सद्‍गुरू - जुलै २३

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


गुरुआज्ञेप्रमाणे वागणार्‍याला कधीही नड येत नाही . राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते , तसे , गुरुचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणार्‍याला कसली नड असणार ? लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते ; परिसापाशी सोने व्हायला रुप्याचे लोखंड व्हावे लागते ; तसे , गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते , ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच होय . बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवीत असताना मधून मधून हात काढून घेतो , पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही , तसा आपल्याला सदगुरुचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी .

आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास , श्रद्धा ठेवतो ; औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो . व्यवहारात जर असे आहे , तर मग ‘ श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही ’ असे म्हणणे बरोबर नाही . डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचे कारण असे की , आपल्याला जगायची इच्छा आहे ; तसे , भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहाणार नाही . आधी श्रद्धा , मग कृती , आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव , असा व्यवहाराचा नियम आहे . परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे . व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत , तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल . आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो , त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ रहावे . ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे . परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही , पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचे नाही . सांगणारा कसाही असला तरी ऐकणार्‍याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल . संतांच्या सांगण्यावर पुर्ण श्रद्धा ठेवावी . अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे . खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली , तो लवकर सुखी झाला . आज आपल्यापाशी ती नाही , तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनू या . आधी पुष्कळ चिकित्सा करुन आपले ध्येय ठरवावे , पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे .

आपण परमात्म्याजवळ मागावे की , " तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव , पण माझे समाधान भंगू देऊ नकोस . माझा मीपणा काढून टाक . तुझा विसर पडू देऊ नकोस . मला अमुक एक तुजजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस . नामामध्ये प्रेम दे , आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे . "

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP