श्रीनागझरी माहात्म्य - अध्याय चवथा

श्री गोमाजीमहाराजांचे माहात्म्य वर्णन , श्री दासगणू महाराजांनी या पोथीत केले आहे .


श्रीगणेशाय नमः ॥

हे महामंगला करुणाघना । पतीतपावन नारायणा । दासगणू लागला चरणा । आतां अभय असूं दे ॥१॥

देवा तुझ्या कृपेवीण । अवघीं कृत्यें आहेत शीण । साखरेअंगीं गोडपण । असलेंच पाहिजे ॥२॥

गोडीवीण साखर । मान ना पावे भूमीवर । तुझी कृपा साचार । हेच गोडपण येथीचें ॥३॥

तेवढी कृपा करावी । दासगणूच्या वरी बरवी । वारी आजन्म होत जावी । पंढरीची दयाळा ॥४॥

असो तांडा एक लमाणांचा । नागझरीस आला साचा । भव्य समुदाय ढोरांचा । होता तया तांड्यांत ॥५॥

कुंडाचिया सान्निध्यास । तांडा उतरला माळास । मुक्काम त्यांचा तीन दिवस । होता झाला त्या ठायीं ॥६॥

घोडीं गाढवें रेडे बैल । कांहीं ओझ्याचे उंट सबळ । तळ त्याचा एक मैल । जवळ जवळ पडत असे ॥७॥

श्रोते त्या तांड्यामाझारीं । एक गाय होती म्हातारी । ती राबत होती बैलापरी । वांझ होती म्हणून ॥८॥

जेव्हां त्या गाईला । वृद्धपणा येता झाला । बसली जागा तियेला । उठवेना कीं येतुलीही ॥९॥

मुखीं ना राहिले दंत । कृष झाली अत्यंत । चारा कोणी तिजप्रत । त्या तांड्यांत घालीना ॥१०॥

निकामें ढोर झाल्यावर । कोण तयासी पुसणार । अवघा मतलबाचा बाजार । धिक्कार असो त्या कृत्या ॥११॥

तो उस्मान खाटीक तेथें आला । लमाणासी भेटण्याला । कांही गुरांची करण्याला । खरेदी ती धंद्यास्तव ॥१२॥

खाटीक लमाणाकारण । प्रथमतः सलाम करुन करितां झाला भाषण । तें ऐका येणें रिती ॥१३॥

आजपर्यंत तुम्ही मला । रिकामा ना परतविला । आज दहा पांच तरी द्यावी मला । जनावरें तीं धंद्यास्तव ॥१४॥

उंट , गाढवें , घोडे , म्हशी । हे नकोत आम्हांसी । बैल , गाई , शेळ्यांसी । आहे आमुचा मतलब ॥१५॥

डंगर झालेल्या गुरांचा । तुम्हा उपयोग नाहीं साचा । उगीच त्यांच्या पोषणाचा । भार तुम्ही न घ्यावा शिरीं ॥१६॥

लमाण म्हणे त्याकारण । ऐसें न करावें भाषण । बापा द्याया तुजलागुन । निकामे ढोर उरलें नसे ॥१७॥

एक ही म्हातारी गाय । बसली आहे येथ पाह्म । ती वाटल्या घेऊन जाय । माझी हरकत तिला नसे ॥१८॥

आठ दहा दिसांची सोबती । ही गाय आहे निश्चिती । सोडून जाणें हिजप्रती । आहे मला अवश्य ॥१९॥

खाटीक म्हणे लमाणाप्रती । इची वेतें झालीं किती । हें सांग मला सत्वर गती । तैशीच हिची किंमत ॥२०॥

लमाण म्हणे त्यावर । ही न फळली आजवर । माल वहाण्या खंबीर । होती म्हणून पोसली ॥२१॥

आतां झाली म्हातारी । वाया गेली सर्वतोंपरी । हिला नेऊन तुला तरी । काय उपयोग होणार ? ॥२२॥

या गाईची किंमत । नको मजला यत्किंचित । मी सोडून हिला येथ । आहे पुढे जाणार ॥२३॥

ऐसें बोलून निघाला । लमाण घेऊन गुराला । तों हंबरडा फोडिला । त्या गाईनें तेधवां ॥२४॥

गाय हुंबरे वरच्यावर । तो गोमाजी कुंडावर । आले होते साचार । स्नान करायाकारणें ॥२५॥

लमाणाचें बोलणें । त्यांनीं ऐकिलें सहज कानें । म्हणून करते झाले येणें । त्या गाईपर्यंत ॥२६॥

समर्थांसी पाहून । गाय चाटूं लागली चरण । भरले पाण्यानें लोचन । पाहूं लागली मुखाकडे ॥२७॥

तैं महाराज म्हणाले लमाणाला । या गाईचा कंटाळा । कां रे तूं सांग केला । मजलागीं येधवां ॥२८॥

अरे लमाणा ही गाय । जगत्रयाची आहे माय । तिला खाटकाच्या करीं काय । देतोस तूं आज दिनीं ? ॥२९॥

तूं हिंदू जातीचा । आहेस ना साचा । खाटका गाई विकण्याचा । धंदा तुम्ही करुं नये ॥३०॥

असे पोटच्या पोरापरी । गुरें सांभाळावीं खरीं । मर्जी असल्या दान करी । मजला या गाईचें ॥३१॥

मग लमाण बोलला । इचा उपयोग आपणाला । मुळींच ना होई भला । हिचें मरण जवळ आलें ॥३२॥

वांझोटी होती साचार । ओझें उचलण्या खंबीर । म्हणून तिचें आजवर । रक्षण म्यां केलें असें ॥३३॥

आतां झाली म्हातारी । उपयोगाची ना राहिली खरी । मरतुकडीचें तुम्हां करीं । उदक मी सोडूं कशाला ? ॥३४॥

हिला सोडून येथ । मी जाणार सत्य । माझ्या मागे इजप्रत । घेऊन जावो कोणीही ॥३५॥

ऐसें लमाण बोलतां । महाराज उठले तत्त्वतां । उगीच मजला खोटी कथा । गाई विषयीं सांगू नको ॥३६॥

ही दुधाळ आहे फार । रोज दूध चार शेर । ही धन्याला देणार । आहे यांत शंका नसे ॥३७॥

पहा प्रत्यंतर तयाचें । मी तुला दावितों साचें । एसें म्हणून गाईचें । अंगावरुनी फिरविला हात ॥३८॥

गाय उभी राहिली । वृद्धावस्था निमाली । खालीं पाहातां मोठी केली । कास तिनें विबुधहो ॥३९॥

महाराज म्हणती शिष्याला । आण भांडें दोहण्याला । या गाईच्या कासेला । दूध विपुल असे कीं ॥४०॥

शिष्यांनीं भांडें आणिलें । समर्थांच्या करीं दिधलें । महाराज दोहण्या बैसले । हात घालून कासेस ॥४१॥

समर्थांच्या करस्पर्शे । वांझपणा मावळलासे । दूध तिंनें दिलें खासें । चार शेर विबुधहो ॥४२॥

तें पाहून लमाण । मनीं गेला गहींवरुन । म्हणे हा साधू धन्य धन्य । गाय वांझोटी दोहिली ॥४३॥

त्या गाईचें दूध भलें । अवघे शिष्य पिते झाले । लमाणास थोडें दिलें । तैसेच त्या खाटकाला ॥४४॥

गोमाजी म्हणती लमाणासी । जा या घेऊन ढोरांसी । ही गाय आम्हांपाशीं । मात्र तुझी राहूं दे ॥४५॥

ती आतां आमुची झाली । ही ना तुझी राहिली । दिनदुबळ्यांची कींव भली । येते एक साधूला ॥४६॥

लमाणासी उपदेश केला । तेथून पुढें खटकाला । तूं न विकावें गाईला । मारावया निरर्थक ॥४७॥

गाईस हाटीं विकणारे । अधमाधम आहेत खरे । हें लक्षांत ठेवी पुरे पुरे । हे लमाणा बोल माझे ॥४८॥

या गाईची गोष्ट भली । अवघ्या नागझरीनें पाहिली । गोमाजीची कळून आली । योग्यता ती अवघ्याला ॥४९॥

तिन वर्षेपर्यंत । ही गाय होती तेथ । होऊनिया एक वेत । पुढें मृत्यु पावली ॥५०॥

खाटीक लमाण निघून गेले । अवघ्यांस चोज वाटलें । गाईचें तें मरण चुकलें । याच नागझरीच्या माळास ॥५१॥

महाराज म्हणाले अवघ्यास । जो धनिक या माळास । साह्म करील गरीबास । अन्नोदकाते देऊनिया ॥५२॥

त्याच्या मनीषा पूर्ण होती । भोगीत संतति संपत्ती । ऐशी पूर्वीपासून आहे ख्याती । या कुंडातील जलाची ॥५३॥

पहा ही गाय तीन दिवस । प्याली कुंडाच्या जलास । म्हणून झाला असे नाश । तिच्या कीं वृद्धत्वाचा ॥५४॥

वांझपणा तोही गेला । हा जलाचा महिमा भला । म्हणून या तीर्थाला । माना श्रेष्ठ बापहो ॥५५॥

असो श्रोते आषाढमासीं । इच्छा उपजली कुकाजीसी । जावयाते पंढरीसी । मुलामाणसास घेऊनिया ॥५६॥

कुकाजी नागझरीस आला । गोमाजीचे चरणाला । घट्ट धरुन बैसला । कांही काळपर्यंत ॥५७॥

प्रेमाश्रु ते नयनांत । अष्टभाव दाटले सत्य । तनू झाली रोमांचित । एकहि शब्द वदवेना ॥५८॥

ऐशी पाहून त्याची स्थिती । बोलते झाले गुरुमूर्ती । आस कशची आहे चित्तीं । ती करावी निवेदन ॥५९॥

इच्छा तुझी करीन पूर्ण । सत्य हे मानी माझें वचन । निज गुरुपाशी चोरुन । कांहीं एक ठेवूं नये ॥६०॥

मग कुकाजी बोलला चला महाराज पंढरीला । भेटवा मजसी विठ्ठला । हीच आहे आस माझी ॥६१॥

गोमाजी म्हणती त्याप्रत । सदा मी पंढरींत । राहतों , न सोडी क्षणमात्र । या पंढरीस वत्सा रे ॥६२॥

त्रिभुवन हेच पंढरी । ज्ञान चंद्रभागेतिरीं । भाव पुंडलीक अंतरीं । आहे जागृत सर्वदा ॥६३॥

निश्चयाच्या विटेस । उभा माझा श्रीनिवास । तयाचा मी आहे दास । अक्षय माझ्याजवळ तो ॥६४॥

कुकाजी बोलला त्यावरी । ही आपुली सत्य वैखरी । परी मजला धरुन करीं । घाला हरीचे पायावर ॥६५॥

पायावरी घालण्याला । आपण चलावें पंढरीला । ऐवढ्या माझ्या हट्टाला । पुरविलेच पाहिजे ॥६६॥

तें गोमाजीनें मानिलें । गुरुशिष्य दोघे आले । पंढरीक्षेत्रा भले । चंद्रभागातटाते ॥६७॥

पुढें दुपारच्या अवसरीं । दोघे राउळाभितरीं । येते झाले अत्यादरीं । विठ्ठलाते भेटावया ॥६८॥

गर्दी नव्हती राउळांत । तेधवां कीं यत्किंचित । बडवे पुजारी चोखांबीत । घुरघुर घोरत होते की ॥६९॥

कुकाजीच्या करा धरिले । गोमाजी राउळांत आले । डोळे भरुन पाहिलें । विटसी विश्वोद्धाराला ॥७०॥

गोमाजी म्हणे विठु माउली । ही आसामी आहे आपुली । होती शेगांवीं दडून बसली । ती मी आलो घेऊनी ॥७१॥

सर्वस्वीं तो आधार याला । असावा येथून आपुला । ही माझी विनंती विठ्ठला । अमान्य आतां करुं नको ॥७२॥

ऐंसें बोलून पायावर । कुकाजी घातला धरुन कर । उभायतांचें अंतर । भरुन गेलें प्रेमानीं ॥७३॥

गोमाजी म्हणती कुकाजीसी । हा पूर्णब्रह्म ऋषीकेशी । पुंडलिकानें विटेसी । येथें आणून उभा केला ॥७४॥

हा सर्व शास्त्रांचा । प्रतिपाद्य विषय आहे साचा । हा वाली अनाथांचा । दीन जनांचा संरक्षक ॥७५॥

हाच रामराजानें । नेला अनागोंदीकारणें । तेथून भानुदासानें । परत यास आणविलें कीं ॥७६॥

निवृत्ती ज्ञानेश सोपान । मुक्ता एकनाथ जनार्दन । यानेंच केले पावन । श्रीचांगदेवाला ॥७७॥

हाच गेला बेदरीं । दामाजीस्तव श्रीहरी । यानेंच भरले गोदातिरीं । नीर नाथगृहांत ॥७८॥

सावत्याची अरणीं मका । यानेच राखिली देखा । भक्तास यासारखा । नाहीं वशिला कोठेच ॥७९॥

दासी जनीचें अवधें दळण । दळितां झाला नारायण । संत सखूकारण । लुगडें हाच नेसला रे ॥८०॥

कान्होपात्रा कलांवतीण । यानेंच नेली उद्धरुन । हाच सेना होऊन । श्मश्रु करी शहाचा ॥८१॥

बेदरीं काळा नाग झाला । चांगदेवासाठीं भला । जेणें तंटा मिटून गेला । हिंदू -मुसलमानांचा ॥८२॥

भक्त बोधल्याच्यासाठीं । गहूं भोपळ्याचे पोटीं । हाच पहा जगजेठी । निर्माण करतां झाला रे ॥८३॥

चोख्याचीं ओढिलीं ढोरं । संभाजीचीं राखिलीं गुरं । हाच भेटला माळावर । लहुळीं कुर्मदासाला ॥८४॥

रामदासासाठीं भलें । रामरुप यानेंच धरिलें । यालाच नेसणें आलें । सखुसाठीं लुगडें पहा ॥८५॥

एक वर्षानंतर । गोरोबाचें मृत पोर । यानेंच उभें समोर । केलें कीं रे जननीच्या ॥८६॥

विठ्ठलबुवा कारण । भिंगारीं केलें बाळंतपण । उद्धरिली रंगू तेलीण । शिष्यीण शेखमहंमदाची ॥८७॥

सुरजी अंजनगांवी भला । देवनाथा हाच भेटला । हाच सखारामाला । भेटला अमळनेरांत ॥८८॥

गोविंद उत्राण -करावरी । यानेंच कृपा केली खरी । ताहराबादेमाझारीं । हाच पावला महीपतीला ॥८९॥

अवघ्या साधूंतला कोहीनूर । श्रीतुकाराम देहूकर । त्यांचा चालतां किर्तन -गजर । हाच प्रगट होत होता ॥९०॥

भक्त नामदेवाला । यानेंच कीं रे पाठविला । औंढ्या नागनाथाला । विसाबास करण्या गुरु ॥९१॥

ऐशा अनेक संतावरी । यानेंच कृपा केला खरी । म्हणून ते भूमिवरी । वंद्य झाले अवघ्यांला ॥९२॥

याच्या कृपेचा करजपंजर । पडला ज्याच्या शिरावर । त्याचा काळास वाटे दर । मग इतरांची काय कथा ॥९३॥

कुकाजी हें ध्यानांत ठेवी । पंढरीची वारी चालवावी । आपुल्या वंशानुवंश बरवी । तुझें होईल कल्याण जा ॥९४॥

मीही आतां लौकरी । सोडणार आहे नागझरी । तुझीच वाट आजवरी । पहात मी होतो रे ॥९५॥

ऐसें बोलून विठ्ठलाला । दोघांनीं नमस्कार केला । तों एक चमत्कार झाला । तो करितों सादर ॥९६॥

श्रीहरीची कंठमाला । गोमाजीचे आली गळां । पांडुरंगानीं भाळा । लाविला बुक्का निजकरें ॥९७॥

वारी करुन परत आले । निज देशाकारणें भले । बहूत भजनीं लागले । लोक गोमाजीबुवाच्या ॥९८॥

प्रत्यही उषःकालाला । गोमाजी स्नान कुंडाला । करुनिया भास्कराला । शतमान घाली नमस्कार ॥९९॥

आहार गाईचें दुधाचा । होता संत गोमाजीचा । अति आग्रह कोणाचा । पडल्या अन्न खातसे ॥१००॥

गोमाजीनें ज्याचें अन्न । खावें तो धनकनकसंपन्न । हे जनांनीं पाहून । लोक आग्रह लागले करुं ॥१०१॥

पुढें त्यांनीं सोडीलें अन्न । उपाधी चुकवाया कारण । बैसती गुहेंत जाऊन । पद्मासन घालुनिया ॥२॥

पुन्हां कुंडांत स्नानासी । यावे अस्तमानासी । एक प्रहर होतां निशी । शिष्यासी बोलत बसावें ॥३॥

पुनरपी जाऊन गुहेंत । व्हावें त्यांनी निद्रिस्त । ऐसा अखेरपर्यंत । क्रम त्यांचा चालला ॥४॥

भक्तजनांची सोमवारी । गर्दी होय माळावरी । तो माळ ना काशीपुरी । प्रत्यक्ष वाटूं लागला हो ॥५॥

गोमाजी म्हणती शिष्यांप्रत । तुम्हीं ऐका रे समस्त । त्या कुंडाचें महत्व । श्रवण द्वारें श्रवण करा ॥६॥

या नागझरी कुंडावर । जो गुरुचरित्र वाचील नर । त्याचीं संकटें होतील दूर । सत्य सत्य त्रिवाचा ॥७॥

कुंडांत स्नान करुन । जो जो जें जें अनुष्ठान । करील तें तें त्यालागून । फलद प्रत्यक्ष होईल कीं ॥८॥

भूतबाधा पिशाच्चबाधा । येथे न राहे बुधहो कदां । जो की करील स्नान सदा । या कुंडाचें शुद्ध भावें ॥९॥

कुंडावरी बैसोन । विष्णुसहस्त्रनामाचें पठण । जो करील भावें करुन । जळतील त्याचीं सर्व पापें ॥११०॥

एवंच अनुष्ठान येथींचे । केव्हां न वायां जावयाचें । हें जें बोललों या वाचें । तें अवघें सत्य असे ॥११॥

आतां येत्या माघमासीं । वद्य पक्षीं चतुर्थीसी होणार मी वैकुंठवासी । नागझरी गांवांत ॥१२॥

देह हा वस्त्रापरी । वस्तु आहे बदलणारी । त्याचा शोक अंतरीं । शहाणा तो करीत नसे ॥१३॥

आत्मवस्तु अविनाश । तिचा न होय कदा नाश । जेव्हां जेव्हां तुम्हांस । माझी आठवण होईल ॥१४॥

तेव्हां तेव्हां तुम्हांसी । भेटेन मी निश्चयेसी । गोमाजीच्या पहा वेशीं । यांत अंतर पडेल ना ॥१५॥

गोमाजीच्या जवळी पोर । जें कां होतें वेडथर । ज्यास डसला विखार । काननामाजीं श्रोते हो ॥१६॥

तो गोमाजीनें सजीव केला । सेवेंत आपुल्या ठेविला । उदेगीर नांव त्याला । देते झाले महाराज ॥१७॥

उदेगीर निष्ठावंत । सेवा अखेरपर्यंत । यानेंच केली बुधहो सत्य । ज्या सेवेस जोड नसे ॥१८॥

माघ वद्य तृतीयेसी । महाराज बदले उदेगीरासी । जाऊनिया शेगांवासी । कुकाजीस आणावें ॥१९॥

तैसेंच लोक नागझरीचे । घेऊन यावे शीघ्र साचे । उदयीक प्रयाण आमुचें । आहे वैकुंठ लोकाला ॥१२०॥

एक प्रहर रात्रीला । गोमाजीचे सान्निध्याला । आली मंडळी माळाला । प्रेमांतील समर्थांच्या ॥२१॥

गोमाजी म्हणती अवघ्यांप्रत । तुमची आमुची संगत । होती आजपर्यंत । ती तुटणार आहे उद्यां ॥२२॥

आतां येथून पुढारी । काळ आहे कठीण भारी । दुनिया होईल जर्जर सारी । संकटसमय आल्यानें ॥२३॥

होतील नकली साधुसंत । सन्नितीचा होईल अंत । वांकडे प्रत्येक जातींत । येणार आहे यापुढे ॥२४॥

जितक्या जाती आज दिसती । तितके समाज पुढें होती । नाश अवघ्यांचा करण्याप्रती । हें कधींही विसरुं नका ॥२५॥

हिंदू संस्कृती नासेल । दुष्काळ पडूं लागतील । मतलबी राजे निघतील । दैन्य करण्या रयतेचें ॥२६॥

जातीजातीचे पुढारी । मतलबी निघतील भूमीवरी । जाचक कृत्य कांहींतरी । करुनिया जाणारे ॥२७॥

सर्वमान्य हिंदु तत्त्वाची । फाडाफाड ते करतील साची । त्यांतच आपुल्या शहाणपणाची । प्रौढी पुढारी मिरवतील ॥२८॥

पुढारी नवीन ढंगाचा । मोह ज्या नुपजेल साचा । तोच भक्त हरीचा । आहे हें विसरुं नका ॥२९॥

नवीन खुळा सेवूं नये । जुनें चांगलें टाकूं नये । निज संस्कृतीचा सोडूं नये । अभिमान तो कदाकाळीं ॥१३०॥

मंदिरे पवित्र राखावीं । तीं ना भ्रष्ट होऊं द्यावीं । वात्रटाचीं नायकावीं । त्याविषयींचीं व्याख्यानें ॥३१॥

कसबनेच्या थाटाप्रत । जी न माने तीच गरत । धर्मनिंदा नसेल ज्यांत । तेंच व्याख्यान साधूचें ॥३२॥

जातींत विपट आणणारा । पुढारी न माना खरा । तो सर्वांचा मातेरा । करणारा प्रत्यक्ष मांग असे ॥३३॥

चहुवर्णांची एकी । प्रयत्नें राखावी प्रत्येकी । तरीच होईल त्रिलोकीं । वाहवा तुमची मुलांनो ॥३४॥

मी जरी नाहीसा झालों । तरी न कोठें लांब गेला । तुमच्यासाठीं आहे बसलों । पहा मुलांनो येच ठायां ॥३५॥

संकटसमयी माझें स्मरण । करा मी तुम्हांस पावेन । हे बोल माझें अप्रमाण । होतील ना कधींही ॥३६॥

जा आतां रात्रभर । भजन करारे सुस्वर । श्रीहरीचा नामगजर । करा सन्निध माझिया ॥३७॥

रात्रभर भजन झालें । महाराजांचे सन्निध भलें । गोमाजीनें प्रयाण केलें । सूर्योदय झाल्यावरी ॥३८॥

तो चतुर्थीचा होता दिन । लोक आले लांबलांबून । अखेरचें घ्यावया दर्शन । श्रीगोमाजी साधूचें ॥३९॥

सर्वत्रांनी मिळून । साधु गोमाजीकारण । समाधि ती देऊन । उत्सव थोर आरंभिला ॥१४०॥

श्रोते अजूनपर्यंत । गोमाजी आपुल्या भक्तांप्रत । संरक्षिती संकटाप्रत । ऐशी साक्ष बहुतांची ॥४१॥

झाडलोट समाधीची । उदेगीर करी साची । अप्रतिम निष्ठा त्याची । समर्थपायीं असे हो ॥४२॥

या उदेगीराचा । इतिहास येणें रीती साचा । हा शिष्य सदानंदाचा । सुखानंदाचा अनुज असे ॥४३॥

हे शिष्य दोन्ही । अधिकारी असून पूर्ण ज्ञानी । श्रीगोमाजीचे चरणीं । निष्ठा यांची अनुपम ॥४४॥

सदानंदगीर गेल्यावर । हे दोघे राहिले तत्पर । करावयासी साचार । सेवा श्रीगोमाजीची ॥४५॥

दोघेही पुरे ब्रह्मचारी । प्रकृती ती निकोप भारी । जेवीं सज्जनगडावरी । कल्याण उद्धव रामदास ॥४६॥

एके दिवशीं ऐसें झालें । ते पाहिजे श्रवण केलें । एक अधिकारी सहज आले । निजामाचे त्या ठायां ॥४७॥

गोमाजींची ऐकूण कीर्ती । येते झाले सहजगती । समाधीच्या दर्शनाप्रती । श्रीगोमाजी साधूच्या ॥४८॥

समाधि ती पाहिली । धन्यता त्या वाटली । मनोभावें पूजा केली । अष्टभाव दाटले ॥४९॥

स्वच्छ होता गाभारा । तथें केर नव्हता खरा । घाणीचा तो पसारा । देऊळाच्या बाहेर असे ॥१५०॥

तों सुखदेवगीर -उदेगीर । येते झाले सत्वर । साधुच्या माळावर । ते अधिकार्‍यांनीं पाहिलें ॥५१॥

आणि दटावुनी बोलला । तुम्ही कोण सांगा या स्थला । ते दोघे वदले तयाला । येणें रीती विबुधहो ॥५२॥

आम्ही गोमाजीपायाचे । सेवक आहोंत साचे । गलों होतों भाकरीचे । साठीं आम्ही गांवांत ॥५३॥

आम्हा दोघांचें उदर । भरतें आहे भिक्षेवर । आम्हां दोघाला आधार । हा एक साधु गोमाजी ॥५४॥

तें ऐकतां क्षणीं । अधिकारी बोलला रागानी । तुम्ही त्यांचे भक्त असूनी । येंथें ऐशी घाण कां ? ॥५५॥

नांव त्यांचे भिक्षेपुरतें । तुम्ही घेतां गांवात साचें । आणि आसपास समाधीचे । घाण ठेवितां काय हें ? ॥५६॥

ऐसें अधिकारी बोलतां । विषाद वाटला सुकदेवचित्ता । उदेगिरास म्हणे आतां । देई याचें उत्तर ॥५७॥

अदेगीर म्हणे त्यासी । आम्ही समाधीचे सेवेसी । करण्यास्तव या माळासी । राहिलों आहों महाराजा ॥५८॥

हा लहानसा गाभारा । कुकाजीनें बांधला खरा । जो पाटील साजिरा । आहे शेगांव ग्रामीचा ॥५९॥

आम्ही गांवांत भिक्षा मागतो । समाधीस नैवेद्य दावितो । आणि येथेंच अक्षय राहतो । भजन करीत गुरुंचे ॥१६०॥

महाराज या माळावरी । वार्‍याचा तो जोर भारी । वाळला पाला वरच्यावरी । येऊन पडे बहुसाल ॥६१॥

तो जरी वरच्यावर । झाडीत राहिल्या साचार । घाण येथें न दिसणार । येतुलीही पाहणारा ॥६२॥

येथें झाडीत बसावें । तरी भिक्षेस केव्हां जावें । जेव्हां फिरावीं एक दोन गांवे । तेव्हां पुरेशी येत भिक्षा ॥६३॥

म्हणून ही सभोंवार । घाण सांचते वरच्यावर । शिवाय गुराख्यांचीं पोरं । येथें येती हमेशा ॥६४॥

मी नसतां तींही येथ । घाण करिती थोडीबहूत । हें स्थान आहे सत्य । गुरांढोरां विश्रांतीचें ॥६५॥

ऐसें ऐकून त्याचें वचन । अधिकारी बोलला त्याकारण । जा ये सत्वर घेऊन । येथल्या पाटील कुलकर्ण्याला ॥६६॥

तो येईपर्यंत । मी येथें बसेन सत्य । लावीन मी थोडीबहूत । झाडलोटीची व्यवस्था ॥६७॥

नागझरीचे पाटील पांडे । आले अधिकार्‍याचे कडे । मुजरा करुन रोकडे । बैसते झाले सन्निध ॥६८॥

अधिकारी म्हणे तयास । या समाधीचे आसपास । घाण आहे विशेष । हें मी नयनीं पाहिलें ॥६९॥

सत्पुरुषाची समाधि बरवी । स्वच्छ सर्वदा ठेवावी । तेथें न कदा असूं द्यावी । घाण येतुलीही विबुधहो ॥१७०॥

म्हणून झाडलोटीकारण । या उदेगिरालागून । इनाम देतों जमीन । थोडीबहूत आज मी ॥७१॥

नागझरीच्या शिवारीं । नव्वद नंबराभीतरीं । जमीन इनाम दिली खरी । दहा एकर आठ गुंठे ॥७२॥

तात्काळ सही शिक्का केला । सनद उदेगीराला । देऊनियां जातां झाला । अधिकारी तो तेथून ॥७३॥

पहा स्वराज्यावांचून । धर्मकृत्या न मिळें मान । बादशहा जरी यवन । तरी कृपा सारखी ॥७४॥

हिंदुचिया साधुस्थला । बादशहानें इनाम दिला । आतांच्या राजवटीला । खैरात मात्र पदव्यांची ॥७५॥

याच इनामामाजीं भली । कुकाजीनें भर टाकिली । उत्तम प्रकारें सोय झाली । सेवा करण्याची सेवका ॥७६॥

ही दासगणू वर्णित कथा । नाहीं गप्पेचा खचित गाथा । विश्वास ठेवुनिया वरता । अनुभवाची वाट पाहाणें ॥१७७॥

॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP