अध्याय अठरावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्रीगणेशाय नमः ॥

अखिलरघुनाथगुणसमुद्र ॥ रामउपासक तेथें जळचर ॥ ब्रह्मानंदें क्रीडती साचार ॥ प्रेमबळें मातोनियां ॥१॥

स्वानंदाचे उमाळे देती ॥ सारासारविचारें तळपती ॥ जीवनावांचोनि गति ॥ दुजी नसे तयांतें ॥२॥

अविद्याविपिन शुष्क बहुत ॥ कांहींच वासना न करी तेथ ॥ नंदनवनींचा मिलिंद सत्य ॥ अर्कींपुष्पीं बैसेना ॥३॥

जो करी सुधारसपान ॥ तो कंटाळे देखोनि वमन ॥ जेणें आत्मशयनीं केलें शयन ॥ तो भवकानन कां सेवी ॥४॥

कल्पद्रुम ज्याचे अंगणीं ॥ नित्य सुरभी दुभे सदनीं ॥ तो तृणबीज काढोनी ॥ कदाकाळीं भक्षीना ॥५॥

प्रारब्धयोगें वावरे शरीर ॥ ते विषयीं न धरिती आदर ॥ तैसे रघुवीर भजनीं सादर ॥ हेंही नेणती कदा ते ॥६॥

सतरावे अध्यायी गतकथार्थ ॥ श्रीरामें मारिला शक्रसुत ॥ सुग्रीव उसां मांडी देत ॥ देहांतसमयीं वाळीच्या ॥७॥

तों अंगदसमवेत तारा सती ॥ सत्वर पातली जेथें पति ॥ मग म्हणे अयोध्यापति ॥ काय ऐसें केलें तुवां ॥८॥

आतां टाकोनि एक बाण ॥ राघवा घेई माझा प्राण ॥ मी पतिसमागमें जाईन ॥ काय वांचोनि व्यर्थ आतां ॥९॥

कवळोनि वाळीचें प्रेत ॥ तारा अत्यंत शोक करीत ॥ ऐसें जाणोनि जनकजामात ॥ काय बोले तें ऐका ॥१०॥

कोण्या अर्थालागीं देख ॥ तारे तूं करिशी शोक ॥ येरी म्हणे पतिवियोगपावक ॥ तेणें दग्ध जाहल्यें मी ॥११॥

ताटिकांतक म्हणे ते काळीं ॥ कलेवराचें नाम वाळी ॥ तरी तें पडलें तुजजंवळी ॥ जैसें तैसें संचलें ॥१२॥

ज्यालागीं शोक करिसी बहुत ॥ तरी तें पडलें वाळीचें प्रेत ॥ येरी म्हणे हृदयस्थ ॥ आत्मा गेला निघोनियां ॥१३॥

मग बोले अयोध्याविहारी ॥ तूं काय आत्म्याची अंतुरी ॥ कीं शरीराची निर्धारीं ॥ सांगें मज विचारोनि ॥१४॥

शरीर तंव नाशिवंत ॥ आत्मा अविनाश शाश्र्वत ॥ तरी शोक करावा किमर्थ ॥ पाहें बरवें विचारोनि ॥१५॥

जैसा घटीं आणि रांजणीं ॥ एक बिंबला वासरमणी ॥ तैसा स्त्रीपुरुष अभिधानीं ॥ आत्मा एक अव्यंग ॥१६॥

घट मठ मोडितां निःशेष ॥ जेवीं न मोडेचि आकाश ॥ कीं तरंग मोडतां सागरास ॥ नाश नसे सहसाही ॥१७॥

मायामय लटिका खेळ ॥ जैसें नसतां दिसे मृगजळ ॥ कीं गंधर्वनगर केवळ ॥ मिथ्या भास आभासे ॥१८॥

सुधापानी स्वर्गी असती ॥ तेही नाश पावती कल्पांतीं ॥ जें जें दिसे आकाररीतीं ॥ नाश निश्र्चितीं असे तेथें ॥१९॥

भग्नपात्रीचें गेलें नीर ॥ माजी बिंबला राहिणीवर ॥ तो न दिसे म्हणोनि अपार ॥ शोक करी अज्ञानी ॥२०॥

मळे पिकवीन अपार ॥ यालागीं इच्छी रोहिणीनीर ॥ तें अदृश्य होतां साचार ॥ शोक करिती मूर्खत्वें ॥२१॥

सकळ पिंडांसमवेत ॥ ब्रह्मांड अवघें मिथ्याभूत ॥ आत्मा अक्षय शाश्र्वत ॥ शोक किमर्थ करिसी तूं ॥२२॥

ऐशीं रावणारीचीं वचनें ॥ अमृताहून गोड गहनें ॥ कीं बोधसमुद्रींचीं चिद्रत्नें ॥ तारेलागीं दीधलीं ॥।२३॥

कीं तीं विश्रांतीची मंदिरें ॥ कीं अनुभवभींचीं नक्षत्रें ॥ कीं स्वानंदाचीं पात्रें ॥ मुखावरी उचंबळती ॥२४॥

कीं रामवचन अगस्ति थोर ॥ शोषिला तिचा शोकसागर ॥ कीं वचनरूपें दिनकर ॥ अज्ञानतिमिरनाशक ॥२५॥

मदनारीमित्राचे चरण ॥ तारेनें धरिले प्रीतीकरून ॥ श्र्वासोच्छ्वास टाकून ॥ तटस्थरूपें राहिली ॥२६॥

श्रीराम म्हणे तारेलागून ॥ माझें वचन मानीं प्रमाण ॥ सुग्रीवासी माळ घालून ॥ सुखेंकरून वर्तावें ॥२७॥

तारा म्हणे चापपाणी ॥ हे वेदविरुध्द दिसे करणी ॥ मग म्हणे कैवल्यदानी ॥ वचन मानीं माझें हें ॥२८॥

तूं पतिव्रतांमाजीं विख्यात ॥ तारे होशी यथार्थ ॥ अघटित घडवी रघुनाथ ॥ महिमा अद्भुत जयाचा ॥२९॥

देवाचें अघटित आचरण ॥ तें मानव करूं म्हणती आपण ॥ तरी तें नरकासी कारण ॥ होईल निश्र्चयें जाण पां ॥३०॥

अघटित घडवी रघुनंदन ॥ स्तंभाविण राहिलें गगन ॥ उदकावरी पृथ्वी संपूर्ण ॥ न बुडे सहसाही ॥३१॥

त्याचें कर्तृत्व करिती इतर ॥ तरी अनर्थासी नाहीं पार ॥ स्वेच्छा वर्ते सर्वेश्र्वर ॥ नव्हे म्हणे कोण त्यातें ॥३२॥

यावरी उत्तरक्रिया समस्त ॥ वाळीची करी सूर्यसुत ॥ अंगदावरी रघुनाथ ॥ प्रीति अत्यंत करीत पैं ॥३३॥

असो ते तारा सुंदरी ॥ रामें बोधिली ऐशियापरी ॥ सुग्रीवासी दिधली निर्धारीं ॥ शेसपाट भरोनियां ॥३४॥

यावरी तारेनें माळ ॥ सुग्रीवासी घातली तात्काळ ॥ जेणें प्रसन्न होय तमालनीळ ॥ आचरण तेंचि उत्तम ॥३५॥

सकल कपि जयजयकारें ॥ गर्जना करिती लहान थोरें ॥ नभ नादावलें भुभुःकारें ॥ महागजरें दुमदुमत ॥३६॥

राघव म्हणे सुग्रीवास ॥ आम्ही येथें राहिलों चार मास ॥ तुम्ही भोगोनि राज्यविलास ॥ सत्वर परतोनि येइंजे ॥३७॥

अर्कज म्हणे रघुनाथा ॥ आपण किष्किंधेसी चलावे आतां ॥ श्रीराम म्हणे माझिया भरता ॥ कारणें मी व्रतस्थ ॥३८॥

माझिया जिवालागाविण ॥ न करी मी मंगळस्नान ॥ आठवोनि भरताचे गुण ॥ रघुनंदन गहिंवरला ॥३९॥

मी चित्रकूटींहूनि निघतां ॥ भरतासि जाहली जे अवस्था ॥ ते सुग्रीवा नये सांगतां ॥ धीर चित्ता न धरवे ॥४०॥

जैसें बाळक परदेशीं ॥ माता टाकोनि जाय तयासी ॥ मजविणें माझ्या भरतासी ॥ तैसें जाहलें असेल ॥४१॥

सांगतां भरताचे गुण ॥ सद्रद जाहला रघुनंदन ॥ सुग्रीव धांवोनि धरी चरण ॥ लक्ष्मणही गहिंवरला ॥४२॥

असो याउपरी राजीवनेत्र ॥ बोलतां जाहला नीरदगात्र ॥ म्हणे सुग्रीवावरी धरीं छत्र । सौमित्रा सत्वर जाऊनियां ॥४३॥

रघुपतीचे चरणांबुज ॥ वंदी तेव्हां सुमित्रातनुज ॥ आशीर्वाद देत भरताग्रज ॥ विजयी होई सर्वदा ॥४४॥

मग सौमित्रें जावोनि सत्वर ॥ सुग्रीवावरी धरिलें छत्र ॥ अमात्यपद पवित्र ॥ वाळीपुत्रासी दीधलें ॥४५॥

सवेंच परतोन लक्ष्मण ॥ आला जेथें जानकीजीवन ॥ जवळी उभा वायुनंदन ॥ कर जोडोनि सर्वदा ॥४६॥

किष्किंधेसी नित्य जाऊन ॥ राघवापाशीं येईं परतोन ॥ तों चातुर्मास लोटले पूर्ण ॥ सुग्रीवासी स्मरण नव्हेचि ॥४७॥

देखोनियां शरत्काळ ॥ बोलता झाला तमालनीळ ॥ म्हणे सुग्रीव जाहला सबळ ॥ राज्यमदेंकरूनियां ॥४८॥

विषयसंगें रमलें मन ॥ धनविद्यामदें गेला भुलोन ॥ परी सज्जनीं त्यास दंडोन ॥ सन्मार्गातें लावावें ॥४९॥

तरी किष्किंधेसी जाईं लक्ष्मणा ॥ आठव देईं सूर्यनंदना ॥ तो जरी न मानी माझिया वचना ॥ तरी वधोनि त्यासी येईंजे ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 09, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP