नागनाथहंसाख्यान - ज्ञानोपदेश

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रीरुद्रारामहंस कळवळोनी । नागनाथासी सन्मुख बैसवीनी । बोलती बापा सावधपणी । तुझें समाधान देऊं तुज ॥१॥

परी त्याग केलियावांचुन । तुझें तुज नव्हेचि ज्ञान । त्या ज्ञानाचें जें होतसे विज्ञान । समाधान तेंचि ॥२॥

तूं म्हणसी म्यां त्यागिलें । संपत्ति स्वजन सर्व अव्हेरिलें । परी हें त्यागाचे रुप नाहीं जालें । शाखा तोडितां मूळ उरे ॥३॥

सर्वस्वें जेणें त्याग केला । तो त्यागकर्ता अहंकार उरला । त्या मीपणाचा त्याग नाहीं जाला । तरी त्यागिलें काय ॥४॥

त्या अहंकारें देहबुध्दि धरिली । तेणेंचि बध्दता बळाविली । तिही अवस्थेमाजी दृढता जाली । एका अभिमानाची ॥५॥

जागृतीमाजीं जो अभिमान । तया विश्व हें असे अभिधान । स्वप्नामाजीं जें उठे मीपण । तया नांव तैजस ॥६॥

झोपेमाजींही नेणिवेचा । अभिमान घेतसे तो प्राज्ञ साचा । एवं तिही अवस्थेंतही अभिमानाचा । वोहटचि नव्हे ॥७॥

ऐसा दृढतर जो अभिमान । जावया व्हावें आत्मज्ञान । ओळखोनी आपणास आपण । अंगें ब्रह्म व्हावें ॥८॥

अंगें ब्रह्म ज्या क्षणीं होणें । त्या क्षणीच विरिजे या अभिमानें । या ज्ञानेवीण जें जें कांहीं करणें । तेणें अभिमान दुणावे ॥९॥

तूं म्हणसी आत्मज्ञान व्हावया । हटयोगादि केलें उपाया । परी ते कष्ट मात्र गेले वाया । करणें तें न केलें ॥१०॥

वृक्षावरोनि मार्ग म्हणतां । वाट न मिळे वृक्षीं वेंघतां । तैसें हटयोगें वायु कोंडितां । आत्मज्ञान कैचें ॥११॥

वृक्षाशेजारीं वाट पहावी । तेणें मार्गे जातां कार्यसिध्दि व्हावी । तैसी विचारेंचि जाणावी । आत्मस्थिति आपुली ॥१२॥

अग्नि लागला जया घरा । बळें घुसतां वाचेना त्या माझारा । तेवी कोंडोनि बैसतांहि वारा । सुटेल कैसा ॥१३॥

आपणांसी धरितील कोणी । यास्तव चोरटा मोटेंत राहे लपोनि । तयासी सुटला हे न कोणी । तैसा हटयोगी मुक्त नव्हे ॥१४॥

विचारे आत्मा नाहीं जाणितला । उगाचि शून्यामाजीं जावोनि पडला । तो इहपरसुखासी मुकला । जेवी झोपाळूं झोपें ॥१५॥

तरी याचा विचारचि करावा । कीं हा कैसा पडिला बंधगोवा । जयासी विकार दिसती तो कोण व्हावा । सत्य कीं मिथ्या ॥१६॥

राजा निजला अंथरुणीं । तो महार जाला असे स्वप्नीं । तया महारासि खरे मानी कोणी । कीं राजयासी ॥१७॥

जागृतीवीण महारपणा । जावया शीण केले नाना । तरी राजा येइल राजपणा । हे सहसा न घडे ॥१८॥

तैसा आत्मा परिपूर्ण आपण । अज्ञानें घेतलें देह -अहंपण । तें अज्ञान न जातां कोटी केलें साधन । तरी आत्मया आत्मा न भेटे ॥१९॥

राजा स्वशयनीं जागा होय । तरी महारपणाचा अपसया क्षय । तेंवि आत्मज्ञानाचा होता उदय । अहंकार निमे देहबुध्दीचा ॥२०॥

तस्मात नागनाथा एक करावें । विचारें निजरुप ओळखावें । आतां निर्विकार करणें नको नवें । आधींच परिपूर्ण ॥२१॥

मी देह मात्र जें मानिलें । इतुकें नि :शेष पाहिजे गेलें । येणें नसतांचि बंधन असे पडिलें । देहबुध्दीचें ॥२२॥

हा देह तरी पंचभूताचा । उगा समुदाय मिळाला तत्त्वांचा । हा आपण तरी असे कैचा । उद्ववे निमे आपणापुढें ॥२३॥

मनाचिये सहवासें । देह जागरीं वावरतां दिसे । त्याचें पापपुण्यात्मक कर्म होतसें । तें आत्मया केवी ॥२४॥

तें कालत्रयीं आपण नसतां । मी देह भाविलें भ्रांतीनें चित्तां । हाचि विश्वाभिमानी तत्त्वतां । मी माझें स्फुरवी ॥२५॥

आपण आत्मा मी परिपूर्ण । ऐसा निश्चय दृढ करुन । देहबुध्दीचा त्याग करण । स्वप्नामाजींही ॥२६॥

स्वप्नींही मी देह न वाटतां । मग कवणासी उपजेल ममता । मी माजे हें निपटून जातां । विश्वाभिमानी मेला ॥२७॥

आताम बुध्दिवृत्तिचियामुळें । देहाचा ध्यास धरिला बळें । तोचि तैजस अभिमानी उफाळे । आपण आपणा न देखतां ॥२८॥

देह अलंकार दशेंद्रिय । प्राण कर्मे सर्व क्रिया होय । परी मी कर्ता म्हणे न्याय अन्याय । हेंचि कीं विस्मृति आपुली ॥२९॥

हें पुण्यात्मक कर्म म्यां केलें । यास्तव पुढें सुख पाहिजे भोगिलें । अथवा पापात्मक जें जें घडलें । याचें दु :ख भोगीन पुढें ॥३०॥

ऐसा कर्ता भोक्ता मीच एक । हेंचि तैजरसाचें रुपक । हें सांडावेम निश्चयात्मक । आपण असंग जाणोनी ॥३१॥

ऐसें अभ्यासें दृढ करावें । कीं मी अकर्ता स्वप्नीं उठावें । देहो वर्तेना काम सुखें नावें । परी असंग आपण ॥३२॥

या रीती अकर्तेपणे जालिया । कोण भोगी क्रियमाण यया । एवं मरण आलें तैजसाभिनिया । आप आपणा भेटतां ॥३३॥

आपआपणासि भेटला । हाचि निर्विकल्पें अनुभव जाला । तोचि अनुभव उपजवी त्रिपुटीला । हेंचि मूळाज्ञान ॥३४॥

तेंचि आपण अंगें असतां । वेगळा पडे अनुभव घेतां । सहज परिपूर्ण जो ऐता । त्याचें विस्मरण जालें ॥३५॥

धन्य मिया ब्रह्म जाणिलें । इतुक्या अभिमानें फुंजूं लागलें । हेंचि प्राज्ञाभिमानाचें रुप जालें । विचारोनि पहा ॥३६॥

मग जैसा असो तैसा असे । मज जाणताही कोणी नसे । ऐसा ध्यास जरी अखंड उमसे । तेव्हां मरे प्राज्ञ ॥३७॥

आतां जाणो जातांही मीच असे । न जाणतांही मी मजमाजीं वसें । आतां स्मरणविस्मरण तें काइसें । निर्विकारीं विकार ॥३८॥

इतुकाही खरखरा तुटला । कोणतेही देह -अवस्थेला । तेव्हां जाणावें अंगेंचि जाला । निमाला प्राज्ञ ॥३९॥

मुळींच आपणासी बंध जाला नाहीं । आतां मोक्ष असे कोठें कांहीं । या रीती होय गा नि :संदेही । हेंचि समाधान ॥४०॥

ऐसा तूं आत्मा परिपूर्ण । तेंचि कीं ब्रह्म जगा अधिष्ठान । जग देह हे भासती नामभेदेंकडुन । परी तूंचि परिपूर्ण अससी ॥४१॥

आतां कांहीं संशय असतां । पुसे आम्ही सांगूं मागुता । अथवा निश्चय जाला असेल तत्त्वतां । तरी स्वानुभव बोले ॥४२॥

ऐसें ऐकतांचि गुरुवचन । नागनाथ घाली सांष्टांग नमन । मी कृतकृत्य जालों पावन । तेंही ज्ञान नष्ट जालें ॥४३॥

आतां आहे तैसेंचि आहे । बंधमोक्ष किमपि न साहे । अखंड स्थिति ऐतीच राहे । कांही केलियाविण ॥४४॥

ऐसें असतां मी काय कष्टलों । व्यर्थचि नेणोनि श्रम करिता जालों । परी सुखाचा लेशहि नाहीं पावलों । संनिधचि असोनी ॥४५॥

आतां स्वामींनी कृपा केली । संशयाची मुळी खांदिली । पूर्णासी पूर्ण स्थिति दिधली । कृपाकटाक्षें ॥४६॥

मागुती करोनि नमस्कार । विनवितसे वारंवार । सदगुरु म्हणती गा निर्धार । जाला तुझा तुज ॥४७॥

आतां आज्ञा घेऊन जावें । उरलें प्रारब्ध भोगून सारावें । शरण येती तयांसी तारावें । ज्ञानोपदेशें ॥४८॥

तंव नागनाथ म्हणे जी महाराजा । अधिकारी पावतील ज्ञानें सहजा । परी भाविक मंदप्रज्ञ वोजा । तया भजनपूजन पाहिजे ॥४९॥

तस्मात राममंत्र मजसी द्यावा । तरीच संप्रदाय चालेल बरवा । ऐकतांचि गुरुहंसराज देवा । आनंद जाला ॥५०॥

तेव्हां मग राममंत्र रामनाम । प्रणवयुक्त सांगितला परम । पुढें पध्दति चालवी सुगम । यास्तव हुरमुजी वस्त्र दिधलें ॥५१॥

आतां जावें गा नागनाथा । माजवावें परमार्थपंथा । ऐसें ऐकतांचि चरणीं माथा । ठेवुनि प्रदक्षिणा करी ॥५२॥

धनबाईसी घेऊन । उत्तरपंथे करिती गमन । तिनेंहि पतिसवें केलें श्रवण । गुरुवचनामृत ॥५३॥

कांहीं संदेह असेल उरला । तो नागनाथें बोधोनि फेडिला । पुढें वृत्तांत कैसा वर्तता जाला । तें बोलेल चिमणें बाळ ॥५४॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नागनाथहंसाख्यान निगुती । पंचम प्रकरणीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP