जयजयाजी महाराज जयजय सदगुरु गोमाजी
भावभक्तीनें विठ्ठल तुम्हीं ठेवियला राजी ॥धृ॥
देहु , आळंदी , पैठण , चाफळ , तेर वा अरण
त्याच परीचें झालें अम्हां नागझरी स्थान
अवघ्या संता - ठायीं अम्हां तव हे द्वयचरण
फार कशाला बोलावें हो तुम्हीच भगवान ॥१॥
करंजपुरीचे स्वामी जे का दत्त अवतार
त्यांनी जीं का तीर्थे दाविलीं या माळावर
त्रिंबक निलांबिका ब्रह्मगिरी कुशावर्त थोर
गायमुखांतुनी वहातें झालें गौतमिचें नीर ॥२॥
त्या तीर्थाचा तुम्हीच केला उकरुनी उद्धार
तुम्ही खरोखर त्रिकालज्ञानी वानूं कुठवर
निंबाजीच्या प्रेतावरुनी तुम्ही आपुला कर
फिरवुनी केला गुरुराया हो सजीव साचार ॥३॥
कुकाजीला त्या हरिभक्तीचें रहस्य सांगितलें
नांवलौकिका चढवुनी त्यासी वारकरी केले
तुज वानाया भाषेमाजीं शब्द न ते उरले
दासगणूला म्हणा दयाळा आजदिनीं अपुलें ॥४॥