भगवंत - डिसेंबर १६

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला तर एकएक थेंब स्वच्छ पाणी तेथून खाली पडत असलेले आपल्याला दिसेल. पुर्वपुण्याईमुळे आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो. पुढे त्या स्वच्छ झर्‍याचे नदीत रुपांतर होते, आणि अनेक ठिकाणांहून वाहात आल्याने तिचे पाणीही काहीसे गढूळ बनते. तसेच आपले जीवनही व्यवहारांतल्या बर्‍यावाईट गोष्टींच्या सान्निध्यामुळे पुढे गढूळ बनत जाते. परंतु ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सर्व गाळ तळाशी राहतो, त्याप्रमाणे कोणतेही काम करताना नाम घेतले तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून, वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो. कोणीही दाढीवाला साधू येऊन सांगू लागला की परमार्थ असा आहे, तसा आहे, तर तुम्ही खुशाल छातीवर हात ठेवून सांगा की, नामाशिवाय परमार्थच नाही. कर्म करताना नाम घेऊन समाधानात राहणे हाच खरा परमार्थ.
भगवंताचे प्रेम यायला, त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला, नामासारखे साधन नाही. आपलेपणाचे प्रेम किती असते पहा ! एक मुलगा आईजवळ राहात होता. पुढे त्याचे लग्न झाले. त्याने बायको आपली मानली, तिच्याबद्दल त्याला प्रेम उत्पन्न झाले. पुढे ती जरा कृश झाली. त्याला वाटले, ही शहाणी आहे, बोलत नाही, परंतु हिला आपल्या आईचा जाच असला पाहिजे. म्हणून तो वेगळा निघाला. आपले म्हटल्याने केवढे प्रेम उत्पन्न होते पहा ! तेव्हा, परमेश्वर आपलासा होण्यासाठी नामाच्या योगाने त्याच्यापाशी आपलेपणा निर्माण केला पाहिजे. रामाचे प्रेम हे त्याच्या नामाच्या संगतीनेच येऊ शकेल. नुसते पुस्तक वाचून परमार्थ सांगणारे भेटतील, पण आचरणात आणून सांगणारे विरळाच. किती, किती म्हणून प्रपंच केला तरी अपुराच पडतो. एखादा म्हातारा माणूस आपण पाहिला तर त्याचा संसार खरे पाहू जाता सर्व झालेला असतो. मुलेबाळे असतात, सर्व तर्‍हेने तो सुखी असतो. परंतु मरणसमयी म्हणतो, नातवाची मुंज पाहिली असती तर बरे झाले असते ! माणूस वासनेत कसा गुंतलेला असतो ते यावरुन कळेल. संसार कितीही केला तरी तो पुरा होऊ शकत नाही, तो अपूर्णच राहतो. मनुष्याच्या जीवनाची तळमळ परमेश्वरप्राप्तीशिवाय शमूच शकत नाही. त्याच्या जिवाला समाधान एका परमेश्वरभेटीतच मिळू शकते; आणि याकरिता आयुष्याच्या सुरुवातीपासूनच नामाची कास धरा. हेच नाम मृत्युसमयी तुम्हाला परमेश्वराची भेट करवून देईल याची पूर्ण खात्री बाळगा. अत्यंत गुह्यातले गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय.

N/A

References : N/A
Last Updated : February 15, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP