७२
प्रातःकाळीं प्रातःस्नान । घडे केलिया स्मरण । महादोषांचे दहन । महिमा गहन पुराणीं ॥ध्रु०॥
गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्या भागीरथी । पूर्णा फल्गू भोगावती । रेवा गोमती वैतरणी ॥१॥
काळी कालिंदी किंकिणी । कपिलायणी इंद्रायणी । नळिणी अर्चिणी धर्मिणी । ताम्रपर्णी नर्मदा ॥२॥
कुंदा वरदा माहेश्वरी । तुंगभद्रा आणि कावेरी । घटपाटपती मलप्रहरी । दुरितें हरी जान्हवी ॥३॥
भीमा वरुणा मंदाकिनी । पूर्णपदा पुन्हपुन्ही । वज्रा वैष्णवी त्रिवेणी । कुमुदिनी नारदी ॥४॥
मनकर्णिका वेदावती । कुकुद्वती हेमावती । सीता प्रयागी मालती । हरिद्वयती गंडिका ॥५॥
शरयू गायत्री समुद्रा । कुरुक्षेत्र सुवर्णभद्रा । दास म्हणे पुण्यक्षेत्रा । नाना नद्या गोविंदीं ॥६॥
श्रीराम .
७३
उठा प्रातःकाळ जाला । अवघे राम पाहूं चला । हा समयो जरी टळला । तरि अंतरला श्रीराम ॥ध्रु०॥
अवघे वानर मिळोनी । राम शोभे सिंहासनीं । सभा घनवटली विमानीं । अवनी अंबर दाटलें ॥१॥
माया जानकी विघडली । होती प्रारब्धें चुकली । तिची देहबुद्धि जाळिली । आपंगिली श्रीरामें ॥२॥
सद्भाव -भरताचिये भेटी । आत्मा रघुराज जगजेठी । उतावीळ होउनि कंठीं । धांवुनि मिठी घातली ॥३॥
जे जे संसारें गांजिले । ते ते राम पाहूं गेले । ते ते आपणांऐसे केले । रामदासदातारें ॥४॥
७४
उठोनीया प्रातःकाळीं । मूर्ति चिंतावी सांवळी । शोभे योगियांचे मेळीं । ह्रदयकमळीं साजिरी ॥ध्रु०॥
राम सर्वांग सुंदर । कांसे मिरवे पीतांबर । चरणीं ब्रीदाचा तोडर । करुणाकर भक्तांचा ॥१॥
राम आनंदाची राशी । राम कैवारी देवांसी । राम भक्तांचे मानसीं । अहर्निशीं शोभत ॥२॥
राम तापसां आधार । राम पुण्याचें माहेर । राम ध्यातो गौरीहर । निरंतर मानसीं ॥३॥
राम विश्रांतीचें स्थळ । राम आनंद केवळ । रामदास सर्वकाळ । कंठी वेळ ऐसाचि ॥४॥
७५
राम सर्वांगें सांवळा । हेमअलंकारें पिंवळा । नाना रत्नांचिया किळा । अलंकारीं फांकतीं ॥ध्रु०॥
पिंवळा मुगुट किरीटी । पिंवळें केशर लल्लाटीं । पिंवळ्या कुंडलांच्या दाटी । पिंवळ्या कंठीं मालिका ॥१॥
पिंवळा कांसे पीतांबर । पिंवळ्या घंटांचा गजर । पिंवळ्या ब्रीदाचा तोडर । पिंवळ्या वांकी वाजती ॥२॥
पिंवळा मंडप विस्तीर्ण । पिंवळें मध्यें सिंहासन । राम सीता लक्षुमण । दास गुण गातसे ॥३॥
७६
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचें भूषण । राम धर्माचें रक्षण । संरक्षण दासाचें ॥ध्रु०॥
रामें ताटिका वधिली । रामें सीता उद्धरिली । रामें जानकी जिंकिली । मुक्त केली गणिका ॥१॥
रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले । रामें बंद सोडविले आनंदले सुरवर ॥२॥
रामें रक्षिलें भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी । राम चिंतितां मानसीं । रामदासीं आनंदु ॥३॥
७७
राम आकाशीं पाताळीं । राम नांदे भूमंडळीं । राम योगियांचे मेळीं । सर्वकाळीं शोभतो ॥ध्रु०॥
राम नित्य निरंतरीं । राम सबाह्य अंतरीं । राम विवेकाचे घरीं । भक्तिवरी सांपडे ॥१॥
राम भावें ठायीं पडे । राम भक्तांसी सांपडे । राम मीपणें नातुडे । मौन घडे श्रुतींसी ॥२॥
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचें भूषण । राम आनंदरक्षण । संरक्षण दासांचें ॥३॥
७८
उठिं उठिं बा रघुनाथा । विनवी कौसल्या माता ॥ प्रभात जालीसे समस्तां । दाखवीं आतां श्रीमुख ॥ध्रु०॥
कनकताटीं आरतीया । घेउनि क्षमा शांति दया । आली जनकाची तनया । ओंवाळाया तुजलागीं ॥१॥
जीव शिव दोघे जण । भरत आणि तो शत्रुघ्न । भाऊ आला लक्ष्मण । मन उन्मन होउनियां ॥२॥
विवेक वसिष्ठ सदगुरु । संत महंत मुनीश्वरु । करिती हरिनामें गजरु । हर्षे निर्भर होऊनियां ॥३॥
सुमंत सात्विक प्रधान । घेउनि नगरवासी जन । आला वायूचा नंदन । श्रीचरण पहावया ॥४॥
माझ्या जिवींच्या जिव्हाळा । दीनबंधू दीनदयाळा । भक्तजनांच्या वत्सला । देईं दयाळा दर्शन ॥५॥
तंव तो राजीवलोचन । राम जगतत्रय जीवन । स्वानंदरुप होऊन । दासा दर्शन दिधलें ॥६॥
७९
उठोनियां प्रातःकाळीं । जपा रामनामावळी । स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळी समवेत ॥ध्रु०॥
नाम भवसिंधुचें तारुं । नामें दोषाचा संहारु । नाम संसार दुस्तरु । पैलपारु पाववी ॥१॥
नामें संकट निवारे । नामें चिंता हे वोसरे । नामें भवदुःख हें हरे । चित्तीं भरे आनंदू ॥२॥
रामनाम तिहीं ताळीं । स्वर्ग मृत्यु आणि पाताळीं । दास म्हणे भूमंडळीं । भाग्यवंत ध्यातील ॥३॥
८०
उठीं जागृतचि निद्रिस्था । जी आत्मया श्रीरघुनाथा । निरसुनि चारी अवस्था । निजभक्तां सांभाळीं ॥ध्रु०॥
अज्ञाननिशी पैं सरली । ज्ञानप्राची पैं उजळली । सहज आकाशीं लोपलीं । मायोपाधि नक्षत्रें ॥१॥
मौन्यें पडलीं निःशब्द काका । बोलणें खुंटलें शब्दउलूका । शब्दनि शब्द निरसुनि देखा । निज सारिका कुंजती ॥२॥
जीव शीव चक्रवाक दोन्ही । विघडलीं होतीं भिन्नपणीं । तीं मीनलीं ऐक्यस्थानीं । स्वात्मगंगातटाकीं ॥३॥
अनुभव नलिनी हरुष थोर । बोधें विकासलीं फुल्लारें । भक्त मीनले मधुकर । निजउद्गार रुंझती ॥४॥
अज्ञानकमळीं आकोचले । प्राणी मोहपाशीं गुंतलें । ऐसें जाणोनि मुक्त केले । आत्मा दिनकरभूषण ॥५॥
ऐसा प्रात काळ जाला । आत्मा -रघुराव चेइला । रामीरामदास मीनला । अवस्थातीत होउनियां ॥६॥