भूपाळी - भाग ४

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


दत्तात्रेय

८६

उठिं उठिं बा दत्तात्रया । भानु करुं पाहे उदया । करणें दीनांवरती दया । चरण दावीं वेगेंसी ॥ध्रु०॥

मंद वायूही सुटला । पक्षी करिताती किल्बिला । दीपवर्ण शुभ्र जाला । पूर्व दिशा उजळली ॥१॥

करुनि कृष्णेचें सुस्नान । घेउनि पूजेचें सामान । सकळां लागलें तव ध्यान । कपाट केव्हां उघडेल ॥२॥

आले देवादिक दर्शना । त्यांच्या पुरवाव्या कामना । संतोषोनि आपल्या मना । तीर्थप्रसाद अर्पावा ॥३॥

गुरु त्रैमूर्ति साचार । करिसी पतितांचा उद्धार म्हणुनि धरिसी हा अवतार । संकटीं भक्तां रक्षिसी ॥४॥

रामदास लागे पायीं । मागे इच्छा हेंचि देईं । तूंचि माझी बाप मायी । प्रतिपाळावें भक्तांसी ॥५॥

नरदेह

८७

उठा उठा अवघेजण । चला करुं प्रातःस्नान । हा नरदेह पावन । कां रे वांया दवडितां ॥ध्रु०॥

भवतमउलूक पळाले । देहबुद्धिढोलींत दडाले । थारा धरोनि राहिले । कोणा न कळत लपोनी ॥१॥

तंव तें उलूक अंधारीं । जाउनि बैसे आढियावरी । गेल्या निःशेष शार्वरी । मग तें येऊं राहिलें ॥२॥

कुबुद्धि वडवाघुळा । भ्रांति म्हणे पळा पळा । चला जाऊं आपुल्या स्थळा । घालूं पाळा अविवेका ॥३॥

निर्मळता जागी जाली । अमंगळता पळाली । ब्रम्हवृंदें तें मिळालीं । स्वात्मगंगातटाकीं ॥४॥

मुक्तपणाचा आनंद । रुंझी करिताती षटपद । सर्व विकासलीं कुमुदें । हर्षे हेलावे देती ॥५॥

ज्ञानगंगे पूर आला । रामदास पाहों गेला । तों अवघाचि बुडाला । या ब्रम्हांडासहित ॥६॥

देवभक्त

८८

नित्य निरंतर गावे । देवभक्त आठवावे । तेणें भक्तिसुख फावे । देव पावे चिंतितां ॥ध्रु०॥

राम सीता लक्षुमण । भरत आणि शत्रुघन । जांबुवंत बिभीषण । सुग्रीव अंगद मारुती ॥१॥

रामकृष्ण आणि यादव । गरुड उद्धव गोपी सर्व । भीष्म कर्णादि पांडव । कुंती द्रौपदी यशोदा ॥२॥

गंगा गौरी पंचानन । वीरभद्र षडानन । सर्वहि गण गजानन । निजवाहन नंदी तो ॥३॥

अत्रि वशिष्ठ आणि कौशिक । गौतम विश्वामित्रादिक । व्यास जमदग्नि वाल्मीक । ऐसीं अनेक ऋषिकुळें ॥४॥

चंद्र सूर्य आणि बृहस्पति । कमलापति आणि सुरपति । कुबेर वायु प्रजापति । भूजलपति परमात्मा ॥५॥

बारादित्य बारालिंगे । दशावतार भक्तिरंग । नाना लीला नाना योग । अनंत माया वैष्णवी ॥६॥

सिद्ध साधु संत मुनी । ब्रम्हनिष्ठ ब्रम्हज्ञानी । भक्त मुक्त समाधानी । दास वर्णी त्यांलागीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP