नागनाथहंसाख्यान - दिल्लींत जन्म

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


जय जय सदगुरु नागनाथा । जगदुद्वारका हंस समर्था । तुझी तूंचि बोलवी कथा । मनोरथ पुरवी ॥१॥

तुंगणीमठीं रुद्राराम । सर्वसुखाचा आराम । अंगें पूर्ण ब्रह्म आत्माराम । भक्तकाम अवतरला ॥२॥

केवळ सच्चिदानंदकंद । जेथें त्रिपुटीचा ओसरला भेद । आपुलिये निजसुखाचा स्वाद । आपणां घेतां न ये ॥३॥

गुळें गूळ केवीं चाखावा । कापुरें कापूर केवीं हुंगावा । तेवी आपुला आनंदलेश सेवावा । आपणचि केवी ॥४॥

यास्तव सच्छिष्य जरी मिळे । तरीच ब्रह्मानंदाचे सोहळे । बोधद्वारां अभेद निवळे । मावळोनि अज्ञान ॥५॥

ऐसा सच्छिष्य कोण जन्मला । अवघे गुंतले सकामनेला । एखादा परमार्थासी जरी लागला । तरी तो गुंतला भिडेनें ॥६॥

आपणां वेगळा सच्छिष्य जन्मेना । ऐसें रुद्रहंसे जाणोनि मनां । संकल्प करिते जाले कीं आपणां । अवतरणें लागे ॥७॥

दुजी व्यक्ति धरुन आपण । आपणचि गुरु परिपूर्ण । आपण आपणांसी उपदेशून । निजसुख सेवूं आपुलें ॥८॥

ऐसा सदगुरुहंसें संकल्प करितां । पुढें काय वर्तलें तें बोलिजेल आतां । तेचि कथा ऐकिजे श्रोतां । नागनाथगुरुची ॥९॥

दिल्लीमाजीं राजा यवन । त्याचा वजीर एक गौडब्राम्हण । शुकराज तयाचें नामाभिधान । धनकनकसंपन्न घरीं ॥१०॥

द्वादशशतें अश्वशाळा । गजरथादि संपत्ति सकळा । वर्तणूकही जयाची सुशीळा । भगवदभक्तचि तो ॥११॥

सहजाबाई पत्नी तयाची । पतिसेवेसीच आवडी जिची । पतीविण दैवत नेणे कधीचि । ना दुसरें व्रत ॥१२॥

शुकराजहि साधु गहन । परमार्थ चालवी प्रपंच करुन । जयाचें बहुत असे कवन । शेवटीं नाम शुकानंद ॥१३॥

एके दिनीं सुदिन असतां । आनंदरुप क्रीडती उभयतां । सत्त्वात्मक भाव असे रमतां । ते समयीं गर्भ राहिला ॥१४॥

सावधान श्रोती असावें । रुद्रहंसें जेव्हां कल्पिता बरवे । तो संकल्प दिल्लींत संभवे । गर्भ सहजाबाईसी ॥१५॥

दिवसेंदिवस गर्भ वाढत । शुकानंद दानधर्मे करीत । प्रतिदिनीं ब्राह्मणसंतर्पण होत । उपायनें येती प्रजेची ॥१६॥

यवनराजाही सदना आला । इनाम जहागिरी देता जाला । आणि आनंद होय पदरिच्या लोकांला । नाना उत्साह करी ॥१७॥

एके दिनीं मंदिरांत । शुकानंद बैसला स्त्रियेसहित । एकांत पाहुनियां डोहळे पुसत । पतिव्रतेसी ॥१८॥

सांग सखये तुज काय आवडे । ते ते मनोरथ पुरवीन कोडें । ऐसें पतीचें वचन ऐकोनि निवाडे । सहजबाई बोलत ॥१९॥

जी जी मज वनांत जावें वाटतें । लुटवावें सर्व संपत्तीतें । वनफळें मुळें खावें ऐते । अथवा पाला लिंबाचा ॥२०॥

ऐसें कांतेचें वचन ऐकतां । शुकानंद म्हणतसे चित्ता । हा योगभ्रष्ट आला गर्भा आतौता । परी प्रपंच त्यागील ॥२१॥

प्रपंच परमार्थ दोनी चालवी । ऐसा नव्हे होईल गोसावी । असो कांतेची कामना पुरवावी । तेव्हां नेत बागामाजीं ॥२२॥

एका वृक्षातळीं बैसविली । वनफळें देती जे जे इच्छिली । संपत्तीहि आणवून वांटिली । तयेच्या हस्तें ॥२३॥

द्रव्य रत्नें मुक्ताभूषणें । अश्व गज आणि गोदानें । वस्त्रपात्रें ब्राह्मणांकारणें । यथेच्छ दिधलीं ॥२४॥

मागुती आणिली सदनासी । दानें देववी प्रतिदिवशीं । असो नवमास लोटतां गर्भासी । प्रसूतिसमय आला ॥२५॥

बहुत स्त्रिया मिनल्या सदनीं । तंव प्रसूत जाली सहजा कामिनी । पुत्र जाला जाला म्हणवुनी । जयशब्द प्रगटला ॥२६॥

धडकती वाद्यांचे कल्लोळ । जनही आनंदले सकळ । ब्राह्मण मिळवुनी धन वाटी पुष्कळ । शुकानंद ॥२७॥

स्नान करुनी पुत्रमुख पाहिलें । ब्राह्मणांसी परम संतोषविलें । परी जातक नाहीं वर्णूं दिधलें । शुकानंदें तेव्हां ॥२८॥

इतर जो जो विधि लोकरीती । तो तो केला यथाशक्तिमति । तेरावें दिवशी नाम निश्चिती । नागनाथ ठेविलें ॥२९॥

सर्व जन त्या चिमणिया बाळा । आल्हाद पावती देखतां डोळा । केवळ स्वरुपें मदनाचा पुतळा । जो अवतरला जगदुद्वारा ॥३०॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नागनाथहंसाख्यान निगुती । प्रथम प्रकरणीं ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP