भूपाळी - भाग ३

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


श्रीकृष्ण

८४

उठिं उठिं रे गोपाळा । घेईं ह्रदयीं कांबळा । गाई अक्राही ओढाळ । बहुतां प्रकारें सांभाळीं ॥ध्रु०॥

अवघ्या विश्वाच्या अकरा । परी या धांवती सैरावैरा । तुजविणें आवराया । दुजा न देखों कोणी ॥१॥

तगें तेंचि माहेर पेंची । मागें धूम वरकडाचि ॥ आलीं पिकें बहुतांचीं । तिनें चटें बुडविलीं ॥२॥

गाय अक्रावीं खडाण । ते मज नाटोपे अवढाण । एके ठायीं स्थिरावेना । तेणें मज जाला रे शीण ॥३॥

तिच्या जाणसी वर्मकळा । अचपळ अलगट तूं गोपाळा । अचाट अदभुत तुझिया बळा । देखोनि काळा पळ सुटे ॥४॥

सभानायक मिळोनी । खंड केला संतजनीं । गाय थोर अवघ्यांहुनी । पायापाशीं ठेविली ॥५॥

रामदासाचें लडिवाळ । ऐकोनि धांविजे कां गोपाळ । कौतुक पाहती सकळ । राखोळी द्यावया नाहीं ॥६॥

शंकर

८५

ढवळे भोळे चक्रवर्ती । ढवळे अलंकार शोभती । ढवळें धाम उमापति । सदा चित्तीं चिंतावा ॥१॥

ढवळ्या जटा गंगाजळ । ढवळा मयंक निर्मळ । ढवळे कुंडलांचे लोळ । शंखपाळे लोंबती ॥२॥

ढवळी स्फटिकाची माळ । ढवळे गळां उलथे व्याळ । ढवळें हातीं नरकपाळ । ढवळा शूळ शोभतो ॥३॥

ढवळा सर्वांगें आपण । ढवळें विभूतिलेपन ॥ ढवळें गात्र ढवळें वसन । ढवळा वहन नंदी तो ॥४॥

ढवळें कैलासभुवन । ढवळें मध्यें सिंहासन । ढवळें शंकराचें ध्यान । दास चिंतन करीतसे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP