भूपाळी - भाग २

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


मारुती

८१

उठा प्रातःकाळ जाला । मारुतीला पाहूं चला । ज्याचा प्रताप आगळा । विरंचीहि नेणतो ॥ध्रु०॥

आमुचा हनुमंत साहाकारी । तेथें विघ्न काय करी । दृढ धरा हो अंतरीं । तो पावेल त्वरित ॥१॥

आमुचा निर्वाणींचा गडी । तो पावेल सांकडीं ॥ त्याचे भजनाची आवडी । दृढ बुद्धि धरावी ॥२॥

थोर महिमा जयाची । कीर्ति वर्णावी तयाची । रामीरामदासाची । निकट भक्ति करावी ॥३॥

८२

उठिं उठिं बा मारुती । उठवी अंजनी माय । प्रभात जाली बापा । रामदर्शना जाय ॥ध्रु०॥

उठिं सूर्योदय जाहला । राम सिंहासनी बैसला । तुज वांचुनि खोळांबला । उठिं बा सत्वर मारुती ॥१॥

राम सीता लक्षूमण । भरत आणि शत्रूघन । तुझें इच्छिती आगमन । नळ नीळ अंगद ॥२॥

सुग्रीव वानरांचा राजा । भक्त बिभीषण तुझा । जांबुवन्त वसिष्ठ वोजा । ब्रह्मनिष्ठ नारद ॥३॥

अवघे मिळोनि वानर । नामें करिती भुभुःकार । दास म्हणे निरंतर । सदा स्मरा मारुती ॥४॥

८३

उठिं उठिं बा बलभीमा । सखया सुंदर गुणसीमा । अंतरीं धरुनियां प्रेमा । उठवी अंजनी माता ॥ध्रु०॥

पूर्वदिशेप्रति भानू उदय करुं पाहे । कमलदळीं भ्रमरालागीं सुटका होत आहे ।

निबिड वनाचे ठायीं कोकिळा मंजुळ बोभाये । चरावया चालिले पक्षी मागि उभे आहे ॥१॥

गंगाद्वाराप्रति मुनिजन चालिले स्नाना । ब्रम्हगिरीच्या शिखरीं जाती निज तपाचरणा ।

साधकजन पातले सखया तुझिया दर्शना । तयांप्रति दे भेटी सत्वर वायुनन्दना ॥२॥

सकळही वानरगण जाहले तुझे भोंवती गोळा । चिमणालीं लेंकुरें उठती गोळांगुळमेळा ।

तुझिया योगें शोभा दिसती कपिकुळा । सत्वर जागा होईं माझ्या तान्हया बाळा ॥३॥

ऐकुनियां वचनातें आरोळीया देऊनियां मोठी । उठलासे हनुमान प्रेमें टाळिया पीटी ।

निरंजन सुखध्यान गोदेच्या तटीं । सदगुरुनाथ शोभत आहे पंचवटीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP