नक्षत्रस्वामी - अध्याय दुसरा

श्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .


अध्याय दुसरा

आता वंदू कमलेश । त्याचे कृपेचा लेश । रक्षितो मज शेष । फणिवर चंद्रमौली ॥

झाली मुक्त गणिका । तुझ्या नामसुधेची कणिका । प्राप्त होवो आणिका । माझ्यासवे ॥

श्रोते व्हा सावधान । करू नक्षत्रकथेचे पान । नका करू अनमान । श्रवण करा ॥

आर्या

स्वामींचे पूर्वज कोण ? आप्त कोण ? कोण कोठुनि आले ? ।

नाही विदित कोणा , मजलाही , जरी यत्न बहुत मी केले ॥१॥

कोणी म्हणती ‘बाई ’ आल्या ‘पलूस ’ गाव सोडून ।

कोणी म्हणती , स्वामींचे ‘कवठे ’ हेच गाव ठासून ॥२॥

दुर्दैवाने विदित न कोणा नाव काय ते पावन मातेचे ।

ती दिव्य ज्योत , सुत भास्कर , निर्झर पवित्र तेजाचे ॥३॥

जरी त्यागला मृगमद अज्ञाने ‘मलिन ’ हो म्हणे त्याला ।

परि दर्दि करती गर्दि , अप्राप्य कस्तुरी ज्याला ॥४॥

रवि न म्हणे हे नगर थोर , परिमित प्रकाश येथेच ।

कुग्रामी जाणे नलगे , राहो नित्य तिमिर येथेच ॥५॥

स्वामीराज नायक अमुचा , कुग्रामी जन्मला होता ।

परी शास्त्राभ्यासे , सकळ जगाला वंद्य जाहला होता ॥६॥

जलाशयात जरी उठति लहरी , जलांत जल पडते ।

तसे अजन्मा घेति जन्मा परि जन्ममरण ना उरते ॥७॥

तो योगी होता कसला ? होता प्रभूईश मूर्तिमंत ।

सावधचित्ते ऐका श्रोते मी वर्णीन तो दयावंत ॥८॥

कीर्ति तुझी सिद्धेशा , की धाऊन येशी हाकेला ।

ऐसी जाणुनि मात तुझी , पुत्रार्थ नवस म्या केला ॥९॥

तु पुत्र दिला मज , परी धाडी संकटा किती सांग ? ।

वारावे विघ्न विभो , आता व्रतबंध करूनिया सांग ॥१०॥

मी निर्धन निष्कांचन , अगतिक मज तूच एक दातारा ।

साहू मी संकटे कितीदा ? कृपा करोनि एकदा तारा ॥११॥

स्वप्नी बिडेश येऊन सांगे , ‘जागे तू आनंदमूर्तीला शरण ।

तो संतशिरोमणि आहे , करिल तव सर्व दुःख तो हरण ’ ॥१२॥

" संतांनी मुंज करावी हे मज भाग्य लाभले थोर " ।

ते ऐकताच मधुवचन साध्वीचा दूर जाहला घोर ॥१३॥

करूनि स्नाने , घेऊन द्र्शन , प्रस्थान ठेविले जाण्या ।

ब्रम्हनाळ या गावी निघाले , स्वये ब्रम्ह द्विज होण्या ॥१४॥

ग्रामस्थांना असे सुगावा , परपीडारत जे खळांपरी ।

तेहि निघाले , विघ्न आणण्या , मधांध यादव खळांपरी ॥१५॥

चला जाऊया , मौज पाहूय , कोण करिल ही मुंज ? ।

विप्र तेथले आणि विधवा यांची देऊ लाउनि झुंज ॥१६॥

मरिती मिटक्या , हा हा म्हणुनि वाजवीत ते चुटक्या ।

निजधर्माला सगळे विसरून , भरीस पडले ते लटक्या ॥१७॥

मार्ग आक्रमित मायलेक ते येति वेरळ तीराला ।

या सरितेची फार प्रसिद्धि , ओढ अनावर पाण्याला ॥१८॥

या काठावर कष्टत होता कृषिवर अपुल्या शेतात ।

गाय तयाची फार मारकी , ख्यात असे लोकांत ॥१९॥

तिने देखिले मायलेक हे , नयनी स्फुरला अंगार ।

आणि निघाली उधळित , पृष्ठि पुच्छमार तो थोर ॥२०॥

फुफाट , उसळे , दौडे , एकवटे बळ मारण्यास सारे ।

ते पाहून भ्याला , कृषिवर , मायलेक तो हाकारे ॥२१॥

धावा , पळा , सुजनहो , थांबू नका इथे आता ।

मारील ही तुम्हाला , गे बाई नवे तुम्ही गमता ॥२२॥

ऐकताच कोलाहल तो , थांबे स्थळीच ती सरला ।

कमलेशा ! धावा का आयुर्दाय आज आमुचा सरला ?॥२३॥

प्स्री निर्भयचित्ते पाही बालक धेनुकडे , मनी हर्षे ।

" माते भिऊ नको गे " मारेल ना सुधा वर्षे ॥२४॥

तो योगी , विप्राचा बालक , पाहताच ती गाय ।

झाली शांत निमाली , लागे चाटण्या पाय ॥२५॥

पाहुन अघटित हे , कृषिवर जोडी पुन्हा पुन्हा हात ।

देवा कोठुन आले स्वामी ? काय त्यांची ही मात ॥२६॥

माझी ही गाय , पाहुन खळबळ इचे , लोक त्वरे पळती ।

पळती जीवभयाने मागी न पुन्हा इथे कधी वळती ॥२७॥

परि पाहता बालक हा , खळबळ इचे पुरे सरले ।

चित्त निमाले , वृती शमली , दुष्टपणा जराही न उरले ॥२८॥

दिसतो बालक परी योगी , सिद्धपुरुष हा कोणी ।

असेचि गमते बा मज , देवपुत्र नसे दुजा कोणी ॥२९॥

परिसाचा सहवास क्षणाचा , लोहास करितसे सोने ।

झाले निर्मळ खळ पुरते , क्षण एक साधुसंगाने ॥३०॥

तत्क्षणीचि झाला कृषिवर शिष्य , हात जोडून ।

वदला "मज इज संगे न्या ’ साधुभाव जोडून ॥३१॥

तो शेत्करी ती गायाअपुली माय घेऊनि संगे ।

आले तिरी नदीच्या जी तोयाने पुष्ट जाहली संगे ॥३२॥

मातेसी नमुनी कथिले ’धेनुचे पुच्छ धरुनि त्वा जावे ।

जावे पैलतिराला लंघावे वेरळेस या भावे " ॥३३॥

जाता माता धीनू खळाळणार्‍या नदितूनी पार ।

पाणी जोडूनि योगी वदले ’ ने मलाही तू पार " ॥३४॥

गंगे , गोदे , कृष्णे , माते तव तोय सुखद मज होवो़ ।

केवळ वस्त्र घडीवर पैलतिरी मज तुम्ही सुखें न्या हो ॥३५॥

ऐसे वदुनि प्रेमे , ठेवी जलपृष्ठि वस्त्र तो योगी ।

घालून आसन बसले वरती , वदे "हूं , अतां चल वेगीं " ॥३६॥

होता आज्ञा तें वस्त्र निघाले जणूं असे सुतरी ।

कुतुके माता डोले ’पुत्र नव्हे हा भवार्णवाची स्तरी " ॥३७॥

पाहून वस्त्रस्तरीवर मूर्ति , येति आनंदमूर्ति भेटाया ।

वदति पाणी जोडून "आले योगिराज स्वामी भेटाया " ॥३८॥

" माझे भाग्य उदेले आले प्रत्यक्ष ब्रम्ह भेटाया ।

नाहीं समर्थ आम्ही , भास्कर हा , यासी दूर लोटाया " ॥३९॥

तो आले ब्राम्हण कवठ्याचे म्हणति साधुभाव जोडून ।

शकुनि जसा धर्माते पाडी व्यसनीं न्यायनीति सोडून ॥४०॥

’ स्वामी हा द्विजकुळीचा नाही , व्रतबंध वांच्छितो पोर ।

मायही तसेच वांच्छी अघाचल मूर्तिमंत जी थोर " ॥४१॥

" पुरुषश्रेष्ठ साधू आपण नित असो तुम्हा प्रणति ।

न करा मुंज अशाची बहु पापद तया नसे गणति " ॥४२॥

बहु कर्णकटु असे शास्त्रपटुंचेबोल ऐकता बटु ।

माथा चरणीं ठेवी जेविं निजगुरुपायीं आर्त वेदपटु ॥४३॥

त्या द्विजसमुहाला भावे नमुनि आनंदमूर्तिंनी कथिले ।

" हा न बटु , परब्रम्ह स्वयें , बा कशास या मथिले ? ॥४४॥

" याचा कोणी करावा व्रतबंध ? जो स्वर्ये सिद्ध ।

द्विज हो त्यागा कुमति , मंगलकार्यास व्हा चला सिद्ध " ॥४५॥

" हा द्विजश्रेष्ठ , पावन , वेदांती , शुद्ध स्नेह सात्विकता ।

आपण यासी भजावे , त्यागावी अप्रमाण भ्रामकता ॥४६॥

मंगल मुहुर्त शोधुनि केली संप्पन्न मुंज बाळाची ।

प्रेमाश्रुपूर ढाळे साध्वी कृतकार्य माय बाळाची ॥४७॥

आनंदमूर्तीच्या कृपाप्रसादें व्रतबंध जाहला थाटांत ।

प्रेमाश्रूंचे सर ओघळले तृप्त आईच्या डोळ्यांत ॥४८॥

तिच्या मनांतील पूर्ण जाहल्या सर्व कामना कमलेशाच्या कृपाबले ।

पुन्हा पुन्हा नतमस्तक होऊन स्मरें प्रभूचीं चरणदले ॥४९॥

श्रीनक्षत्रस्वामींचे चरित्र अद्‌भूत । मने सज्जनांची होती शांत ।

भक्त आनंदाने परिसोत । द्वितीयोध्याय हा ॥५०॥

श्रीसिद्धराज प्रसन्न

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-05-20T00:19:57.6100000