आहे पणांत अवकाश नाही. केवळ अस्तित्वाचा एकच स्वभाव आहे. परंतु आकाशाचेठायीं एक आहे पणा व दुसरा अवकाश असें दोन स्वभाव आहेत. ॥६१॥
अथवा आकाशाचा गुण प्रतिध्वनि हा आहे, तो सद्वस्तूचेठायीं दिसत नाहीं. परंतु आकाशाचेठायी आहेपणा आणि प्रतिध्वनि असे दोन आहेत. म्हणून सत् एक स्वभाव आणि आकाश द्विस्वभाव आहे असें अर्थांतच सिद्ध झाले. ॥६२॥
याज्वर अशी शंका आहे कीं, आकाश हें सद्वस्तूचें कार्य असून आकाशाची सत्ता असें म्हणण्याचा जो परिपाठ आहे, त्याजवरुन सत्ता हा आकाशाचा धर्म आहे, असें होतें तर हें विपरीत कसें ? तर याजवर आमचें असें समाधान आहे कीं, जी शक्ती आकाशाची कल्पना करिते, तीच शक्ति सत्ता आणि आकाश या दोहोंचा अभेद कल्पून धर्माचा धर्मी आणि धर्मीचा धर्म करिते ॥६३॥
वास्तविक पाहतां सत्तेचे आकाश असा व्यवहार असावा तो नसून आकाशाची सत्ता अशा व्यवहार साधारण लोकांत व विद्वान लोकांत आढळतो हाही मायेचाच खेळ आहे ॥६४॥
पदार्थ जशाचा तसा भासला असतां तें सत्यज्ञान होय. आणि नशाचा तसा न भासतां अन्यथा भासतो त्या़सच भ्रम असें म्हणतात ॥६५॥
याप्रमाणें श्रृत्यर्थविचार करण्यापूर्वी जें सद्रूप ब्रह्म भ्रांतीनें गगनादिकांच्या रुपानें भासतें, तेंच श्रुत्यर्थविचार झाल्यानंतर त्याचा गगनादि भाव जाऊन पूर्ववत् ब्रह्मच भासूं लागतें. याजकरितां आधी आकाशाचें विवेचन करावें ॥६६॥
आकाश आणि सत् हें दोन शब्द जसे एकमेकांपासून भिन्न आहेत, तसेंच आकाशबुद्धि आणि सदबुद्धि या दोनही एकमेकांपासून भिन्न आहेत. कारण पूर्वी वाय्वादिक भूतांचिठायीं जशी सत्ता व्यापून आहे तसें आकाश नाहीं म्हणून आकाशापासून सत्ता भिन्न आहे हें सिद्ध झालें. ॥६७॥
आतां सद्वस्तूची व्याप्ति अधिक असल्यामुळें त्याला धर्मित्व येतें. आणि आकाशाची कमी असल्यामुळें त्याला धर्मत्व येतें. बुद्धीनें आकाशापासून सत्ता निराळी केली असतां आकाशाचें स्वरुप काय राहतें हें सांगतां येणें अशक्य आहे. ॥६८॥
कोणी म्हणेल कीं, तें अवकाशात्मक आहे. होय पण तें सतापासून भिन्न असल्यावर असतच असलें पाहिजे. तसें न म्हटल्यास व्याहतिदोष येतो. ॥६९॥
वास्तविक नसणारें जग भासतें कसें अशी शंका घेण्याचें कारण नाही. असें भासणें हें मायेचें भूषणच आहे. स्वप्नांत हत्ती घोडे भासतात म्हणून ते खरे काय ? जें नसून भासतें त्यासच मिथ्या म्हणतात. ॥७०॥
जाति, व्यक्ति, देही, देह, गुण, आणि द्रव्य हीं जशीं एकमेकांपासून पृथक् आहेत, तशीच सत्ता आणि आकाश हीं एकमेकांपासून भिन्न आहेत. यांत नवल तें काय ? ॥७१॥
हें मात्र खरें आहे कीं, हा भेद जरी समजला तरी तो चांगला चित्तांत ठसत नाहीं. यास कारणें दोन आहेत. एक चित्ताचें अनैकाग्र्य, दुसरें संशय. यापैकी कोणचे कारण आहे याचा विचार करावा. ॥७२॥
अनैकाग्र्य असेल तर ध्यानानें एकाग्रता करावी. आणि संशय असेल तर प्रमाण व युक्ति लढवून चांगलें विवेचन करावें. म्हणजे वर सांगितलेला भेद चित्तांत चांगला ठसेल. ॥७३॥
ध्यान, प्रमाण आणि युक्ति यांच्या योगानें आकाश आणि सत्ता या दोहोंतील भेद एकदां मनांत ठसल्यावर पुनः आकाश सत्य व सद्वस्तु पोकळ असें कधींही वाटणार नाहीं. ॥७४॥
तत्त्ववेत्त्याला आकाश हें अगदीं निस्तत्त्व आणि सद्वस्तु ओत प्रोत दाट भरलेली अशी भासते. ॥७५॥
हें ज्ञान एकदा दृढ झालें असतां आकाशाला खरें म्हणणारास व ज्याला सद्रूपाची व्यापकता समजली नाहीं अशा मनुष्यास पाहून तत्त्ववेत्त्याला मोठें आश्चर्य वाटेल. ॥७६॥
याप्रमाणें आकाशाचें मिथ्यात्व आणि सद्वस्तूचें सत्यत्व चांगलें ठसल्यावर याच न्यायानें वाय्वादिक भूतांपासून सद्वस्तुची निवड करावी. ॥७७॥
सद्वस्तुच्या एकदेशीं माया, मायेच्या एकदेशी आकाश व आकाशाच्या एकदेशी वायु कल्पिलेला आहे. ॥७८॥
शोष, स्पर्श, गति आणि वेग, हे वायूचे धर्म आहेत. सत्ता, माया आणि आकाश या तिहींचे जे तीन स्वभाव तेहीं वायुगतच आहेत. ॥७९॥
‘ वायु आहे ’ अशा व्यवहारास जो हेतुभूत तो वायूंतील सत्ताधर्म समजावा, आणि सत्तेपासून वायु पृथक् केला असतां जें त्याचें निःसत्वरुप राहतें तो मायाधर्म, आणि वायूंतील जो ध्वनि तो आकाशधर्म समजावा. ॥८०॥