे जरुर आहे. आपण त्याच्या नामस्मरणात राहिलो म्हणजे तो सदासर्वकाळ आपल्याजवळ राहतो. तुम्ही कुणाचे नाव घेतले म्हणजे त्याची मूर्ती जशी तुमच्या ध्यानात येते, त्याप्रमाणे देवाचे नाव घेतले म्हणजे तो तुमच्याजवळ असतो. देव कसा आहे हे विचारले तर कसे सांगता येईल? तो नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनीच सांगितले आहे. नाम हे त्याचे रुप. म्हणून, नामस्मरण केले म्हणजे देवाला तुमच्याजवळ येणेच भाग पडते. हे नामस्मरण कसे करावे? समर्थांनी सांगितले आहे की, ‘ काहीच न करुनि प्राणी । रामनाम जपे वाणी । तेणे संतुष्ट चक्रपाणी । भक्तालागी सांभाळी ॥ ’ आपण नाम घेताना काहीच करीत नाही का? आपण त्या वेळी संसाराची काळजी करीत असतोच ना? म्हणजेच त्या वेळी आपण आपला मीपणा ठेवून नामस्मरण करीत असतो ! मीपणारहित जो नामस्मरण करील त्यालाच देव सांभाळीत असतो; आणि जो स्वस्थ राहील त्याचा योगक्षेम देव चालवीत असतो.
N/A
References : N/A
Last Updated : November 07, 2010
TOP