अध्याय तेवीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


मग सौमित्र आणि अष्ट दिक्पती ॥ तेही बिभीषणासी भेटती ॥ पुष्पवर्षाव करिती ॥ वृंदारक तेधवां ॥५१॥

मग बिभीषण जोडूनि कर ॥ उभा राहिला श्रीरामासमोर ॥ म्हणे जयजय राम करुणासमुद्र ॥ जगदोद्धारा दीनबंधो ॥५२॥

जयजय रामकमळपत्राक्षा ॥ हे ताटिकांतका सर्वसाक्षा ॥ मखपाळका निर्विकल्पवृक्षा ॥ कर्माध्यक्षा कर्ममोचका ॥५३॥

जय राम चंडीशकोदंडभंजना ॥ हे राम दशकंठदर्पहरणा ॥ हे राम विषकंठदाहशमना ॥ भक्तरंजना जगवंद्या ॥५४॥

हे राम पद्मजातजनका ॥ हे राम विबुधबंधच्छेदका ॥ हे राम दुष्टअसुरांतका ॥ सहस्रमुखा न वर्णवेचि ॥५५॥

ऐसी बिभीषणें करितां स्तुति ॥ मग तयासी हाती धरूनि सीतापति ॥ आपणजवळी बैसवी प्रीतीं ॥ बहुत मान देऊनियां ॥५६॥

संतोषोनि बोले रघुनंदन ॥ आमचा पांचवा बंधु बिभीषण ॥ वानर म्हणती धन्य धन्य ॥ भाग्यरावणानुजाचें ॥५७॥

मग चतुःसमुद्रींचीं उदकें आणुनी ॥ बिभीषणासी रामें बैसवूनी ॥ लंकापति हा म्हणूनि ॥ अभिषेक केला यथाविधी ॥५८॥

लंकानगरींचा नृप पूर्ण ॥ येथून अक्षयी बिभीषण ॥ यावरी लोकप्राणेशनंदन ॥ काय करिता जाहला ॥५९॥

वाळूची लंका विशाळ केली ॥ कपींचीं किराणें बाहेर पडली ॥ ते बिभीषणाजवळी गहाण ठेविली ॥ राघवेंद्र तेधवां ॥६०॥

माझ्या हनुमंताच्या लंकेवरून ॥ ते लंका सांडीन ओंवाळून ॥ परम प्रीतीं सीताजीवन ॥ लंका विलोकी मारुतीची ॥६१॥

असो यावरी बिभिषणाप्रति ॥ विचारीत जनकजापती ॥ म्हणे सागर तरावया निश्र्चितीं ॥ काय उपाय करावा ॥६२॥

यावरी बोले बिभीषण ॥ सागराची पूजा करून ॥ मागावा मार्ग प्रार्थून ॥ वानरदळ उतरावया ॥६३॥

मग समुद्रतीरीं रघुनंदन ॥ बैसला दर्भासन घालून ॥ पूजा सागरी समर्पून ॥ मित्रकुळभूषण मार्ग मागे ॥६४॥

फळ तोय वर्जून समस्त ॥ निराहार बैसला सीताकांत ॥ हिमाचळीं हिमनगजामात ॥ तप करी जयापरी ॥६५॥

तो तेथे रावणाचा हेर ॥ शार्दूळनामा होता असुर ॥ लंकापतीपुढें जाऊन सत्वर ॥ वार्ता सांगे ते काळीं ॥६६॥

म्हणे कमळिणीप्रियभूषण ॥ अगाध वानरसमुदाय घेऊन ॥ प्रतापसिंधु रघुनंदन ॥ जळसिंधुतीरीं राहिला ॥६७॥

ऐसा समाचार ऐकतां साचार ॥ चिंतेनें व्यापिला दशकंधर ॥ मग शुकनामें असुर ॥ दशकंधर त्यासी सांगे ॥६८॥

तूं आमचा बंधु होसी ॥ जाऊन सांग सुग्रीवासी ॥ तुज काय कारण सीतेसी ॥ परतोन जाईं माघारा ॥६९॥

मग तो शुक रूप जाहला ॥ क्षणें सिंधू उल्लंघूनि आला ॥ अंतरिक्षीं उभा राहिला ॥ बोलों लागला धीटपणें ॥७०॥

म्हणे मज पाठविलें रावणें ॥ वानरेश्र्वरा तूं एक वचनें ॥ तुवां शीघ्र परतोनी जाणें ॥ मर्कटसेना घेऊनियां ॥७१॥

आम्ही जानकी आणिली हिरून ॥ तरी तुम्हांसी यावया काय कारण ॥ व्यर्थ वेंचू नका प्राण ॥ जावें परतोन किष्किंधे ॥७२॥

जरी तुम्ही न जाल परतोन ॥ तरी मी शुक स्वकरेंकरून ॥ तुमची शिरकमळें छेदून ॥ नेईन आतां लंकेसी ॥७३॥

ऐसें बोलतां शुक निशाचर ॥ परम क्रोधावले वानर ॥ बहुत धांविन्नले वीर ॥ आसडून खालीं पाडिला ॥७४॥

बहुत मिळोनी कुंजर ॥ ताडिती जैसें एक मार्जार ॥ पाणिप्रहारें तैसा असुर ॥ वानरवीरीं ताडिला ॥७५॥

परम कासावीस होऊन म्हणे मज राघवा सोडवीं येथून ॥ कृपासागर रघुनंदन ॥ पाहे विलोकून त्याकडे ॥७६॥

सुमित्रासुत म्हणे सोडा सत्वर ॥ तात्काळ मुक्त करिती वानर ॥ सवेंचि गगनीं उडोनि असुर ॥ मागुतीं बोले निंद्योत्तरें ॥७७॥

म्हणे एथून जाय तूं किष्किंधापति ॥ न धीर रामाची संगती ॥ जैसें देवांचे बुद्धी छळितां उमापती ॥ पुष्पचाप भस्म झाला ॥७८॥

तुम्हांसी मारावया देख ॥ घेऊन आला रघुनायक ॥ तुम्ही वानर शतमूर्ख ॥ नेणा हित आपुलें ॥७९॥

ऋषभ म्हणे रे शुका ॥ दुर्बुद्धि मलिना मशका ॥ जाऊनि सांगे दशमुखा जनकात्मजा सोडी वेगीं ॥८०॥

तूं आमुचा शत्रु साचार ॥ तुज वधावया आला रघुवीर ॥ तुझीं दाही शिरें छेदून सत्वर ॥ बळी देईल दशदिशां ॥८१॥

शुक म्हणे सीता गोरटी ॥ पुन्हां न पडे तुमचे दृष्टीं ॥ मर्कटहो व्यर्थ कष्टी ॥ कासया होतां उगेची ॥८२॥

ऐसें ऐकतां वाळिनंदन ॥ म्हणे धरा धरा मागुतेन ॥ तो तात्काळ वानरीं आसुडोन ॥ केले ताडण ते वेळां ॥८३॥

मग करचरण बांधोन ॥ शुक ठेविला रक्षून ॥ असो इकडे रघुनंदन ॥ समुद्रासी मार्ग मागे ॥८४॥

तीन दिवसपर्यंत ॥ गुणसमुद्र रघुनाथ ॥ समुद्राची वाट पहात ॥ परी तो उन्मत्त सर्वदा ॥८५॥

परम क्षोभला रघुनाथ ॥ म्हणे हा समय नोळखे यथार्थ ॥ यास मी मान दिधला बहुत ॥ सागरनिर्मित म्हणोनिया ॥८६॥

लवणजळविषेंकरून ॥ सर्प हा पसरला लंबायमान ॥ आतां यावरी बाण सुपर्ण ॥ सोडितां भक्षील क्षणार्धे ॥८७॥

माझा बाण वडवानळ ॥ क्षणें शोषील समुद्रजळ ॥ जैसें ज्ञान प्रवेशतां सकळ ॥ अज्ञान जाय निरसोनी ॥८८॥

की माझा बाण कलशोद्भव ॥ क्षणें शोषील जळार्णव । सूर्य उगवतां तम सर्व ॥ जाय जैसें निरसोनी ॥८९॥

मागुती क्षण एक वाट पाहून ॥ उभा ठाकला रघुनंदन ॥ धनुष्यावरी योजिला बाण ॥ अर्ध क्षण न लागतां ॥९०॥

बाणाचे मुखी ब्रह्मास्त्र ॥ स्थापिता जाहला राजीवनेत्र ॥ की क्षोभला प्रळयरुद्र ॥ अक्षय सागर देखतां ॥९१॥

आकर्ण चाप ओढितां प्रचंड ॥ भयें तडाडी विरिंचिअंड ॥ जळचर खेचरें उदंड ॥ मूर्च्छना येऊन पडियेलीं ॥९२॥

निशा संपतां समग्र ॥ उदयाद्रीवरी ये मित्रचक्र ॥ तैसा दिव्यरूप समुद्र ॥ सरितांसहित प्रगटला ॥९३॥

यागीं होतां पूर्णाहुती ॥ तात्काळ प्रगटे आराध्यमूर्ति ॥ तैसा प्रगटला सरितापति ॥ परिवारेंसी तेधवां ॥९४॥

वंदूनियां रघुवीरचरणां ॥ म्हणे राजीवाक्षा रघुनंदना ॥ स्मरारिमित्रा आनंदसदना ॥ जानकीजीवना रघुपति ॥९५॥

तूं कृपासमुद्र रघुवीर ॥ कां हे लहरी आली क्रूर ॥ माझा अन्याय नसतां शर ॥ धनुष्यावरी घातला ॥९६॥

माझा स्वभाव रघुनंदना ॥ सर्वदाही करावी गर्जना ॥ तुजसीं गर्व गर्वहरणा ॥ सर्वथाही केला नाही ॥९७॥

मग म्हणे रघुनंदन ॥ म्यां शरासनी योजिला बाण ॥ पुन्हा काढितां नये पूर्ण ॥ यासी कारण सांग कांहीं ॥९८॥

यावरी बोले सरितानाथ ॥ पश्र्चिमेस असे मरु दैत्य ॥ तो माझी जळचरें भक्षित ॥ सदा पीडितो गोब्राह्मणां ॥९९॥

त्यावरी टाकूनियां बाण ॥ मरूचा तात्काळ घ्यावा जी प्राण ॥ तों शर गेला न लागतां क्षण ॥ कल्पांतचरपळेसारिखा ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP