अध्याय अठरावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


अति विशाळ धरोनि द्रुम ॥ आनंदें नाचती प्लवंगम ॥ एक गायन करिती सप्रेम ॥ डुल्लती राम ऐकोनियां ॥१॥

राग उपराग भार्येसहित ॥ मूर्च्छना शरीर कंपित ॥ सप्त ताल अति संगीत ॥ गीत प्रबंध खंडरचना ॥२॥

गद्यपद्यछंदगति ॥ ऐकतां तटस्थ होय गभस्ति ॥ ठायींच्या ठायीं विरती ॥ गायन ऐकतां तयांचें ॥३॥

असो यावरी मित्रपुत्र ॥ मित्रकुठमंडणातें समग्र ॥ दावीतसे सकळ भार ॥ पृथ्वी अंबर भरलें तें ॥४॥

जैसे कां जलतरंग ॥ सागरीं तळपती सवेग ॥ परि तो पाहतांचि सांग ॥ सागरचि एकला ॥५॥

तैसा ब्रह्मानंद सागर रघुवीर ॥ तेथींच्या लहरी ते वानर ॥ असो पृथ्वी दिशा अंबर ॥ वानरमय दिसतसे ॥६॥

ते रघुनाथाची मनोवृत्ति ॥ सकळ सुर अवतरले क्षितीं ॥ वानवेषें अपार शक्ति ॥ उचलूं भाविती भूगोल ॥७॥

नळ केला दळाधीश ॥ अठरा पद्में वानर विशेष ॥ बहात्तर कोटी रीस ॥ छप्पन्न कोटी गोलांगूळ ॥८॥

सीतावल्लभ म्हणे किष्किंधानाथा ॥ मज वाटते बहुत चिंता ॥ अन्न वस्त्रें या समस्तां ॥ कोठून आतां पुरवावीं ॥९॥

अर्कज म्हणे जनकजावरा ॥ यांसी फळ मूळ कंद आहारा ॥ न मिळे तरी भक्षिती समीरा ॥ तेणेंचि तृप्त होती हे ॥११०॥

अंबर तरी हे दिगंबर ॥ शस्त्रें पर्वत किंवा तरुवर ॥ ऐकतां मंगळभगिनीचा वर ॥ परम आश्र्चर्य मानित ॥११॥

सुग्रीव म्हणे राजीवनेत्रा ॥ हा खेळ तुझा कोमलगात्रा ॥ जाणोनि पुससी विचारा ॥ पदवी वानरां देऊनियां ॥१२॥

असो यावरी ताराकांत ॥ सकळ वानरां आज्ञापित ॥ त्रिभुवन धुंडोनि समस्त ॥ सीताशुद्धि करावी ॥१३॥

महीतळ अतळ वितळ ॥ सुतळ तळातळ महातळ ॥ सातवें तें रसातळ ॥ शोधावया धाडिले ॥१४॥

विलोकावे चतुर्दश लोक ॥ वैकुंठकैलासादि सकळिक ॥ धुंडोनियां आवश्यक ॥ सीताशोध करावा ॥१५॥

कैलासादि ब्रह्मलोक ॥ इंद्रचंद्रसूर्यलोक ॥ जनलोक तपोलोक ॥ सकळ शोधूं धाडिले ॥१६॥

वरुणलोक भूलोक ॥ यमलोक पितृलोक ॥ मृत्युलोकासी विशेष देख ॥ लोक चतुर्दश धुंडावे ॥१७॥

भरतखंड रमणकखंड ॥ हरित सत्य विधिविशेष प्रचंड ॥ केतु सुवर्ण द्राक्ष वितंड ॥ हरिखंड नववें पैं ॥१८॥

जंबुद्वीप शाकद्वीप ॥ शाल्मली क्रौंच द्राक्षाद्वीप ॥ अंग वंगादि दक्षद्वीप ॥ छप्पन्न देश शोधिले ॥१९॥

वनें उपवनें पर्वत ॥ ऋषिआश्रम विवरें मठ बहुत ॥ भक्तांची स्थानें बहुत ॥ शोधावया धाडिले ॥१२०॥

तीर्थें क्षेत्रें शोधिलीं नाना ॥ परी रामांगना कोठें दिसेना ॥ सीतेचें स्वरूप समजेना ॥ कष्टती हे बहुसाल ॥२१॥

सीता रामाची ज्ञानशक्ति ॥ तिची कैसी आह स्थिती ॥ न पुसतां व्यर्थचि भ्रमती ॥ अहंमती भुलोनियां ॥२२॥

सद्रुरूसी न रिघतां शरण ॥ कदापि नोहे आत्मज्ञान ॥ नवनीत मंथनावांचून ॥ हाता न चढे सर्वथा ॥२३॥

व्यर्थ हिंडतां भागले वानर ॥ दृष्टी न पडे सीता सुंदर ॥ परतोनि येती समग्र ॥ अधोवदन लज्जित ॥२४॥

मग तयांचें समाधान ॥ स्वयें करीत रघुनंदन ॥ दक्षिणादिशेसी कोण कोण ॥ गेले तेंचि ऐका हो ॥२५॥

मुख्य अंगद वाळिसुत ॥ नळ नीळ ऋषभ जांबुवंत ॥ पांचवा तो हनुमंत ॥ जो उमाकांत अवतरला ॥२६॥

आणिक एक शत वानरगण ॥ रघुपतीची आज्ञा घेऊन ॥ आक्रमिलें सकळीं गगन ॥ वायुवेगें करोनियां ॥२७॥

तंव तो कृतांतासी शिक्षा करणार ॥ महाराज जो रुद्रावतार ॥ अंगदासी म्हणे क्षण एक स्थिर ॥ तुम्हीं रहावें समस्तीं ॥२८॥

कांहीं आठवलें मानसीं ॥ पुसोन येतों रघुपतीसी ॥ ऐसें बोलोनि तयांसी ॥ वायुसुत परतला ॥२९॥

एकाएकीं येऊन ॥ दृढ धरिले रामचरण ॥ उभा ठाकला कर जोडून ॥ जैसा सुपर्ण विष्णुजवळी ॥१३०॥

तो बोले मंजुळ उत्तरीं ॥ म्हणे भार्गवजिता अवधारीं ॥ सीताशुद्धि वानरीं ॥ कैशी करावी तें सांगा ॥३१॥

सीतेचें स्वरूप कैसें स्वामी ॥ केवीं ओळखिजे प्लवंगमीं ॥ रूपरेखा कैशी आम्हीं ॥ जाणावी ती राघवा ॥३२॥

ऐसे हनुमंत बोलतां ॥ संतोषला कमलोद्भवपिता ॥ म्हणे तुझिया बुद्धीस तुळितां ॥ वाचस्पति हळुवट ॥३३॥

पुसिलें सीतास्वरूप ॥ तरी तें जाण माझेंचि रूप ॥ जैसी प्रभा आणि दीप ॥ एकरूप दोहींचें ॥३४॥

जैसी कनक आणि कांति ॥ कीं रजत आणि त्याची दीप्ति ॥ तैसी जाण सीता सती ॥ स्वरूप माझें अभेद ॥३५॥

सीतेच्या अंगींचा सुवास ॥ मृगमदाहूनि विशेष ॥ अर्धयोजन आसपास ॥ घ्राणदेवीसी संघटे ॥३६॥

खूण ऐकावी मारुति ॥ मुखीं कर्पूराची वसे दीप्ति ॥ माझें स्मरण अहोरातीं ॥ सीता सती करीतसे ॥३७॥

द्वादश हस्तप्रमाण साचार ॥ सीतेसमीप पाषाण तरुवर ॥ त्यांसी माझें स्मरण निरंतर ॥ खुण साचार ओळखें ॥३८॥

अंतरखूण सांग सीतेतें ॥ कैकयीगृहीं म्यां स्वहस्तें ॥ वल्कलें नेसविलीं तियेतें ॥ वनवासासी निघतां पैं ॥३९॥

मग विनवी समीरात्मज ॥ ऐसी खूण द्यावी मज ॥ जेणें अवनिजा मानी सहज ॥ दास मी तुमचा सत्य कीं ॥१४०॥

ऐकोनि मारुतीचें वचन ॥ तोषलें रघुनाथाचें मन ॥ धन्य धन्य म्हणवून ॥ शब्दरत्नें गौरविला ॥४१॥

धन्य तो अंजनी सज्ञान ॥ ऐसें प्रसवली निधान ॥ ज्याच्या प्रतापाखालीं संपूर्ण ॥ ब्रह्मांड ठेंगणें होय कीं ॥४२॥

प्रेम नावरे रघुनाथा ॥ हृदयीं आलिंगिलें हनुमंता ॥ वरदहस्त ठेवोन माथां ॥ करीं मुद्रिका घातली ॥४३॥

खूण दिघल अवतारमुद्रिका ॥ जेणें मानी जनककन्यका ॥ मग साष्टांगें रघुनायका ॥ हनुमंत वंदी ते काळीं ॥४४॥

पुढती विलोकी रामवदन ॥ हृदयीं रेंखिलें तैसेंचि ध्यान ॥ श्रीराम सद्रद होऊन ॥ बोलता जाहला ते काळीं ॥४५॥

कधीं येशील परतोन ॥ मग म्हणे वायुनंदन ॥ एक मास सरतां पूर्ण ॥ सीतादर्शन घेऊनि येतों ॥४६॥

ऐसें बोलून हनुमंत ॥ यशस्वी पूर्ण अयोध्यानाथ ॥ आनंदें गर्जोनि अकस्मात ॥ गगनपंथें उडाला ॥४७॥

जैसा योगभ्रष्ट जन्म पावत ॥ मागुतीं स्वरूपीं ऐक्य होत ॥ तैसे कपि वाट पाहात ॥ वायुसुत आला तेथें ॥४८॥

रामस्मरणें अवघे गर्जती ॥ सपक्ष नग जैसे उडती ॥ तैसे निराळमार्गे सर्व जाती ॥ अगस्तिदिशा लक्षोनी ॥४९॥

चपळ पाणिद्वयचरण ॥ गगनीं झेंपावती हरिगण ॥ यशस्वी अयोध्याप्रभु म्हणोन ॥ वारंवार गर्जती ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 09, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP