अंतरिक्षीं जाती कपिगण ॥ तों देखिलें शापदग्ध वन ॥ वानरांचीं किरणें अडखळून ॥ मुरकुंडी वळोन पडियेले ॥५१॥
मागुती उड्डाण घेऊं जाती ॥ समस्तांच्या आकर्षिल्या शक्ती ॥ एकाकडे एक पाहती ॥ तटस्थ मारुति जाहला ॥५२॥
ऐसें काय कारण व्हावयासी ॥ तरी तेथें पूर्वीं दंडक ऋषी ॥ महातापसी तेजोराशी ॥ पुत्र त्यासी एक होता ॥५३॥
अष्टादश वरुषांचा सुत ॥ वनीं क्रीडतां अकस्मात ॥ वनदेवता अद्भुत ॥ भयानक धांविन्नली ॥५४॥
तिनें भक्षिला ऋषिनंदन ॥ दंडक तें जाणोन ॥ शापिलें तेव्हां तें कानन ॥ महाक्रोधेंकरूनियां ॥५५॥
जो या वनीं संचरेल पाणी ॥ तो मरण पावेल तेचि क्षणीं ॥ कपी सावध रामस्मरणीं ॥ म्हणोनि प्राण वांचले ॥५६॥
असो तो दंडकाचा नंदन ॥ विशाळ ब्रह्मराक्षस होऊन ॥ नित्य भक्षी जीव मारून ॥ द्वादशयोजनें भोंवते ॥५७॥
तेणें देखोन वानर ॥ मुख पसरोनि भयंकर ॥ भक्षावया आला सत्वर ॥ कपिवीर गजबजिले ॥५८॥
ऐसें देखोन वालिकुमर ॥ परमप्रतापी प्रचंडवीर ॥ निःशंक धांवोनि सत्वर ॥ राक्षस चरणीं धरियेला ॥५९॥
गगनीं गरगरां भोवंडिला ॥ उर्वीवरी आपटिला ॥ शरीर चूर जाहलें ते वेळां ॥ मृन्मयघटशकलासारिखें ॥१६०॥
ऐसा तो दंडकाचा पुत्र ॥ पावला तात्काळ पूर्वशरीर ॥ मग तेणें आपुला समाचार ॥ वानरांसी सांगितला ॥६१॥
वंदोनियां वानरगणा ॥ तात्काळ गेला पितृदर्शना ॥ पुढें रामदूतां पंथ सुचेना ॥ दिशा समजेना कोणती ॥६२॥
वृक्ष फळ ना जळ ॥ दग्ध वन दिसे सकळ ॥ क्षुधेतृषेनें सकळ ॥ वानर तेव्हां चडफडती ॥६३॥
ओंढवलें परम कठिण ॥ शोधिती शुष्क विपिन ॥ तंव एका विवरांतून ॥ पक्षीफळें आणिती ॥६४॥
त्या विवरद्वारीं येऊन ॥ थोकले तेव्हां वानरगण ॥ एक योजन लंबायमान ॥ तमेंकरून पूर्ण तें ॥६५॥
पुढें जाहला वायुकुमर ॥ मागें येती समस्त वानर ॥ जैसी संतांची कांस मुमुक्षु नर ॥ धरिती आत्मसाधनासी ॥६६॥
कीं वेदाध्ययनेंकरून ॥ वर्तती जैसे विद्वज्जन ॥ कीं खड्रधारें तीर्थस्नान ॥ करूनि स्वर्गस्थ होती तैसे ॥६७॥
हनुमंताच्या आधारें समस्त ॥ तैसे वानर विराजत ॥ परी कासाविस जाहले तेथ ॥ मूर्च्छा येऊनि पडती पै ॥६८॥
श्वासोच्छ्वास कोंडोन ॥ आकर्षिले सर्वांचे प्राण ॥ मग हनुमंतें पुच्छेंकरून ॥ सकळ बांधोन उचलिले ॥६९॥
योजन एक क्रमोनि विवर ॥ मारुति गेला सत्वर ॥ पुढें प्रकाश देखिला अपार ॥ वन सुंदर सफळ तें ॥१७०॥
पुष्पफळभारें द्रुम ॥ वाढिन्नले भेदीत व्योम ॥ त्या वृक्षांवरी प्लंगम ॥ चढावया शकती ना ॥७१॥
शरीर जाहले परम क्षीण ॥ यालागीं ऊर्ध्व न होती किरण ॥ तों सुप्रभा खेचरी येऊन ॥ उभी ठाकली तेधवां ॥७२॥
तियेप्रति पुसे वायुनंदन ॥ हेममय नगर पूर्ण ॥ फळोदक अमृतासमान ॥ कवणें हें स्थान निर्मिलें ॥७३॥
सुप्रभा सांगे पूर्ववृत्तांत ॥ ये स्थळीं होता मय दैत्य ॥ तेणें करून अद्भुत ॥ विष्णुसुत प्रसन्न केला ॥७४॥
त्याकारणें हें स्थान ॥ विरिंचीनें निर्मिलें येऊन ॥ त्यासी दिधलें वरदान ॥ विवरामाजी चिरंजीव तूं ॥७५॥
विवराबाहेर येतां जाण ॥ तात्काळचि पावसी मरण ॥ तो नानाकौटिल्यविंदान ॥ मंत्रहवन जाणतसे ॥७६॥
बहुत तप आचरोन ॥ दैत्यांचें इच्छी कल्याण ॥ मग इंद्रें विधीस प्रार्थून ॥ हेमा नारी निर्मिली ॥७७॥
स्वरूपें लावण्यें आगळी ॥ त्या विवरांत प्रवेशली ॥ मयदैत्यें देखिली ते वेळीं ॥ देखोनि तियेसी भूलला ॥७८॥
म्हणे मज तू वरी वो सुंदरी ॥ ते म्हणे चाल विवराबाहेरी ॥ मरण विसरोन दुराचारी ॥ उर्वीवरी पातला ॥७९॥
तों इंद्रें घालोनि वज्रप्रहार ॥ तेथेंचि मारिला मयासुर ॥ मग हेमेलागीं नगर ॥ ब्रह्मदेवें दिधलें ॥१८०॥
मग कित्येक काळ क्रमोनि देखा ॥ हेमा गेली सत्यलोका ॥ मी तिची परिचारिका ॥ वननगर रक्षीतसें ॥८१॥
देवां दुर्गम हें स्थान ॥ मज हेमा बोलिली वचन ॥ येथें येतील वानरगण ॥ तुज उद्धरोनि जाती ते ॥८२॥
हनुमंत सांगे पूर्ववृत्तांत ॥ सीताशुद्धीसी जातों समस्त ॥ क्षुधाक्रांत तृषाक्रांत ॥ या विवरांत प्रवेशलों ॥८३॥
मग तिनें घातला नमस्कार ॥ फळें पुष्पें आणोनि सत्वर ॥ वानरांसहित वायुकुमर ॥ षोडशोपचारीं पूजिला ॥८४॥
फळें उदक सेवून ॥ तृप्त जाहले वानरगण ॥ मग परतले तेथून ॥ परी विवरद्वार न सांपडे ॥८५॥
मग सुप्रभेसी म्हणे हनुमंत ॥ माते आम्हां दावीं शुद्ध पंथ ॥ तेव्हां ते खेचरी बोलत ॥ नेत्र समस्त झांका तुम्ही ॥८६॥
ऐसें ऐकतांचि वचन ॥ समस्तीं विवरीं झांकिले नयन ॥ सुमुहूर्ती एक मंत्र जपोन ॥ काय तेव्हां बोलिली ॥८७॥
मग म्हणे उघडा नेत्र ॥ तों समुद्रतीरीं उभे वानर ॥ सुप्रभा न दिसे साचार ॥ नवल थोर वर्तलें ॥८८॥
कपी आश्र्चर्य करिती ते क्षणीं ॥ जैसे संसारदुःखें वेष्टिले प्राणी ॥ त्यांसी निजज्ञान उपदेशूनि ॥ सद्रुरु काढी बाहेर ॥८९॥
कीं जळते घरींहून काढिलें ॥ कीं पूरीं बुडतां वांचविलें ॥ कीं शिर छेदितां सोडविलें ॥ तैसें केलें सुप्रभेनें ॥१९०॥
कृपाळु तो रविकुळभूषण ॥ तेणेंच ते दीधली धाडोन ॥ समुद्रतीरीं वानरगण ॥ ब्रह्मानंदें नाचती ॥९१॥
इकडे तें विवर त्यजूनि सुप्रभा ॥ किष्किंधेसी जाऊन सीतावल्लभा ॥ भेटली कौसल्यागर्भा ॥ दृष्टीभरोन न्याहाळित ॥९२॥
म्हणे ब्रह्मानंदा आत्मयारामा ॥ मज पावन करीं मेघश्यामा ॥ तीस ज्ञान सांगोन वदरिकाश्रमा ॥ राघवेंद्रें पाठविली ॥९३॥
काळांतरें बदरिकाश्रमीं ॥ देह ठेवोनि कैवल्यधामीं ॥ जैसा आर्द्रघट मिळे भूमीं ॥ तैसीच स्वरूपीं समरसली ॥९४॥
इकडे समुद्रतीरीं वानर ॥ चिंताक्रांत करिती विचार ॥ म्हणती शुद्धि न लागे अणुमात्र ॥ कैसा प्रकार करावा ॥९५॥
एक म्हणती परतोनि जावें ॥ काय रघुवीरांते सांगावें ॥ आमुचेनि हें कदा नोहे ॥ सीताशुद्धि म्हणोनियां ॥९६॥
तरी आतां द्यावे जी प्राण ॥ परी न जावें परतोन ॥ व्यर्थ वांचोन ॥ प्रेतवत संसारीं ॥९७॥
मग आणोन काष्ठभार ॥ ढीग रचिले पर्वताकार ॥ तात्काळचि वैश्र्वानर ॥ वानरवीरीं चेतविला ॥९८॥
तों जांबुवंत बोले वचन ॥ मीच आधीं सेवीन कृशान ॥ यावरी अंजनीगर्भरत्न ॥ ऋृक्षपतीप्रती बोले ॥९९॥
म्हणे जांबुवंता सर्वज्ञा ॥ मजप्रती द्यावी आधीं आज्ञा ॥ यावरी तो ऋृक्षराणा ॥ प्रत्युत्तर देतसे ॥२००॥