पञ्चमहाभूतविवेक - श्लोक ४१ ते ६०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


आतां अशी एक शंका आहे कीं, भूग्यादिक चार भूतें परमाणूंची बनलीं असल्यामुळें ती नाशवंत व खोटीं असें कदाचित् मानतां येईल. पण आकाशाचे मिथ्यात्त्व बुद्धींत कसें ठसावें ? ॥४१॥

याज्वर आमचें असें उत्तर आहे कीं, सर्व जग एकीकडे सारुन निवळ आकाश जसें तुझ्या बुद्धींत शिरलें तसेंच आकाशही एकीकडे सारुन केवळ सद्रूप पहा म्हणजे झाले. म्हणजे तें बुद्धींत आपोआप ठसेल. ॥४२॥

जगद्रहित आकाश प्रत्यक्ष दिसतें, असें जर म्हणावें, तर प्रकाश व तम यांखेरीज आकाश कोठें दिसतें ? शिवाय आकाश दिसतें ? शिवाय आकाश दिसतें म्हणण्यानें आम्हावर शंका घेणाराच्या मतास विरोध येतो. कारण त्यांच्या मतें आकाश प्रत्यक्ष नाहीं. ॥४३॥

परंतु आमची सद्वस्तु तशी नाहीं. ती आमच्या अनुभवास स्पष्टपणें येते. तूष्णीं स्थितीमध्यें तिचा अनुभव स्पष्ट येतो. येथें शून्याची शंका येईल तर तेथें शून्यबुद्धीही नाहीं. ॥४४॥

सद्वुद्धि तरी कोठें असते, अशी कोणी शंका घेईल तर आहे असें आम्ही तरी कोठें म्हणतों ? तूष्णीं स्थितीत सदबुद्धीही नाही. पण मनाच्या अभावाचा साक्षी स्वयंप्रकाश असल्यामुळे सद्रूप पाहणें हें मनुष्यास अगदीं सोपें आहे. ॥४५॥

मनाच्या सर्व कल्पना नाहींशा झाल्या असतां जसा साक्षी निराकुल राहतो, तसेंच मायेचा विस्तार होण्यापूर्वी सद्रूप शांत असतें. ॥४६॥

आतां मायेचें लक्षण कसें काय आहे याचा विचार करुं या सद्वस्तूची शक्ति माया ही स्वतः निस्तत्व असून केवळ अग्निशक्तीप्रमाणें आहे, म्हणजे कार्यावरुन समजण्याजोगी आहे, आणि शक्ति म्हटली म्हणजे कार्यापूर्वी कधीही समजावयाची नाही. ॥४७॥

ज्याप्रमाणें वन्ही आणि वन्हीची शक्ति हीं दोनही एकच होऊं शकत नाहीत. त्याप्रमाणें सद्वस्तु आणि तिची शक्ति हीं दोनही एकच होऊं शकणार नाहीत. आतां ही शक्ति सतापासून निराळी जर म्हणावी तर तिचें रुप कोणतें ? ॥४८॥

तिचें रुप शून्य जर म्हणावें तर शून्य हें मायाकार्य आहे. असें पूर्वीच सांगितलें आहे. तेव्हां शून्यही नव्हे व ती सद्वस्तपासून भिन्नही म्हणतां येत नाहीं व अभिन्नही म्हणतां येत नाही. तस्मात ती अनिर्वचनीय आहे असेंच म्हटलें पाहिजे. ॥४९॥

याविषयीं श्रुतिप्रमाण असें आहे कीं, सृष्टीपूर्वी सतही नव्हतें व असतही नव्हतें; केवळ तम मात्र होतें. तम होतें या वाक्यांत तमास स्वतः अस्तित्व आहे असें समजूं नये. केवळ सताचा योग मात्र आहे. ॥५०॥

याकरितां शून्याप्रमाणें मायेलाही द्वितीयत्व गणतां येत नाहीं. साधारण व्यवहारांतही वस्तुशक्तीची गणना वस्तूहून पृथक् केली जात नाहीं. एकाद्या चैत्र नांवाच्या मनुष्याच्या चाकरीबद्दल पगार नमूद करणें झाल्यास तो त्यांच्या नांवावर मात्र घालतात. त्याच्या शक्तीची गणना पृथक् केली जात नाहीं ॥५१॥

आतां याजवर अशी एक शंका आहे कीं, शक्तीच्या प्रमाणावर वेतनांचें प्रमाण असतें. म्हणजे शक्ति जसजसी कमी जास्त असते तसतसें वेतनही कमीजास्त मिळतें. पण ही शंका बरोबर नाही. वेतनाचें प्रमाण शक्तीच्या प्रमाणावर नसून तिच्या कार्याच्या प्रमाणावर आहे. योद्धा केवळ शूर असून उपयोगी नाहीं किंवा शेतकरी केवळ शरीरानें बळकट असून फळ नाहीं. ते आपापली चाकरी बजावतील तरच त्यास वेतन मिळेल. ॥५२॥

तस्मात् शक्तिमात्राची गणना शक्तापासून पृथक् करितां येत नाही. इतकें सिद्ध झालें. शक्तिकार्याची गणना पृथक् होऊं शकेल. पण तें मुळींच मिथ्या आहे. याकरितां ब्रह्माचेठायीं द्वैताचा संभव मुळींच नाहीं हें सिद्ध झालें, ॥५३॥

ब्रह्माची शक्ति ब्रह्मास सर्वत्र न व्यापतां ती केवळ एक देशी मात्र आहे. ज्याप्रमाणें घट होण्याची शक्ति चिकण मातींत मात्र असते. ॥५४॥

माया ही ब्रह्मावर एकदेशी व्याप्त आहे. एतद्विषयीं पुढील श्रुति प्रमाण आहे. " या परमेश्वराचा एक पाद सर्व भूतांला व्यापून स्वतः त्रिपाद होत्सातां स्वयंप्रकाश होऊन राहतो. " ॥५५॥

याविषयीं गीतेंतही प्रमाण आहे. भगवंतानीं अर्जुनास असें सांगितलें आहे कीं मी या सर्व जगास माझ्या एका अंशानें व्यापून राहिलों आहें. ॥५६॥

सर्व विश्व व्यापून परमेश्वर दशांगुळें उरला अशीही एक श्रुति आहे; ‘ विकारवर्तिच ’ असें एक व्यासाचें सूत्र आहे. त्याचाही अभि प्राय हाच आहे. ॥५७॥

निरंश ब्रह्माला अंश कसा. अशी शंका येईल तर तिचें समाधान असें कीं, निरंशावर अंशाचा आरोप ठेवून माया ब्रह्माला सर्वत्र व्यापते किंवा अंशतः व्यापते असें विचारणारास उद्देशून त्याचें समाधान करण्याकरितां श्रुतीचे असें वचन आहे. ॥५८॥

सद्वस्तूचा आश्रय करुन असणारी शक्ति सद्वस्तूचेठायी नानाप्रकारच्या विकाराची कल्पना करिते. ज्याप्रमाणें भिंतीवर काढलेले चित्रांत नानाप्रकारचे वर्ण भासतात. ॥५९॥

सद्वस्तूवरील पहिला विकार आकाश होय. त्याचें मुख्य स्वरुप अवकाश. ‘ आकाश आहे ’ या वाक्यावरुन आहे पणा आकाशाचेठायीं व्यापून आहे असें होतें. ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP