श्रोते सावधान । नारायणहंसाचें कथन । परमात्मा पूर्ण सच्चिद्वन । अमूर्तचि मूर्ति ॥१॥
आदिनारायणापासून । अंतींही हंस गुरु नारायण । व्यक्ति मात्र दिसती भिन्न भिन्न । परी मुख्य रुप एक ॥२॥
घट अनेक मृत्तिका एक । अलंकार भेद न भेद कनक । तेवी अस्ति भाति प्रियात्मक । एकचि हंसगुरु ॥३॥
नामभेद मात्र जरी कल्पिले । तितुकेही नेहटून जरी पाहिले । एकाचि व्यक्तिमाजीं देखिलें । कर्तृत्त्व सर्वांचे ॥४॥
मुख्य परमात्मा ब्रह्म अनंत । तो तरी व्यापून असे आदि अंत । अहं ब्रह्म स्फूर्ति जे उदभुत । तेही या व्यक्तींत सिध्द ॥५॥
सत्त्वगुणेंचि देह धरिला हंसरुपें विष्णु जो प्रगटला । तोचि ब्रह्मया बुध्दीतें शिकविता झाला । आणि राहिला मुख्य प्राणीं ॥६॥
वेदार्थाची व्हावी उभवणी । तोचि ब्रह्मा बुध्दि राहे अधिष्ठुनी । देहक्रिया चालवितो वसिष्ठ मुनि । निष्कर्मपणें अलिप्त ॥७॥
अहंकाररावणवधासी । राम अवतरे बुध्दिकौशल्याकुशीं । पुढें पावला ऐक्यसाम्राज्यपदासी । देहअयोध्याग्रामीं ॥८॥
परी तो जाणता मुख्य प्राणा सोडून । न राहे तोचि देही हनुमान चंचलचि जानकी ज्ञान -चळण । निवडी कोण तयासी ॥९॥
या इतुकियांत हंसगुरु । प्रगटे जो निर्विकार विचारु । याचें कारण जें अज्ञानअंधकारु । कलिरुप निरसावा ॥१०॥
कलिमाजीं समर्थ प्रगटले । परी अज्ञानकलीचें निसंतान केलें । गुरुशिष्यपण हरोनि उरलें । गुरुत्त्व गुरुत्त्वें ॥११॥
तया एकरुप गुरुत्त्वाचे । सहा मासले भिन्न भिन्न नामाचे केले परी एकत्त्व न वचे । कवणेही काळीं ॥१२॥
तेचि उध्दव माधव रुद्राराम । नागनाथ लक्ष्मणहंस परम । सहावा भाग हंस नारायणनाम । प्रगटले कलियुगीं ॥१३॥
परी आदिनारायणापासून ज्या कृति । नारायणहंसी उमटल्या निश्चिती । तरी पहावया जावें अन्यत्र व्यक्ति । कासया दुजे ठायीं ॥१४॥
जैसें आकाशादिकांचे गुण । पृथ्वीत व्यापले येऊन । तेवी सर्व व्यक्तींचें गुरुत्त्व लोटून । आलें नारायणीं ॥१५॥
तेंचि गुरुत्त्व सत्शिष्य अंतरा । प्रगट होईल ज्ञानद्वारां । परी पाहिजे अधिकारी तो पुरा । अनन्यभावार्थी प्राज्ञ ॥१६॥
इंधनही अग्निच होतसे । परी मिळणी जाली पाहिजे विश्वासें । शिष्यासी गुरुत्त्वचि लाहे अपैसें । अनन्य होतांचि ॥१७॥
येथें पडेल कोणी संशयीं । कीं गुरुत्त्व पहिलेंच शिष्याचे ठायीं । नसे काय उदभवलें या समयीं । याचें उत्तर ऐका ॥१८॥
काष्ठी अग्नि असेचि पहिला । परी वरुनी अग्निसंग जाला । मग तो हा अग्नि मिळोनि जाळिता जाला । सर्व आकार काष्ठाचा ॥१९॥
तेवी शिष्याचे ठायीं सामान्य प्रकाश । पूर्वीच कीं असे अविनाश । वरी गुरुरुप गुरुत्त्वें प्रवेश । तेव्हां नाश शिष्यअज्ञाना ॥२०॥
तस्मात गुरुरुपीं अनन्य असावें । तेणें तत्क्षणींच गुरुत्त्व पावावें । प्रज्ञावंत बळेंचि घे स्वभावें । अनन्या वोपावें गुरुनाथें ॥२१॥
यास्तव चिमणें बाळ गर्जोनी । विनवीतसे मुमुक्षुलागुनी । अनन्य व्हावें प्रज्ञावंत असोनी । तरी गुरुत्त्व वोळे आपसया ॥२२॥
शिष्यासी गुरुत्त्व प्राप्त व्हावें । याचि हेतू गुरुपध्दतीसी बोलावें । कारण कीं गुरुमाहात्म्य सत्शिष्या कळावें । तेणें गुरुसेवा लाहे ॥२३॥
तया गुरुसेवेनें गुरुचि होइजे । म्हणोनि गुरुसी ओळखिलें पाहिजे । तस्मात गुरुपध्दति चरित्र सहजें । बोलिलें असे ॥२४॥
आदिनारायणा पासोनिया । पावेतों लक्ष्मणहंसराया । निरोपिले अष्टकीं सहाविया । पर्यंत यथामति ॥२५॥
आतां नारायणहंसांचें चरित्र । नारायणहंसच बोलतसे पवित्र । परी निमित्त चिमणीया बाळाचें वक्त्र । बोलिलें म्हणोनी ॥२६॥
हंसाची हंसें वर्णिली कृति । येथेंही शंका करील कोणी चित्तीं । कीं आपुली आपण केली स्तुति । हेंही अपूर्व ॥२७॥
तरी ऐका सावधपणें । हंसगुरुसी दुजें काय होणें । एक आत्माचि पूर्णपणें । नामरुप सर्व जगीं ॥२८॥
हें सर्वही जग मीच असे । ऐसा स्वानुभव जेथें वसे । तेथें एक देहाचें मीपण काइसें । उध्दवेल स्वप्नीं ॥२९॥
जेथें बोलणें तें तें आपुली स्तुति । तेथें आणावी कोठून दुजी व्यक्ति । श्रोते वक्तेही कोठें असती । गुरुविण दुजे ॥३०॥
तस्मात कोणीही कवणाची स्तुति । केली तरी आपणचि आपणां स्तविती । आणीकही एक बोलिजे युक्ति । तेही अवधारा ॥३१॥
आपण तरी आत्मा असंग । तेथें स्तुतीचा कोठें उद्योग । परादिका स्तविती जरी असंग । तरी त्या भिन्न आत्म्याहुनी ॥३२॥
ब्रह्मीं वेदवाणी जाली उत्पन्न । तेचि स्तवी ब्रह्मस्वरुपालागून । येथें ठेवील कवण हो दूषण । पशुवांचोनिया ॥३३॥
आत्मा ब्रह्म गुरुरुपावांचून । कोण करील उपदेश कथन । अवघे हे जडतत्त्वें म्हणून । गुरुच वर्णी गुरुसी ॥३४॥
तस्मात हंसचि करी स्तवन हंसाचें । श्रोतेवक्तेही हंसचि साचे । येथें किमपिही संशयाचें । काज नाहीं ॥३५॥
आतां ऐका सावधान । नारायणहंसांचें कथन । हें अष्टक सातवें पहावें अवलोकून । मननविचारें ॥३६॥
पूर्वाष्टकीं लक्ष्मणहंस । प्रपंच परमार्थ चालविती उभयांस । तेणें वैराग्य उपरम पावले लोपास । ऐसें वाटतें येरा ॥३७॥
ज्ञान तेथें दोनी असती । तेणेंविण बाणेना कदा स्थिति । परी आच्छादिल्यापरी वाटे स्थिति । दृष्ट दु :ख असे म्हणोनी ॥३८॥
हाचि विस्मय लक्ष्मणहंसांसी । जाला असे किंचित मानसीं । इतुकें आठवलें मानसीं । ऐसी व्यक्ति धरावी ॥३९॥
तों मानसीचा हेतु प्रगटला । नारायणहंसरुपें अवतरला । तेचि कथा चिमणिया बाळाचे बोला । ऐका आदरें ॥४०॥
इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नारायणहंसाख्यान निगुती । प्रथम प्रकरणीं ॥१॥