मग नळासी म्हणे हनुमंत ॥ सखया गर्व न धरी किंचित ॥ अवघाकर्ता रघुनाथ ॥ अभिमान तेथें कासया ॥५१॥
स्तंभावीण आकाश धरी ॥ उदकावरी तारी धरित्री ॥ मित्र शशी उडुगणें निर्धारीं ॥ वायुचक्री चालवी जो ॥५२॥
अनंत ब्रह्मांड मोडून ॥ सवेंचि निर्मी न लागतां क्षण ॥ त्या रामापुढें अभिमान ॥ कोठें चालेल जीवांचा ॥५३॥
जैसा उगवतां वासरमणी ॥ मृगांकतेज लोपे ते क्षणीं ॥ तेथें खद्योत स्वेतेजेंकरूनी ॥ उजळील काय नभातें ॥५४॥
यालागीं गर्व सांडोनी ॥ संागतों ते वर्म धरी मनीं ॥ रकारें एक शिला रेखुनी ॥ काना देऊनि करी गुरु ॥५५॥
दुजे शिळेवरी रेखीं मकार ॥ दोहींस करी एकंकार ॥ तूं म्हणसी रामनाम पवित्र ॥ सेतूवरी केवीं लिहूं ॥५६॥
कपी देतील वर चरण ॥ हा संशय धरी तुझंं मन ॥ बरे मुख्य भेदासी कारण ॥ तो अभिमान सोडी कां ॥५७॥
मुख्य रामनाम पाहीं ॥ हृदयीं अभेद रुळे सदाही ॥ मग ते पाषाण सहसाही ॥ भेदभाव न धरिती ॥५८॥
हनुमंतवचन तीक्ष्ण कुठार ॥ समूळ छेदिला अभिमानतरुवर ॥ मग निरभिमानें नळवीर ॥ तैसेंचि करिता जाहला ॥५९॥
करितांच श्रीरामस्मरण ॥ नळ कपी जोडी पाषाण ॥ तो तेथें सम विषम थोर लहान ॥ भेदाभेद न दिसेचि ॥१६०॥
हनुमंत काव्यांतील हृद्रत ॥ चतुरीं जाणिजे हा भावार्थ सेतुपंथें नाम यथार्थ ॥ नळें नाही रेखिलें तें ॥६१॥
दुजयासी पाषाण जे बुडवित ॥ ते सागरीं तरती तारुवेत ॥ हा नळाचा गुण नव्हे निश्र्चित ॥ अदभुत महिमा रामाचा ॥६२॥
सेतू बांधावया कारण ॥ नळ रामेंचि केला निर्माण ॥ भक्तवत्सल रघुनंदन ॥ महिमा वाढवी दासांचा ॥६३॥
असो बाणसंख्यादिवसांत ॥ सुवेळेपर्यंत बांधिला सेत ॥ शतयोजनें लांब गणित ॥ दशयोजनें रुंद पैं ॥६४॥
गगनीं पाहती सुरवर ॥ सेतू दिसे जैसा भोगेंद्र ॥ रघुपतीतें सांगती वानर ॥ सेतू संपूर्ण केला नळ ॥६५॥
नळास बोलावून रघुनंदनें ॥ हृदयी धरिला परम प्रीतीनें ॥ म्हणे धन्य धन्य तुझें जिणें ॥ भरिलें त्रिभुवन कीर्तीनें ॥६६॥
सखया त्वां अदभुत कार्य केले ॥ अघटित तेंचि घडविलें ॥ असो रघुवीर म्हणे ते वेळे ॥ चल सुवेळे जाऊं आतां ॥६७॥
कुंचा फिरविला वीरें नळे ॥ तत्काळ उठलीं कपिदळें ॥ भुभुःकारनादें ते वेळे ॥ डळमळिला भूगोळ ॥६८॥
सुमुहूर्त वेळा पाहून ॥ उठोनि चालिले रामलक्ष्मण ॥ दशयोजनें रुंद प्रमाण ॥ सेना दाटली चालता ॥६९॥
कडेचे कोसळती वानर ॥ सवेंच उडी घेती चक्राकार ॥ वरी येऊन सत्वर ॥ सेतुपंथें चालती ॥१७०॥
रघुवीर चरणचालीं जात ॥ धांवती सुग्रीव हनुमंत ॥ म्हणती रघूत्तमा विपरीत ॥ होईल ऐसें वाटतें ॥७१॥
तुमचे पद लागतां ये वेळा ॥ उद्धरतील सेतूच्या शिळा ॥ होतील अहल्येऐशा अबळा ॥ पडतील गळां कपींच्या ॥७२॥
कुटिल भाव सोडून ॥ विनोदें हांसे सूर्यनंदन ॥ मग हनुमंतस्कंधी रघुनंदन ॥ आरूढला ते वेळां ॥७३॥
अंगदाच्या स्कंधावरी ॥ सौमित्र बसे ते अवसरीं ॥ बाळसूर्य उदयाद्रीवरी ॥ त्याचपरी शोभतसे ॥७४॥
न भरतां अर्धप्रहर ॥ सूवेळेसी आला रघुवीर ॥ सेना उतरली अपार ॥ लंकानगर गजबजिलें ॥७५॥
शुकास केले होते बंधन ॥ तो राघवें दिधला सोडून ॥ तेणें रघुपतीचे वंदोनि चरण ॥ लंकेमाजी प्रवेशला ॥७६॥
मग रावणापुढें अदभुत ॥ राघवप्रताप शुक सांगत ॥ म्हणे जयासी समुद्र सरितांसहित ॥ मूर्तिमंत भेटला ॥७७॥
धन्य प्रतापी रघुनंदन ॥ जळी तारिलें पाषाण ॥ परमशक्तिवानरगण ॥ कळिकाळासी न गणिती ॥७८॥
तुम्ही निरोप जे सांगितले ॥ तितुके मित्रपुत्रासी कथिले ॥ तंव तिही धांवोनि मजला धरिलें ॥ बांधोनि पाडिलें आजिवरी ॥७९॥
करुणासागर रघुनंदन ॥ तेणें आज दिधलें सोडून ॥ आतां राजा जानकी नेऊन ॥ सत्वर रामासी समर्पावी ॥१८०॥
सखा करितां रघुनंदन ॥ तेणें चंद्रार्कवरी कल्याण ॥ ऐकतां क्षोभला रावण ॥ म्हणे केले ताडण तिहीं तुज ॥८१॥
भय घेतलें मानसीं ॥ म्हणोनि भलते वाचाळसी ॥ शत्रुप्रताप मजपुढें वानिसी ॥ तरी मृत्यु पावसी निर्धारें ॥८२॥
मग शुक आणि सारण ॥ दोघां सांगे दशवदन ॥ म्हणे सुवेळेसी जाऊन ॥ सैन्य गणोनि या वेगीं ॥८३॥
मुख्य मुख्य कोण वानर ॥ कोणासवें किती भार ॥ ऐसें पाहूनि सत्वर ॥ परता रक्षूनि आपणां ॥८४॥
आज्ञा वंदूनि दोघांजणीं ॥ कपिसेनेंत आले ते क्षणी ॥ वानरवेष धरूनि ॥ सैरावैरा हिंडती ॥८५॥
सेना धुंडोनि सकळ ॥ मग जेथें असे अयोध्यापाळ ॥ लक्षीत ते सभामंडळ ॥ उभे दूर राहूनियां ॥८६॥
तो बिभीषणाची दृष्टि ते काळी ॥ अकस्मात दोघांवरी पडली ॥ धांवोनि धरिले ते वेळीं ॥ राघवाजवळी आणिले ॥८७॥
म्हणे हे रावणाचे हेर ॥ इही सेना गणिली समग्र ॥ वेष पालटोनी वानर ॥ होऊन हिंडती स्वईच्छा ॥८८॥
चुना मोखानि वायस ॥ जाहले जैसे राजहंस ॥ कीं धरूनि ब्राह्मणांचा वेष ॥ मैंद जैसे हिंडती ॥८९॥
कीं खोटेंनाटे करून ॥ खऱ्यांत मेळविती कुजन ॥ मग परीक्षककाढिती निवडोन ॥ दोघेजण तैसे धरिले ॥१९०॥
मग राजाधिराज रघुनंदन ॥ सुहास्यवदन बोले वचन ॥ म्हणे या दोघांस करी धरून ॥ दाखवा सैन्य समस्तही ॥९१॥
सकळ वृत्तांत आणूनि मना ॥ जाऊनि श्रुत करा दशवदना ॥ तंव ते म्हणती रघुनंदना ॥ मखपाळका विश्र्वेशा ॥९२॥
आम्हीं महिमा एकिली कर्णीं ॥ तो राम आजि देखिला नयनीं ॥ असो श्रीरामाची आज्ञा घेउनी ॥ दोघे परतले लंकेसी ॥९३॥
आले देखोन दोघे हेर ॥ षोडश खणांचे गोपुर ॥ त्यावरी चढला दशकंधर ॥ सेवक अपार भोंवते ॥९४॥
हेरांप्रति पुसे रावण ॥ सांगा येथून कोणाचे कोण ॥ मग ते दाविती दोघेजण ॥ संकेतवर्ण लक्षूनियां ॥९५॥
वानरसेना दशयोजन ॥ सभोंवती उतरली वीस्तीर्ण ॥ एकएक वीर दैदीप्यमान ॥ बळवंत आणि प्रतापी ॥९६॥
वानरसिंधूचें मव्यमंडळ ॥ जुत्पत्ति उभे भोंवते सकळ ॥ त्या मध्यभागीं तमालनीळ ॥ वस्त्राभरणीं मंडित दिसे ॥९७॥
कनकहरिणचर्मी पूर्ण ॥ पहुडलासे रघुनंदन ॥ सुग्रीवाचे मांडीवरी शिर ठेवून ॥ गोष्टी सांगे कौतुकें ॥९८॥
जाळूनि गेला लंकानगर ॥ सवेंच घेऊन आला रघुवीर ॥ तो हनुमंत वायुकुमर ॥ चरण चुरी रामाचे ॥९९॥
तुमचा बंधु बिभीषण ॥ रघुनाथनिकट बैसोन ॥ जे जे झाले वर्तमान ॥ गोष्टी सांगे रामकर्णीं ॥२००॥