श्रीनागझरी माहात्म्य - अध्याय पहिला

श्री गोमाजीमहाराजांचे माहात्म्य वर्णन , श्री दासगणू महाराजांनी या पोथीत केले आहे .


श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी गजानना । जयजय हैमवतीच्या नंदना । जयजय कृपार्णवा सनातना । भवहारका पावा मशी ॥१॥

धरिता चरण । होतें विघ्नाचें निमूर्लन । ऐसें तुझें महिमान । पुराणांनीं कथन केलें ॥२॥

त्याची प्रचीती यावी मला । हेंच आहे मागणें तुला । तेवढें देई जगत्पाला । नाहीं ऐसें म्हणू नको ॥३॥

हे कंजकन्ये सरस्वती । तूं कविजनांची वरदमूर्ती । करुन वास माझ्या चित्तीं । वर्णन रसाळ करवावें ॥४॥

जगदवंद्या जगदाधारा । भवभवांतक भवानीवरा । ॐकाररुपा उदारा सर्वशक्ती पशुपते ॥५॥

तूं अवघा कल्याणरुप । भक्तांचे हरिसी त्रिताप दासगणूला मायबाप । तूंच एक निःसंशय ॥६॥

म्हणून माझी उपेक्षा । देवा कधीं करुं नका । दगा मुळींच देऊं नका । दासगणूकारणें ॥७॥

जी जी उपजेल चिंता । ती ती निवारी उमानाथा । नागभूषणा प्रतापवंता । ठेवा मस्तकीं वरदकर ॥८॥

हे भीमातटविहेरी श्रीहरी । रावणांतका पूतनारी । कृपाप्रसाद मजवरी । देवा आपुला होऊं द्या ॥९॥

तूं भक्तवत्सल नारायण । साधुसंतांचा केवळ प्राण । तुझ्या कृपेचें महिमान । आगळें आहे सर्वांहुनी ॥१०॥

तुझ्या कृपेनें वानर । आक्रमीते झाले सागर । अंगदानीं जलावर । शिला तरविल्या तुझ्याबळें ॥११॥

ऐसें तुझें ब्रीद गाजतें । तार मजला रुक्मिणीपते । मी लागलों पायातें । आतां अभय असूं दे ॥१२॥

आतां कुलाची कुलदेवता । कोल्हापूरवासिनी जगन्माता । चरणीं तिच्या टेवून माथा । अत्यादरें वंदीत मी ॥१३॥

आतां वंदन दत्तात्रयाते । श्रीपाद श्रीवल्लभाते । नरसिंह सरस्वती विमलकीर्ते । मशी साह्य कराहो ॥१४॥

आतां वंदन रामदासा । ज्ञानेश्वरादि पुण्यापुरुषा । हे तुकारामा क्लेशपाशा । तोडा दासगणूचे ॥१५॥

हे पुण्यश्लोक बाबासाई । तुझ्या मी लागलों पायीं । हे वामनशास्त्री माझे आई । करा उद्धार गणूचा ॥१६॥

आता श्रोते सावधान । कथा ही ऐका पुरातन । जिच्या श्रवणें दोष दहन । होतील जन्मांतरीचे ॥१७॥

करावया जगदोद्धार । अवतरले दत्त दिगंबर । त्याचाच पुढें अवतार । श्रीपाद श्रीवल्लभ पहा ॥१८॥

श्रोते त्यांच्या मागुनी । अवतरते झाले ज्ञानखनी । वैदर्भी करंजपुरालागुनी । स्वामी नरसिंह सरस्वती ॥१९॥

काशीप्रती येऊन । कृष्णसरस्वतीपासून । सन्यास तो केला ग्रहण । जगदोद्धार करावया ॥२०॥

प्रयाग गया वाराणशी । बद्रिकेदार बद्रिकाश्रमासी । तैसे गंगोत्री जमनोत्रीसी । स्वामी जाते जाहले ॥२१॥

अयोध्या मथुरा वृंदावन । द्वारकेमाजीं रुक्मिणीरमण । वंदूनीया केलें गमन । प्रभासक्षेत्राकारणें ॥२२॥

क्षेत्रें तीं पूर्वेकडील । स्वामी करिते झाले सकल । ॐकारेश्वर महंकाल । उज्जनीसी वंदिला ॥२३॥

तेथूनिया शिष्यांसहीत । स्वामी करंजपुराप्रत । येते झाले आनंदीत । वृत्ती धारण करोनी ॥२४॥

प्रेमा जन्मभूमीचा । कोणासही यावयाचा । आहे यांत आश्चर्याचा । भाग काहीं नसे की ॥२५॥

कांहीं दिवस करंजपुरीं । राहते झाले साक्षात्कारी । शिष्य सात बरोबरी । होते तेधवां स्वामींच्या ॥२६॥

मुख्य माधव सरस्वती । बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती । उपेंद्रमाधव सरस्वती । सदानंद पांचवा ॥२७॥

ज्ञानज्योती सरस्वती । हे सहावे शिष्य निश्चिती । नाम सातव्या शिष्याप्रती । सिद्ध ऐसें होतें हो ॥२८॥

हे स्वामींचे शिष्य सात । सप्तऋषीच मूर्तिमंत । ब्रह्मज्ञान चित्तांत । ठसलें होतें जयांच्या ॥२९॥

श्रोते हे सप्तऋषी । घेऊन आपुल्या सदगुरुसी । निघते झाले दक्षिणेसी । दक्षिण यात्रा करावया ॥३०॥

वैदर्भी करंजपुराहून । निघते झाले दयाधन । तिथी एकादशी लक्षून शुद्धपक्षाची विबुधहो ॥३१॥

त्या सर्वांचे होतें मनीं । साधावी शवरात्रपर्वणी । गौममीतटाका येउनी । त्र्यंबकेश्वर -क्षेत्रांत ॥३२॥

परी झालें अघटीत । पथीं लागला वेळ बहुत । समाराधना स्वामीप्रत । पंथें होऊं लागल्या ॥३३॥

त्यामुळें ऐसे झालें । त्र्यंबकक्षेत्र दूर राहिलें । स्वामी शिष्यासहीत आले । मननदीच्या काठाला ॥३४॥

तो माघ वद्य एकादशी । तिथी होती त्या दिवशीं । आतां आपण शिवरात्रीसी । त्र्यंबकेश्वरा पोहचूं कसें ! ॥३५॥

ऐशापरीचें भाषण । करिते झाले शिष्यगण । गुरुराया गौतमीस्नान । आतां कशाचे शिवरात्रीसीं ? ॥३६॥

तुम्ही आणिल्या मनांत । योगबळें क्षणांत । पोहोचाल गोतमीतटाप्रत । हें आहे ठावे अम्हा ॥३७॥

परी गुरुवरा आमुची गती । आतां होईल कवण्यारिती । योगशास्त्राची माहिती । मुळींच नसे आम्हांला ॥३८॥

या वैदर्भामाझारीं । गोदावरीची करील सरी । ऐसी सरिता भूवरी । एखादी तरी आहे का ? ॥३९॥

म्हणजे तेथें जाऊन । तिला गोदावरी समजून । शिवरात्रीला करुं स्नान । आपण सगळे गुरुराया ॥४०॥

ऐसें भाषण ऐकिलें । स्वामी गालामधें हंसले । वेड्यांनो तुम्ही न जाणिलें । वैदर्भीच्या मननदीला ॥४१॥

ही मननामें पुण्यसरिता । मोठी अवघ्यांत तत्त्वतां । तिची ऐका थोडी कथा । तुम्हालागी सांगतो ॥४२॥

मागे विभांडक म्हणून । एक होता ब्राह्मण । तयानीं तें केलें स्नान । बारा । वर्षे जान्हवीसी ॥४३॥

सहा वर्षे नर्मदातिरीं । विभांडक राहिला निर्धारी । वृद्ध गौतमी गोदावरी । तिचे कांठीं एक वर्ष ॥४४॥

भीमरथी कृष्णा कोयना । तोच पुढे कुंभकोणा ॥ जाता झाला करण्या स्नाना । त्या कावेरी नदीचें ॥४५॥

परी न कांही उपयोग झाला । विषयवसिनेस पूर आला । त्या विभांडकाचे मनाला । स्थिरता ती मुळीं नसे ॥४६॥

स्नान करुनी येता परत । पापवासना मनांत । उत्पन्न होऊं लागली सत्य । तेणें तो कंटाळला ॥४७॥

ही विभांडकाची स्थिती । जाणते झाले अत्री । जे अनुसूयेचे पती । जनक दत्तात्रयाचे ॥४८॥

ते म्हणाले विभांडका । हताश ऐसे होऊं नका । सांगतो मी उपाय देखा । मनशुद्धिकारणें ॥४९॥

मन पवित्र झाल्याविना । स्नान फला येईना म्हणून जो का असें शाहणा । तो प्रथमतः ऐंसें करी ॥५०॥

मनरुपीं गंगेंत । स्नान करी अहोरात्र । संकल्पविकल्पारहीत । आपण होऊनिया ॥५१॥

मनसंकल्पाचीं पापें । जाती न तिर्थाचिया बापें । म्हणून साधन सांगतों सोपें । त्याचा उपयोग आधीं करी ॥५२॥

विभांडका लौकरी । चाल मननदीचीये तिरीं । तेथे बैसूनीया करी । गायत्रींचें पुरश्चरण ॥५३॥

मननदीचें ते वारी । मी सिंचिता तुजवरी । विषयवासना निमेल सारी । आणि होशील शुद्ध तूं ॥५४॥

तें विभांडककानीं मानिलें । मननदीचें स्नान केलें । त्रयमासांत शुद्ध झालें । विभांडकाचें मन पहा ॥५५॥

ऐशी मननदी पुण्यसरिता । उपेक्षी ना सर्वथा । चला जाऊं स्नानाकरतां । या बोर्डी संगमासी ॥५६॥

ऐसें स्वामींनीं सांगितलें । तें शिष्यांनीं मानिलें । अवघे मिळून आले । मनबोर्डी संगमाला ॥५७॥

दोन नद्या मिळती जेथ । तें प्रयाग होय साक्षात । संशय न धरा किंचित । प्रयागरुप समजा याते ॥५८॥

अवघ्यांचीं स्नानें झाल्यावरी । वदते झाले साक्षात्कारी । चला आतां त्र्यंबकेश्वरीं । शिवरात्रपर्वणी साधावया ॥५९॥

ऐसें म्हणून माळाप्रत । स्वामी आले शिष्यांसहीत । अत्यादरें त्या जोडूनी हात । उत्तराभिमुख बैसले ॥६०॥

आणि मोठ्यानें गर्जना केली । गोदावरीच्या नांवें भली । तयी गोष्ट काय झाली । ती आतां अवधारा ॥६१॥

कडकड ऐसा आवाज झाला । त्या माळाच्या पोटाला । तात्काळ एक खड्डा पडला । एक पुरुष उंचीचा ॥६२॥

स्वामी म्हणाले गोदावरी । यावे आतां लौकरी । या भुक्कड माळावरी । मजला संतुष्ट करावया ॥६३॥

हा खड्डा नव्हे कुशावर्त । आहे मातोश्री साक्षात । प्रगट व्हावें आपण येथ । हीच माझी प्रार्थना ॥६४॥

ऐसें बोलतां क्षणीं । प्रगट झाली स्वर्धुनी । पाणी गोमुखांतुनी । येऊं लागलें निर्मल ॥६५॥

तया कुंडी स्नान केलें । स्वामी परतून वरी आले । या गोष्टीचे वाटलें । चोज अवघ्या शिष्यगणा ॥६६॥

एकमेका शिष्य म्हणती । गुरुवर्य नरसिंह -सरस्वती । आहे अलोलीक विभूती हें आज कळालें ॥६७॥

जे जे करणें त्र्यंबकेश्वरीं । तें तें करा या माळावरी । हा त्र्यंबकराज त्रिपुरारी । पहा येथें बैसला ॥६८॥

ऐसें म्हणून शिष्याला । वरील खडकाच्या पोटाला । नागेश्वर दाखविला । स्वयंभू शिवांचे शिवलिंग ॥६९॥

हा नागेश्वर नागनाथ । हाच आहे औंढ्याप्रत । हाच त्र्यंबक क्षेत्रांत । निलांबिकेजवळी असे ॥७०॥

नोगेश्वराच्या उत्तरेस । जें का फुटलें खडकास । लिंग त्या नांव विशेष । त्र्यंबकेश्वर ऐसें दिले कीं ॥७१॥

हाच ब्रह्मगिरीवरी । हाच कुशावर्ताभितरी । अंगुष्टमात्र त्रिपुरारी । विराजला उखळांत ॥७२॥

हा शेजारचा सोमेश्वर । सोमनाथ साचार । भवभवांतक भवानीवर । सौराष्ट्रदेशीं हाच असे ॥७३॥

पुढे त्या ईशान्यकोनीं । विश्वेश्वर पिनाकपाणी । दाविला लिंगरुपानी । आपुल्या सप्त शिष्यांतें ॥७४॥

लिंग पांचवें ठेविं गुप्त । श्रोते तया कुंडांत । जो का असे पुण्यवंत । त्याच्याच दृष्टी पडेतें ॥७५॥

श्रोते त्या माळा भले । पंचलिंगी नाम दिधलें । तेंच आहे चाललें । अजूनकालपर्यंत ॥७६॥

जैसे का पल्वलांतून । कमलें होतीं निर्माण । तैसेंच खडकापासून । लिंगे उत्पन्न जाहलीं ॥७७॥

सात दिवसपर्यंत । स्वामी राहिले असती तेथ । भजन पूजन यथास्थित । केलें सर्व त्या ठाया ॥७८॥

शिष्याची समजूत काढिली । गोदावरी त्या भेटविली । ही गोष्ट कलींत केली । स्वामी नरसिंहसरस्वतींनीं ॥७९॥

इतिहास नागझरीचा । ऐशारिती आहे साचा । यांत एकही भागकल्पनेचा । नाहीं नाहीं विबुधहो ॥८०॥

तेंच हें नागझरीचरित्र । कथिलें तुम्हां संक्षिप्तात । यांतकल्पनेचें यत्किंचित । नाहीं नाहीं विबुधहो ॥८१॥

स्वप्नीं स्वामी जें बोललें । तेंच मी कागदीं लिहीलें । पुढें बुधहो बुजून गेलें । कुंड कांही दिवसांनीं ॥८२॥

श्रोते याच कुंडावर । गोमाजीनामें साधूवर । होऊनिया गेले साचार । कंठमणी श्रीहरीचे ॥८३॥

गांवापासून उत्तरेसी । पंचलिंगीच्या माळासी । हा बैसला होता ज्ञानराशी । निजानंदीं डोलत ॥८४॥

कूळ आणि जातगोत । कांही न ठावे कोणाप्रत । लोकांस वेडा वाटत । परी शहाणा होता अंतरीं ॥८५॥

गुरें चारी वरवरी । अहोरात्र जपे हरी । ढोरांच्या कंठास दोरी । नाहीं त्यांनी लाविली कदां ॥८६॥

अस्तमानाचे समयाला । गोमाजी म्हणे गुरांला । या माझ्या सान्निध्याला । येऊन बसा निर्धास्त ॥८७॥

सभोंवतीं जंगल बाभळीचें । असंभाव्य होतें साचें । साम्राज्य काट्याकुट्यांचें । झालें होतें भूवरी ॥८८॥

बैल गाई वासर । मिळून होतें खंडीभर । एक्या रात्रीस भयंकर । वाघ तेथें पातला ॥८९॥

आसपास जीं गांवें होतीं । त्यागांवांस वाटली भीति । त्या व्याघ्राची निश्चिती । मग काय विचारतां ? ॥९०॥

बंदुकीमाजीं भरुन बार । हकाटी पिटावी वरच्यावर । ‘ वाघ आला , रहा हुशार ’ । ऐशा गर्जना करोनी ॥९१॥

गोमाजीच्या वस्तीसी । वाघ येई प्रतिदिवशीं । मिसळून गाईगुरांसी । तो तेथें शांत बसे ॥९२॥

हे कित्येकांनीं पाहिलें । आश्चर्य त्यांना वाटलें । जे का स्वतःनिर्वैर झाले । त्यांना वैर कोठोनी ? ॥९३॥

वाघाचिया मानांवरती । गाई माना टाकितीं । भय कोणाच्या नाहीं चित्तीं । ऐसा प्रभाव साधूचा ॥९४॥

श्रोते एक वेडथर । गोमाजीचेपाशी पोर । रहात होतें साचार । त्याला आप्त नव्हते कुणी ॥९५॥

बहिण भ्राता माय पिता । गोमाजीच त्याला होता । त्याची ऐका अभिनव कथा । थोडकी मी सांगतों ॥९६॥

एकें दिवशीं काननांत । तो पोर असतां निद्रिस्त । विखार झोंबला त्याप्रत । गेला प्राण निघूनी ॥९७॥

कलेवर तें कांतारीं । पोराचें राहिले भूमिवरी । इकडे गोमाजीचे अंतरीं । लागलासे तळमळ ॥९८॥

जो जो मनुष्य येईल कोणी । संत गोमाजी त्या त्या लागुनी । करुनिया दिनवाणी । पुसूं लागलें येणेंरिती ॥९९॥

काल रात्रीपासूनी । वेडा न आला या ठिकाणीं । रात्रीस मला सोडुनी । तो न राहे घटकाभर ॥१००॥

ऐसें पुसावे ज्याला त्याला । तों एक गुराखी तेथें आला । तो बोलला समर्थाला । येणेरिती ऐका तें ॥१॥

येथून एक मैलावर । काननीं तुमचा वेडापीर । सर्पदंशाने भूमिवर । आहे मृत्यु पावला ॥२॥

चला त्याची माती करा । ऊद लांडगे कांतारा । आहेत याचा विचार करा । गाफील ना ऐसें बसावें ॥३॥

त्या पोराचे बरोबर । गेले गोमाजी साधूवर । जवळ जाऊनी फिरविला कर । त्याच्या प्रेतावरुनी ॥४॥

‘ हे वेड्या उठ त्वरित । मी रात्रभरी होतों पहात । वाट बसून पहा सत्य । त्या माझ्या झोपडीमध्ये ’ ॥५॥

महाराजांचा कर लागतां । मुलगा उठला तत्त्वतां । पिसेपणाची मुक्तता । झाली त्याच्या विबुधहो ॥६॥

पोर म्हणे गोमाजीसी । काल अस्तमानचे समयासी । विखार झोंबला पायासी । दहाचिया फडीचा ॥७॥

केस होते त्यावर । वरचेवरी फुत्कार । टाकी महाभयंकर । चार हात लांब होता ॥८॥

त्याने माझ्या पायाला । येऊन विळखा घातला । पुढें न शुद्धि राहिली मला । काय झालें तें कोण जाणे ॥९॥

त्या पोरास उठवून । आले गोमाजी घेऊन । निजस्थानाकारण । याचें नांव भूतदया ॥११०॥

एक पाटील शेवगांवचा । कुकाजी या नांवाचा । धाकटा बंधू कडताजीचा । महादजीचा पुत्र असे ॥११॥

हे पाटील गणेश कुळीचे । वतनदार शेगांवचे । पुष्कळांसी वांकडें त्यांचें । येतें झालें शेगांवांत ॥१२॥

म्हणून अवघ्यांसी कंटाळून । आले टाकळीसी निघून । कुकाजी कडताजी दोघेजन । त्या गांवींच्या कटकटीनें ॥१३॥

बुधहो ही वतनदारी । सुखद न कोणा झाली खरी । बंधूबंधूत होती बैरी । ये ठायीं पहा कीं ॥१४॥

मोह वतनदारीचा । मनालागीं पडल्या साचा । त्याच्यापुढें लोभाचा । उदय होतो चित्तांत ॥१५॥

लोभ उपजल्या अंतरीं । सन्निती जाते विलया खरी । दया क्षमेला अंतरीं । स्थान त्याच्या लव नसे ॥१६॥

सन्नीति नष्ट झाल्यावर । चितीं उपजे अहंकार । अहंकारें वाढे वैर । बहुतेकांसी विबुधहो ॥१७॥

ऐशी स्थिति कुकाजीची । शेगांवी झाली साची । मानमान्यता तयांची । ग्रामीं न राहिली तिळभर ॥१८॥

मानमान्यतेकारण । संग्रही पाहिजे विपुल धन । तें नसल्या विचारी कोण । वतन मोठें असलें जरी ॥१९॥

शेगांवींचें अवधे जन । कुकाजीस पाहून । करुं लागलें हास्यवदन । तिरस्कारमुद्रेनें ॥१२०॥

हा वतनदारांचिया पोटा । जन्मला आहे खराटा । हा कुकाजी मूर्ख बेटा । ऐसें म्हणूं लागले ॥२१॥

हे लोकांचे शब्दबाण । कुकाजीला न झाले सहन । म्हणून बंधूसह येऊन । टाकळीमाजीं राहिला ॥२२॥

व्यवसाय उदरपूर्तीचा । कसाबसा करुन साचा । गाडा आपुल्या प्रपंचाचा । कुकाजी तो हाकीत असे ॥२३॥

तो राहून टाकळींत । आला सहज नागझरींत । उद्योगधंदा पहाण्याप्रत । एके कालीं विबुधहो ॥२४॥

नागझरीला पाहीले । चित्त त्याचें हताश झालें । परी त्याला येथेंच कळलें । सुखप्राप्तीचें साधन ॥२५॥

नागझरीचें म्हणती जन । तुम्ही येथवरी केलं येणं । त्याअर्थी दर्शन । घ्या येथल्या साधूचें ॥२६॥

साधुदर्शनें आपदा टळती । शांत राहे चित्तवृत्ती । इच्छा असल्या राबती । अष्टसिद्धि अंगणांत ॥२७॥

म्हणून गोमाजीच्या दर्शना । कुकाजी तो आला जाणा । तों पाहिलें तया स्थाना । कौतुक ऐसें अभिनव ॥२८॥

एक क्रुर वाघीण । बैसली पिलास घेऊन । गोमाजीचे दिव्यचरण । वाघीन चाटूं लागली ॥२९॥

तें पाहून कुकाजीसी । भय वाटलें मानसीं । गेला न पुढें दर्शनासी । तसाच फिरला गांवाकडे ॥१३०॥

नागझरीस आला परत । पाटील गांवीचा त्यास पुसत । पाहिले का तुम्ही संत । आमुच्या गांवीचे गोमाजी ? ॥३१॥

कुकाजी बोले विनयानें । मी पाहिले तया नयनें । परी संत म्हणाया कारणें । मी नाहीं कबूल ॥३२॥

वाघ बैसला समोर । म्हणून का तो साधूवर । सर्कशीमाजीं ऐसे प्रकार । याहून होती अधिक कीं ॥३३॥

म्हणून कां सर्कसमालकाला । साधू म्हणावें हो बोला । वाघ दीनवत होता बसला । हें मी स्वतःपाहिलें ॥३४॥

इतुकेंच आहे खरे त्यांत । ती सर्कस नसावी निश्चित । एक अती विरक्त पुरुष तो असावा ॥३५॥

नुसत्या विरक्ततेनें । संत का हो तया म्हणणें सतेज गाराकारणें । हिरे न कोणी म्हणतात ॥३६॥

संतत्वाची व्याख्या । शास्त्रीं कथिली ती एका । उगीच वेड्यास लावूं नका । संत हें विशेषण ॥३७॥

संत पाहिजे अधिकारी । क्षमा , दाय , अंतरीं । बंदा गुलाम ज्याचा हरी । झाला आहे सर्वथा ॥३८॥

अलौकिक कृत्यें हातीं । जयाचिया साच होतीं । भूत भविष्या जाणती । त्यास साधू म्हणावें ॥३९॥

मग पाटील बोलला त्याते । अहो भूतभविष्य त्याला कळते । या गोष्टींचें ज्ञान नसतें । मुळीच वेड्यापिशाला ॥१४०॥

ऐका गोष्ट सांगतों एक । उदेभान भालतडक । नांवाचा परमभाविक । गृहस्थ आहे या गांवीं ॥४१॥

त्याच्या म्हशी चुकून गेल्या । चौकशा त्या बहूत केल्या । परी त्या सर्व वायां गेल्या । ढोरें मुळीं न सांपडती ॥४२॥

निरुपाय होऊन अखेरी । माळास आला सत्वरी । गोमाजीच्या पायावरी । शीर त्यानीं ठेविलें ॥४३॥

तोंच महाराज बोलले । म्हशीसाठीं का येणें केलें ? । फळ आळसाचें हें भलें । तुज मिळालें येवेळा ॥४४॥

अरे गुराख्यावांचून । ढोरांचें न होय संरक्षण । तूं सकाळीं उठून । गुरें देशी सोडोनिया ॥४५॥

नाहीं गुराखी सांभाळण्यासी । वाट जिकडे फुटेल त्यासी । तिकडे जाती अहनिशी । हा धर्म ढोरांचा ॥४६॥

आज झाले दहा दिवस । म्हशी न आल्या गेहास । म्हणून मला पुसण्यास । तूं आलास माळावरी ॥४७॥

चिंता न करी मानसीं । सुखरुप तुझ्या आहेत म्हशी । त्या परवाच्या दिवशीं । येतील तुझ्या सदनातें ॥४८॥

गोमाजीनें जें सांगितलें । तेंच कुकाजी सत्य झालें । हें वर्तमान आहे वहिलें । याच आठवड्यांतील कीं ॥४९॥

मग कुकाजी वदला त्यातें । बोलाफुलास गांठ पडते । काकतालीय न्यायातें । आणा पाटील मनांत ॥१५०॥

ऐसा संवाद बहूत झाला । कुकाजी गेला टाकळीला । ही टाकळी सान्निध्याला । आहे नागझरीच्या ॥५१॥

यापुढील अवघें वृत्त । द्वितीयाध्यायीं होईल विदित । असा श्रोते सावचित । गोमाजीचरित्र ऐकावया ॥५२॥

ही दासगणू -वर्णित कथा । नाहीं गप्पेचा खचित गाथा । विश्वास ठेवूनिया वरता । अनुभवाची वाट पाहाणें ॥१५३॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP