* दीपदान
आश्विन व. चतुर्दश दिवशी प्रदोषकाळी तिळाच्या तेलाने भरलेले आणि प्रज्वलित असे १४ पूजित दिवे घेऊन
'यममार्गांधकारनिवारणार्थे चतुर्दशदीपानां दानं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून ब्रह्मा, विष्णू व महेश इ. देवतांच्या देवळांत, सभामंडपात, गाभार्यात, आवारात आणि बागा, गल्ल्या, विहिरी यांच्या आसमंतात, तसेच तबेला व अन्य एकान्त ठिकाणी दिवे उजळावेत. या
'दिव्यां' च्या व्रताने यमराज प्रसन्न होतो.
* नरकचतुर्दशी
आश्विन व. चतुर्दशीला पहाटे, ज्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चतुर्दशी असेल त्या दिवशी सकाळी, शौचमुखमार्जन झाल्यावर-
'यमलोकदर्शनाभावकामोऽहमभ्यंगस्नान करिष्ये ।'
असा संकल्प सोडून तिळाच्या तेलापासून केलेले उटणे अंगास लावावे. मग नांगरलेल्या जमिनीतील ढेकूळ, तुंबी व आघाडा डोक्याभोवती अनेक वेळा फिरवून स्वच्छ स्नान करावे. जरी कार्तिक-स्नानात तेलाने अभ्यंग वर्ज्य असले तरी
'नरकस्य चतुर्दश्यां तैलाभ्यंगं च कारयेत् ।
अन्यत्र कार्तिकस्नायी तैलाभ्यंगं विवर्जयेत् ।'
याअनुसार नरकचतुर्दशीस तेलाने अभ्यंग स्नान करण्यात कोणताही दोष नाही. जर ही तिथी दोन्ही दिवस चंद्रोदयव्यापिनी असेल तर चतुर्दशीला चौथ्या प्रहरी आंघोळ करावी. चार दिवस हे व्रत केल्याने सुखसौभाग्य वाढते.
या चतुर्दशीस 'रूपचतुर्दशी' असेही म्हणतात.
या दिवशी चार वातींची समई प्रज्वलित करून पूर्वेकडे तोंड करून ती
'दन्तो दीपश्चतुर्दश्यां नरकप्रीतये मया ।
चतुर्वर्ति समायुक्त: सर्वपापान् अनुत्तये ।'
हा मंत्र म्हणून दान द्यावी. यावेळी एक प्रज्वलित उल्का (दारूसामानाची बनलेली ) घेऊन
'अग्निदग्धाश्च ये जीवा ये ऽ प्यदग्धा: कुले मम ।
उज्जवल ज्योतिषादग्धास्ते यान्तु परमां गतिम् ।'
या मंत्राने तिचे दान केले तर उल्का इ. मुळे मेलेले सद्गतीप्रत जातात.
हे एक काम्य व्रत आहे. या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान झाल्यावर सर्व आन्हिके आटोपून झाल्यावर नक्त व्रताचा संकल्प करतात. सायंकाळी नरकासुराच्या नावाने चार वातींचा दिवा लावून पुढील मंत्र म्हणातात -
'अग्निर्ज्योती रविर्ज्योतिश्चद्रोज्योतिस्तथैव ।
सर्वेषां ज्योतिषां श्रेष्ठी दीपोऽयं प्रतिगृह्यताम्।'
असे म्हणून देवालये, वाडा, उद्याने वगैरे सर्वत्र दिवे लावतात. नंतर गवताची अगर अन्य कशाची चूड पेटवून '
अग्निदग्धाच्च ये -'
हा मंत्र म्हणतात. अग्नीने दग्ध होऊन जे मरण पावले असतील, मेल्यावर दग्ध झाले नसतील तेसुद्धा सर्व या चुडीचा प्रकाशामुळे परमगती पावतात.
शेवटी शैव ब्राह्मणाला वस्त्रालंकार व भोजन देऊन व्रतकर्त्याने स्वत: उडदाच्या पानांच्या भाजीने युक्त असे नक्त भोजन करावे, असे सांगितले आहे.
* यमतर्पण
आश्विन व. चतुदशीला सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून पाणी, दर्भ व तीळ हातात घेऊन
'यमाय धर्मराजाय मृत्यवे अनंताय वैवस्वताय कालाय सर्वभूतक्षयाय औदुंबराय दघ्नाय नीलाय परमेष्ठिने वृकोदराय चित्राय व चित्रगुप्ताय'
यांतील प्रत्येक नावाने पाणी सोडावे.
उदा. 'यमाय नम: ।'
जानवे गळ्याता मालाकार ठेवून तर्पण करताना काळे व पांढरे दोन्ही तीळ वापरावे. कारण यमामध्ये धर्मराजरूपी देवत्व व यमराजरूपी पितृत्व हे दोन्ही अंश असतात.
* हनुमज्जयंत्युत्सव
'आश्विनस्यासिते पक्षे भूतायां च महानिशि ।
भौमवारे ऽ ञ्जनादेवी हनुमंतं अजीजनत् ।'
आश्विन व. चतुर्दशीला भौमवारी मध्यरात्री अंजनीने हनुमानास जन्म दिला. मारुती-उपासकांनी या दिवशी प्रात:स्नानादी करून
'मम शौर्यादार्यधैर्यादिवृद्धर्थं हनुमत् प्रीतिकामनया हनुमज्जयंतिमहोत्सवं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून मारुतीची षोडशोपचारे पूजा करावी. तेल व गंध यात शेंदूर खलून तो मूर्तीला लावावा. त्यास फूले वाहावीत. नैवेद्यासाठी तूप घातलेला चुर्मा, मोदक, केळी, पेरू इ. फळे ठेवावीत. वाल्मीकी रामायणातील 'सुंदरकांड' वाचावे. रात्री दिवाळीसारखी दिव्यांची शोभा करावी. चैत्र शु. पौर्णिमेलाही काही शास्त्रानुसार हनुमानजयंतीचा उत्सव करतात, म्हणून चैत्रातील व्रतांत या व्रताचा समावेश दिसुन येतो. आश्विन व. चतुर्दशीला हनुमानजयंती करतात,