कार्तिकस्नान
सर्व धर्मकृत्यांत स्नानास फार महत्त्व असून त्याची फार आवश्यकता असते. तसेच, स्नानामुळे मनुष्याच्या आरोग्याचे रक्षण व निरोगीपण यात वाढ होते. माघ, कार्तिक व वैशाख या महिन्यांतील नित्य स्नानाला तर आगळेच महत्त्व आहे.
कार्तिकं सकलं मासं नित्यस्नायी जितेंद्रिय: ।
जपन् हविष्यभुक्छान्त: सर्वपापै: प्रमुच्यते ॥'
अर्थ - संपूर्ण कार्तिक महिनाभर जितेन्दिय राहून नित्य स्नान केले व हविष्यान्न घेतले तर सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
हे व्रत आश्विन पौर्णिमेस चालू करून ३१व्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेपर्यंत करावे व त्या दिवशी समाप्ती करावी. किंवा या स्नानाची सुरुवात दशमी किंवा एकादशीपासून करतात. या काळात स्नानासाठी विहीर अगर तळे यांचा वापर करावा. कुरुक्षेत्र, अयोध्या इ. तीर्थे व पुर्या व काशीच्या पाचही नद्यांतील स्नानाला तर आगळेच महत्त्व आहे. असे योग दुर्लभ असतात. पाण्यात उतरण्यापूर्वी बाहेरच हातपाय धुवावेत. आचमने करून शेंडीस गाठ मारून दर्भाने संकल्प सोडून मगच स्नान करावे.
हे कार्तिक स्नान पुत्रप्राप्तीसाठी व्रत म्हणून केले असेल तर स्नानानंतर अभिलाष्टक नावाचे स्तोत्र पठण करावे. संपूर्ण महिनाभर प्रात:स्नान करणे शक्य नसल्यास निदान कार्तिक शु. एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस करावे.