अलक्ष्मी : (लक्ष्मी नव्हे ती )
या देवीचे वर्णन आगम व विष्णुपुराण यांत आढळते. ती कृष्णवर्ण, रक्तनेत्र; द्विभुज, लांब नाकाची, स्तन व पोट मोठे असलेली, कमळ व काकध्वज धारण करणारी, बैलासारखी तोंड असलेली व कन्यापुत्रसहित असते. केरसुणी हे तिचे आयुध होय. शीतलादेवीचे स्वरूपही काही अंशी अलक्ष्मीसारखेच आहे. या वर्णनाशी जुळणार्या काही मध्ययुगीन शिल्पकृती.
हिचा फेरा आपल्या घरावर येऊ नये म्हणून काही ठिकाणी आश्विन शु. अष्टमीस महालक्ष्मीच्या पूजेआधी ज्येष्ठा या नावाने हिची पूजा करून घराबाहेर तिचे विसर्जन करतात. ही घरातून निघून जावी म्हणून काही ठिकाणी मागील दारी एक वात लावून ती घराच्या कोनाकोपर्यात फिरवून पुढील दारी आणुन टाकतात. हा प्रकार म्हणजे अलक्ष्मीला बाहेरची वाट दाखविणे होय. याच्याउलट बाहेर वात लावून ती घरात आणणे म्हणजे लक्ष्मीला घरात येण्याचा मार्ग दाखविणे, असे समजतात. बंगालमध्ये आश्विनी अमावस्येस शेणाची 'क्षणिका अलक्ष्मी' बनवून लक्ष्मीप्रमाणेच तिची पूजा करतात व मग तिचे विसर्जन करतात.
आश्विन अमावस्या
यादिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर देव, पितृ व पूज्य लोकांची पूज करून दूध, दही, तूप इ. ने श्राद्ध करावे. अपरान्हवेळी आपल्या गल्लीतील घरे स्वच्छ करवून घेऊन सुशोभित करावीत व विविध प्रकारचे गायन-वादन, नर्तन-कीर्तन इ. करून प्रदोषकाळी दिवाळी करून आप्तजन व संबंधितांसह मध्यरात्री निरीक्षण करावे. नंतर रात्रीच्या राहिल्या भागात जागरण करून सूप व डमरू जोराने वाजवून अलक्ष्मीला ( दरिद्रतेला ) हाकलावे.
* कौमुदी महोत्सव
वर वर्णन केलेल्या पद्धतीने मानसिक व शारीरिक दृष्ट्या ठाकठईक असताना दिवे प्रज्वलित करणे यासच हे नाव आहे. बलिपुराणानुसार व. एकादशी ते अमावस्येपर्यंत हे व्रत करतात.
* दीपावली
प्रज्वलीत पणत्या ओळी करून मांडल्या असता त्यांना 'दीपावली' व त्यांची वर्तुळाकार मंडले तयार केल्यास 'दीपमालिका' अशी नावे आहेत. दोन्ही नावांत एकच अर्थ समाविष्ट आहे. या व्रतेकरून
'आश्विने मास्यमावास्या तस्यां दीपप्रदीपनं ।
शालायां ब्राह्मण: कुर्यात् स गच्छेत् परमं पदम् ।'
या श्लोकाधारे मुक्ती ( परमपद ) मिळते. ब्रह्मपुराणात 'आश्विन महिन्यात अमावस्येस मध्यरात्री देवी लक्ष्मी सर्व लोकांच्या घराघरात संचार करते' असा उल्लेख आहे. म्हणून आपली घरे स्वच्छ, सुशोभित व पवित्र करून दिवे प्रज्वलित केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते व ती त्या घरात कायम वास्तव्य करते. या खेरीज पावसाळ्यात घाण, केरकचरा, कोळ्यांची जाळी, धूळ, दुर्गंध इ. दूर करण्याच्या दृष्टीनेही या दिवशी दिव्यांच्या रांगा अगर मंडले प्रज्वलित करावीत, हे आरोग्यदृष्ट्या हितकर होय. प्रदोषकाळापासून मध्यरात्रीपर्यंत टिकणारी ही तिथी श्रेष्ठ होय. अशी नसल्यास प्रदोषव्यापिनीच घ्यावी.
दर्शश्राद्ध :
दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.
* लक्ष्मीपूजन
आश्विन अमावास्येस म्हणजे दिवाळी दिवशी प्रात:स्नानादि नित्यकर्मे झाल्यावर
'मम सर्वापच्छान्तिपूर्वदीर्घायुष्यबलपुष्टिनैरुज्यादि सकल शुभफलप्राप्त्यर्थं गजतुरगरथराज्यैश्वर्यादि सकलसंपदाम् उत्तरोत्तराभिवृद्ध्यर्थं इंद्रकुबेरसहित श्रीलक्ष्मीपूजनं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून दिवसभर व्रत पाळावे व संध्याकाळी ( प्रदोषकाळी ) पूर्वोक्त विधींनी पुन्हा स्नान करून दिवे उजळावेत. दीपावली, दीपमालिका वा दीपवृक्ष बनवून खजिन्यात अगर कोणत्याही स्वच्छ, सुंदर, सुशोभित व शांत ठिकाणी वेदी तयार करावी. त्यावर स्वस्तिक काढावे. वेदीवर अगर पाटावर आठ दले अक्षतांनी रेखून त्यावर लक्ष्मीची स्थापना करावी.
'लक्ष्म्यै नम:', इंद्राय नम;', कुबेराय नम:'
या नावांणी प्रत्येकास वेगवेगळी अगर सर्वांस मिळून एकत्र पूजा करावी.
'नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरे: प्रिया ।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात्वद् अर्चनात् ।'
मंत्राने लक्ष्मीची;
'ऎरावत समारूढो वज्रहस्तो महाबल: ।
शतयज्ञाधिपो देवस्तस्मा इंद्राय ते नम: ।'
मंत्राने इंद्राची; तसेच
'धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च ।
भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपद: ।'
या मंत्राने कुबेराची प्रार्थना करावी. पूजा साहित्यात तर्हेतर्हेची मिठाई व साळीच्या लाह्या, उत्तमोत्तम फळे, फुले व सुगंधित धूपदीपादी उपचार असावेत. संपूर्ण दिवस ब्रह्मचर्यात राहून उपवास वा नक्त-व्रत करावे.
लक्ष्मीपूजनात लेखसाहित्यात पुढील वर्षाच्या जमाखर्चाच्या वह्या मांडून पूजा करण्याचा प्रघात व्यापारी व सावकार यांच्यात आहे व लक्ष्मी- पूजनानंतर शुभ्रवस्त्रे व अलंकार धारण करून ब्राह्मण, आप्तइष्टांसह भोजन करावे. रात्री घरात व घराभोवती दिवे लावून जागरण करावे. अर्धी रात्र उलटल्यावर स्त्रियांनी सुपे व ढोलकी वाजवून आपल्या घरातल्या अलक्ष्मीची हकालपट्टी करावी. पहाटे दिव्याच्या प्रकाशात भावांनी व आप्तेष्टांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारावे.
फल - लक्ष्मीपूजन केल्याने पूजकाच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते आणि त्याला दु:ख व दारिद्र्यबाधा होत नाही.
या दिवशी रात्री बळीच्या कारागृहातून विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांची मुक्तता केली व तो क्षीरसागरात जाऊन सुखाने झोपला.