अध्याय तेवीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


जळीं जीव वधितां मरु दैत्य ॥ शिर छेदिलें अकस्मात ॥ जीवन शोषिलें तेथ बहुत ॥ मारवाडदेश वसिन्नला ॥१॥

अद्यापि तिकडे अल्प जळ ॥ परी वृक्षवल्ली सदा सुफळ ॥ असो सागरें तमालनीळ ॥ जामात म्हणोनि पूजिला ॥२॥

मग सर्व पूजा आणून ॥ घनश्यामगात्र रघुनंदन ॥ अपर्णावराचें मनरंजन ॥ हर्षे पूजी श्रीरामचंद्रा ॥३॥

दिव्यालंकार दिव्य वस्त्रें ॥ अमोलिक रत्नें प्रभाकरें ॥ राघवापुढें नदीश्र्वरें ॥ समर्पिलीं ते काळीं ॥४॥

सागर म्हणे अयोध्यानाथा ॥ वस्त्रे भूषणें लेईं समर्था ॥ नृपास वल्कलें तत्त्वतां ॥ रिपुसन्मुख योग्य नव्हे ॥५॥

अयोध्यानाथा नृपवरा ॥ करूनि यांच्या अंगीकारा ॥ मग समरंगणीं दशकंधरा ॥ खंड विखंड करावें ॥६॥

बैसावया दिव्य रथ ॥ समरीं पाठवील शचीनाथ ॥ वानर सुग्रीवादि समस्त ॥ विनविती तेव्हां रघूत्तमा ॥७॥

स्वामी आम्हां समस्तांचे मनीं ॥ वस्त्रे भूषणें घ्यावीं ये क्षणीं ॥ भक्तवचनें चापपाणी ॥ मानिता झाला ते वेळे ॥८॥

कल्पांतचपळेसमान ॥ राघव नसेला पीतवसन ॥ उत्तरीय प्रावरण दैदीप्यमान ॥ कीं चंडकिरण प्रकाशला ॥९॥

सांवरूनि जटाभार ॥ वरी मुकुट घातला सुंदर ॥ तेज तळपतसे अपार ॥ दिकृचक्रांमाजी न समाये ॥११०॥

प्रळयचपळेचे उमाळे उठती ॥ तेवी दिव्य कुंडलें तळपती ॥ कीं कवि आणि अंगिरापती ॥ कर्णीं शोभती साचार ॥११॥

मुक्ताफळमाळा बहुत ॥ रघुपतीच्या गळां डोलत ॥ कीं मुक्तरूपें समस्त ॥ अनंत ब्रह्मांडें गुंफिलीं ॥१२॥

मुक्ताफळांचे तेज गहन ॥ परी त्यांचा पालटला वर्ण ॥ दिसती इंद्रनीळसमान ॥ श्यामलांगीं रघुपतीच्या ॥१३॥

जेंवि निष्कलंक मृगांक ॥ तेंवि हृदयी झळके पदक ॥ कटीं मेखळेचें तेज अधिक ॥ देखतां अर्क भुले पैं ॥१४॥

वेदांतीच्या श्रुति गहन ॥ अर्थ बोलती जेंवि शोधून ॥ तैशा क्षुद्रघंटा रुणझुण ॥ शब्द करिती रसाळ ॥१५॥

तीक्ष्ण प्रभेची चके्रं तळपती ॥ तैशा मुद्रिका करी झळकती ॥ पदी नेपुरें गर्जती ॥ असुरांवरी प्रतापें ॥१६॥

नीळ गगनावरी सुंदर ॥ मंदाकिनीओघ दिसे शुभ्र ॥ तैसा अम्लान सुमनहार ॥ श्यामलांगीं शोभतसे ॥१७॥

असो दिव्यगंधीं दिव्यसुमनीं ॥ सागरें पूजिला चापपाणी ॥ तैसाचि लक्ष्मण तये क्षणी ॥ वस्त्रालंकार गौरिविला ॥१८॥

देव करिती जयजयकार ॥ वर्षती दिव्यपुष्पसंभार ॥ भुभुःकारें गर्जती वानर ॥ तेणें अंबर कोंदलें ॥१९॥

असो जगदात्मा रघुवीर ॥ जो कां सर्वांनंदमंदिर ॥ सागराप्रति राजीवनेत्र ॥ काय बोलता जाहला ॥१२०॥

म्हणे सुवेळेसी जावया दळभार ॥ उपाय सांगे कांहीं सत्वर ॥ सागर म्हणे नळ वानर ॥ ऋषीचा वर त्यास असे ॥२१॥

नळ कपि बाळपणीं ॥ शाळिग्राम टाकी जळीं नेउनी ॥ मग ऋृषि म्हणती जीवनीं ॥ पाषाण तरोत तव हस्तें ॥२२॥

यालागी सुवेळेपर्यंत ॥ नळाचे हस्तें बांधी सेतु ॥ असो आज्ञा मागोनि सरितानाथु ॥ जाहला गुप्त स्वस्थानीं ॥२३॥

याउपरी कौसल्यानंदन ॥ नळ कपि जवळी बोलावून ॥ म्हणे धन्य धन्य वरदान ॥ जळीं पाषाण तारीं आतां ॥२४॥

धन्य धन्य तुझी माउली ॥ तुज ऐसें रत्न प्रसवली ॥ तरी सखया आतां ये काळीं ॥ प्रगट करी सामर्थ्य तुझें ॥२५॥

ऐसें बोलतां रघुवीर ॥ भुभुःकारें गर्जती वानर ॥ पाषाण पर्वत अपार ॥ समुद्रजळी टाकिती ॥२६॥

लागतां नळाचा वरदहस्त ॥ समुद्रीं तरती काष्ठवत ॥ कीं तुंबिनीफळें तरत । पाषाण पोहती त्यापरी ॥२७॥

कीं सद्रुरूचे कृपेंकरूनी ॥ भवजळीं तरती बहुत प्राणी ॥ तैसीच नळाची करणी ॥ पाषाण जळीं तरले हो ॥२८॥

इकडे अठरा पद्में वानर ॥ बहात्तर कोटी रीस वीर ॥ पर्वत तरुवर ॥ संख्यारहित आणिती ॥२९॥

असंभाव्य उचलिती पर्वत ॥ वरी ग्रामतटाकांसहित ॥ ऐशा नगांच्या उतरंडी बहुत ॥ धांवताती घेऊनि ॥१३०॥

भार वानरांचे धांवती ॥ चालतां न दिसे खाली क्षिती ॥ लक्षांचे लक्ष पर्वत टाकिती ॥ नव्हे गणती शेषातें ॥३१॥

त्याहीमाजी हनुमंत ॥ विशाळरूप धरी अद्भुत ॥ कीं मंदराचळचि धांवत ॥ रामकार्याकारणें ॥३२॥

तरी तो महाराज हनुमंत ॥ तेणें किती वाहिले पर्वत ॥ मूळकाव्यामाजी गणित ॥ केले असे ऐका तें ॥३३॥

वेदसंख्यालक्ष पर्वत ॥ पुच्छें वेष्टित आधीं हनुमंत ॥ शास्त्रसंख्यालक्ष शिरीं ठेवित ॥ हातीं घेत लक्षद्वय ॥३४॥

बहुत नगांच्रूा पंक्ति ॥ स्कंधीं बैसवी हो मारुति ॥ मागें सांडोनि समीरगती ॥ आकाशपंथें धांवतसे ॥३५॥

वानर श्रमले असंख्यात ॥ ठायी ठायी पडती निद्रिस्त ॥ परी श्रमरहित हनुमंत ॥ असंख्यात खेपा करी ॥३६॥

आश्र्चर्य करी अयोध्यापाळ ॥ म्हणे धन्य मारुतीचें बळ ॥ संख्यारहित अचळ ॥ रिचवी नेऊन सागरीं ॥३७॥

प्रथमदिवशीं नळें अद्भुत ॥ चौदा गांवें बांधिला सेत ॥ परी अभिमान धरिला बहुत ॥ माझेनि तरती पाषाण हे ॥३८॥

तंव निमेषामाजी एक मीन आला ॥ तेणें सर्व सेतु गिळिला ॥ सवेंच दिनमणि उगवला ॥ तों सेतु नाही त्या स्थळीं ॥३९॥

सुग्रीवादि वानर तर्क करिती ॥ रावणें नेला सेतू म्हणती ॥ मग रघुपतीस जाणविती ॥ सेतू नाही म्हणूनियां ॥१४०॥

मग श्रीरामें शरभासीं सांगूनी ॥ तिमिंगिल मत्स्य आणविला ते क्षणीं ॥ शरभ म्हणे सेतू शोधूनि ॥ वेगें आणूनि देइंजे ॥४१॥

नाहीं तरी अयोध्यानाथ ॥ तुम्हांस शिक्षा करील बहुत ॥ यावरी तिमिंगिल बोलत ॥ राघवापुढें ते वेळां ॥४२॥

मी दर्शनास येतेवेळे ॥ मागें येत होतीं लघु बाळें ॥ त्यांही गिळिला शीघ्रकाळें ॥ बाळभावेंकरूनियां ॥४३॥

तयां हातें बांधवीन क्षणांत ॥ अथवा स्वपृष्ठीचा करीन सेत ॥ हास्यवदन करी रघुनाथ ॥ म्हणे करणी अद्भुत बाळांची ॥४४॥

गर्वहत नळ होऊन ॥ खालीं पाहे अधोवदन ॥ असो मत्स्यशिशूनें सेतू उगळून ॥ आणून ठेविला पूर्वस्थळीं ॥४५॥

मग त्यापुढें कपी नळ ॥ सेतू बांधिता जाहला विशाळ ॥ परी जळी पडतां ते अचळ ॥ मत्स्य गिळिती सेवेगें ॥४६॥

मत्स्य गिळिती अचळ ॥ उगाचि तटस्थ पाहे नळ ॥ तो मत्स्यरूपी केशव विशाळ ॥ जळचरांप्रति सांगतसे ॥४७॥

म्हणे मी आणि रघुवीर ॥ दोघे एकरूप साचार ॥ सेतुबंधनासी निर्धार ॥ विघ्न कांही न करावें ॥४८॥

नळासी साह्य होऊन ॥ तळीं पृष्ठी द्या अवधे जण ॥ असो पर्वत गिळितां राहिले मीन ॥ नवल जाहलें ते वेळीं ॥४९॥

परी पर्वत शिळा उसळोन ॥ दूर जाती वाहून ॥ नळाची विकळ मति होऊन ॥ तटस्थरूप जाहला ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP