श्रीसदगुरुहंसांचे चरणीं । केवीं जावें मुमुक्षूनीं । हें कळे नारायणहंसाचे व्याख्यानीं । वृत्ति घालितां ॥१॥
असो षण्मास विरह होत्साता । स्वजनीं कीं विजनीं एकरुपता । एक वेळ निघोनि अवचिता । येता झाला पाथरी ॥२॥
तेथें एक स्वामीची गांठ पडली । तेधवां अंतरीं कल्पना केली । कीं मनकामना पुरेल वहिली । दर्शन सफळ होय ॥३॥
म्हणोनि घातले साष्टांग । हस्त जोडोनि विनविलें सांग । हे गुरुराया मी शरण अभंग । श्रीचरणां आलों ॥४॥
तरी माझें अंतर साक्षित्त्वें जाणून । उपदेशावें मज अपरोक्ष ज्ञान । तंव स्वामी बोलताती वचन । मजपासुन प्राप्त नव्हे ॥५॥
परी मजपाशीं ज्ञान अहे ऐसें । हें ज्ञातयाविण कळेल कैसें । तेंचि ज्ञान तुजपासीं असे । स्वसंवेद्य ॥६॥
तया स्वसंवेद्याची व्हावी प्राप्ति । तरी सदगुरु पाहिजे निश्चिती । तया सदगुरुची खूण तुजप्रति । सांगेन ऐकावी ॥७॥
लक्ष्मणपंत नामें रोजगारी । रहात असती वसमतीमाझारीं । तयांसि शरण जाऊनि झडकरी । उपदेश मागावा ॥८॥
तंव नारायण असे बोलत । मी जाणत असे लक्ष्मणपंत । प्रपंचीच तरी मज तया असत । अंतर केवी ॥९॥
सदा ते आम्हीं रोजगारप्रकरणीं । चर्चा करीत होतों अनुदिनी । परी परमार्थाची गोष्ट कर्णीं । कधीं ऐकिली नाहीं ॥१०॥
तंव स्वामी म्हणती तुज पडिलें काय । आम्हीं सत्य सांगतों तूं मौनेंचि जाय । तुझी पूर्णता तेथेंचि होय । हें भाष्य घे आमुचें ॥११॥
तूं प्रापंचिक म्हणुनि कल्पना करिसी । तरी ऐक बापा सांगेन दृष्टांतासी । जया साकर घ्यावया जाणें दुकानासी । तेणें वाणियाकाडे न पहावे ॥१२॥
रक्तपितीहि वाणियां असतां । साकर उणी नव्हे तत्त्वतां । तैसी देहाची क्रिया न पाहतां । ज्ञानरहस्य घ्यावें ॥१३॥
आत्मा परमार्थी ना प्रपंची । जैसा असे तैसाचि । तरी हे माझी वाणी यथार्थ साची । मानोनी शरण जावें ॥१४॥
ऐसें ऐकतांचि तथास्तु म्हणोनी । निघता झाला साष्टांग नमोनी । चालिला त्त्वरें वसमतीलागुनी । मार्गी चार दिवस लागले ॥१५॥
परी मन संशया क्षणक्षणा । निश्चयचि करितसे स्वामीचे वचना । मागुती भलतीच होतसे कल्पना । पुन्हां निश्चय होय ॥१६॥
तंव रात्रीमाजीं स्वप्न देखिलें । एक वानर सानसें आलें । तेणें हलवुनी उठविलें । आणि रागें रागें बोलत ॥१७॥
कारे तुज स्वामीनीं सांगितलें असतां । वाउग्या कल्पना करिसी चित्ता । तुझी लक्ष्मणहंसावीण पूर्णता । अन्य स्थळीं नव्हे ॥१८॥
तुझा अधिकार असे तीव्रतर । म्हणोनी प्रबोधशक्तीचा नको विस्तार । एक अनुभवाच्या खुणा पडतां कानावर । अपरोक्ष पावसी ॥१९॥
तस्मात माझें हें वचन सत्य मानोन । जाई लक्ष्मणहंसांसी शरण । तूं मी तो हें त्रिधा न पाहोन । कार्यसिध्दि करीं ॥२०॥
ऐकतांचि खडबडोनी जागा झाला । विस्मित होउनिया बैसला । म्हणे काय म्यां हा संशय होता धरिला । तरी अपराधी थोर मी ॥२१॥
असो गुरुराया न कळोनि घडिले । अपराध ते क्षमा पाहिजे केले । पुढें दृढ निश्चय करुनीं गमन होते झालें । वसमतीसी ॥२२॥
लक्ष्मणहंस ओसरीवरी बैसले । हें नारायणें दृष्टीसीं देखिलें । अंगणींच साष्टांग घातले । तेणें विस्मय हंसांसी ॥२३॥
हा हा म्हणोनी उडी घातली । नारायणाची तनु आलिंगिली । स्वकरें नेत्राची अश्रु पुसिली । लक्ष्मणहंसें ॥२४॥
नंतर ओसरिये जाउनि बैसती । काय हेतु लक्ष्मणहंस पुसती । तंव नारायणा न बोलवे निश्चिती । फुंद दाटोनी येतसे ॥२५॥
मग वाढवेळ सावरोनी । विनंति करिता होय नमोनी । मी शरण आलों चरणांलागोनी । तरी उपदेशावें अनन्या ॥२६॥
तंव लक्ष्मणहंस म्हणती आतांचि काय । प्रपंचाचा पुरता का अनुभव न होय । पुढें आपेआप होईल उदय । परमार्थाचा ॥२७॥
हें उत्तर ऐकतांच दचकले । कीं उपेक्षा करिती ऐसें दिसोनि आलें । म्हणोनि बोलतसे जी उपेक्षिलें । न पाहिजे समर्थे ॥२८॥
लोळणी घातलीसे चरणा । जी जी नुपेक्षावें मज दीना । अपुलें म्हणावें उदगारवचना । नाभी म्हणोनी ॥२९॥
मग निर्धार पावोनि हंसरायें । म्हणती बापा असावें निर्भय । तुझें ठेवणें जें मजपासीं अद्वय । ते देऊं तुझें तुज ॥३०॥
नागनाथ श्रीगुरुनें मजसी । तृप्ति जे दिधलीं अहर्निशी । तितुकीही ओपीन तुजसी । हे आज्ञाचि समर्थांची ॥३१॥
श्रीगुरुनें आज्ञा मज असे केली । कीं भुकिस्ते न पाहिजे फिरविली । अनुकूल कण्या भाकरी स्वीकारिली । पाहिजे आवडीनें ॥३२॥
पक्वान्नें मजपासीं असती ना । परी तृप्तींत उणें कधीं असेना । हें ऐकतांचि आनंद नारायणा । स्वप्नींचा प्रत्यय आला ॥३३॥
जी जी अन्य विषयांचें नसे काज । एक दाखवावी माझी मज समज । यर तत्त्वांचा पाल्हाळ सहज । उडे सक्रिय ॥३४॥
राजा बैसतां राज्यासनीं । राजचिन्हें उमटती येवोनी । राज्यीं बैसविणेंचि आपणावांचोनि । कवणासी नव्हे ॥३५॥
शाखा मज अंगुळिये दावा । तेणें चंद्ररुप पावेन स्वानुभवा । येर पाल्हाळाचा नलगे गोवा । ऐसें विनवोनि वंदिले ॥३६॥
तथास्तु म्हणोनि नारायणासीं । नाभी शब्दें दिधलेंअभयासी । परी आम्हां आजचि जाणें शेवाळियासी । तरी समागमें चलावें ॥३७॥
शेवाळियाची सरदेशपांडेगिरी । अर्पिली यजमानें आम्हा करीं । तेथें जावोनी राहों सहपरिवारी । परि तुर्त आतां सडे जाऊं ॥३८॥
नंतर भोजनें जालियावरी निघाले । उभयतांही शेवाळियासी पातले । रात्रिमाजीं नारायणें विनविलें । जे संप्रदाय पाहिजे चालिला ॥३९॥
मुख्य उपदेश तरी ज्ञानाचा । येथें उपयोग नसे अन्याचा । परी लोकरीती आचरणाचा । मार्ग रक्षिला पाहिजे ॥४०॥
तरी मंत्र -उपदेशही द्यावा । मग पाववावें स्वानुभवा । अणिक इच्छा असे जी गुरुसेवा । दिधलीच द्यावी ॥४१॥
मग लक्ष्मणहंसें दुसरे दिनीं । शैवदीक्षा नि :सीम पाहोनी । शिवमंत्र सांगितला कर्णी । गुरुनामासहित ॥४२॥
आणि सोहमात्माहि आपण । आणि शिवगुरु हीं नामें दोन । एवं ही त्रिपुटी एकीकरण । विचारितां ज्ञान हेंचि ॥४३॥
असो नारायणहंस आनंदले चित्तीं । सेवाहि करितसे यथाशक्ति । आतां ऐका उपदेश -उक्ति । अल्परीती बोलिजे ॥४४॥
नारायणा सन्मुख बैसविलें । लक्ष्मणहंसें बोलूं आरंभिलें । तुझें तुज रुप दावीन परि घेतलें । पाहिजे त्त्वां विचारें निवडोनी ॥४५॥
हा स्थूल देह जो दिसतसे । याच्या अंतरीं प्राण वाहतसे । येथेंचि मायेपासोनि तत्त्वें अपैसे । असतीं ओळखावी ॥४६॥
पंचभूतें आणि त्रिगुण । आणि सत्रा तत्त्वें जाण । मात्राही तेथेंचि असती व्यापून । चारी वाणी सहित ॥४७॥
पांच विषयही जागृतीचे । आणि अवस्था धर्मही बुध्दीचे । चलन जें होतसे प्राणाचें । त्यांत सर्वही विलोकावें ॥४८॥
जीव शिव अविद्या माया । हे सर्व जाणावे तया ठाया । तेथील सर्व अनुभव घेवोनिया । बोलो येई मजपुढें ॥४९॥
तीन दिवस अवधि तुज दिधली । इतुकें समजून पाहे वेगळालीं । तथास्तु म्हणोनि चरणीं मिठी घातली । मग जात एकांता ॥५०॥
निवांत वायु लक्षीत बैसला । सर्व प्रतीतीस आणिलें वेगळाला । ती दिवसाचा नेम होता केला । तो साधिला एके दिनीं ॥५१॥
मग साष्टांग नमोनि पुढें बैसे । हस्त जोडोनि विनवीतसे । जें जें जितुकें अनुभवा आलेंसे । तें अल्पसें चरणीं निवेदूं ॥५२॥
नाभीपासोनि भ्रुकुटी पावेतों । अधोर्ध्ववायु हा चालतो । जेवी आकाशीं वायु वाहतो । तेवीच ह्र्दयीं ॥५३॥
त्यांत तो मी शब्द हा उठत । परी तो कोण तयाते सांडित । मीच म्हणोनिया अनुभवित । तया प्राणासवें ॥५४॥
गगनीच्या वायूंत शब्दहि असे । परि मी हा अनुभव नसे । या प्राणवायूंत उमटतसे । मी म्हणोनी ॥५५॥
हें कार्य तो अगत्य करुं । अमुक हें हातीं न धरुं । हाचि जाणिलासे अहंकारु । उठे ते समयीं ॥५६॥
तोचि अंतरीं मी मी करित । हे हे म्हणोनि बाहेर धावत । शब्दस्पर्शादि प्रकार होत । दहा तयाचे ॥५७॥
शब्दादि विषय तो बाहेर असती । परी ध्यासरुपें अंतरींहि वसती । या इतुकियासीहि एकचि वृत्ति । निवडी बरें वाईट ॥५८॥
ते वृत्ति पदार्थहि नसतां । उत्पन्न करितसे अतौता । बरें तरी सुखावे पाहतां । वाईट तरी दु :ख ॥५९॥
असो जे अंतरीची वृत्ति । तेही पंचधा पावे विकृति । प्रथम आठवण जे होय स्फूर्ति । संकल्पा आधीं ॥६०॥
हर्ष भयादि खेदात्मक । उगीच होत असे दचक । तेचि जाणिलें अंत :करण एक । निर्विकल्परुप ॥६१॥
क्षणा चांगुलें वाईट क्षणा । संशयात्मक उठे जे कल्पना । तया वृत्तिरुप मना । ओळखिलें तेधवां ॥६२॥
मग उभयतातून एक निश्चय करी । होय अथवा नव्हे झडकरी । तेचि बुध्दि हें कळलें अंतरीं । उठतां क्षणीं ॥६३॥
त्या निश्चयाचें करी चिंतन । होय होय नव्हे नव्हे स्फुरण । तयाचें चित्त हें अभिधान । तेंही ओळखिलें तेथ ॥६४॥
अहंकार तो मी म्हणोनि उठे । हें अगत्य करुं कीं न करुं उमटे । धरी देहतादात्म्य गोमटें । तोही अंतरीं जाणिला ॥६५॥
आणिक येथील एक प्रकार । त्या वायूसरिसा उठे स्वर । त्या स्वराचे पन्नास अनुकार । अकयादि होती ॥६६॥
प्रकार चारचि या इतुकियांचे । प्रथम स्फूर्तीत गुप्तत्त्वें राहणें त्यांचें । भाव जे का असती आठवणीचे । तेचि परी वाचा ॥६७॥
पुढें तया अक्षरांचें उठणें । स्पष्ट नसे परीभास होणें । तेचि पश्यंती ऐसी ओळखिली मनें । अंतरामाजीं ॥६८॥
पुढें स्पष्ट मननीं उदभवती । भिन्न भिन्न मातृकही उमटती । तेचि मध्यमा वाचा चित्तीं । अनुभविली असे ॥६९॥
त्यापुढें वैखरी तोचि उच्चार । दंती ओठी ताल आदि प्रकार । संधीतून उमटतां नाद सधर । वेगळाले वर्ण उमटती ॥७०॥
असो हे इतुके प्रकार नाना । परी ते एकचि स्फूर्ति वाटे मना । हें अनुभविलें तितुकें श्रीचरणां । निवेदिलें ॥७१॥
आणीकही काय काय प्रकार असती । ते ते निरुपावे मजदीना प्रति । इतुकें ऐकतां सुखावे गुरुमूर्ति । म्हणती हा अधिकारी थोर ॥७२॥
आतां यासी शाखा दाखवावया । अनमान करावा कासया । शब्दासरिसा झेपाउनिया । अनुभवचंद्रीं जाईल ॥७३॥
मग बोलती कुर्वाळुनी । सावध असावें गा निरुपणीं । आणीक मासले असती त्या स्फुरणीं । तेही अनुभउन घेई ॥७४॥
पिंड ब्रह्मांड या उभयांची । रचना तेथें असे साची । ते वेगळाले जाणोनि आत्मयाची । स्थिति कैसी ते जाणावी ॥७५॥
प्रथम स्फुरण जें उठलें । तें एक परी द्विधा पाहिजे कळलें । प्रकृतीचें चंचळ नाम ठेविलें । जाणतेपणा तो पुरुष ॥७६॥
शिवशक्ति आणि नटेश्वर । त्या प्रकृतिपुरुषा जाण ते निर्धार । ते तेथेंचि ज्ञानअज्ञानांचे प्रकार । दोनीहि असतीं ॥७७॥
स्फुरणाचें कळणें या नांव ज्ञान । स्फुरणाविण न कळें तें अज्ञान । ज्ञान विद्या अज्ञान अभिधान । अविद्या असे ॥७८॥
विद्येंत बिंबला तो शिव । अविद्येंत बिंबला तो जीव । परी पाहतां स्फुरणाचा स्वभाव । एकचि असे ॥७९॥
त्या स्फुरणीं तिन्ही गुण समान । तेंचि गुणसाम्याचें लक्षण । गुण वेगळे न होतां क्षोभ होण । ते गुणक्षोभिणी ॥८०॥
शांति दांति जे उठती । हे सत्वगुणाची प्रतीति । मुळीं उत्पन्न जाली जे ज्ञानशक्ति । पंचधा वृत्ति तो सत्वगुण ॥८१॥
कामक्रोधादि तीव्र वृत्ति । ही रजोगुणाची विकृति । इंद्रिय प्राण जे क्रियाशक्ति । हाही रजोगुण ॥८२॥
आळसादि वृत्ति हा तमोगुण । पंचतन्मात्रादि भूतसंघ निर्माण । हेही द्रव्यशक्तीचें लक्षण । दृश्यरुप तम ॥८३॥
स्फुरणीं शब्द आणि अवकाश । चंचळरुप उठे जो स्पर्श । हेचि पोकळपणें अवकाश । तोचि वायु ॥८४॥
भासकत्त्वें विषयासी दिसे रुप । तेंचि महाते जाचें स्वरुप । मृदु रसरुप तें आप । ओळखावें स्फुरणीं ॥८५॥
कठिण नेणपणा अज्ञान । तेंचि पृथ्वीचे लक्षण । एवं ऐसें स्फुरण विवंचून । पाहे मागुती ॥८६॥
आठव भास तत्त्वाची स्पष्टता । चौथी प्रकटली दृश्याकारता । हेचि चारी देह असाती तत्त्वतां । पिंड ब्रह्मांड उभयांचे ॥८७॥
व्यष्टीसी म्हणावें एकपिंड । समष्टीसी नाम ब्रह्मांड । परी जिन्नस एकरुप कोड । मासला दुजा नाहीं ॥८८॥
इतुकें अंतरीं अनुभवी म्हणतां । नारायण एकांता होय जाता । तितुक्याहि अनुभउनी वृत्तांता । येउनिया निवेदी ॥८९॥
मग साष्टांग नमुनी पुसतसे । जी जी तो महाशब्द उठतसे । मीमीचे प्रकार इतुकें कळलेंसे । परी तो कैसा नेणवे ॥९०॥
तरी तो कोण कैसा अनुभवावा । हें मज सांगावें स्वानुभवा । जेणें समूळ मीपणाचा गोवा । तुटोनि जाय ॥९१॥
गुरु म्हणती ऐक सावधान । तया तोतोचे लक्षण दोन । एक स्फुरणामाजीं असे व्यापून । एक स्फुरणाआधीं ॥९२॥
परी अगोदर स्फुरणीं जें उमटे । तेंचि अनुभवावें गोमटें । कोणतें म्हणसी तरी तत्क्षणीं दाटे । स्फुरणादितृणांत ॥९३॥
चतुर्धा वृत्ति दशेंद्रिय । चतुर्धा वाचा पंचधा विषय । त्यांत साक्षित्त्वाचा अन्वय । अकुंठित चाले ॥९४॥
स्फुरणापूर्वी जो सामान्य प्रकाश । जो का होता अविनाश । तोचि विकारामाजीं आला विशेष । यास्तव तो मी तो मी म्हणे ॥९५॥
तो तरी स्वकीयत्त्व घेउनी उठतसे । परी अन्यथा मानिलें उपाधिवशें । देहद्वयासी विभागोनि असे । द्विधा होउनी ॥९६॥
पंचधा व्यापारीं देह वावरे । ते जागृति स्थूलाचे अनुकारें । ते क्षणीं मीं म्हणोनि जो स्फुरे । तो विश्वाभिमानी ॥९७॥
अंतरीं मी मी माझें हें बाहेरी । त्याच विश्वाभिमानाची द्विधा परी । त्या विकारा यथार्थ जाणतां निर्धारी । तो मी मूळरुप असे ॥९८॥
प्रत्यक्ष विषय न होतां देहाचा । जो बुध्दि आठवी अंतरीं साचा । तोचि अनुकार सूक्ष्म स्वप्नाचा । त्याचा अभिमानी तैजस ॥९९॥
तयाचीही लक्षणें द्विविधता । अंतरीं उठती मी मी कर्ता । तोही मीपणा विचारोनिया पहातां । स्वप्रकाशरुप ॥१००॥
हे देहद्वय अवलंबावया कारण । मुळीं स्वकीय निजरुपाचें विस्मरण । तेचि जाणिजे शरीर अज्ञान । उत्पत्तिस्थान दोहींचें ॥१०१॥
इंद्रियांसहित वृत्ति शिणोनी । लय होय ती सुषुप्ति अभिधानीं । तया नेणतेपणाचा अभिमानी । तोचि गा प्राज्ञ ॥१०२॥
आतां तुजला सांगतों खूण । असत्य तितुकें स्फुरणापासून । सत्य जे स्फुरणासी अधिष्ठान । हे दोन्ही निवडोनि घे ॥१०३॥
सत्यरुपाचा साभिमान घ्यावा । असत्याचा अभिमान त्यागावा । अणिकही प्रकार सांगेन ऐकावा । सत्यअसत्यांचा ॥१०४॥
अवस्था तीन वाचा चार । या इतुक्यांत जें सदा निरंतर । तेंचि सत्य जाणावें निर्धार । स्वस्वानुभवें ॥१०५॥
एक येतां एक जाय । एक उद्ववतां एकाचा लय । ते ते मिथ्या जाणे निश्चय । अंतरीं विचारोनी ॥१०६॥
हेचि अन्वय व्यतिरेक समज । बापा सांगातलेसे तुज । तरी विचारें ओळखुनी सहज । सांगें मज पुढें येवोनी ॥१०७॥
इतुकें ऐकतां साष्टांग केलें । एकांतीं जावोनि विवरिलें । दृढ अनुभवोनि येवोनि बोले । तेंही ऐका किंचित ॥१०८॥
जी जी तिन्ही अवस्थेंत आणि वाचेंत । एकचि जाणणें असे सदोदित । परी अवस्थाहि एकएकांत । नाढळती पाहतां ॥१०९॥
वैखरींत तिन्ही वाचा असती । परी मध्यमेंत वैखरींची समाप्ति । मध्यमेंतहि उभय वाणी उमटती । परी मध्यमा नसे पश्यंतीत ॥११०॥
पश्यंतीमाजीं परा असे । परी परेमाजीं एकही नसे । अन्वय व्यतिरेक ऐसे । ओळखिलें अंतरीं ॥१११॥
ज्ञान अज्ञान भासकपणा । जागृतिमाजीं असती जाणा । परी जागृति नसे माजीं स्वप्ना । किंचित व्यापार ॥११२॥
ज्ञान अज्ञानीं दोनी स्वप्नीं । परी स्वप्न जागर नसें अज्ञानीं । केवळज्ञानीं नसती तिन्ही । परी ज्ञान अज्ञानीं असे ॥११३॥
अथवा सुषुप्तींत स्वप्न जागर । न उमटती किंचित भात्र । आणि स्वप्नामाजींही नसे साचार । जागृतिझोपेचा ॥११४॥
जागृतिमाजीं तरी पाहतां । स्वप्नसुषुप्तीची नसे वार्ता । एवं एकामाजीं एक अवस्था । नसती मिथ्या म्हणोनी ॥११५॥
परी तिन्ही अवस्थेमाझारी । जाणीव एकली असे निर्धारी । तस्मात ज्ञानचि एक अंतरीं । सत्यरुप वाटे ॥११६॥
पांच विषयही जागृतीचे । वेगळाले परी ज्ञान एक साचें । तैसेंचि ज्ञान जें जागृतीचें स्वप्नींहि तेंचि ॥११७॥
सुषुप्तिमाजींही तेंचि ज्ञान । सामान्यत्त्वें असे व्यापून । एवं ऐसें ज्ञान प्रकाशमान । सत्य असे तिही काळीं ॥११८॥
या रीती सत्य असत्य निवडिले । सत्य ज्ञान प्रत्यया आलें । स्फुरणापासून विषयांत दाटलें । साक्षीरुपें ॥११९॥
स्फुरणापूर्वी जें ज्ञान होतें । तेंचि स्फुरणीं उमटलें आयतें । म्हणोनि तो मी ऐसें बोलिजेते । स्फुरणउत्थानीं ॥१२०॥
परी स्फुरण उठोनि जे प्रतीति । अनुभवा येतसे अति । तेचि स्फुरणाचिया अंतीं । अनुभवा न ये ॥१२१॥
विशेषांतील जो अनुभव । तो तरी वृत्तीचा स्वभाव । होतां समूळ वृत्तीचा अभाव । अनुभूतिहि व्यर्थ ॥१२२॥
तरी वृत्तिअभावीं जो ज्ञानप्रकाश । जो सामान्यत्त्वें निर्विशेष । कळला पाहिजे निर्दोष । तेंचि ज्ञान सत्य ॥१२३॥
तरी कृपा करुनि स्वामिराया । मज लोटावें ठायीं तया । वृत्तिवीणही माझें मिया । ओळखावें स्वरुप ॥१२४॥
तंव गुरुराज म्हणती सावधान । तूं नानुभवे म्हणसी सामान्यज्ञान । तरी वृत्तीचा लय जाणतसे कोण । तुजवांचुनी ॥१२५॥
वृत्तिकाळीं वृत्तिसाक्षी ज्ञान । जाणत असे वृत्तिलागून । परी वृत्तीचा लय देखे आपण । तोचि सामान्यदेखणा ॥१२६॥
वृत्ति --उत्थानीं अनुभव घेतला । कीं अमुक वेळ लय होता जाला । तो अनुभविला विषय आठविला । किंवा नानुभूत ॥१२७॥
वृत्ति --अभावीं जाणिलें नसतां । उत्थानीं लय कळे केउता । तस्मात सामान्य प्रकाश आयता । अनुभविला निश्चयें ॥१२८॥
वृत्ति काळींच सामान्यत्त्वाचा । अनुभव घ्यावा लयसाक्षित्त्वाचा । हेचि शाखा दाविली तुज साचा । आतां लक्षी स्वानुभवचंद्र ॥१२९॥
ऐसें ऐकतांचि सदगुरुवचन । वृत्ति धृतिमाजीं जाली लीन । स्वरुपीं स्वरुपचि स्वानुभवावीण । उर्वरित उरलें ॥१३०॥
दोन मुहूर्त निवांत ठेला । तया निर्विशेषाचा ओघ लोटला । उत्थानकाळीं प्रकाश दाटला । सामान्याचा ॥१३१॥
शरीरीं रोमांच उठलें । थरथरा गात्रें कापूं लागले । नेत्रीं अश्रूंचे ओघ लोटले । विस्मय पावलें । मनादि ॥१३२॥
गुरुचरणीं मिठी घालून । मंद मंद करीतसे स्तवन । हे गुरुराया काय होऊं उत्तीर्ण । मजमाजीं मज मेळवी ॥१३३॥
सदगुरुसींहि आनंद जाला । सत्शिष्य स्वात्मत्त्वें आलिंगिला । म्हणती तुझा तुज प्रत्यय बाणला । आतां दृढ करी अभ्यासें ॥१३४॥
नंतर विवेकसिंधूचें निरुपण । साग्र बिंबविलें स्वानुभावेंकडून । या रीती एक मास लोटला अनुदिन । संवादसुखें ॥१३५॥
गुरुमुखें अर्थ जो श्रवण करावा । तो मननें ह्रदयीं साठवावा । तत्क्षणीच निदिध्यासें दृढ खलावा । जे पुन्हां संशय नुरें ॥१३६॥
असो मास लोटल्यानंतर । वसमतीस आले सत्त्वर । तंव शोधूं आले पंत गंगाधर । भेटले उभयतांसी ॥१३७॥
मग सदगुरु लक्ष्मणहंस । आज्ञापिते जाले नारायणहंसांस । जे तुवां जावें मातापितयांस । सेवेनें संतोषावें ॥१३८॥
तंव नारायण विनवी कर जोडोनी । आतां मी प्रपंच करीना जनीं । एक सदा असावें गुरुचरणीं । कीं स्वेच्छा संचरु ॥१३९॥
तस्मात मज सहसा प्रपंचार्थी । आज्ञा न करावी जी समर्थी । मजलागी कवणिया ही अर्थी । संबंध असेना ॥१४०॥
सदगुरु म्हणती नव्हे ऐसें । तुज दृढ अपरोक्ष जालें नसे । तेंचि खलोनि वृत्ति -अभ्यासें । अति दृढ करी ॥१४१॥
जैसी देहबुध्दि होती बळकट । ऐसी ब्रह्मबुध्दि करी निघोट । परी हें प्रपंचींच साधेल अविट । प्रपंच त्यागितां नव्हे ॥१४२॥
स्वजनीं असोनि मी -माझें जावें । व्यापारांत असतां कर्तृत्त्व न उठावें । उपाधि नसतां गेलें हें कळावें । कासयावरोनी ॥१४३॥
तस्मात आमुची आज्ञा हेंचि प्रतिपाळन । करोनि जावें सदनालागुन । स्थिति दृढ करी अनुदिन । विस्मरण पडाचि नेदी ॥१४४॥
नारायणहंसाचिये चित्तीं । प्रपंच न करावा निश्चिती । परी सदगुरु जेव्हां अज्ञापिती । तेव्हां उपाय नाहीं ॥१४५॥
मग नमोनी नारायणहंसें । विनवी आज्ञेमुळें मी जातसे । परी माझा उल्हास जो मानसें । तो पुरविला पाहिजे ॥१४६॥
इतुकें प्रार्थूनि पितियासवें । गेले असती सुखस्वभावें । पुढें वर्तमान कैसें कैसें व्हावें । तें बोलोल बाळ चिमणें ॥१४७॥
इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नारायणहंसाख्यान निगुती । चतुर्थ प्रकरणीं ॥४॥