नारायणहंसाख्यान - सिध्दावस्थेची कसोटी

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


जय जय सदगुरु परमहंसा । आदिगुरु मायाविलासा । मुमुक्षुसाधकां शिकवसा । मूर्ति धरोनी ॥१॥

वर्णरहित ब्रह्मविद ब्राह्मण । आश्रमरहित आश्रमीं आचरण । हें तुझें तूंचि जाणसी विटंबन । इतरां न कळे ॥२॥

व्यतिरेकेसी ब्रह्मज्ञान । हेंचि ब्रह्मचर्याचें लक्षण । तोचि तूं गृहस्थ नांदसी परिपूर्ण । अन्वयरुप अलिप्तत्त्वें ॥३॥

निरंजनीं जया वास । तोचि वानप्रस्थ अति सुरस । सर्व कर्मांचा जो उपन्यास । हाचि संन्यास ज्ञात्यासी ॥४॥

येरांचे आश्रम वेगळे वेगळे । चारीही नसती एका काळे । हें नवल ज्ञानियाचे सोहळे । एकदाचि चारींचे ॥५॥

असो नारायणगुरु परमहंस । मूर्तिमान होती जगदुद्वारास । चारीही आश्रमांसी वास । जयाचे ठायीं ॥६॥

परी वेगळालेहि स्थूलमानें असती । त्यांत दोन निवेदिलें यथामति । आतां वानप्रस्थ ऐका श्रोतीं । ब्रह्मारणीं संचार ॥७॥

श्रीसदगुरुलक्ष्मणहंसांची । आज्ञा घेवोनिया साची । वाट धरिली असे पूर्वीची । मातापुराकडे ॥८॥

प्रथम तळणीग्रामासी आले । स्वामीसंनिध एक रात्र राहिले । तेथोनि दुसरे दिनीं जों निघाले । तों एक भाविक भेटला ॥९॥

तेणें अश्वावरी बैसवोनी । मातापुरी घातले नेउनी । भोजन जालिया निघती तेथुनी । शिखराकडे ॥१०॥

मार्गी देवीचें स्थळ पाहिलें । परशरामाचें अवलोकिलें । पुढें सर्वतीर्थावरी पातले । राहते जाले तेथ ॥११॥

शिखरावरीही जाउन । दत्तमूर्तीचें घेतलें दर्शन । पुन्हां मागुती सर्वतीर्थ येउन । मागील स्मरण करिती ॥१२॥

तेथें मुख्य स्थान दत्तात्रयाचें । त्यावरी राहणें नागनाथहंसांचें । रुद्राराम ही वशीनले साचें । यथास्थानीं ॥१३॥

लक्ष्मणहंसही तेथें राहोन । गेले असती स्वच्छंदेंकडून । तस्मात पुण्यपावन हें स्थान । तरी येथेंचि वास करुं ॥१४॥

म्हणोनि रात्रि क्रमोनी प्रात :काळीं स्नान केलें तीर्थजळीं । स्नान संध्या करोनि सकळी । गुरुतीर्थ सेविलें ॥१५॥

लिंबाचा पाला तोडोनि खादला । उदक घेवोनि ढेंकर दिधला । तेथें एक ब्राह्मण असे राहिला । घरदार सोडोनी ॥१६॥

प्रतिदिनीं अन्न येतसे वरोनि । तेथें भोजन करितसे पाक करोनी । तेणें बोलाविलें भोजनालागोनी । तंव तया न येऊं म्हणती ॥१७॥

मज राहणें येथें बहु दिन । कवणासी मागणें नाहीं अन्न । आणि स्वहस्तेंहि न करी जाण । तरी निंब खाउनि राहूं ॥१८॥

तो म्हणे जोंवरी तुम्ही रहाल । मागणें ना करणें तुम्हा लागेल । मजसी आपुली सेवाच घडेल । तरी भोजन करीत जावें ॥१९॥

नारायणहंस ह्मणती वडील तुम्ही । तुमचीच सेवा करावी आम्ही । तंव बाबा म्हणे एकत्र धामीं । साह्य असावें एकमेकां ॥२०॥

नंतर उभयतांनीं भोजन केलें । ऐसेंचि प्रतिदिनीं चालिलें । परी लिंबाचा पाला खाउनी पहिलें । अल्पसें अन्न खावें ॥२१॥

तो ब्राम्हण पुरश्चरण । करित असे प्रतिदिन । तया निवारिना हंस नारायण । करावेंचि प्रतिपादी ॥२२॥

मनीं ह्मणती आपणही त्यासवें । पुरश्चरणचि करुं लागावें । उगेचि व्यर्थ का रिक्त बैसावें । मार्ग लागेल दुजिया ॥२३॥

कांहीही नसतां प्रयोजन । तेथें आरंभिलें पुरश्चरण । गुरुमंत्राचें अनुष्ठान । एकाग्र केलें ॥२४॥

त्रिकाळही दत्ताचिये दर्शना । जाती उभयतांही प्रतिदिना । भागवताचेंही पुराणश्रवणा । अत्यादरें जावें ॥२५॥

तेथील एक असे वदंता । कीं दत्तात्रेय भलते वेषें तत्त्वतां । येतसे सह्याद्रिपर्वतावरुता । दर्शन देत कवणाही ॥२६॥

हें ऐकतांचि नारायणहंसें । अंतरामाजीं हसूं येतसे । हे सर्व अज्ञान जीव कैसे । एकदेशी भाविती ॥२७॥

हा जो जो मिळे समुदाय । तो तो अवघा एकचि दत्तात्रेय । परी यांसी कोणें म्हणावें काय । एवं विस्मय पावती ॥२८॥

असो नारायणहंस जिकडे जिकडे । फिरत असतां पर्वतीं कोडें । जे जे कोणीहि दृष्टींस पडे । तें तें रुपडें दत्ताचें ॥२९॥

असो सहा मास जालियावरी । पुरश्वरण संपलें निर्धारी । तेथील ओळखीहि जाली सारी । गोसावियांची ॥३०॥

भवानीभारती भेटला । तो शब्दज्ञानी असे भला । परी किमपिही स्वानुभवाला । ठावचि नाहीं ॥३१॥

तया अंधळियें थोर सळिलें । भलतेंचि पुसावें जें मना आलें । परी तयासी स्वानुभवें खंडिले । शब्दजात जितुकें ॥३२॥

तो म्हणे नागनाथहंस योगी । म्यां पाहिलें असती बहु माझी सलगी । रुद्रारामबावाहि प्रसंगीं । म्या देखिलें असती ॥३३॥

नारायणहंस म्हणे निर्भीड । गाईचे कासेंसी जैसे गोचिड । तयांसी दुग्ध त्यागोनी रक्त गोड । तेवीच तुम्ही पाषांडी ॥३४॥

असो तितुकें कोठवर बोलावें । परि तो खळ कदाही न द्रवे । मग त्यासी भाषण सोडोनि स्वभावे । निवांत राहती ॥३५॥

एके दिनीं एकादशीसी । नारायणहंस स्वच्छंदेसी । एकलेंच आले कैलास टेकडीसी । तेथील असनधुणी पाहिली ॥३६॥

माघारी फिरतां एका वृक्षातळीं । एक गोसावी देखिला नेत्रकमळीं । परी भाव कीं दत्ताविण या भूमंडळीं । दुजे तरी असेचिना ॥३७॥

म्हणोनि मनोभावें करुन वंदन । करिते जाले पुढें गमन । तंव ते गोसाविये अवलोकून । हांक असे मारिली ॥३८॥

अरे कारे मजसी न बोलतां । जासी उतरुन टेकडी खालुता । मजसी ओळखी गा बापा पुरता । कोण असे जो मी ॥३९॥

नारायणहंस बोलती वंदून । एक गुरु हंसचि परिपूर्ण । तेथें ओळखी अथवा नोळखण । दोन्ही ही नसती ॥४०॥

तंव पुनरपि गोसावी बोलत । गुरुसी नामाचा नसे काय संकेत । येरु म्हणे नाम तरी श्रीदत्त । अनंतरुपी एक ॥४१॥

तरी तूंच निश्चयेसी दत्त अससी । हें ऐकतांचि हर्ष जाला मानसी । मग धावोनी धरियेलें पोटेंसी । नारायणहंसा ॥४२॥

अगा बापा मीच दत्तात्रेय । वरु मागें जें मनीं आवडीं होय । नंतर जगदुद्वारा करी जाय । तुज मज भेद असेना ॥४३॥

तंव हांसोनि बोले नारायण । वर हा मागावा सांगा कवण । देहादिकीं आत्मयान । हेंचि मज न कळे ॥४४॥

देहादिकासी वरप्राप्ती । तरी देहादि नासतां वरही नासती । आत्मा तो असंगपणें चिन्मूर्ति । तया वराची अनपेक्षा ॥४५॥

तथापि आत्मस्थितिच दृढ व्हावी । हे जरी प्रार्थोनी मागावी । तरी आत्मयासी प्रवृत्तिच नव्हे बरवी । या मायिक जगासह ॥४६॥

जरी प्रवृत्तिच खरी झाली असती । तरी निवृत्ति कल्पांती न होती । तस्मात आत्मया आत्मवीं दृढ रहावी स्थिति । हेही मागणें फोल ॥४७॥

या रीती आपणचि उपदेशून । सदृढचि केले परिपूर्ण । आतां परिक्षितसा होतें कीं उत्थान । कीं समाधान राहें ॥४८॥

तरी हे गुरुराजया समर्था । तूंच एक कीं सर्व पदार्था । या वेगळें नामरुपा सर्वथा । मीपणा ठाव असेना ॥४९॥

ऐसे ऐकोनिया वचन । आनंदें आलिंगिला नारायण । प्रेमअश्रूनें डवरिले नयन । उभयतांचेही ॥५०॥

अगा सखया धन्य तुझे ज्ञान । धन्य तो जेणें केलें समाधान । स्वप्नींही देहबुध्दि नव्हे उत्पन्न । कोण उपमा तुज देउं ॥५१॥

आतां तुवां येथून जावें । भीमातीरीं जाउन रहावें । सहवासे जन उध्दरावें । आमुचें आर्शीर्वादें ॥५२॥

मागुती हंसे केली विनंति । उठाठेवीच नसावी कोणती । कोण बुडे कीं तारावें निश्चिती । गुरुशिष्यउपाधि नको ॥५३॥

श्रीदत्त म्हणती गा बापा प्राज्ञा । जरी न इच्छेसी उपाधि सुज्ञा । परी अनायासें संभवेल ही आमुची आज्ञा । अन्यथा नव्हे ॥५४॥

तरी तुवां सुखेंचि वर्तावें । घडणें तेंचि घडेल स्वभावें । परी अपुले संप्रदायीं माझें वागवावें । चिन्ह योगदंडाचें ॥५५॥

आणिक एक सांगतों तुजसी । येथें अंधळिया भवानी भारतीपासी । रुद्राक्ष ठेविला रुद्रारामहंसासीं । तो तयासी मागोनि घ्यावा ॥५६॥

पुढें संप्रदाय वाढता क्षणीं । आज्ञा करावी तयालागोनी । कीं जप रुद्राक्षमाळेवांचोनी । न करावा कवणें ॥५७॥

इतुकें बोलुनिया श्रीदत्त । अंतर्धान ते जाले पावत । नंतर नारायणहंस गमन करित । शिखरावरी ॥५८॥

भवानीभारतियाजवळी जाऊन । म्हणती आमची वस्तु द्यावी आम्हांलागुन । तेणेंही पाहिली आठवुनि खूण । रुद्राक्ष दिधला ॥५९॥

मग सर्वतीर्थावरी येऊन । रुद्राक्ष दाविला बाबालागुन । तेणें शिखेमाजीं केला बंधन । जे न सुटे मागुता ॥६०॥

तंव शेवाळियाची यात्रा आली । तेव्हां सर्व वार्ता श्रुत जाली । कीं गुरुच्या देहास व्यथा उध्दवली । समाधान न पडे ॥६१॥

मग तया यात्रेचिया समागमीं । निघोनि पातले शेवाळें ग्रामीं । पुढें व्यथाही राहिली अनुक्रमी । नंतर गुरुगृहींच वास ॥६२॥

दासबोध निगमसार । विवेकसिंधु आदिमकर । लिहुनि ठेवियले सुंदर । सदगुरुहीं ॥६३॥

तंव तेथें गोविंदबुवा गुरुपुत्र । वैराग्यशील आणि स्वतंत्र । पातला असे परम पवित्र । आचरण ज्याचें ॥६४॥

तो हटयोगामाजीं असें पुरा । कर्तृतंत्रज्ञानेंही खरा । तयाची नारायणहंसाची त्त्वरा । भेटी जाली ॥६५॥

तयासी सदनासी आणिलें । गुरुमाउलीसी भेटविलें । लक्ष्मणहसेंहि ठेऊन घेतलें । साधक म्हणउनी ॥६६॥

पुसदचा एक बळवंतराजा । तो मुमुक्षु असे वोजा । तेणें पाचारुन गुरुसी सहजा । नेलें ग्रामासी ॥६७॥

तेथें जावोनी लक्ष्मणहंसे । तयाचिया अधिकारा ऐसें । साधन सांगितलें जैसें । करितां अधिकार वाढे ॥६८॥

मागुती शेवाळिया येऊन । गोविंदबुवा सांगितलें वर्तमान । तया उभयतांही मिळोन । आज्ञा केली नारायणा ॥६९॥

कीं गुरुभक्तीचें पूर्ण लक्षण । कायिक वाचिक मानसिक सेवन । याचें प्रगट व्हावें निरुपण । ऐसें कथन करी ॥७०॥

आज्ञा वंदोनिया सत्त्वर । ग्रंथ केला गुरुभक्तिसार । तो उभयतांपुढें यथाप्रकार । वाचोनिया दाखविला ॥७१॥

नंतर उभयतांहीं एके दिनीं । एकांतीं बोलती एकमेकांलागुनी । म्हणती नारायण हा होय शिरोमणि । ज्ञानियांहिमाजीं ॥७२॥

परी कसून यासी पहावें । समाधान दृढ राहे कीं भंगे स्वभावें । हें अमुचेनें करणें न संभवे । लक्ष्मणहंस बोलती ॥७३॥

तरी तुवा पहावें कसूनी । ऐसी आज्ञा होता क्षणीं । तो म्हणे आज्ञा हे मजलागोनी । करणें अगत्य ॥७४॥

मग तेणें आरंभ छळावयासी । करिता जाला नारायणहंसांसी । तितुकें तो न बोलवें वाचेसी । परी अल्पसें बोलूं ॥७५॥

लक्ष्मणहंसही पुसदासी गेल । मागें गोविंदबावानें छळण । मांडिलें । केव्हां धरोनिया ओढिलें । रस्तियामाजीं ॥७६॥

लोकांसी म्हणावें पहा पहा चोर । धरोनि आणिला म्यां सत्वर । आणि ताडितसे वारंवार । लोक तटस्थ पाहती ॥७७॥

परी लज्जित नव्हेचि अंतरीं । हें ओळखून तदनंतरी । ह्रदयीं सप्रेमभावें धरी । मग स्तुति करी अपार ॥७८॥

अत्यंत स्तुति करितां करितां । मुखाकडे पाहे तत्त्वतां । म्हणे कारे हर्ष जाला चित्ता । यास्तव पादुका फेंकून मारी ॥७९॥

केव्हां म्हणे तुज गुरुसेवा नाहीं घडली । तरी या पलंगीं बुक्या मारी आज्ञा केली । जरी किचित आळसें हस्तक्रिया राहिली । तरी मी जीवें मारीन ॥८०॥

बहुत वेळ जरी लोटतां । पुरेंहि न म्हणे तत्त्वतां । किंचित अंगमोडाहि देतां । म्हणे होसी सेवाचोर ॥८१॥

आतां तुज प्रायश्चित देईन । निराहार करी एकवीस दिन । अथवा उभा राहे कर जोडून । कांहीं काळ जालिया पुरें म्हणे ॥८२॥

आतां म्हणे भोजन करी । तुज प्रायश्चित जालें निर्धारी । मग तीक्ष्णादि वाढी निजकरीं । खातां नेत्रीं उदक ये ॥८३॥

मागुती म्हणे का रे कुसमुसिसी । आम्हीं सळितों हें वाईट वाटे तुजसी । तरी आतां आम्ही जातों वेगेंसी । अभाविकापासीं न राहो ॥८४॥

मग पळतचि अरण्यांतरीं धांवे । नारायणें रडत पाठीं लागावें । अहा दयाळा क्षोभोनि न जावें । अडवें पडावें पदांवरी ॥८५॥

मग म्हणे आम्ही सदना येऊं । रक्त देशी तरी सव्वाशेर पेऊं । नारायण म्हणे सर्वस्वें देऊं । यांत विशेष काय ॥८६॥

मग सदनीं आणून चाकू घेतां । कांपावयासी सिध्द होतां । मग हस्त धरोनि बोले तत्त्वतां । म्हणे मी काय राक्षस ॥८७॥

केव्हां वाढवेळ उभेंचि करावें । केव्हां करीत असें ओणवें । केव्हां म्हणे नेत्र झांकोनि बैसावें । उघडितां जीवें मारीन ॥८८॥

खाय म्हणोनि शेण हातीं द्यावें । खाऊं जातां हस्तावरी ताडावें । ऐसें किती म्हणोनि सांगावें । परी भाव न भंगे सहसा ॥८९॥

एकदां मायबाईनें व्यंकटीसी । काज सांगितलें करी वेगेसीं । तो म्हणे मी करीन तिसरा प्रहरासी । थांबा आतांचि करीना ॥९०॥

हें ऐकतांचि गोविंदबुवा । कोपला जैसा प्रळयाग्न बरवा । म्हणे तुमचा संगचि नसावा । अभक्त गुरुचे ॥९१॥

नारायणहंसें क्षमापविलें । जी जी अन्याय पाहिजे क्षमा केलें । परी तयासी लोटून दिधले । चालिला अरण्यांत ॥९२॥

नारायणहंसही लागे पाठीं । तयामागें धांवतसे व्यंकटी । मायबाईहि चालिली उठाउठी । तयामागें ताई ॥९३॥

वनांत एके ठायीं बैसला । नारायणहंसें साष्टांग केला । सर्वही लागती चरणाला । परी तो न ये म्हणे ॥९४॥

मायबाईसी म्हणे नारायण । तुम्ही सदनासी जा अवघेजण । मी आले तरी आणीन समजाउन । नाहीं तरी जाईन समागमें ॥९५॥

मग ते सर्वही सदना गेले । नारायणहंसें बहुत विनविलें । परी नायकेंचि कांहीं केलें । तमोगुणरुपी ॥९६॥

माझे पाठिसी कां लागसी । धोंडे घेऊनि मारी वेगेंसी । येरें साष्टांग घातिलें चरणासी । म्हणे मारा परी सदना चला ॥९७॥

तुम्हांसी जाणेंचि जरी असिलें । तरी सदगुरुहंस येतील पहिलें । तयाची आज्ञा घेऊनि जा वहिलें । निमित्त देऊनि जाऊं नका ॥९८॥

मग म्हणे गुरु -अवज्ञा जे जाली । ते म्यां अपुले कर्णी ऐकिली । माझीही गुरुभक्ति सटवली । तरी मी प्रायश्चित करीन ॥९९॥

तुझेंही वाटेल जरी अंतरीं । उभा राहे एक पदावरी । चळसी तरी वृक्षांची फांटी धरी । मी पुरें म्हणे तंव ॥१००॥

मग नारायण तैसाचि उभा राहे । गोविंदबावा काय करी लवलाहे । वृक्षी उलटें टांगोनि राहे । लोंबत भूमीसी ॥१०१॥

अस्तमानापासून दिन उगवला । पर्यंत उभयतां राहती उगला । दिन उदय होतां गोविंदबावा उतरला । पुरें म्हणे नारायणहंसां ॥१०२॥

मग येते जाले सदनासी । आनंद जाला मायबाईसी । स्वयंपाक करुनी भोजनासी । सारिती अवघे ॥१०३॥

एकदां म्हणे नारायणहंसांसी । अजि मधुकरी जरी मागसी । तरीच भोजन करुं उपवासी । नातरी राहूं ॥१०४॥

तथास्तु म्हणुनी मधुकरी आणिली । मग आवडीनें सर्वी भोजनें केलीं । एके दिनीं म्हणे बहु अवधि लोटली । लक्ष्मणहंसाचे भेटीसी ॥१०५॥

तरी चाल जाऊं पुसदासी । उभयतां निघती तया क्षणासी । गांवाबाहेर येतां त्या समयासी । पर्जन्य थोर जाला ॥१०६॥

परी माघारे तरी न फिरती । महादेवाचे देवळीं राहती । पर्जन्य उघडला तरी वस्ती । देवालयींच करिती ॥१०७॥

तेथेंचि भोजनें सर्वीं सारावी । नारायणहंसें मधुकरी आणावी । दिनभर तेथेंच वेळ काढावी । आणि रात्रींही उभयतां राहती ॥१०८॥

असो लक्ष्मणहंस पुसदाहुनी । पातले असती स्वकीयसदनीं । वर्तमान सर्वही ऐकोनी । किंचित कोप आणिला ॥१०९॥

मग गोविंदबावासी पाचारिलें । म्हणे इतुकें अघटित काय केलें । असो आतां भोजनें संपादा वहिलें । मधुकरी न आणवितां ॥११०॥

नंतर गोविंचबावानीं एकांतीं । सांगितली जे जे झाली कृति । परी चळली नाहीं चित्तवृत्ति । आपुले कृपेकडोनी ॥१११॥

पुढें आषाढी पौर्णिमा आली । सर्वीं गुरुपूजा सांग केली । आरती नारायणहंसें घेतली । सानसीं पात्रीं ॥११२॥

तंव गोविंदबावानें वातीचा जुंबाडा । तया पात्रीं टाकिला धडफुडा । ज्वाळा चालिल्या असती भडभडा । परी हातावरी शीतळ ॥११३॥

आरत्याही लांबविल्या बहुत । सर्वही पहाती विस्मित । असो आरती जालिया समाप्त । पात्र तळीं ठेवी ॥११४॥

मागुती उगेंच बोट लाविलें । तंव बोट जळोनि फोड आले । परी हस्तावरी असतां नाहीं पोळलें । आरतीचे समयीं ॥११५॥

नंतर भोजना बैसती सारी । तव गोविंदबावा काय करी । तिखटाचा गोळा पात्रावरी । लक्ष्मणहंसाचे ठेविला ॥११६॥

भोजनकाळी प्रसाद मागत । चटणी नारायणासी द्या म्हणत । सदगुरु होतां संकोचित । आपणचि घेऊनि दिधला ॥११७॥

नारायणहंसें हस्त पसरोनी । गोळा टाकिला तत्क्षणीं वदनीं । गिळुनि घेतला अति हर्ष मनीं । पुढें काय जालें ऐका ॥११८॥

रात्रीं गोविंदबावा निजला । तंव स्वप्नीं पूर्णानंद गुरु आला । अतिकोपेंसी ठोकिता जाला । म्हणे मज त्त्वां कां सळिलें ॥११९॥

जागें होऊनि जंव पाहूं लागे । तंव जिव्हेसीहि फोड आले वेगें । मग नारायणहंसांपुढें येऊनि साष्टांगें । नमिता झाला ॥१२०॥

नारायणहंस म्हणे करुणाघना । पाहिजे इतुकी करावी छळणा । परी न करावें मजसी नमना । म्हणोनी साष्टांग नमिलें ॥१२१॥

मग म्हणे जालें तें जालें । तें सर्व पाहिजे क्षमा केलें । आतां तूं मज गुरुरुप वहिलें । केल्याची शिक्षा पावलों ॥१२२॥

असो मागुती लक्ष्मणहंस । गेले असती पुसदास । समाधान नाहीं शरीरास । ऐसें वर्तमान आलें ॥१२३॥

मायबाईचे मुखाकडून । नारायणहंसें ऐकिलें वर्तमान । मी आतांचि भेटीसी जातों म्हणून । निघाले एकटे ॥१२४॥

गोकुळअष्टमीचा निराहार । दुसरे दिनींही न घेता आहार । लागतांचि चवथा प्रहर । पुसदासी पावले ॥१२५॥

तेथें सर्वसेवेसी जाला अधिकार । तेणें अति आनंदयुक्त अंतर । ऐसें लोटले अहोरात्र । एकवीस दिन ॥१२६॥

अंगें हंस असोनि निरवडी । हंसदास्यत्त्वाची अति आवडी । निज ब्रह्मत्त्वहि परतें सांडी । गुरुसेवेपुढें ॥१२७॥

एकदां निद्रेमाजीं असतां । स्वप्नामाजीं एक पुरुष आला अवचिता । तो म्हणे तुझे गुरुसी असे उवणीता । पूर्णता नाहीं ॥१२८॥

हें ऐकतांचि खडबडोनि उठे । हें काय हो स्वप्न वोखटें । तेणें अंत :करणासी धैर्य फाटे । जेवी मस्तकीं पडे वज्र ॥१२९॥

गुरुनिंदा नायकावी कर्णी । ऐकतां जिव्हा त्याची काढावी उपडोनी । अथवा भस्म करावा शाप देउनी । नातरी पुन्हां मुख न पहावें ॥१३०॥

जागृतींत तरी व्यक्ति भिन्न । नावलोकिता येईल वदन । परी स्वप्नामाजीं दुजें कवण । मनचि पुरुषाकृति जालें ॥१३१॥

तरी गुरुनिंदा मजचि जाली । अहा प्रारब्धा घरबुडी जाली । गुरुभक्ति एकाएकी सटवली । आतां मी वांचेना सहसा ॥१३२॥

जालें समाधान बिघडलें । सर्वगात्रें कांपूं लागलें । नेत्रीं अश्रूंचें पूर दाटले । हें देखिलें गुरुनाथें ॥१३३॥

अगा बापा जालें काय । काळवंडोनि कां गेला सूर्य । जी जी मी मेलों मेलों म्हणोनि धरी पाय । सर्वही उपाय बुडाले ॥१३४॥

रडत रडत सांगें वर्तमान । मज गुरुनिंदेचें घडलें दूषण । ऐसिया देहासी प्रायश्चित आन । देहांतावीण नाहीं ॥१३५॥

तरी मी देहासी कडेलोट करीन । अथवा अग्नीं उडी टाकीन । आता आज्ञा द्यावी मजलागून । किंचित क्षमा न करावी ॥१३६॥

ऐसें ऐकतांचि सदगुरु हासती । हेचि काय ज्ञानाचि संपत्ति । अरे सत्य कोठें असे जागृति । कीं स्वप्न सत्य होईल ॥१३७॥

अगा सत्यासी असत्यत्व न यावें । असत्यासी सत्यत्वें नचि व्हावें । ज्ञानाचें रुप याचि नावें । हें तो अज्ञान प्रत्यक्ष ॥१३८॥

अगा अझोनी देहासी गुरु कल्पिसी । येथें वंद्य निंद्य व्यर्थ भाविसी । तरी अंतर पाहे विचारेसी । गुरु नव्हे साडेतीन हात ॥१३९॥

अनंत ब्रह्मांडे गुरु व्यापला । तो काय निंदास्तवनामध्यें आला । वंद्यनिंद्य रुप देह हा अथिला । परि हे अज्ञानभ्रांति ॥१४०॥

असो ऐसें अनादि गुरुत्त्व जें संचलें । तें केव्हां आम्ही वंचोनि ठेविलें । उपदेशमात्रें तुजसी वोपिलें । आतां तुझें रुप काय ॥१४१॥

तथापि अहंकारादि देहांत । यासि घडावें प्रायश्चित । ऐसें वांछितसे तुझें चित्त । तरी करि सांगूं ऐसें ॥१४२॥

मीच करीन देहत्यागासी । ऐसा जो अभिमान दृढ धरिसी । जाळावें ययाचि अभिमानासी । पूर्ण ज्ञानाग्निमाजीं ॥१४३॥

अगा स्वप्नीचा व्याघ्र लटिका दिसे । जागे करणार पुरुष काय साच असे । तैसें शिष्यत्त्व अज्ञानें उमसे । तरी गुरुत्त्व काय अन्यथा ॥१४४॥

तस्मात हें जीवाचें भाविलें । हें तरी अगत्य पाहिजे सांडिलें । या दोहींहून निजगुरुत्त्व संचलें । तं तूंचि कीं निजांगें ॥१४५॥

ऐसें ऐकतां सदगुरुवचन । साष्टांग घाली हंसनारायण । जी जी चिदगगनीं संशयमेघ भासमान । जाला होता तो निरसला ॥१४६॥

वचननिर्धार हा प्रळयवात । जेधवां सुटला अति अदभुत । एकदेशी संशयाभ्र किंचित उरे कोठोनी ॥१४७॥

असो ऐसे गुरुशिष्य एक जाले । नंतर उभयतां शेवाळिया आले । गोविंदबावासी वर्तमान सांगितलें । लक्ष्मणहंसें ॥१४८॥

एकदा लक्ष्मणहंस गोविंदबाबा । एकेमेकां बोलती स्वानुभवा । हंसगुरु म्हणतीं गा मज बरवा । विचार आठवला असे ॥१४९॥

नारायणासी जगदुद्वारा । पाठवावें वाटे माझ्या अंतरा । तंव गोविंदबावाही म्हणती सत्वरा । कीजे लवलाही ॥१५०॥

मग नारायणहंसांसीं बोलाउनी । सांगती कीं जावें संचारालागुनी । सहजगती अधिकारी मिळता क्षणीं । उद्वारागती पाववी ॥१५१॥

आशय जो होता दत्तात्रेयाचा । तोचि निघतां सदगुरुहंसांचा । तथास्तु महाप्रसाद जी साचा । तत्क्षणीं साष्टांग नमी ॥१५२॥

नंतर वसमतीपावेतों उभयतां । मिळुनि आले असती तत्त्वतां । पुढें नारायणहंस एकट चित्ता । आनंदोनि चालिले ॥१५३॥

जेवी रामआज्ञेवरुनी समर्थ । धरिती कृष्णातीराचा पंथ । तेवींच भीमातीर करावया सनाथ । नारायणहंस चालले ॥१५४॥

वत्सालागी स्वेच्छा गाउली । कास भरोनि जेवीं धांवली । तेवी हंसमाय कृपेसहित वोळली । चिमणिया बाळावरी ॥१५५॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नारायणहंसाख्यान निगुती । षष्ठ प्रकरणीं ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP