अध्याय अठरावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


तारा रुमा दोघी घेऊन ॥ नित्य करी मद्यपान ॥ जो न करी माझे स्मरण ॥ त्यास अवश्य दंडावें ॥५१॥

जो ब्राह्मण देखोनि उपहास करी ॥ संत भक्तांचा द्वेष धरी ॥ सद्रुवचन अव्हेरी ॥ त्यासी अवश्य दंडावें ॥५२॥

निंदी हरिहरांची चरित्रें ॥ अपमानी जो सत्पात्रें ॥ अपूज्य पूजी आदरें ॥ त्यासी अवश्य दंडावें ॥५३॥

कायावाचामनें ॥ ज्यासी परपीडा अगत्य करणें ॥ आणि वेदविरूध्द ज्यासी वर्तणें ॥ त्यासी अवश्य दंडावें ॥५४॥

ऐश्र्वर्यमदें जे मातले ॥ हिंसा करितां न कंटाळले ॥ धर्मपंथ ज्यांनीं मोडिले ॥ त्यांसी अवश्य दंडावें ॥५५॥

कमळा आणि चक्रपाणी ॥ भेटों इच्छिती धर्मसदनीं ॥ कार्पण्यलोभें विघडी दोनी ॥ त्यास अवश्य दंडावें ॥५६॥

यावरी वीरचूडामणी ॥ किष्किंधेसी जाईं ये क्षणीं ॥ तो जरी माझें वचन अवगणी ॥ तरी तेचि क्षणीं वधावा ॥५७॥

वाळी निर्दाळिला ज्या बाणें ॥ त्याच शरें त्याचा प्राण घेणें ॥ ऐसें ऐकतां लक्ष्मणें ॥ राघवचरण वंदिले ॥५८॥

धनुष्यासी चढवूनि गुण ॥ वेगें चालिला उर्मिलाजीवन ॥ किष्किंधेसमीप येऊन ॥ लाविला बाण चापासी ॥५९॥

तों इकडे सूचना मारुति ॥ जाणवीत सुग्रीवाप्रति ॥ म्हणे एकला वनीं रघुपति ॥ चला वेगीं दर्शना ॥६०॥

सीताशुद्धीस त्वरीत ॥ वानर धाडावे निश्र्चित ॥ तूं जाहलासि उन्मत्त विसरलासि स्वामिकायार्थ ॥ सूर्यसुत मग बोले ॥६१॥

जाहले धूर्णित लोचन ॥ बोले उदासीन वचन ॥ म्हणे वानरसेना मेळवून ॥ सिद्ध करा हळू हळू ॥६५॥

ऐसें बोलोनि सूर्यसुत ॥ राणीवसामाजीं प्रवेशत ॥ तों नगरद्वारीं उर्मिलानाथ ॥ येवोनि उभा ठाकला ॥६६॥

धनुष्यासि लाऊनि बाण ॥ क्षोभे जैसा प्रळयाग्न ॥ पळों लागले वानरगण ॥ येती शरण सुग्रीवा ॥६७॥

तेव्हां सुग्रीव गजबजिला ॥ म्हणे हनुमंता रक्षी मला ॥ येरु म्हणे सौमित्र कोपला ॥ तो नाटोपें कवणातें ॥६८॥

उभयदारांसमवेत ॥ शरण येत सूर्यसुत ॥ आणिक वानरभार समस्त ॥ सांगे हनुमंत समस्तां ॥६९॥

म्हणे हो नम्रता धरून ॥ अवघे घाल लोटांगण ॥ तैसेंच करिती वानरगण ॥ सुग्रीवासहित तेधवां ॥७०॥

तारा रुमा पुढें होऊन सौमित्रास मागती चुडेदान ॥ सुग्रीव धरी दृढ चरण ॥ ऊर्मिलापतीचे तेधवां ॥७१॥

सौमित्र म्हणे क्रोधायमान ॥ ऐसे तुम्ही निर्दय पूर्ण ॥ श्रीरामसच्चिदानंदघन ॥ वनीं सोडोनि राज्य करितां ॥७२॥

तो अनंत ब्रह्मांडनायक ॥ अयोध्यानाथ पुण्यश्र्लोक ॥ त्यास वनीं सांडोनि राज्यसुख ॥ गोड कैसें वाटलें ॥७३॥

हनुमंत बोले वचन ॥ सर्व अपराध क्षमा करून ॥ उठवावा सूर्यनंदन ॥ प्रीती करोन येसमयीं ॥७४॥

मग उठवोनि सूर्यसुत ॥ राघवानुज आलिंगित ॥ तंव वानरभार अद्भुत ॥ चहूंकडोन धांविन्नले ॥७५॥

वानरचमूसमवेत ॥ चालिला तेव्हां तमारिसुत ॥ जैसी नदी उचंबळोन बहुत ॥ मिळूं जाय जलार्णवा ॥७६॥

आवेशें वानरगण धांवत ॥ जैसें गोकुळ तृषाक्रांत ॥ सरितापंथें जलपानार्थ ॥ चपळत्वेंकरून लोटती ॥७७॥

कीं दात्याचें गृह लक्षून ॥ धांवती वेगें याचकजन ॥ कीं पाहावया सद्रुरुचरण ॥ सच्छिष्य येती त्वरेनें ॥७८॥

कीं लग्नघडी उरली थोडी ॥ देखोनि धांवती वऱ्हाडी ॥ कीं मिलिंदचक्रें धांवती तांतडी ॥ पद्मकरंद सेवावया ॥७९॥

तैसे आले रघुपतीजवळी ॥ लोटांगणें घालिती सकळी ॥ रामें आलिंगिला हृदयकमळीं ॥ मित्रतनुज आदरें ॥८०॥

आणीकही सकळ वानरां ॥ भेटला परत्रींचा सोयरा ॥ कर जोडोनि पुढारां ॥ किष्किंधेश स्तवीतसे ॥८१॥

जय निगमागमवंद्या रघुवीरा ॥ भक्तकैवारिया आनंदसमुद्रा ॥ पंचकद्वययरथपुत्रा ॥ विश्र्वनेत्रा विश्र्वपाळा ॥८२॥

शरणागतासी तूं वज्रपंजर ॥ कदा नुपेक्षी शाङर्‌रधर ॥ जैसें सबळ काष्ठ तारी नीर ॥ आपण वाढविलें म्हणोनि ॥८३॥

तिळभरी पाषाण न तरे जळीं ॥ वृक्षा तारी सर्व काळीं ॥ शरणागतांची माउली ॥ तैसाचि तूं श्रीरामा ॥८४॥

पद्मासी ढका न लावी भ्रमर ॥ काष्ठें तात्काळ करी चूर ॥ तेंवि भक्तपाळक अभक्तसंहार ॥ सीतावल्लभा करिसी तूं ॥८५॥

असो भूरत्नशुद्धीसी वानर ॥ जावया इच्छिती सर्वत्र ॥ मग बोले विषकंठमित्र ॥ जाऊंद्या सत्वर चहूंकडे ॥८६॥

अर्कसुतें पाठवून दूत ॥ वानर आणिले समस्त ॥ अष्टदश पद्में बल अद्भुत ॥समरीं कृतांता जिंकिती ॥८७॥

सुग्रीवें घालोन आण ॥ आणिले वेगें सप्तद्वीपींचे हरिगण ॥ समस्तांसी म्हणे सूर्यनंदन ॥ ऐका वचन सत्य माझें ॥८८॥

सीताशुद्धि करून तत्वतां ॥ जानकी भेटवूं रघुनाथा ॥ हें कार्य सिद्धीस न पावतां ॥ निजनगरासी न जावें ॥८९॥

सीता न भेटवितां रघुवीरा ॥ जो कोणी जाईल माघारा ॥ तो मात्रागमनी अवधारा ॥ ब्रह्महत्यारी पापिष्ठ ॥९०॥

त्यासी रासभावरी बैसवून ॥ तात्काळ छेदीन नासिका कर्ण ॥ पृथ्वीवरी फिरवीन ॥ स्वामिद्रोही म्हणोनियां ॥९१॥

सीताशुद्धि नोहे म्हणोन ॥ जो कोणी येईल परतोन ॥ त्यासी मी स्वहस्तें दंडीन ॥ छेदीन कर चरण तयांचे ॥९२॥

तंव द्वीपद्वीपींचे वानर ॥ गिरिकंदरीं जे राहणार ॥ मेरुपाठारवासी समग्र ॥ देत भुभुःकार पातले ॥९३॥

नाद न मायेचि गगनीं ॥ चालतां दणाणी मंगळजननी ॥ शेष कूर्म दचकले मनीं ॥ भुभुःकारध्वनि ऐकोनियां ॥९४॥

एक हरि पर्वत उचलोनि ॥ कंदुकवत् धाडी गगनीं ॥ एक वरचेवर झेलोनि ॥ भिकावित दुसरीकडे ॥९५॥

एक महावृक्ष उपडोनि बळें ॥ झोडोनियां भक्षिती फळें ॥ पृथ्वी अंबर समग्र भरलें ॥ रीसवानरीं तेधवां ॥९६॥

एक गगनपंथें उडिया घेती ॥ खालीं पाडूं पाहती गभस्ती ॥ खुंटली समीराची गति ॥ वाट न फुटे चालावया ॥९७॥

एक पश्र्चिमसमुद्रा धांवती ॥ तों अस्तासी गेला दिनपति ॥ एक समुद्रीं पुच्छें बुडविती ॥ ओढून काढिती जलचरें ॥९८॥

दशलक्ष योनि उदकांत ॥ नाना जातींचे जीव बहुत ॥ आणोनि राघवासी दावित ॥ चतुःसमुद्र धुंडोनियां ॥९९॥

नानाजातींचे वानर ॥ बहुत रंग बहुत विकार ॥ एक उभे राघवासमोर ॥ वांकुल्या दाविती विनोदें ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : April 09, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP