जय जय सदगुरु दीनदयाळा । जगदुद्वार करिसी स्वलीळा । अधिकारिया मार्ग दावावया कृपाळा । कष्टसी निजांगें ॥१॥
मुमुक्षुनें पुरतें पहावें । सदगुरुसी कष्ट कासया व्हावे । परी तुम्हा अधिकारियांच्या कणवें । शिणती अंगें ॥२॥
जेणें कदा उष्ण नाहीं देखिलें । ते उभयतां अनवाणी चालिले । कुबेराऐसी संपत्तीतें त्यागिलें । वनीं पाला खाती ॥३॥
जयाचिया मस्तकीं छत्र । तेणें जटा बांधिल्या एकत्र । जयाभोंवतीं सेवकसेनासंभार । तो एकटाचि चालिला ॥४॥
असो ऐसें चालतां मार्गी । आले दक्षिण देशालागी । गोदा उतरोनी लागवेगीं । एक स्थळ देखिलें ॥५॥
तालोका एक नीमें बीड । त्याखाली एक ग्राम तलवड । योजना आंत असें निवाड । गोदेपासोनी ॥६॥
तेथें एक पर्वता ऐसी । टेकडी असें बहु उंचसी । त्यावरी जगदंबा स्थापित तिजपाशी । वस्ती कांहीं असेना ॥७॥
शिखर सहित देउळा । भोंवतीं वोवर्या दीपमाळा । दिव्य टाकें एक सुंदर जळा । भरलें असें ॥८॥
आणि लिंबादि वृक्ष शोभतीं । ऐसें देखोनि आनंद चित्तीं । धनाबाईसी तेव्हां म्हणती । कीं येथेंचि राहूं ॥९॥
मग एका वोवरीमाजी जाऊन । राहते जाले दोघेजण । प्रात :काळी करावें स्नान । माळाखाली उतरोनी ॥१०॥
पुरश्चरण गायत्रीचें । विधियुक्त आरंभिलें साचें । तंव धनाबाई विनवी वाचें । मजही मंत्र सांगावा ॥११॥
तेव्हां तिजलाही रामनाम । मंत्र सांगितला आवडी परम । जप करितसे अनुक्रम । भर्तियासमीप ॥१२॥
लिंबाचा पाला तोडोनी । धनाबाई आणी वाटोनी । तो एकदां खाऊन उभयतांनी । जळपान करावें ॥१३॥
कोणीही दर्शनासी येतां । न घेती कवणेंही कांहीं देतां । एक वस्त्र धनाबाईसी असतां । मग कांहींच नलगे ॥१४॥
आपण कौपीन घालावी । गोधडी चिंध्याची पांघरावी । कृष्णाजिनें भूमीवरी अंथरावी । वरी शयन करिती ॥१५॥
धनाबाईनेंहि बांधिल्या जटा । कांहीं पदार्थ न इच्छी सान मोठा । पतिसेवा करी निष्कपटा । अथवा जप ॥१६॥
एक पुरश्चरण संपतां । दुजिया आरंभिती तत्त्वतां । ऋतु प्राप्त जरी जाला असतां । परी समागम नव्हे ॥१७॥
ऐसीं एकवीस वर्षे लोटलीं । पुरश्चरणें करिती वहिली । उभयतां तरुण असून नाहीं इच्छिली । कामबुध्दि दोघांही ॥१८॥
कितेक लोक दर्शना येती । बहुत स्तुतिस्तवनें करिती । कांहीं द्रव्यहीं देऊं पाहती । अथवा अन्न वस्त्र ॥१९॥
परी कांहींच कोणाचें नाहीं घेणें । निर्वाहार्थ लिंबाचा पाला खाणें । पाणीपात्र तुंबिणीचें रक्षणें । अन्य कांहींच नसे ॥२०॥
ऐसें एकवीस वर्षे लोटतां । एक हटयोगी भेटला अवचिता । तो म्हणे कां हो व्यर्थ काळ घालवितां । योग कां न करा ॥२१॥
प्रपंच सर्वही त्यागिला । कांहीं इच्छा नसे तुम्हांला । तरी प्रवर्तावें योग साधनाला । जेणें मुक्ति सुलभ ॥२२॥
योगाविण मुक्ति जे म्हणती । ते शब्दज्ञानी ठकले असती । तरी अभ्यासावी योगरीति । मी सांगेन येथें राहुनी ॥२३॥
तुमचें भाग्य बहुत थोर । मी अप्रार्थित आलों सत्त्वर । तरी सांगेन तैसे करा निर्धार । अल्पदिनीं सिध्दिसी जाय ॥२४॥
ऐकोनि योगियाचें उत्तर । नागनाथ घाली नमस्कार । अवश्य करुं योगप्रकार । आपण साह्य असतां ॥२५॥
मग प्राणायाम यथारीती । त्रिकाळ दोघेही साधिती । पुढें ब्रह्मरन्ध्रही भेदोनि गति । हळूं हळूं जाली ॥२६॥
परी धनाबाईनें याम साधिला । थोरला योग नाहीं केला । नागनाथा असे साध्य जाला । समाधि राहिला षण्मास ॥२७॥
नि :शेष सवृत्तिक हरे । निवांत जाला एकसरे । षण्मास जालिया ही नुतरे । स्वतां समाधि ॥२८॥
मग योगिराजें ज्या उत्थानाच्या । क्रिया असती साच्या । त्या त्या करोनि ब्रांह्मडीच्या । वायूसी उतरिलें ॥२९॥
डोळे उघडूनि योगिया पाहिले । इंद्रिय सावरुन नमस्कारिलें । योगी म्हणे तुझें कार्य सिध्दी गेलें । आतां आम्ही जातों ॥३०॥
पुसोनिया गेला योगी । तंव सिध्दि आल्या नागनाथालागी । कांहीही कल्पना होता वेगीं । व्यर्थ न जाय ॥३१॥
कोणासी बोलावें तैसें व्हावें । भूतभविष्य कळे अवघें । दुरिचें वर्तमान येथें समजावें । अथवा अन्याच्या मनीचें ॥३२॥
हें पाहुन नागनाथांसी । संतोष नाहीं जाला मानसीं । विचारी म्हणे हें परमार्थासी । विघ्न ओढवलें ॥३३॥
परी कवणासीहि न बोलतां । उदासीनत्त्वें राहिला चित्ता । हेही द्वादश वर्षे पूर्ण तत्त्वतां । जाहलीं असती ॥३४॥
एवं तया स्थळावरी जाली । तेहतीस वर्षे लोटलीं । लोकांमाजीं थोर ख्याति प्रगटली । दूर देशावरी ॥३५॥
लोक अवघे दर्शना येती । त्यांत बीडचा आला यवन अधिपति । पाहुनि साधुत्त्वाची ख्याति । परतोनि गेला ॥३६॥
तेणें मोगल राजिया पासुन । पांच ग्रामीच्या सनदा घेउन । आला भेटला कर जोडुन । पत्र पुढें ठेविलें ॥३७॥
नागनाथ म्हणती हें काय । येरु लीनत्त्वें बोलता होय । थोर माझा असे मनोदय । कीं आपणां जहागीर असावी ॥३८॥
म्हणोनि हे म्यां पांच गांवें । करुनि आणिले अपुले नांवें । इतुकें अगत्य स्वीकारावें । हेचि सेवा माझी ॥३९॥
मग नागनाथ बोलती हासोनी । अमुची खटपट करावी कोणी । हे नलगे उपाधि आम्हांलागुनी । आणीक द्यावें कवणासी ॥४०॥
यवन म्हणे आम्ही सेवाधार । सर्व बंदोबस्त ठेवूं साचार । परी उत्पन्नाचा करावा स्वीकार । दानधर्म करावा ॥४१॥
ऐकतां नागनाथ उगे बैसले । तयासी उत्तर नाहीं केलें । यवनासी मनामाजीं वाटलें । कीं स्वीकारिलीं ग्रामें ॥४२॥
तसाचि तो गेला नगरा । नागनाथ विस्मय पावले अंतरा । म्हणती सांडिले धन संपत्ति अपारा । वडिलांची बाळपणीं ॥४३॥
आतां हे आम्हांसी कासया । प्रपंचाच्या शीणचि वाया । तस्मात राहूं नये यया ठाया । बहुत दिन क्रमिले ॥४४॥
धनाबाईसी तेव्हां म्हणती । येथुन जावें वाटे माझें चित्तीं । बहु बरें म्हणतसे ते सती । इच्छा स्वामींची ॥४५॥
मग रात्रिमाजींच निघाले । गोदावरी उतरते जाले । पुढें ईशान्य दिशेसी चालले । आले सिंव्हाद्रि पर्वता ॥४६॥
मातापुरीं दत्तात्रय । शिखरीं गोसावियांचा समुदाय । सर्वतीर्थी येउन उभय । राहते जाले ॥४७॥
परी कोणाशी कांही न मागावें । निंबपत्रें वाटोनि खावें । हें कळलें समस्तां अघवें । कीं हे योगी निस्पृह ॥४८॥
तेथें दामोदरभारती नामें । तो सर्व कारभार चालवी नेमें । तो येउन विनवी सप्रेमें । नागनाथहंसांसी ॥४९॥
आतां निंब पुरें करावा । अन्न आहार घेत जावा । येथें किंवा परकीया गांवा । अप्रार्थित स्वीकारावें ॥५०॥
आपण अप्रार्थित जरी न घ्याल । तरी जनांसी सेवा कैसी घडेल । जगदुद्वार हा संभवेल । कवणे परी ॥५१॥
जें करावयाचें तें जालें । योग सायास सिध्दि गेले । तरी आतां देहालागी पीडिले । यांत विशेष काय ? ॥५२॥
तथास्तु म्हणती नागनाथ । अन्नादि स्वीकारुं अप्रार्थितार्थ । मग सामुग्रि देउन प्रतिदिनीं आतिथ्य । करिती सर्व गोसावी ॥५३॥
साहित्य घेउनि धनाबाई । पाकनिष्पत्ति करी ते ठायीं । भोजनादि सारोनि सायंसमयीं । दर्शना जाती दत्ताच्या ॥५४॥
एके दिनीं दामोदरभारती । योग साधावा वांछून चित्तीं । नागनाथहंसांसी करी विनंति । कीं मज अभ्यास सांगावा ॥५५॥
नागनाथें बहु बरें म्हणोनी । निवांत एक स्थळ पाहुनी । तेथ उभयतां जाती प्रतिदिनीं । प्राणायाम साधावया ॥५६॥
परी दामोदरभारतीसी । सिध्दि नाहीं जाली अभ्यासीं । एके दिनीं बैसला असतां योगासी । धोंडा पडिला घसरोनी ॥५७॥
तो तरी अंगावरी नाहीं पडिला । हदरुन कडकडा शब्द असे उठला । तेणें शब्देंचि घाबरुन उठिला । आरोळी देउनी ॥५८॥
मग केव्हांहि अभ्यासा बैसतां । तया स्थानापर्यंत येतां । आरोळी मारोनि उठे तत्त्वतां । तेव्हां पुढें मार्ग नव्हे ॥५९॥
असो एक भवानीभारती । तोहि सेवीतसे अहोराती । तो तरी कदा न सोडी संगति । नागनाथांची ॥६०॥
ऐसें सिंव्हाद्रिपर्वतीं दत्तशिखरीं । राहिले उभयतां षण्मासवरी । पुढील कथा यथामति उत्तरीं । चिमणे बाळ बोलेल ॥६१॥
इति श्रीमद्वंसगुरुपध्दति ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नागनाथहंसाख्यान निगुती । तृतीय प्रकरणीं ॥३॥