पूर्वी असें सांगितलें कीं, सताची जशी सर्वत्र अनुवृत्ति आहे, तशी आकाशाची नाही. पण आतां आकाशाची व्याप्ति वायूमध्यें दाखवितां; तेव्हां पूर्वोत्तर विरोध येतो, अशी कोणी शंका घेईल. ॥८१॥
तर त्याचें समाधान हेंच कीं, पूर्वी आम्हीं जी व्याप्ति निवारिली, ती अवकाशलक्षणस्वरुपाची आणि आतां जी आम्ही सांगत आहों, ती केवळ शब्दरुपधर्माची म्हणून पूर्वोत्तर विरोध येत नाही. ॥८२॥
याजवरही असा एक पूर्वपक्ष आहे की, वायूतून सत्ता निराळी काढली असतां बाकीं राहिलेलें वायूचें रूप निस्तत्व जसें आहे तसेंच अव्यक्त मायेपासून ते भिन्न असल्यामुळे त्यास मायाही म्हणतां येत नाहीं. ॥८३॥
तर याजवर आमचें असे समाधान आहे कीं, माया ही अव्यक्तच असली पाहिजे असें कांहीं नाही. निस्तत्वरुप हेंच मायेचें रुप तें असलें म्हणजे झालें माया व्यक्त असो, किंवा अव्यक्त असो, त्या दोहींलाही हें निस्तत्वरुप साधारणच आहे. ॥८४॥
परंतु प्रस्तुत या विचाराची जरुर नाहीं. तूर्त सत् कोणचें आणि असत् कोणचें याच विवेक करणें आमचें काम आहे. असताचे जे अवतार भेद आहेत त्यांचे कांहीं येथें प्रयोजन नाहीं. ॥८५॥
याकरितां वायूचेठायीं जो सत्तारूप अंश आहे, तो वजा जातां बाकी उरलेला जो वायूचा अंश तो आकाशाप्रमाणें मिथ्या आहे. हे वायुचें मिथ्यात्व चित्तामध्यें ठसवून बुद्धिनें वायूचा त्याग करावा. ॥८६॥
याचप्रमाणें वायूपेक्षा न्यूनदेशी असणारा जो वन्ही त्यांचें चिंतन करावें, म्हणजे सत्तारुप अंश वजा केला असतां अवशिष्ट वन्हि मिथ्या आहे असा दृढ निश्चय करावा. हा न्युनाधिक विचार ब्रह्मडावरणाचेठायीं दृष्टीस पडतो. ॥८७॥
वायूच्या दहाव्या हिशानें वायूच्याठायीं अग्नि असतो हें पंचभूताचें एकाहून एका दशांशें करुन न्यूनत्व पुराणांत सांगितलें आहे. ॥८८॥
वन्हींचे स्वरुप उष्ण प्रकाशात्मक आहे. वन्हि आहे यांत सत्तारुप धर्म आला तो एकीकडे सारुन ,वन्ह निराळा केला असतां तो निस्तत्व शब्दवान आणि स्पर्शवान आहे असें दिसेल. ॥८९॥
याप्रमाणें सत्ता माया, आकाश व वायू या सर्व अंशाहिंकरुन युक्त जो अग्नि त्याचे स्वतःचा गूण रुप होय; त्याची निवड बुद्धीने करावी. ॥९०॥
सत्तेपासून अग्नीची निवड करुन त्यांचे मिथ्यात्व चित्तांत ठसलें असतां उदक हें अग्नीहून दशांशानें कमी आहे असे कल्पावे. ॥९१॥
पाणी आहे या व्यवहारास कारणीभूत जी सत्ता ती वेगळी करुन पाहिले असता बाकी राहिलेले उदक हें अगदी निस्तत्व आहे. यांत शब्द स्पर्श रुप हे तीन गूण बाकीच्या भूतांचें असून रस हा पाण्याचा स्वकीय गूण आहे. ॥९२॥
सत्तेपासून पाणी पृथक करुन त्यांचेही मिथ्यात्व चित्तांत ठसलें असतां त्याहुन दशांशानें कमी असणारी जी पृथ्वीं तिचें चिंतन करावें. ॥९३॥
पृथ्वी आहे या व्यवहारास कारणीभूत जी सत्ता ती निराळी करुन बाकी राहिलेली पृथ्वी निस्तत्व आहे शब्द, स्पर्श, रुप आणि रस हे चार गूण तिजमध्यें इतर भूतांचें असून गंध हा तिचा स्वकीय गूण आहे. ॥९४॥
तिजपासून सत्ता निराळी करुन तिचें मिथ्यात्व चांगले ठसल्या नंतर तिजहुन दशांशानें कमी असें तिच्या मध्यमागीं असणारें ब्रह्मांड, ॥९५॥
व त्या ब्रह्मंडात चतुर्दश भूवनें आहेत. त्या भूवनांमध्यें प्राण्यांचें देह आहेत. ॥९६॥
या सर्वातून सद्वस्तु वेगळी केली असतां बाकीचे अंडादिक मिथ्या ठरतात. डोळ्यांसह जरी भासली तरी ती मिथ्याच समजावी. ॥९७॥
पंचभूतें व त्यांपासून झालेली ब्रह्मांडे व या दोहोंस कराणीभूत जी मायाशक्ति यांचें मिथ्यात्व विवेक व ध्यान यांच्या योगाने एकदां चित्तांत चांगलें ठसले असतां सद्वस्तुच अद्वैत आहे असा निश्चय चित्तांतून कधीहीं ढळणार नाहीं. ॥९८॥
सद्रूपापासून वेगळी केलेली भूम्यादिक द्वैत सृष्टी मिथ्या ठरली असतां तत्त्ववेच्याचा व्यवहार अगदी बंद पडेल अशी शंका कोणी घेऊ नये. पदार्थ मिथ्या ठरल्याने व्यवहार बंद पडतो असे समजणे ही मोठी चूक आहे. ज्या ज्या कामाकरितां जी जी क्रिया पाहिजे ती ती क्रिया यथास्थित चालण्यास जगन्मिथ्यत्वामुळे मुळीच नड येत नाही. ॥९९॥
सांख्य, काणाद , बौद्ध आदिकरुन जे वादी होऊन गेले त्यांनी निरनिराळ्या रीतीने जसजसें भेदाचें प्रतिपादन केलें आहे. त्या सर्वांचे खंडन करण्याचें आमचें काम नाहीं. त्यांचे मत तूर्त आहे तसेच असूं दे. ॥१००॥
आम्हीं येथे केवळ व्यावाहारिक भेदाचा मात्र निरास करतों. इतर वाद्यांनी जर आमच्या सद्गूप अद्वैत ब्रह्मची निःशंकपणे अवज्ञा केली तर आम्हांलागी त्यांच्या द्वैताचा अनादर करण्यास कोणाची भीति आहे. ॥१०१॥
त्यांच्या अद्वैताच्या अनादराप्रमाणें आम्हीं केलेल्या द्वैताचा अनादर निष्फळ नाहीं, हा द्वैताचा अनादर एकदा चित्तांत चांगला ठसला असतां अद्वैत बुद्धि स्थिर होते व तीस्थिर झाली असता मनुष्य जीवन्मुक्त होतो. ॥१०२॥
याविषयीं गीतावाक्य प्रमाण आहे भगवंतांनी अर्जूनास असें म्हटलें आहे कीं हे अर्जूना या अद्वैत बुद्धीला ब्राह्मी स्थिति असें म्हणतात. ही प्राप्त झाली असतां प्राणी मोह पावत नाही; व या स्थितीत असल्यावर अंतकालीं ब्रह्मप्राप्ति होते. ॥१०३॥
येथें अंतकाला या शब्दाचा अर्थ असा कीं सद्रुप अद्वैत ब्रह्म आणि असद्रुप द्वैत ह्म दोन्हींचें भ्रमेकरुन जें ऐक्यज्ञान त्याचा जो अंतकाल तो समजावा. तो अंतकाल म्हटला म्हणजे द्वैत व अद्वैत या दोहोंमधील भेदबुद्धी होय. ॥१०४॥
अथवा अंतकाल या शब्दाचा जो लोकप्रसिद्ध अर्थ तो घेतला तरी चालेल. प्राणोत्क्रमणकालीहीं एकदां गेलेली भ्रांति पुनः परत येत नाही. ॥१०५॥
हा मनुष्य रोगी असो, निरोगी असो, बसला असो भूईवर लोळत पडला असो, प्राणत्यागकाली मूर्छित पडो, कसाही असो, तेथें भ्रांतीची शंकाच नाहीं. ॥१०६॥
ज्या प्रमाणे प्रती दिवशीं केलेले वेदपठण स्वप्न व निद्रा यांमध्यें जरी विसरले तरी दुसरें दिवशी आठवतें त्याप्रमाणें एकदां झालेलें ज्ञान नष्ट होत नाहीं.॥१०७॥
शिवाय प्रमाणापासून उप्तन्न झालेलें ज्ञान दुसर्या प्रबल प्रमाणावांचून नाश पावत नाहीं वेदातांपेक्षा तर दुसरें प्रमाणत नाही. ॥१०८॥
तस्मात वेदांत प्रमाणांनी सिद्ध केलेले अद्वैत तें कधीही बाधित होत नाहीं म्हणून भूत विवेकापासून अंतकाली मोक्ष प्राप्ति होते. ॥१०९॥
भूतविवेक समाप्त