श्रीनागझरी माहात्म्य - अध्याय दुसरा

श्री गोमाजीमहाराजांचे माहात्म्य वर्णन , श्री दासगणू महाराजांनी या पोथीत केले आहे .


श्रीगणेशाय नमः ॥

हे पांडुरंगा रुक्मिणीपती । नरहरी वामना विमलकीर्ती । नंदनंदना रघुपति । पावा दासगणूतें ॥१॥

श्रोते एक्याकालीं भले । ऐसें वर्तमान घडून आलें । तें पाहीजे श्रवण केलें । भाव ठेवून येधवां ॥२॥

नागझरीचा रहाणार । निंबाजी नामें मराठा नर । त्याचीही श्रद्धा फार । होती गोमाजीचे वरी ॥३॥

तो निंबाजी अकस्मात । पावता झाला पंचत्व । भोंवतालीं बसून आप्त । रुदन करु लागले ॥४॥

कांता तडतडा केस तोडी । जीभ झाली कोरडी । वळती झाली बोबडी । बोलतां नये शुद्ध तिला ॥५॥

भिंतीलागी धडक घेई । यांच्यामागें आतां मीही । क्षण एक वाचणार नाहीं । प्राणत्याग करीन ॥६॥

आप्त समजूत घालिती । परी बाई ना ऐके तिळरती । वाड्यांत माणस जमले अती । रस्त्यालाही तैसेच ॥७॥

निंबाजी भला म्हणून । त्यांचे ऐकितां मरण । लोक अवघे जमून । आले माती करावया ॥८॥

परी बाई ऐकेना । प्रेतास उचलूं देईना । उपदेशही मानीना । कोणाचाही लवमात्र ॥९॥

टाकळीसही ही वार्ता । कळती झाली हां हां म्हणतां । दुःख झालें समस्तां । निंबाजीच्या मृत्युमुळे ॥१०॥

निंबाजीच्या प्रेमाचे । लोक जे होते टाकळीचे । तेही आले धावून साचे । नागझरीमाझारी ॥११॥

त्यांत कुकाजी पाटील होते । ते बोलले समस्तांतें । समजवा त्याच्या कांतेतें । वेळ होतो मातीला ॥१२॥

बाई ! माणूस मेल्यावर । कोठून परत येणार ? । याचा कांहीं विचार । करी आपुले मानसीं ॥१३॥

आजपर्यंत जे जे गेले । ते ते नाहीं परत आले । हे शब्द ना मुळींच रुचले । निंबाजीच्या कुटुंबासी ॥१४॥

लोकांनी केली तयारी । वटकें बांधून सत्वरी । आणून ठेविला त्यावरी । मुडदा त्या निंबाजीचा ॥१५॥

तों इतुक्यांत आले तेथ । श्रीगोमाजी सदगुरुनाथ । अरे ! कां जाळितां निंब्याप्रत । ऐंसें म्हणाले लोकांला ॥१६॥

हाय मोकलून कांता रडे । पाहा कोणी तिच्याकडे । शब्द वेडेवांकुडे । निंबाजीविषयीं बोलूं नका ॥१७॥

ऐसे बोलून प्रेताजवळ । आले गोमाजी तात्काळ । दोर्‍या त्या तोडून सकल । मानेस हात घातिला ॥१८॥

ऊठ । बापा , उशीर झाला । माध्यान्हीं सूर्य आला । कांतेनें आकांत मांडिला । तुझ्यासाठीं पहा रे ॥१९॥

तिचें तूं सौभाग्यभांडार । बोहल्यावरी धरिल कर । आणि आतां होऊनी निष्ठुर । जातोस हें बरें नव्हे ॥२०॥

तिशीं झालेला हा शोक । आड येईल तुला देख । म्हणून संगतीचें सुख । काहीं दिवस देई तिला ॥२१॥

ऐसें गोमाजी बोलतां भले । चार्वाक त्यांसी हांसले । कांहींनीं खालीं पाहिलें । गोष्ट अशक्य म्हणून ॥२२॥

परी झालें अघटीत । गोमाजीचा लागतां हात । निंबाजी तो वकट्यावरत । उठूनिया बैसला ॥२३॥

निंबाजी तो उठताक्षणीं । तेथीच्या अवघ्या लोकांनीं । गोमाजीच्या नांवानीं । जयजयकार केला हो ॥२४॥

हें कुकाजीनें पाहिलें । अतिशय त्या नवल वाटलें । गोमाजीचें कळून आलें । कर्तृत्व तें तयाला ॥२५॥

गोमाजी साधू असल्याची । साक्ष कुकाजीस पटली साची । मग कोणाच्या सांगण्याची । गरज न राहिली तयाला ॥२६॥

पुढें निंबाजी दहा बारा । वर्षे होता जिवंत खरा । साधूचा मिळाल्या आसरा । ऐसेंच होतें अभिनव ॥२७॥

तो दिवस तैसाच गेला । दुसरे दिवशीं प्रभातकाला । कुकाजी तो दर्शना आला । पंचलिंगी माळास ॥२८॥

तों गोमाजीची पवित्र मूर्ति । रकट्यावरी बसली होती । नासाग्रदृष्टि शांतवृत्ति । पर्वताचे समान ॥२९॥

मोह लोभ अहंकार । सेवकांपरी होते दूर । दया , सन्नीति , सद्विचार । यांचा प्रत्यक्ष पुतळा तो ॥३०॥

गोमाजीस पाहिलें । कुकाजीचें उचंबळलें । ह्रदय सहज दाटलें । अष्ट सात्त्विक भाव अंगी ॥३१॥

चरणीं मस्तक ठेवून । कुकाजी करुं लागला रुदन । म्हणे मजवरी दयाधन । कृपा आतां करावी ॥३२॥

मी शेगांवीचा वतनदार । परी प्रसंग आला मजवर । पोटासाठीं घरघर । फिरावयाचा ये कालीं ॥३३॥

नांवास मी वतनदार । जमीन अवघी दोन एकर । पोट माझें तेवढ्यावर । भरेना कीं गुरुराया ॥३४॥

शेगांवी भीक मागावया । माझा समर्था न होई हिय्या । वाटे वतनदाराचिया । व्यर्थ आलों पोटा मी ॥३५॥

भीक मागण्या वतनदारी । आड येऊं लागली खरी । म्हणून वस्ती केली साजिरी । सध्या येऊन टाकळींत ॥३६॥

वतनदारीस लागो आग । हिच्यापासून मला अलग । करा सुख होईल मग । सहज तुमच्या कृपेनें ॥३७॥

ऐशी ऐकतां दिन वाणी । बोलूं लागले कैवल्यदानी । वेड्या , वतनदारांनी । धीर कदापि सोडूं नये ॥३८॥

तूं बच्चा वाघाचा । म्हणजे वतनदाराचा । आहेस कीं रे साचा । याचा विसर पडूं न दे ॥३९॥

सतेज हिरा जो कां असे । तोच धनाचे सोशीतसे । घाव वेड्या हें ना कसें । तुज कळलें सांग मज ॥४०॥

तूं जातीनें क्षत्रीय वीर । त्यांतून आहेस वतनदार । तुझ्यावरी आहे भार । बहुतांचिया पोषणाचा ॥४१॥

माझे वचन प्रमाण मानी । जाऊं नकोस गांगरुनी । धनदौलत तुझ्या सदनीं । येईल कुकाजी चालत ॥४२॥

आतां इतुकेंच करावें । टाकळीमध्यें न रहावें । नागझरीस यावे । तुवा माझ्या राजसा ॥४३॥

टाकळींत तुझे सोयरे । जरी असती सांप्रत खरे । तरी राहण्याला नाहीं बरे । त्यांचें सदन जाण पा ॥४४॥

विपत्कालामाझारीं । सोयर्‍यांचे न जावें घरीं । हें शास्त्र वाक्य अंतरीं । जागृत तुवां ठेवावें ॥४५॥

पहा सोयरेधायरे पांडवाला । कमी कां होते जगतीतला । परि धर्मराज बंधूला । घेऊन वनवासास गेला रे ॥४६॥

गोमाजीनें जें सांगितलें । तैसेंच कुकाजीनें केलें । टाकळी गांव सोडिलें । आला नागझरीस रहावया ॥४७॥

नारायण घुले नांवाचा । गृहस्थ एक नागझरीचा । होता शुद्ध वर्तनाचा । बंधू जया सोनाजी ॥४८॥

हे दोन बंधु असूनी । रहात होते एक्याठिकाणीं । हें कुकाजीनें पाहूनी । त्यांचे शेजारी राहिला ॥४९॥

पुढें पुढें ऐसें झालें । कुकाजीस लागलें । वेड गोमाजींचे भलें । विरह न साहे क्षणाचा ॥५०॥

एके दिवशीं दर्शनाला । कुकाजी गेला माळाला । तों महाराज नव्हते तया स्थला । तेणें खट्टु झाला मनीं ॥५१॥

आदरें पुसे लोकांस । कोठें गोमाजी पुण्य पुरुष । सोडोनिया स्थलास । तें सांगा मजप्रती ॥५२॥

तयीं लोक म्हणती तयास । हें न ठावें मुळीं आम्हास । गोमाजीचे परमभक्त । आहेत तिघे गांवामध्ये ॥५३॥

पाहिला कुकाजी भगवान । दुसरा गणपती माधव जाण । तिसर्‍यांचें नामाभिधान । जयसिंग भवानी ऐसें असे ॥५४॥

त्यास जाऊन विचार । ते येथलेच रहाणार । गोमाजीची कृपा फार । आहे त्या तिघांवरी ॥५५॥

ते तुला गोमाजीचा । पत्ता सांगतील साचा । बसून येथें न व्हावयाचा । कार्यभाग तुझा कीं ॥५६॥

ऐसें वचन ऐकिलें । कुकाजी गांवांत आले । आदरें विचारुं लागले । समर्थशुद्धी तिघांला ॥५७॥

मग कुकाजी भगवान बोलला । काय कुकाजी , सांगूं तुला । गोमाजींची अगाधलीला । ती न शब्दें वर्णवे रे ॥५८॥

पहातां पहातां गुप्त होती । श्रीगोमाजी गुरुमूर्ती । कोठून कैसें निघून जाती । हें न कोणा कळे बरें ॥५९॥

गणपती माधव त्यावर । बोलूं लागला साचार । यांत काय याहून फार । अधिकार मोठा गोमाजीचा ॥६०॥

घटकेंत जान्हवीचे तिरी । घटकेंत व्यंकटेशगिरीं । घटकेंत म्हणती माहुरीं । आम्हीं पाहिलें गोमाजीला ॥६१॥

म्हणून साधू गोमाजी । कोठें आहेत आजीं । हें सांगावयातें माझी । मती आहे कुंठित ॥६२॥

नंतर जयसिंग भवानी । बोलतां झाला मधुरवाणी । एकदोन वेळ महिन्यांतूनी । महाराज जाती पूर्णेला ॥६३॥

पयोष्णीचें स्नानाचा । त्यांस आहे शोक साचा । समय वृद्धापकालाचा । जरी झाला सांप्रत ॥६४॥

तरी काठी टेकीत । आक्रमण करिती पंथ । अडचणही सोशितात । गोमाजी महाराज निजांगें ॥६५॥

कुकाजीचे अंतरीं । तळमळ लागली रात्रभरी । तो बाभळबनांत माळावरी । गुहेपाशीं बैसला ॥६६॥

चहूंकडे अंधार । बाभळीचे वृक्ष अपार । अवाज होऊं लागला कीर्र । विबुधहो कीं रात्रीचा ॥६७॥

रात्र होती अंधारी । घुबडें , पिंगळे वृक्षावरी भयप्रद एकसरी । ध्वनी काढूं लागले ॥६८॥

धृत्कारें घुबडें घुमती । पिंगळे किलबिल शब्द करिती । टिटव्या त्या ओरडताती । टी टी करुन ओढ्याला ॥६९॥

मोठमोठाले विखार । फिरुं लागले महीवर । वेडेवाकडे काढुनी सूर । रडती भूतें रानांतुनी ॥७०॥

कुकाजी पहाटपर्यंत । गुहेपाशीं होता स्थित । भय ज्याच्या मनांत । किंचित नाही राहिलें ॥७१॥

अरुणोदयाचे समयाला । गार वारा सुटता झाला । प्राचीप्रांत अवघा फुलला । अरुणाच्या प्रभेनें ॥७२॥

श्रीसविता सूर्यनारायण । उदय पावूं लागला जाण । तैं चक्रवाकांचें गायन । सुरुं झालें आकाशीं ॥७३॥

ऐशा त्या समयाला । जाग आली कुकाजीला । उठुनिया बैसला । आपुल्या शय्येंवरुन ॥७४॥

असो ऐन दोनप्रहरीं । गोमाजी आले माळावरी । ते पाहून अंतरीं । कुकाजी तो संतोषला ॥७५॥

महाराज , काल दिवसभर फिरलों चहूंकडें भिरभिर । दर्शनाशी अंतर । पडलें माझ्या दयाळा ॥७६॥

आपलें दर्शन जे दिवशीं । न होईल महाराज मशीं । गोड न लागे त्या दिवशीं । कांहीं एक जिवाला ॥७७॥

कालच्यापरी आजचा जाता । दिवस माझा पुण्यवंता । तरी मी केला होता । निश्चय प्राणत्यागाचा ॥७८॥

ऐसें तेधवा ऐकून । समर्थे केलें हास्यवदन । बरें झालें अज्ञान । तुझें आज कळलें मला ॥७९॥

पयोष्णीचे स्नानसाठीं । मी गेलों होतों पूर्णाकांठीं । स्नान करुनी उठाउठी । तेथूनिया निघालों ॥८०॥

तों आलों माळावर । रस्ता चाललों एक प्रहर । आतां न चालवे क्षणभर । कुकाजी मजला पदानें ॥८१॥

थोडे चालल्या गुढगे दुखती । बळें चालतां झोक जाती । डोळ्यांपुढें अंधेरी ती । येऊं लागे क्षणाक्षणा ॥८२॥

इतुक्यामध्यें तेथें आले । उभयता बंधु घुले । मुळीं न मागें राहिले । कुकाजी , गणपती , जयसिंग ॥८३॥

अवघ्यांनी नमस्कार केला । समर्थाचिया चरणांला । अवघ्याप्रती आनंद झाला । समर्थांसी पाहून ॥८४॥

चंद्रदर्शनें चकोर । बा घना पाहून नाचती मोर । तैसेंच झालें साचार । तेधवां अवघ्या मंडळींना ॥८५॥

कुकाजी म्हणे गुरुनाथा । आम्हां सोडून पुण्यवंता । कोठेंही न जावें आतां । हीच विनंती पायांतें ॥८६॥

आपण याच माळाविशीं । गोष्ट कथिली अम्हांसी । ती आठवा पुण्यराशी । पुनरपि कीं येधवां ॥८७॥

की या बाभूळबनांत । मोठे क्षेत्र आहे खचित । झाकून गेलेलें सांप्रत । तें उघडें करावें ॥८८॥

तुमच्यामुळें वैदर्भाला । त्याचा लाभ होईल भला । शपथ विठूची आपणांला । आतां कोठें जाऊं नका ॥८९॥

आणि त्या माळावरचें । तीर्थ आहे कोणचें । काय महिमान तयाचें । तें सांगा गुरुवर्या ॥९०॥

भगीरथानें भागीरथीं । गौतमी गोदा निश्चिती । रहीवनाने नर्मदा ती । आणिली या भूमिवर ॥९१॥

त्यायोगें जगाला । सहज गंगेचा लाभ झाला । या तिन्हीही नद्यांला । मुख्य नांव गंगा असे ॥९२॥

भगिरथें आणिली म्हणून । भागीरथीं नांव पावून । करिती झाली पावन । स्नानमात्रें जगाला ॥९३॥

ब्रह्मगिरी पर्वतासी । गंगा आणितां गौतमऋषि । नांव मिळालें तियेसी । गौतमी गोदा गुरुराया ॥९४॥

तैसेंच आपण करावें । तीर्थ उदयास आणावें । आणि आपुलें त्यास द्यावें । नांव कीं तें पुण्यपुरुषा ॥९५॥

त्यायोगें तुमचा भला । अव्याहत जो चालला । त्या स्नानाचे नियमाला । अंतर पडे न मुळींच कीं ॥९६॥

आपुला नियम मोडूं नका । तीर्थ गुप्त ठेवूं नका । ही विनंती आमुची ऐका । आज दिनीं दयाळा ॥९७॥

गोमाजी बदले त्यावर । प्रत्येकानीं एकेक खोरं । घेऊन यातें लौकर । तीर्थ मोकळें करावया ॥९८॥

ऐशी आज्ञा होतांक्षणीं । अवघे निघाले तेथूनी । नागझरीसी येऊनी । वतर्मान श्रुत केलें ॥९९॥

खोरें घेऊन लौकर । चला जाऊं माळावर । श्रीगोमाजी साधूवर । काय करी तें पहावया ॥१००॥

बहुत मंडळी घेऊन खोरीं । आपुल्या त्या स्कंदावरी । येते झाले माळावरी । गोमाजीचे आज्ञेनें ॥१॥

मंडळीला पाहून । उठते झाले दयाधन । एके करीं घेऊन । खोरें आपुल्या विबुधहो ॥२॥

मोहना नदीच्या उत्तरेसी । एका खडकाचे सान्निध्यासी । घेऊन आले पुण्यराशी । अवघ्या लोकांकारणें ॥३॥

आणि म्हणाले खांदा येथ । जमीन आहे भुसभुशीत । श्रम न पडतील तुम्हांप्रत । तीर्थ बुजलेलें म्हणूनी ॥४॥

अवघे लोक खांदावया । लागले एकसरां तया ठायां । गोमाजी पहाती बैसुनिया । वटवृक्षाच्या साउलीसी ॥५॥

दोन प्रहरपर्यंत । खांदीत होते लोक तेथ । सूर्य माध्यान्हाप्रत । येतां गायमुख दिसलें कीं ॥६॥

श्रोते गायमुखाचें । तोंड बुजलें होतें साचें । पहार घालून मुखाचें । शोधन केलें मंडळींनी ॥७॥

परी न आलें तेथ नीर । ही हकीकत जोडून कर । गोमाजीसी सत्वर । शिष्य सांगू लागलें ॥८॥

महाराज गायमुख लागलें । परी कोरडें आहे भलें । पहार घालून पाहिलें । आम्ही आतांच तयासी ॥९॥

कदाचित पूर्वकाला । कुंड असेल या स्थला । सांप्रत त्याचा लोप झाला । आहे ऐसें वाटते ॥११०॥

गोमाजी वदले त्यावर । हें न खरें साचार । चला जाऊं जोडून कर । खालीं जाऊन येधवां ॥११॥

खोदल्या जागी अवघे आले । समर्थांनी हात जोडले । अपार स्तवन मांडिलें । त्या तीर्थराजाचें ॥१२॥

हे जान्हवी गंगे पुण्यसरिते । तूं स्वामी नरसिंहसरस्वतीते भेटली आहेस साच येथें । माघमासीं वद्यपक्षीं ॥१३॥

तैसेंच आतां करावें । आम्हां अवघ्यांस दर्शन द्यावें । अक्षयीचे येथें रहावे । यावच्चंद्रदिवाकर ॥१४॥

ऐसे स्तवन मांडिलें । तो गायमुखांतून पाणी आलें । गोड अमृततुल्य भलें । नयनें पाहिलें सर्वांनी ॥१५॥

स्नानें केलीं समस्तांनी । तो खड्डा गेला भरुनी । विचार करुं लागले मनीं । याचा निकाल करणे कसा ॥१६॥

चहूंकडे निरखून पहातां । आग्नेय कोनासी तत्त्वतां । प्रवाहाची अवचिता । खूण आली दिसून ॥१७॥

ज्या अर्थी उतार । आग्नेयेस आहे साचार । त्या अर्थी येथून नीर । पूर्वी वहात असावें ॥१८॥

तोही मोकळा केला त्यांनी । वाहूं लागलें त्यांतून पाणी । तें मोहनेस जाऊनी । मिळतें झालें अखेर ॥१९॥

ही पाणी निघाल्याची वार्ता । पसरती झाली हां हां म्हणतां । येऊं लागले स्नानाकरितां । विविध लोक त्या ठायां ॥१२०॥

कुंड चंद्रभागा झालें । गोमाजी विठ्ठल बनले । नागझरीसी महत्त्व आलें । तीर्थाचें की सहजची ॥२१॥

जनकल्पना नानापरी । त्या सांगाव्या कोठवरी । कोणी म्हणती आली वरी । पाताळगंगा भोगावती ॥२२॥

कोणी लोक ऐसें म्हणती । स्वामी श्रीनरसिंहसरस्वती । जातां दक्षिण देशाप्रती । माघ मासीं येथ आले ॥२३॥

त्यांनी महापर्व शिवरात्रीसी । येथें आणविले गंगेसी । दंतकथा आहे ऐसी । अनादि कालापासून ॥२४॥

तें तीर्थ बुजून गेलें । तें गोमाजीनें खुलें केलें । पूर्वीचे वृत्त कथिलें । अवघ्या शिष्यमंडळींना ॥२५॥

भूत भविष्य वर्तमान । जाणिताती साधूजन । यांत आश्चर्य तिळभरी न । हा प्रभाव ज्ञानाचा ॥२६॥

आणि म्हणाले त्यावर । ही पूर्णा पयोष्णी साचार । आली आहे येथवर । मला स्नान घालावया ॥२७॥

आतां येथून स्नानास । न जाय पूर्णेस । माय माझी माळास । आली आहे मजसाठीं ॥२८॥

हिला कोणी गंगा म्हणती । कोणी म्हणती भागीरथी । कोणी पयोष्णी आली म्हणती । गोमाजीस्तव माळावर ॥२९॥

लोकांस सांगती साधूवर । हें तीर्थ आहे महाथोर । खचित राजराजेश्वर । सकल तीर्थांचा कलियुगीं ॥१३०॥

अवघ्या तीर्थांचें लागे पुण्य । एकवार येथें केल्या स्नान । आहे पहा ऐसें वचन । स्वामी नरसिंहसरस्वतीचें ॥३१॥

माय देशास्तव आपुल्या । या गोष्टीं त्यांनीं केल्या । कर्तृत्वाच्या लाविल्या । पताका साक्षात ये ठायीं ॥३२॥

हेंच मजला स्वामींनीं । कथिलें स्वप्नीं येउनी । तेंच मी तुम्हांलागुनी । कथन केलें सविस्तर ॥३३॥

उगीच महती वाढण्यास । मी न कथिलें तुम्हास । करा कुंडाच्या विचारास । सांगोपांग ये ठायां ॥३४॥

गायमुख तीर्थावांचुनी । कोठेंच नाही ये अवनीं । मी नवें न दिलें बसवुनी । हें तुम्ही जाणतसा ॥३५॥

गायमुख आहे पूर्वीचें । कुंड तेंही पूर्वीचें । आज दिसलें म्हणून त्याचें । कौतुक तुम्ही करुं नका ॥३६॥

स्वामी नरसिंहसरस्वतींनीं । या अभिनव स्थलास राहूनी । पवित्र केली ही मेदिनी । आपुल्या पादस्पर्शानें ॥३७॥

कांही दिवसपर्यंत । स्वामी राहिले होते तेथ । मायदेश सोडण्याप्रत । वाईट वाटत होते त्यां ॥३८॥

परी जगदोद्धार करावया । स्वामी अवतरले ये ठाया । तेंच कृत्य करावया । जाणें होते भाग त्यांसी ॥३९॥

म्हणून कष्टें करुन । दक्षिण दिशा लक्षून । शिष्य सांगांतीं घेऊन । स्वामी गेले वाशीमा ॥१४०॥

ऐसें पूर्व कालीचें वृत्त । मीं कथिलें तुम्हांप्रत । जें मला स्वप्नांत । नरसिंहसरस्वतीनीं सांगितलें ॥४१॥

तें अवघ्यांनीं मान्य केलें । पंचलिंगी माळा राहिले । साधू गोमाजी ते भले । पतितोद्धार करावया ॥४२॥

श्रोते एका समयाला । अस्तमानाचा समय आला । संधिप्रकाश तोही उरला । अती थोडका श्रोतेहो ॥४३॥

तें पाहून कुकाजी उठला । गांवांत जाऊं लागला । तेल तें आणण्याला । दिवा लावाया कारणें ॥४४॥

तें पाहून समर्थ । बोलूं लागले त्याप्रत । तेल मुळचें आहे येथ । हे कृत्रीम आणूं नको ॥४५॥

मूळ ब्रह्मापासून । पंचभूतें निर्माण । झाली त्यांचें एकीकरण । जें कां झालें तेंच जग ॥४६॥

जा गायमुखापासुनी । घेऊन यावें थोडें पाणी । त्यानेच दिवा लागूनी । ठेवूं आपण ये ठायां ॥४७॥

कुकाजी म्हजे गुरुनाथा । तेलावांचून समर्था । दीप न लागे तत्त्वतां । हें आहे ख्यात जगीं ॥४८॥

गोमाजी म्हणती त्यावर । अरें तूं पाहसी वरवर । शोध तेलाचें अंतर । म्हणजे सारें कळेल कीं ॥४९॥

करडी , कार्‍हळे , तिळास । रगडून जो काढिती रस । तैल नाम तयास । जन आदरें देती कीं ॥१५०॥

त्या द्रवरुप रसाचे ठायीं । प्राधान्य तें तेजास पाही । जलांशानें त्या ठायीं । द्रवत्व तें प्राप्त झालें ॥५१॥

कोणतेंहि असो भूत । तेज आहेच तयांत । तयाचें मी तुला येथ । प्रत्यंतर दावितों ॥५२॥

कुकाजी तें ऐकोनी । गायमुखाचें वाटींत पाणी । आला असे घेऊनी । श्रीगोमाजीचे समोर ॥५३॥

ती ओतून दिवलाण्यांना । समर्थे दीप लाविला । कुकाजी तो थक्क झाला । ही पाहून कृती हो ॥५४॥

ही दासगणू वर्णीत कथा । नाही गप्पेचा खचित गाथा । विश्वास ठेवूनिया वरता । अनुभवाची वाट पहाणें ॥१५५॥

श्रीहरिहरार्पंणमस्तु ॥

॥ श्रीशंकर ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP